वारकर्‍यांच्या सेवेसाठी आरोग्य दिंडी - सह्याद्री मानव सेवा मंच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2019
Total Views |



सह्याद्री मानव सेवा मंच,’ ठाणे ही संस्था गेली ३५ वर्षे मोफत वैद्यकीय सेवा, विविध प्रकारचे समाज सेवा कार्य, सातत्याने करीत आहे. ही सामाजिक संस्था समाजातील दुर्बल व दुर्लक्षित घटकांसाठी कार्य करते. सेवाभावी कार्य करण्याची तळमळ असलेले डॉक्टर्स व त्यांना साहाय्य करणारे अनेक कार्यकर्ते एकत्रित आले. दु:खी, पीडित, कुपोषित व सामान्य वैद्यकीय सेवांपासून वंचित असलेल्या आपल्या बांधवांना सक्रिय साहाय्य करण्याचा वसा त्यांनी उचलला.

 

डॉ. विश्वास सापटणेकर यांचा निवास ठाणे आणि लंडन या दोन्ही ठिकाणी असायचा. ठाणे आणि लंडन या दोन्ही ठिकाणी त्यांची रुग्णालये आहेत. वारकरी आणि वारी याबाबत डॉ. विश्वास यांना प्रचंड आत्मियता आणि उत्सुकता होती. तसेही आषाढ सुरू झाला की वारीचे वेध आणि वारीबद्दल कुतूहल वाटत नसेल, असा महाराष्ट्रात माणूसच विरळाच. मात्र, डॉ. विश्वास यांनी केवळ वारीबाबत आत्मियता ठेवली नाही. वारीला जाणारे खेड्यापाड्यातले श्रद्धाळू बांधव जात-पात-लिंग इ. भेदांना दूर ठेवतात, हे खरे अध्यात्मातील समरसतेचे दूत. त्यांचे कौतुक आणि अभिमान सगळ्यांनाच आहे. तरीही वारी करत असताना वारकर्‍यांनाही आरोग्याच्या समस्या येतात. उघड्या आभाळाखाली, अनवाणी चालताना, मिळेल ते खाताना, कुठेही पाणी पिताना त्यांना आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच खूप काळ चालल्याने पाय सुजणे, पायांना जखमा होणे किंवा अशक्तपणा जाणवणे अशाही आरोग्याच्या समस्या वारकर्‍यांना येऊ शकतात. अर्थात, विठूरायाच्या भक्तीत वारकरी इतके तल्लीन असतात की ते या सगळ्या समस्यांचा मुळीच बाऊ करत नाहीत. तरीही, त्यांना आरोग्याचा त्रास तर सहन करावाच लागत असेल, ही बाब लक्षात घेऊन डॉ. विश्वास हे वारकर्‍यांसाठी वारीदरम्यान आरोग्य तपासणी आणि मोफत आरोग्याचे शिबीर आयोजित करतात. त्यातूनच मग ‘सह्याद्री मानव सेवा मंच’ची स्थापना झाली.

 

संस्थेमार्फत चालवल्या जाणार्‍या उपक्रमांनी महाराष्ट्राच्या आरोग्य जीवनाचे वास्तवच दाखवले. मोरवाडा तालुक्यातील निबिड जंगलात वसलेले एक दुर्गम दुर्लक्षित गाव ‘देवबांध’ तेथील आदिवासींकरिता सुरुवातीच्या काळात तर दगडांवर बसून, रुग्णाला जमिनीवर झोपवून तपासणी व औषधोपचार केला जाई. तर कित्येकवेळा रूग्णांना झाडाला बांधून सलाईन लावण्यात येई. का? तर कित्येकांना एका ठिकाणी बसण्याची सवयच नव्हती. त्यामुळे एका ठिकाणी स्थिर राहावे यासाठी त्या रूग्णांनी स्वत:च ही शक्कल लढवलेली. यासाठी त्या आदिवासी रूग्णांचे नातवेाईक हौसेने पुढाकार घेत. या आदिवासी बांधवांच्या आरोग्याची तर काळजी संस्था घेतेच त्याशिवाय औषधोपचारांबरोबरच कपडे, पौष्टिक आहार, घरबांधणी, शिक्षण इत्यादींसाठी मदत संस्था करते. गेली कित्येक वर्षे संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी या गावात जाऊन सेवाकार्य करत आहेत. गावकर्‍यांमध्ये विविध योजनांबद्दल जागृती करत आहेत. त्यामुळे या गावाचे रूपडे बदलले आहे. आज तेथे छोटा दवाखाना, शाळा, मुला-मुलींसाठी वसतिगृह, छोटे, व्यापारी केंद्र सुरू झाले आहे. गावाचा कायापालट झाला आहे. अजूनही तेथे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी संस्थेचे डॉक्टर्स व कार्यकर्ते जाऊन नियमितपणे मोफत तपासणी व औषधोपचार करतात.

 

महाराष्ट्रातील सातशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या आषाढी वारीतसह्याद्री मानव सेवा मंचाचे डॉक्टर व कार्यकर्ते औषधे व वैद्यकीय सेवा लहान तंबूमध्ये छोटे दवाखाने उभारून पुरवत आहेत. त्याचा व्याप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तेथे औषधे, इंजेक्शन, जखमांना मलमपट्टी, सर्व प्रकारच्या सलाईन्स, दंतचिकित्सा, नाक-कान-घसा यावरील उपचार इतकेच नाही, तर छोटी ऑपरेशन्स व फ्रॅक्चर असल्यास प्लास्टरही केले जाते. दमलेल्या-थकलेल्यांना पाय दुखण्यावर मसाज करण्यासाठी तेलही दिले जाते. हे शिबीर वारीच्या मार्गावर टप्प्याटप्प्याने आठ ते दहा ठिकाणी उभारले जातात व १२-१२ तास अखंड सेवा दिली जाते.

