वन विभागाची 'अरण्यकन्या'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2019   
Total Views |




वृक्षसंपदेचा बेकायदेशीरपणे र्‍हास करणार्‍या आणि वन्यजीव गुन्ह्यांमधील आरोपींच्या बेधडकपणे मुसक्या आवळणारी वन विभागाची 'अरण्यकन्या' म्हणजे वन परिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे...

 

वन विभागासारख्या पुरुषांची मक्तेदारी असणार्‍या विभागात 'त्या' आज एक सक्षम अधिकारी म्हणून पाय रोवून खंबीरपणे उभ्या आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पहिल्या महिला अधिकारी म्हणून त्या ओळखल्या जातात. कर्तव्यदक्ष आणि कार्यशील अधिकारी म्हणून वन विभागातील महिला कर्मचारी आणि अधिकार्‍यांचे त्या प्रतिनिधित्व करतात. अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली. वृक्षसंपदेचा बेकायदेशीरपणे र्‍हास करणार्‍या आणि वन्यजीव गुन्ह्यांमध्ये हात असलेल्या आरोपींच्या त्या बेधडकपणे मुसक्या आवळतात. वन विभागाची ही 'अरण्यकन्या' म्हणजे वन परिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे!

 

नाशिकमधील कळवण येथे दि. ९ एप्रिल १९८४ रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात कल्पना यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब सर्वसामान्य असले तरी शिक्षणाप्रति रूची असलेले होते. त्यामुळे शैक्षणिक पातळीवर कल्पना यांना घरच्यांचा भक्कम पाठिंबा मिळाला. शैक्षणिक पातळीवर उत्तम कामगिरी करत असल्याने आपण वेगळ्या वाटांचा मागोवा घ्यावा, याची आस नेहमीच त्यांच्या मनी होती. म्हणूनच चाकोरीबाहेरच्या क्षेत्रात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काम करण्याचा निश्चय त्यांनी मनोमन पक्का केला. पुण्यातील कृषी महाविद्यालयात त्यांनी आपले बी.एस्सीपर्यंत पदवीचे शिक्षण पूर्ण केले. २०११ मध्ये त्यांनी एमपीएससीची परीक्षा दिली. वन विभागाच्या सेवेत रुजू होण्यासाठी त्यांनी २०१३ ते २०१५ या कालावधीत प्रशिक्षण घेतले. सप्टेंबर, २०१५ मध्ये त्या वन विभागाच्या सेवेत दाखल झाल्या.

 

त्यांना पहिल्यांदाच काम करण्याची संधी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात मिळाली. त्यावेळी प्रकल्पात वन कर्मचारी सोडल्या, तर अधिकारीपदावर एकही महिला अधिकारी कार्यरत नव्हती. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पात काम करणार्‍या कल्पना पहिल्या महिला वनाधिकारी ठरल्या. अमरावती सर्कलच्या अकोट परिक्षेत्राच्या वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून त्या काम करू लागल्या. अवैध शिकार, वृक्षतोड, गुरांची चराई अशा महत्त्वाच्या समस्या त्यांना डोळ्यांदेखत दिसत होत्या. त्यांनी या अवैध कामांविरोधात कारवाईचा सपाटा लावला. त्यावेळी त्यांच्या हाताखील १६ महिला वन कर्मचारी काम करत होत्या. कल्पना यांनी प्रथम त्यांना प्रोत्साहन देऊन बेधडकपणे काम करण्याची नवी ऊर्जा प्राप्त करुन दिली. प्रकल्पामध्ये रात्रीच्या वेळी बेकायदा वृक्षतोड फोफावली होती. साग आणि चंदनाच्या झाडांची तोड रात्रीच्या वेळी 'गुपचुप' चाले. त्यामुळे त्यांनी रात्री जंगलात गस्ती घालण्यास सुरुवात केली. त्यासाठी विशिष्ट अंतरावर कॅम्प तयार केले. त्यामध्ये वन कर्मचारी नेमून त्यांच्या मदतीने त्या गस्ती घालू लागल्या. वृक्षतोड करणार्‍या आरोपींना त्यांनी रंगेहाथ पकडले. मात्र, यादरम्यान अनेकदा आरोपींनी महिला अधिकारी पाहून हल्ला किंवा झटापट केल्याची आठवण कल्पना आवर्जून सांगतात. अशा वेळी साहसी वृत्तीने सामना केल्याने वृक्षतोड करणार्‍या टोळीवर त्यांचा जरब बसला.

 

व्याघ्र प्रकल्पात घडणार्‍या मानव-वाघ संघर्षाला त्याठिकाणी होणारी गुरेचराई काहीअंशी कारणीभूत आहे, हे जाणून कल्पना यांनी मेळघाटात कार्यरत असताना वन क्षेत्रातील गुरेचराईला आळा घातला. सध्या त्या कल्याण तालुक्यात कार्यरत आहेत. या ठिकाणीदेखील त्यांनी कामाचा सपाटा लावला आहे. शहरी भागात वन विभागासमोर असणारी मोठी समस्या म्हणजे अतिक्रमणाची. कल्पना या कल्याणमध्ये कार्यरत झाल्यानंतर वन विभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले निदर्शनास आले. त्यांनी ताबडतोब कारवाईचा बडगा उगारत तीनशेहून अधिक अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त केल्या. विशेष म्हणजे, या माध्यमातून त्यांनी विभागाचे आठ हेक्टर क्षेत्र मोकळे केले. मोकळ्या झालेल्या जागेवर भीती असते ती म्हणजे, पुन्हा अतिक्रमण होण्याची. त्यामुळे कल्पना यांनी शक्कल लढवली. विभागाने हाती घेतलेल्या ३३ कोटी वृक्षारोपणाअंतर्गत मोकळ्या झालेल्या जागेवर वृक्षारोपण करून घेतले. याशिवाय वन्यजीवांच्या तस्करीकडेही त्यांनी विशेष लक्ष दिले.

 

अंधश्रद्धेपोटी आजही मांडूळ सापाची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कल्याणमध्येही त्याचे प्रमाण अधिक आहे. म्हणून त्यांनी मांडूळ सापांची तस्करी करणार्‍या तस्करांची धरपकड सुरू केली. भविष्य सांगणार्‍या ज्योतिषांकडून पोपटांची सुटका करण्याचे कामही त्यांनी हाती घेतले आहे. पुरुषांची मक्तेदारी असणार्‍या क्षेत्रात आज कल्पना निर्भीडपणे कार्यरत आहेत. भविष्यात वन विभागात येऊ पाहणार्‍या महिलांसाठी त्या आदर्श आहेत. प्रामाणिक आणि बेधडकपणा अंगी असल्यामुळे त्या आज यशस्वी वनाधिकारी आहेत. त्यांच्या भविष्यातील कामाला दै. 'मुंबई तरुण भारत' कडून शुभेच्छा...!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@