मुस्लीम जगताचाच दुटप्पीपणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2019   
Total Views |

 

 
 

मुसलमानांवर अनन्वित अत्याचार करणार्‍या चीनविरोधात का मग कुठल्याही मुस्लीम देशाला, दहशतवादी गटांना जिहादपुकारावासा नाही वाटला? का चीनमधील उघूर मुसलमानांवरील छळकथा अजून इस्लामिक देशांच्या वेशीपर्यंत पोहोचलेल्या नाहीत? या प्रश्नांची उत्तरं सापडणार नाहीत, कारण जेव्हा विषय चीनचा येतो, तेव्हा विषय हा केवळ आणि केवळ पैशाचा असतो, त्यामध्ये मग धर्म आपसूकच दुय्यम स्थानी फेकला जातो.

 

धर्महितापेक्षा व्यापारहितच सर्वोपरी असते, याची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचिती आली. कारण ठरले ते चीनमधील उघूर मुस्लिमांविरोधातील अन्यायाला वाचा फोडणारे एक पत्र. तब्बल २२ देशांच्या राजदूतांनी स्वाक्षरी करून संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार समितीला चीनमधील उघूर मुसलमानांवर होणार्‍या अत्याचारांविरोधात सविस्तर पत्र लिहिले. पण, धक्कादायक बाब म्हणजे, या २२ देशांमध्ये एकाही मुस्लीम देशाचा समावेश नाही. त्यामागचे कारणही तसे स्पष्टच. कारण, बहुतांशी मुस्लीम देशांना चीनने व्यापारीदृष्ट्या आपल्या कवेत घेतले आहे. यामध्ये काही आफ्रिकन देशांचाही समावेश आहे. पण, जगातील ५० मुस्लीमबहुल किंवा ४५ स्वत:ला इस्लामिक देशम्हणून मिरवणार्‍या एकाही देशाने या विरोधात कधी आवाज उठवल्याचे ऐकीवात नाही. त्यामुळे हाच प्रश्न उपस्थित होतो की, हे मुसलमान देश चीनमधील मुसलमानांना त्यांचे खर्‍या अर्थाने भाईजानमानतच नाही का? मुस्लीम देशांनीच अशाप्रकारे मुद्दाम उघूर मुसलमानांच्या दडपशाहीकडे कानाडोळा करणे मग गैरइस्लामिक का म्हणू नये? मुसलमानांवर अनन्वित अत्याचार करणार्‍या चीनविरोधात का मग कुठल्याही मुस्लीम देशाला, दहशतवादी गटांना जिहादपुकारावासा नाही वाटला? का चीनमधील उघूर मुसलमानांवरील छळकथा अजून इस्लामिक देशांच्या वेशीपर्यंत पोहोचलेल्या नाहीत? या प्रश्नांची उत्तरं सापडणार नाहीत, कारण जेव्हा विषय चीनचा येतो, तेव्हा विषय हा केवळ आणि केवळ पैशाचा असतो, त्यामध्ये मग धर्म आपसूकच दुय्यम स्थानी फेकला जातो. व्यापारी हितसंबंधांपुढे मग इस्लामिक एकतेची बांग दूर कुठे तरी विरून जाते. चंद्राला एकाएकी चिनी ग्रहण लागते आणि पसरतो तो फक्त नैतिक अंध:कारच!

 

ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, जपान, आईसलँड यांसारख्या २२ बहुसंख्य ख्रिस्तीबहुल देशांनी चीनच्या उघूर मुसलमानांविरोधातील अत्याचाराला वाचा फोडली. यामध्ये युरोपीय देशही खासकरून अग्रेसर आहेत. पण, मक्का-मदिनेच्या पाक रियासतीची दुहाई देणार्‍या सौदी अरेबियानेही या विरोधात ब्रही काढू नये, याचेच आश्चर्य वाटते. चीनच्या ताटाखालचे मांजर असलेल्या पाकिस्तानकडून तर यासंदर्भात अपेक्षा नाहीच. त्यातही ज्या २२ देशांनी चीनविरोधात आवाज बुलंद केला, त्यांचे चीनशी व्यापारी संबंध नाही, असेही नाही. पण, केवळ आणि केवळ मानवतावादाच्या मुद्द्यावर या देशांनी चीनला लक्ष्य केले. पण, ४५ पैकी एकाही इस्लामिक देशाला या विषयाचे गांभीर्य समजले नाही, यापेक्षा मुद्दाम आंधळेपणाचे सोंग करत याकडे डोळेझाक करणेच या या देशांनी अधिक सोयीस्कर मानले. असे हे मुखात वारंवार अल्लाहचे नाव घेणारेच चीनमधील अल्लाहच्या बंद्यांच्या साहाय्यासाठी तसूभरही पुढे सरसावले नाही, यातच सर्व काही आले. या विरोधात सोशल मीडियावरही जगभरातील मुसलमानांनी इस्लामिक एकतेची खिल्ली उडवत या मुस्लीम देशांच्या निष्क्रियतेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. पण, या इस्लामिक देशांनी त्यांच्या देशातील नागरिकांचीही कधी गय केली नाही, तर चीनच्या मुसलमानांविरोधात त्यांना जिव्हाळ्याचा पान्हा फुटेल, ही अपेक्षाच मुळी फोल ठरावी. परंतु, जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीरचा विषय पुढे येतो, तेव्हा मात्र हीच इस्लामिक राष्ट्रे भारतावर तोंडसुख घेण्याची आयती संधी दवडत नाही. भारताने काश्मीरचा विषय कसा हाताळावा, सैन्याचा वापर करू नये वगैरे अक्कलपाजळणी सुरू होते. मात्र, चीनच्या उघूर मुसलमानांचा विषय येताच, हेच देश शेपूट घालून मोकळे झाले. जवळपास १० लाखांवर उघूर मुसलमानांची शैक्षणिक शिबिरांच्या नावाखाली चीनने मोठ्या संख्येने धरपकडीचा मार्ग अवलंबला. त्यांची बायोमेट्रिक माहिती बळजबरीने संकलित करणे, मशिदींवर हातोडा मारणे अशाप्रकारे इस्लामपासून परावृत्त करण्यासाठी चीनने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कित्येकांचे रक्तही सांडले.

 

शिनजियांग प्रांतातशिबिरांच्या नावाखाली छळछावण्याच चीनने सुरू केल्याचे मानवतावादी संघटनांनी केलेल्या सर्वेक्षणांतून उघडकीस आले. पण, चीन हे अत्याचार मान्य करायला तयार नसून उलट रशिया, पाकिस्तान, ओमान, म्यानमार, कतार, कुवेत, सीरिया यांसारख्या बहुसंख्य मुस्लीम देशांच्या राजदूतांच्या स्वाक्षरीचे दुसरे पत्र चीनने संयुक्त राष्ट्रांना पाठवले. त्यामध्ये चीनने उघूर मुसलमानांच्या विकासासाठी राबविलेल्या योजना आणि चीनच्या मानवतावादाचा स्तर उंचावणार्‍या उपाययोजना यांचे कौतुक वाचायला मिळते. असा हा मुस्लीमजगताच्या दुटप्पीपणाचा बुरखा आधीच फाटला असून अशा प्रकारांमुळे इस्लामिक एकतेला धक्का तर लागलाच आहे, पण मुळात मुसलमानांचा धर्मबांधिलकीवरून विश्वासच उडाला, तर आश्चर्य वाटायला नको.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@