मी पुन्हा येईन...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2019   
Total Views |

 

 
येणाऱ्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश मिळवायचे आहे, तो निर्धार त्यांनी ‘मी पुन्हा येईन... नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी’ या कवितेत व्यक्त केला आहे. असा निर्धार व्यक्त करायला काही गोष्टी लागतात.
 

महाराष्ट्र विधानसभेच्या अखेरच्या पावसाळी अधिवेशनाचे नुकतेच सूप वाजले. आता ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होतील आणि त्यानंतर नवीन सरकार अधिकारावर येईल. तेव्हा या अधिवेशनात विधानसभेला संबोधित करताना आपल्या शेवटच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कवितेच्या माध्यमातून आपला निर्धार व्यक्त केला.

ती कविता अशी -

मी पुन्हा येईन....

याच निर्धारानं, याच भूमिकेत,

याच ठिकाणी

नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी...

मी पुन्हा येईन....

गावांना जलयुक्त करण्यासाठी,

शहरांचा चेहरा बदलण्यासाठी

माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी

नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी...

मी पुन्हा येईन....

माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनविण्यासाठी

माझ्या बळीराजाचे हात

बळकट करण्यासाठी

नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी...

याच निर्धारानं, याच भूमिकेत,

याच ठिकाणी

प्रत्येक व्यक्तीची साथ घेत,

त्याचा हात हाती घेत

माझ्या महाराष्ट्राला एक नवं रूप देण्यासाठी

नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी...

मी पुन्हा येईन....

 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हा ते आपला कार्यकाळ पूर्ण करतील का, अशी शंका अनेकांच्या मनात होती. भाजपला पूर्ण बहुमत नव्हते. प्रारंभी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला. पण, ती धूर्तपणाची राजकीय चाल होती. देवेंद्र फडणवीस हे त्या चालीत फसले नाहीत. शिवाय शिवसेना रुसून बसली होती. शेवटी शिवसेनेने पाठिंबा दिला आणि शिवसेना सरकारमध्ये सामील झाली. शिवसेनेला सरकारमध्ये आणणे, हे एक अवघड आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. तेथे त्यांचे राजकीय कौशल्य पणाला लागले आणि ते यशस्वी झाले.

 

सत्तेत असूनही शिवसेनेने विरोधी पक्षाची भूमिका घेतली आणि आपल्याच सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. हे सर्व सहन करीत राहणे अवघड असते. सामान्य कार्यकर्त्याला हे आवडत नाही. त्याची अशी इच्छा होती की, शिवसेनेच्या फार नादी लागू नये आणि आपण आपल्या बळावर सत्तेत राहावे. शिवसेनेला डोक्यावर चढवून घेऊ नये. सामान्य कार्यकर्त्यांचे मत आणि ज्याला पक्ष व राज्य चालवायचे आहे, त्याचे मत यात अंतर पडते. घाईगर्दीने निर्णय करता येत नाही. अविचाराने तर मुळीच करता येत नाही. शिवसेनेला सहन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार चालविले. शिवसेना आणि भाजपमध्ये अनावश्यक कटुता निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली. शिवसेना पक्षप्रमुखांशी स्नेहाचे संबंध ठेवले. त्याचा परिणाम म्हणून लोकसभेसाठी शिवसेनेशी युती झाली. त्याचा लाभ दोन्ही पक्षांना झाला.

