पक्षीसंवर्धनाची चिनी शक्कल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2019   
Total Views |




चीनच्या जिआंगमेंग शहरात जगातील पहिली हायस्पीड रेल्वे साऊंड बॅरियर
-ध्वनिरोधक बांधणी उभारण्यात आली आहे. ही बांधणी दोन किमी लांबीची असून त्यात ४२ हजार, २६० बॅरिअर लावण्यात आले आहेत. ३५५ किमी लांबीच्या हायस्पीड रेल्वे ट्रॅकचा हा एक भाग असून या एकूणच प्रकल्पासाठी १९२ कोटींचा खर्च झाला आहे. पण ही बांधणी का करण्यात आली?



पक्षी... निसर्गाने निर्माण केलेली सुंदर, आकर्षक आणि चित्तवेधक कलाकृती... जगात पक्ष्यांच्या हजारो जाती आढळतात. काही पाणपक्षी, काही स्थलांतर करणारे, काही समुद्री, काही रानावनांतच राहणारे, काही शहरी, काही झुंडीने तर काही एकेकट्याने जीवन जगणारे, काही जोडीदाराशी आयुष्यभर एकनिष्ठ असणारे, काही गाणारे, काही कर्कश्श आवाज करणारे, काही नृत्यनिपुण तर काही साधे-सरळ... किती म्हणून सांगता येतील, पक्ष्यांचे प्रकार! अर्थातच यातले काही पक्षी प्रत्येकाला आवडतात, तर काही निवडक लोकांना... माणसाचा पक्ष्यांशी संबंध खाण्याच्या बाबतीतही येतो. कोंबडी, इमू वगैरे पक्ष्यांचे मांस आणि अंडी कित्येकांच्या जिभेचे चोचले पुरवतात, तर यावर आधारित कुक्कुटपालन वगैरे व्यवसायही केले जातात. परंतु, पक्ष्यांशी माणसाचा संबंध केवळ खाण्यापुरताच येत नाही, तर तो इतरही अनेकप्रकारे येतो किंवा निर्माण केला जातो.

 

भारतासह जगभरात पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासणारी मंडळीही बरीच हौशी. काहींना तर घरात-पिंजर्‍यात पक्षी पाळण्याचीही आवड असते. तसेच काही संस्थांच्या माध्यमातून पक्षीगणनाही करण्यात येते, जेणेकरून संबंधित पक्ष्यांची आताची संख्या किती आहे, हे कळेल. अशा नानाविध पद्धतीने पक्ष्यांशी नाते जोडण्याचा, संबंध ठेवण्याचा उद्योग माणूस करत असतो. कधी कधी उन्हाने घेरी आलेल्या पक्ष्याला कोणीतरी मदत केल्याचे, त्याचे प्राण वाचवल्याचे, कशाला तरी धडकून जखमी झालेल्या पक्ष्यावर औषधोपचार केल्याचे अशा बातम्याही आपल्यासमोर येत असतात. त्यांची माहिती मिळाली की, संवेदनशील मनांना पक्ष्यांवरील संकटाची जाणीव होते. परंतु, वाढत्या औद्योगिकीकरणाचाही पक्ष्यांवर वाईट परिणाम होतो व त्यामुळे काही काही पक्ष्यांच्या जाती नामशेष झाल्याचे तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचेही विविध माध्यमांतून आपल्याला समजत असते. वाढते प्रदूषण-हवा, जल, ध्वनी-पक्ष्यांच्या अधिवासाला मारक ठरत आहे. अर्थात त्याविरोधात पक्षीतज्ज्ञ, पर्यावरणवादी, निसर्गप्रेमींकडून आवाजही उठवला जातो. काही वेळा आंदोलने होतात, सरकार वा प्रशासनाकडून काहीतरी आश्वासनही मिळते. त्यातून दोन्हीकडच्या लोकांचा पक्ष्यांप्रतिचा कळवळा किती हा संशोधनाचाच विषय.

 

सध्या मात्र पक्षीसंवर्धनासाठी चीन या अवाढव्य, परंतु हुकूमशाही-साम्यवादी-एकछत्री अमलाखालील देशाची चर्चा होत असून त्याला कारणही तसेच आहे. आपल्या आर्थिक विकासाच्या, धोरणांच्या अंमलबजावणीत जो आड येईल, त्याला दडपण्याचे धोरण चीन नेहमीच राबवत आला. जे देशांतर्गत तसेच काम चीनने आंतरराष्ट्रीय स्तरावरही केले. दक्षिण चीन समुद्र, तैवान, हाँगकाँगपासून ते चीनच्या कर्जाने बेजार झालेले अनेक देश हे त्याचेच उदाहरण. अशा चीनने पक्ष्यांच्या अधिवासाच्या, जीवन जगण्याशी संबंधित एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. चीनच्या जिआंगमेंग शहरात जगातील पहिली हायस्पीड रेल्वे साऊंड बॅरियर-ध्वनिरोधक बांधणी उभारण्यात आली आहे. ही बांधणी दोन किमी लांबीची असून त्यात ४२ हजार, २६० बॅरिअर लावण्यात आले आहेत. ३५५ किमी लांबीच्या हायस्पीड रेल्वे ट्रॅकचा हा एक भाग असून या एकूणच प्रकल्पासाठी १९२ कोटींचा खर्च झाला आहे. पण ही बांधणी का करण्यात आली? तर, यामुळे आवाजाला बाहेर जाण्यात अडथळा निर्माण होईल, जेणेकरून हायस्पीड रेल्वेचा वातावरणात जाणारा आवाज रोखला जाईल. पण असे का? तर रेल्वे रुळाच्या परिसरातील पाणथळ प्रदेशात राहणार्‍या ३० हजार पक्ष्यांना वाचवणे हा त्याचा उद्देश आहे.

 

वस्तुतः जिथे ही ध्वनिरोधक बांधणी केली आहे, तिथून ८०० मीटर अंतरावर एक बेट असून तिथल्या वृक्षांवर सुमारे ३० हजार पक्ष्यांची घरटी आहेत. रेल्वे रुळ व गाड्यांच्या आवाजामुळे या पक्ष्यांच्या अधिवासाला धोका पोहोचेल, अशी भीती वर्तविण्यात आली होती आणि त्याला इथल्या लोकांनी विरोधही केला होता. तसेच पक्ष्यांना वाचविण्याचा उपाय शोधावा, अशी मागणीही केली गेली. पुढे सरकारने हे उत्तर शोधले व तीन वर्षांत ही ध्वनिरोधक बांधणी उभारली. दरम्यान, तांत्रिक विशेषज्ज्ञांच्या मते ही बांधणी १०० वर्षांपर्यंत टिकेल आणि त्यावर वादळ-वार्‍याचाही परिणाम होणार नाही. सोबतच यामुळे आवाज ०.२ डेसिबलपर्यंत मर्यादित राहिल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले. आता यामुळे इथले पक्षीवैविध्य वाचेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@