 

सेवा मंच नेहमीच राष्ट्रीय आपत्तींमध्येही मदतीसाठी धावून जाण्यास तत्पर असतो. किल्लारी लातूरमधील भूकंप, भिवंडीतील दंगल, संगमेश्वर व जांभूळपाडा येथील पूर अशा आपत्कालीन स्थितीत जखमी व गरजूंना मदत पुरविली. महाराष्ट्रातील सह्याद्री घाटातील दुर्लक्षित आदिवासी पाडे व कोकणातील लहान वस्त्यांमध्येही वेळोवेळी अशीे शिबीरं घेतली जातात. महाराष्ट्राबरोबरच भारतातील उत्तर-पूर्व प्रदेशातील आसाम, नागालँड, मिझोराम, मेघालय येथील घनदाट जंगलातील, अतिदुर्गम व धोकादायक भागातही संस्थेचे डॉक्टर वैद्यकीय सेवेसाठी जाऊन पोहोचलेत. काश्मीर, लेह-लडाख, भूतान, प.बंगाल या भारताच्या सीमा भागांमधील खेड्यांमध्ये औषधोपचारांची जरूर असलेल्या धोकादायक भागांतही संस्थेचे डॉक्टर जातात. इतकेच नव्हे तर जागतिकस्तरावर निवड होऊन अत्यंत धोकादायक अशा ‘साऊथ सुदान’मधील प्रत्यक्ष युद्धभूमीवर वैद्यकीय व शल्यचिकित्सा सेवा देण्यास तब्बल अडीच महिने डॉ. विश्वास सापटणेकर जाऊन आले. ‘सह्याद्री मानव सेवा मंच’चा आवाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. समाजसेवेच्या या अखंड कार्यात अनेक सेवाभावी संस्था व कार्यकर्ते सामील होत आहेत.

 

समाज सेवा हीच देशसेवा व ईशसेवा’ आहे. त्यासाठी अर्थातच मनुष्यबळ व आर्थिक बळाची निकड जाणवते. आमचे कार्य आपण प्रत्यक्ष अनुभवा ही विनंती. धडाडीच्या तरुणाईने या कार्यात सहभागी व्हावे व दानशूरांनी ‘सह्याद्री मानव सेवा मंच’च्या या पवित्र कार्याला आर्थिक हातभार लावावा, ही कळकळीची विनंती. दानशूरांच्या देणगी रकमेवर ‘सेक्शन ८०’ खाली करात सवलत मिळेल.आदिवासी, वारकरी समुदायाबरोबरच पंढरपूरच्या विठ्ठलाचेही अखंड आशीर्वाद आपल्या पाठीशी असतील.

 

गेली १५ वर्षे वारीमध्ये संस्थेतर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करताना मी पाहत आले आहे की, दरवर्षी येणार्‍या वारकर्‍यांचा उत्साह कायमच तसाच असतो, त्यात बिल्कूल बदल नसतो. आरोग्य शिबिरामध्ये उपचाराला आलेल्या आजीला अजितने विचारले, “आजी, केव्हापासून वारीला येतेस?” आजी म्हणाली, “परकरी पोर होते तेव्हापासून.” यावर अजित म्हणाले, “मग विठू भेटला कधी?” यावर आजी म्हणाली,“लोकांच्या अडीनडीला गरजेला उभा राहणार्‍या प्रत्येकात माझा विठूच असतो. आतापण माझा उपचार करणारे हे डॉक्टर यामध्ये पण माझा विठू आहेच. तुम्ही पाहा तुम्हाला पण दिसेल.” वारकर्‍यांच्या श्रद्धा आणि शाश्वत मूल्यांची जाणीव प्रगल्भ असते, याची ही छोटीशी झलकच म्हणता येईल.

- अजित टिपणीस

 

आम्ही कामानिमित्त अहमदाबादला राहत होतो. पण माझे पती अजित यांचे मित्र डॉ. विश्वास सापटणेकर हे समाजकार्य करीत असतात अशी माहिती होती. त्यांच्याकडून त्या कार्याचे अनुभवही आम्ही ऐकत होतो. साधारण ३५ वर्षांपूर्वी सुरू झालेली ‘सह्याद्री मानव सेवा मंचही संस्था मानवतेच्या शाश्वत मूल्यांचा पुरस्कार करतच सुरू झाली. निवृत्तीनंतर पुण्याला परतल्यानंतर मात्र डॉ. विश्वास यांच्या सेवाकार्यामध्ये सहभागी होण्याची आंतरिक इच्छा मला आणि अजित यांना झाली. त्यातूनच मग आम्ही ‘सह्याद्री मानव सेवा मंच’शी जोडले गेलो. साधारण जानेवारी महिन्यात वारीच्या आरोग्य शिबिरांसंबंधीच्या तयारीची सुरुवात होते. आरोग्य शिबिरामध्ये सामिल होणारे डॉक्टर्स, नर्सेस, स्वयंसेवा यांच्याशी संपर्क केला जातो. आरोग्य शिबिरांमध्ये मोफत तपासणी आणि औषधे दिली जातात. ही औषधे काही सेवाभावी दानशूर संस्था व्यक्ती आम्हाला देतात. प्रत्यक्ष आरोग्य शिबिरासाठी ५० जणांचा गट कार्यरत असतो.

- मोहना टिपणीस

९८२३०८०६४६

संपर्क : डॉ. विश्वास सापटणेकर - ९१३६६००५८५

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@