 

देवेंद्र फडणवीस यांच्यापुढील दुसरे आव्हान त्यांची ‘जात’ हे होते. एका बाजूला महाराष्ट्र पुरोगामी आहे, समतावादी आहे, बुद्धीवादी आहे, असा टेंभा मिरविणारे भरपूर लोक आहेत. हीच मंडळी प्रत्यक्षात मात्र गलिच्छ जातीय राजकारण करीत असतात. त्यांनी मुख्यमंत्र्यांची ‘जात’ काढण्याची संधी कधी सोडली नाही. ‘नवपेशवाई’, ‘ब्राह्मणशाही’, ‘पगडी आणि पागोटे’, असे सगळे विषय या काळात आलेले आहेत. ते कुणी आणले हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ‘मराठ्यांचे मराठीपण म्हणजे ब्राह्मणविरोध’ हे समीकरण याच लोकांनी बनविले. त्यांनी मोठ्या कौशल्याने आरक्षणाचा विषय पुढे आणून मराठ्यांचे मूक मोर्चे काढले. प्रचंड शक्तीप्रदर्शन केले. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या मूक मोर्चांवर कधी टीका केली नाही. त्यांच्या आरक्षणाच्या मागणीचा गंभीरपणे विचार केला. या मागणीचा विचार करण्यासाठी एक आयोग नेमला. त्याचा अहवाल शीघ्रगतीने पूर्ण करण्याचा आग्रह धरला. या अहवालाच्या आधारे विधिमंडळाचा कायदा केला आणि मराठ्यांना शिक्षणात आणि नोकऱ्यांत आरक्षण दिले. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी जुनी आहे. मराठा मुख्यमंत्री असताना ही मागणी पूर्ण झाली नाही. ब्राह्मण मुख्यमंत्र्याने मात्र ती पूर्ण केली. असे जातीचे उल्लेख करून लेखन करणे, हे माझ्या विचारधारेत बसत नाही. पण, ते या ठिकाणी प्रकर्षाने करावे लागेल. पुरोगामित्वाच्या नावाखाली जातीय राजकारण करणाऱ्यांना हीच भाषा समजते.

 

‘भाजप हिंदुत्ववादी, मुख्यमंत्री ब्राह्मण, त्यामुळे मनुचे राज्य आले,’ अशी ओरड दलित चळवळीतील अनेकांनी सुरू केली. त्यांच्या विचाराची झेप ब्राह्मणशाही आणि मनुवाद यांच्या पलीकडे जात नाही. मनुला ब्राह्मण विसरले, समाजाला मनुशी काही घेणेदेणे नाही आणि मुख्यमंत्री कोणत्या जातीचा आहे, याच्याशीही बहुसंख्य लोकांना काही घेणेदेणे नाही. ‘मनुवाद’ आणि ‘ब्राह्मणशाही’ या दोन शब्दांवर ज्यांची दुकानदारी चालते, त्यांचे तसे नाही. लोकांना त्याच्याशी काही घेणेदेणे असो अथवा नको, परंतु त्यांचे तुणतुणे मात्र तसेच वाजत राहते. महाराष्ट्रात शहरी नक्षलवाद्यांचे नवआव्हान उभे राहिले. पुण्यात झालेली एल्गार परिषद, भीमा-कोरेगावचा प्रश्न, त्यातून निर्माण झालेला महाराष्ट्रव्यापी हिंसाचार हा सगळा प्रश्न अतिशय नाजूक झाला. जानेवारी २०१८ मध्ये झालेला हिंसाचार देवेंद्र फडणवीस यांनी फार कौशल्याने हाताळला. रस्त्यावर उतरून दगडफेक करणार्यांना पोलिसांचे बळ वापरून काही तासांतच ठीक करता आले असते, पण त्यांनी संयम पाळला. राज्याच्या दंडशक्तीचा अतिरेकी वापर केला नाही. हा अतिरेकी वापर कसा होतो, हे समजण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १०१ जणांना आपला जीव गमवावा लागला, हा इतिहास समजून घ्यावा लागतो.

