विक्रमांची रणरागिणी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2019
Total Views |


 


धावण्याच्या स्पर्धात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरांवर अनेकानेक पदके पटकावणार्या द्युती चंदचीओळख आता विक्रमांची रणरागिणी अशी झाली आहे. जाणून घेऊया भारताच्या याच धावपटूविषयी...


इटलीतील जागतिक युनिव्हर्सिटी गेम्समध्ये भारताची धावपटू द्युती चंदने नुकतीच सुवर्णपदकाची कामगिरी केली. आत्तापर्यंत या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणे कोणाही भारतीयाला शक्य झालेले नाही. भारतीयांच्या विजेतेपदाचा दुष्काळ द्युतीने संपवला. त्यामुळे विक्रमांची रणरागिणी म्हणून आता तिची ओळख झाली आहे. द्युती चंद ही मूळची ओडिशातील. ३ फेब्रुवारी, १९९६ रोजी ओडिशातील जजपूर या गावी तिचा जन्म झाला. घरात आई-वडिलांसह एकूण सहा भावंडे. घरची परिस्थितीही बेताची. वडील पारंपरिक शेतकरी. काबाडकष्ट केल्यावर कसेबसे दिवसातून दोन वेळचे पोट भरायचे. गरीब कुटुंब असल्याने इतर भावंडांप्रमाणे शिक्षण पूर्ण करून एखादी सरकारी नोकरी करावी, असा कुटुंबाचा आग्रह. त्यामुळे द्युतीचेही प्रयत्न याच दिशेने सुरू होते. द्युतीची मोठी बहीण सरस्वती हीदेखील एक धावपटू. कुटुंबाला हातभार लागावा यासाठी सरकारी नोकरी मिळवण्याचे तिचे लक्ष्य. खेळाडूंना सरकारी नोकरीत जाण्याच्या संधी मिळतात हे माहीत झाल्यावर तिने दररोज धावण्याचा सराव सुरू केला. शाळा, जिल्हास्तरावर शर्यती जिंकून तिने सरकारी नोकरीसाठी आपले प्रयत्न सुरू ठेवले. आपल्याप्रमाणे द्युतीनेही प्रयत्न करावे, असे तिला वाटायचे. महागडे खेळ आवाक्याच्या बाहेर. त्यामुळे द्युतीला प्रेरणा देत तिने धावण्याचा सराव सुरू करण्यास सांगितले. द्युतीने मोठ्या बहिणीच्या सांगण्यानुसार धावण्याचा सराव सुरू केला. जिद्द आणि चिकाटीने सराव करत ती दररोज धावू लागली. धावण्यात द्युती तरबेज असल्याचे सरस्वतीने ओळखले आणि पाचवीत असतानाच तिला एका सरकारी स्पोर्ट्स अकॅडमीची परीक्षा देण्यास सुचवले. सरकारी अ‍ॅकॅडमी असल्याने धावपटूंचे राहणे, खाणे आणि शिक्षण मोफत असल्याने द्युतीला ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे होते. अ‍ॅकॅडमीची ही परीक्षा सहज यशस्वी करत द्युतीने धावपटू होण्याचा आपला प्रवास येथून सुरू केला. मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत शाळा, तालुका आणि जिल्हास्तरावर तिने पदके पटकावलीच; मात्र, आपल्या उत्तम कामगिरीचा धडाका तिने तसाच सुरू ठेवत राज्यस्तरावरही यश मिळवले. राष्ट्रीय क्रीडा मंत्रालयाने या कामगिरीची दखल घेत तिची निवड राष्ट्रीय स्तरावर केली. आशियाई स्पर्धेसाठीही तिची निवड झाल्यानंतर ती सर्वत्र प्रकाशझोतात आली.

 

आंतरराष्ट्रीय स्तरावरील द्युतीच्या पदकांची किमया पाहता आता तिचा हात धावण्यामध्ये कुणीही पकडू शकणार नाही. विविध देशांच्या स्पर्धांमध्ये द्युतीने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई केली आहे. द्युतीने नुकत्याच इटली येथे सुरू असलेल्या जागतिक युनिव्हर्सिटी गेम्समध्ये १०० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक स्वत:च्या नावावर केले. तिने ११.३२ सेकंदांच्या वेळेसह ही विक्रमी कामगिरी केली. यंदाच्या युनिव्हर्सिटी स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. शिवाय या जागतिक स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली. आतापर्यंत एकाही भारतीय खेळाडूला युनिव्हर्सिटी गेम्समध्ये १०० मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीतही पात्रता मिळवता आली नव्हती. त्यामुळे तिचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. २०१४ साली द्युतीने तैपेईतील २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावत भारताचे नाव उज्ज्वल केले. याच स्पर्धेतील ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीतही तिने अव्वल येण्याचा मान मिळवत आणखी एका सुवर्णपदकाची कमाई केली. तिची ही यशस्वी वाटचाल सुरूच राहिली आणि द्युतीने २०१६ साली दोहा येथे झालेल्या एशियन इनडोअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत ६० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताला कांस्यपदक मिळवून दिले. गेल्या वर्षी इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या १०० आणि २०० मीटर अशा दोन्ही स्पर्धांमध्ये रौप्यपदकांची कमाई केली. तिच्या नावावर आत्तापर्यंत दोन सुवर्णपदके, दोन रौप्य आणि पाच कांस्यपदके आहेत.

 

द्युतीला आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात संघर्षही करावा लागला आहे. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकच्या नियमांनुसार 'इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन'ने महिला अ‍ॅथलिटसाठी 'हायपर अ‍ॅण्ड्रोजेनिझम' ही चाचणी लागू केली होती. या चाचणीची द्युती चंद बळी ठरली. टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण जर वाढले असेल तर ती किंवा तो खेळाडू बंदीस पात्र राहील, असा नियम त्यावेळी आड आला. द्युतीच्या गुणसूत्रांत टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण नैसर्गिकरीत्या वाढलेले होते. नियमामुळे तिचे ऑलिम्पिकचे स्वप्न भंगले. मात्र, या परिस्थितीतही द्युती खचली नाही. तिने आपला लढा पुन्हा जोमाने सुरू केला. द्युतीने हायपर अ‍ॅण्ड्रोनिझम धोरणालाच 'कॅस'मध्ये (कोर्ट अ‍ॅर्बिट्रेशन फॉर स्पोर्टस) आव्हान दिले. 'कॅस'मध्ये जाण्याचे धाडस आजपर्यंत कोणत्याही खेळाडूने केले नव्हते. मात्र, द्युतीने मांडलेल्या मुद्द्यांवरून 'कॅस'ने हे मान्य केले की, महिला खेळाडूंमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण पुरुषपातळीएवढे असले तरी, त्यामुळे त्या महिला खेळाडूला फायदा होऊ शकतो हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे 'कॅस'ने 'हायपर अ‍ॅण्ड्रोनिझम'ची चाचणीच दोन वर्षांपर्यंत स्थगित केली. या लढ्याचा द्युतीला तर फायदा झालाच; मात्र, जगभरातील अनेक महिला धावपटूंसाठीही हा निर्णय नवसंजीवनी देणारा ठरला. द्युती चंदमुळे जगातील सर्वच महिला अ‍ॅथलिट्सना या निर्णयाचा फायदा मिळाला. थोडक्यात म्हणजे, द्युतीने जगातील सर्वच महिला अ‍ॅथलिट्सना 'स्त्रीत्व' बहाल केले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 
रामचंद्र नाईक
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@