शेवटची रात्र...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2019
Total Views |



राधेय आपल्या तंबूत पोहोचला आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु, त्याला झोप येईना. त्याचे हृदय धडधडत होते. कारण, त्याला माहिती होते उद्या त्याचा मृत्यू आहे. उद्या त्याला त्याच्या भावाशी लढा द्यायचा होता. भावाला ठार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करायचे होते. सर्व गोष्टी अनुकूल असत्या, तर ते काही कठीण काम नव्हते, पण त्याला हे अशक्य वाटत होते.

 

दुर्योधन राधेयवर नाराजच होता. कारण, त्याने अजून अर्जुनाचा वध केला नव्हता, शिवाय त्याने नकुलाला हाती सापडूनसुद्धा जीवंत सोडून दिले, हे पण पाहिले असावे. पण, तो राधेयवर खूप प्रेम करत होता म्हणून त्याला काही बोलला नाही. अर्जुन अजून जीवंत आहे हे पाहून आपल्या इतकेच दु:ख राधेयास होत असणार हे दुर्योधनाला माहिती होते. आपापल्या तंबूत जाण्यापूर्वी राधेयने दुर्योधनाचे हात प्रेमाने हातात घेतले आणि तो म्हणाला, “अर्जुन हा अतिशय कुशल योद्धा आहे आणि त्याचा सारथी त्याला मार्गदर्शन करतो. कृष्णामुळेच तो अजून जीवंत आहे. पण, मी तुला वचन दिल्याप्रमाणे उद्या मी माझी प्रतिज्ञा नक्कीच पूर्ण करीन.” यावरती दुर्योधनाने त्याचे हात प्रेमाने दाबले आणि म्हणाला, “राधेया, ते मला ठाऊक आहे.”

 

राधेय दुर्योधनच्या तंबूत कितीतरी वेळहोता. ते दोघे पुढच्या दिवसाच्या योजना आखत होते. पण, मनातून राधेयला माहिती होते की,त्याची दुर्योधनाबरोबरचीही शेवटची रात्र आहे. राधेय दुर्योधनाला म्हणाला, “दुर्योधना, उद्या एकतर मी अर्जुनाला मारून विजयी होईन किंवा तो माझा वध करेल. अर्जुन हा माझ्यापेक्षा कितीतरी वरचढ योद्धा आहे. मला बढाया मारता येत नाहीत. आम्हा दोघांकडे दिव्य अस्त्रे आहेत, पण दैवीकृपा आणि सामर्थ्य यात मी अर्जुनाहून खूप वरचढ आहे. मजकडे ‘विजय’ नावाचे धनुष्य आहे, जे गुरू भार्गव यांनी मला दिले आहे. अर्जुनाच्या ‘गांडिव’ धनुष्याहून ते नक्कीच श्रेष्ठ आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, मी उद्या तुला दिलेले वचन पूर्ण करेन...!

 

आता अर्जुन कसा श्रेष्ठ आहे तेही तुला सांगतो. अर्जुनाचे धनुष्य, त्याचा टणत्कार, त्याचा रथ, त्याचे घोडे दिव्य आहेत. त्याच्या ध्वजावर हनुमान विराजित आहेत. या विश्वाचा रक्षणकर्ता श्रीकृष्ण असून तो त्याच्या रथाचा सारथी आहे. माझ्याकडे चांगला सारथी नाही. जर शल्य माझा सारथी झाला, तर मी हे युद्ध जिंकू शकेन. पण, त्याचे मन वळवून त्याचा होकार घेणे फक्त तुलाच जमेल! तू मन वळविण्यात कुशल आहेस. तुला ती चांगली देणगी आहे.” दुर्योधनाने त्याला सांगितले की, तो शल्याचे मन वळवेल आणि राधेयाचा निरोप घेतला. पण, राधेयला मनातून माहिती होते की, ही त्याची शेवटची रात्र आहे. त्याचे पाय रेंगाळत होते. तो मागे वळला आणि दुर्योधनाकडे पाहून त्याला आलिंगन दिले. निरोप घेताना त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आपल्या मित्राचे हे निस्सिम प्रेम पाहून दुर्योधनपण गहिवरला आणि त्याच्याही डोळ्यांतून अश्रू आले.

 

राधेय आपल्या तंबूत पोहोचला आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु, त्याला झोप येईना. त्याचे हृदय धडधडत होते. कारण, त्याला माहिती होते उद्या त्याचा मृत्यू आहे. उद्या त्याला त्याच्या भावाशी लढा द्यायचा होता. भावाला ठार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करायचे होते. सर्व गोष्टी अनुकूल असत्या, तर ते काही कठीण काम नव्हते, पण त्याला हे अशक्य वाटत होते. आपला सारथी शल्य आणि अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण यांची बरोबरी कशी होणार? खरे तर शल्याला राधेय अजिबात आवडत नव्हता. युद्धाच्या शेवटी तो स्वत: आणि दुर्योधन मरणार, हे त्याला पक्के ठाऊक होते. शेवटी युधिष्ठिरच जगावर राज्य करणार हे त्याला कळून चुकले होते.

 

राधेयला आपल्या दोन्ही माता आठवल्या. राधेयला त्याचा खूप अभिमान होता आणि कुंतीचा कोमल स्पर्श, तिचे गोड पण उदास डोळे त्याला आठवले. त्याला भार्गव मुनींच्या आश्रमातील तो भुंग्याच्या दंश आठवला. त्याने त्याची मांडी फोडून टाकली होती, त्या जखमेची खूण अजून ताजी होती. जेव्हा कडोनिकडीची वेळ असेल तेव्हा तुला अस्त्रांचे दिव्यमंत्र आठवणार नाहीत, हे भार्गवांचे शब्द त्याला आठवले. आता उद्या त्याला खरोखर त्या मंत्रांची आवश्यकता होती. पण, ते तो विसरणार हे विधिलिखित होते. ‘ऐन युद्धाच्या वेळी तुझ्या रथाचे चाक चिखलात रुतून बसेल, हे त्या ब्राह्मणाचे शब्द पण त्याला आठवले. अशा असाहाय्य स्थितीमध्ये तो मारला जाणार होता. पण राधेयने या सर्व गोष्टींचे स्वागत करायचे ठरविले. कारण, इतकी वर्षे दु:ख भोगल्यानंतर युद्धात मृत्यू हीच जणू त्याची विश्रांती होती.

 

आता त्यालाआपल्या भावाच्या मुलाला थंडपणे मार’ असे कोणी सांगणार नव्हते; तो धनुष्याच्या टोकाने स्पर्श करून आपल्या सख्ख्या भावाचा अपमान करणार नव्हता आणि त्यांच्या डोळ्यांतील शरमेचे अश्रू पाहणार होता! त्या दिवशी नकुलाचा असा अपमान करणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. उद्या तर तो युधिष्ठिराशी पण लढणार होता आणि त्याचाही अपमान करणार होता. त्याने कुंतीला आश्वासन दिले होते की, तो पांडवांना मारणार नाही. पण त्याला असे वाटत होते की, तो हा शब्द पाळतो हे कुंतीस कळायला हवे, जे फक्त श्रीकृष्णाला कळले होते. भूतकाळातील अनेक घटना त्याच्या डोळ्यांसमोर तरळत होत्या आणि याचा त्याला आनंद होत होता. अशी त्याची शेवटची रात्र भारलेली होती! (क्रमश:)

 
 - सुरेश कुळकर्णी
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@