 

जातीय संघर्षाची कोठारे महाराष्ट्रात भरपूर आहेत. ब्राह्मण-ब्राह्मणेतर, मराठा विरोधी अन्य जाती, दलित विरुद्ध सवर्ण, मागासवर्गीय विरोधी मराठा, हिंदू-मुसलमान ही सर्व तणावाची कोठारे आहेत. सरकार अस्थिर करण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी या कोठारांना आगी लावण्याचे काम तथाकथित पुरोगामी राजकारणी करीत असतात. त्याला लोकांनी बळी पडू नये, याची काळजी करावी लागते. शासनाला अत्यंत सावध राहावे लागते. आपले गुप्तहेर खाते मजबूत ठेवावे लागते. देवेंद्र फडणवीस यांनी चुकूनही जातीय भूमिका घेतली नाही, सांप्रदायिक भूमिका घेतली नाही. केवळ एका वर्गाच्या हिताचा विचार केला नाही. ‘सर्वजनविकास’ याच मार्गाने ते वाटचाल करीत राहिले. आज असे म्हणावे लागेल की, त्यात ते शंभर टक्के यशस्वी झालेले आहेत. आता त्यांचे ब्राह्मणत्व जर कुणी काढले, तर लोक हसतील. आणि ते दलितविरोधी आहेत असे जर कुणी म्हणाले तर जनता त्याला वेड्यात काढेल. ते मुस्लीमविरोधी आहेत असा जर कुणी म्हणाला तर मुसलमानही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील ‘जनतेचे मुख्यमंत्री’ झाले आहेत. अशी प्रतिमा निर्माण करणे खरोखरच अवघड गोष्ट आहे. आजवर झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या-त्या जातीचे मुख्यमंत्री म्हणून विख्यात झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी ही सीमारेषा पार केली.

 

येणाऱ्या निवडणुकीत त्यांना यश मिळवायचे आहे, तो निर्धार त्यांनी ‘मी पुन्हा येईन... नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठीया कवितेत व्यक्त केला आहे. असा निर्धार व्यक्त करायला काही गोष्टी लागतात. पहिली गोष्ट आत्मविश्वास लागतो. आत्मविश्वास, विचारधारेच्या शक्तीतून येतो. आत्मविश्वास, आपलीच आपल्याला नीट ओळख होते त्याच्यातून होतो. निर्धार व्यक्त करायला दुसरी गोष्ट म्हणजे डोळ्यापुढे स्वप्न असावे लागते. सत्ता मिळवून करायचे काय, याचे चित्र समोर असावे लागते. कवितेत ते त्यांनी व्यक्त केले आहे. कुठे जायचे हे पक्के असेल, तर मार्ग आपोआप सापडतो आणि निर्धार व्यक्त करण्यासाठी तिसरी गोष्ट लागते, ती म्हणजे आपल्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास. राजकारण अतिशय वाईट असते. कोण कधी पाठीत खंजीर खुुपसेल, हे सांगता येत नाही. अशा सर्व सहकाऱ्यांच्या मनात सामूहिकतेची भावना निर्माण करावी लागते. देवेंद्र फडणवीस यांनी ती निर्माण केली आहे. आपल्या सहकाऱ्यांचा विश्वास त्यांनी जिंकला आहे. निर्धार व्यक्त करण्यासाठी विजयी होणार, यावर पूर्ण विश्वास असावा लागतो. हा विश्वास दुसऱ्या भाषेत जनविश्वास असतो. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि म्हणून मी विजयी होणार,’ असे आपोआप विधान येते.

 

देवेंद्र फडणवीस यांची निर्धार कविता ऐकल्यानंतर मला विं. दा. करंदीकर यांच्या, ‘आयुष्याला द्यावे उत्तर...’ या कवितेतील पुढील ओळी आठवल्या-

“असे जगावे दुनियेमध्ये,

आव्हानाचे लावून अत्तर,

नजर रोखूनी नजरेमध्ये,

आयुष्याला द्यावे उत्तर...

असे दांडगी इच्छा ज्याची,

मार्ग तयाला मिळती सत्तर,

नजर रोखूनी नजरेमध्ये,

आयुष्याला द्यावे उत्तर...

पाय असावे जमिनीवरती,

कवेत अंबर घेताना,

हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना...

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
@@AUTHORINFO_V1@@