जगभरात लैंगिक गुन्ह्याला बळी पडणार्या केवळ मुली-महिलाच नसतात, तर त्यात काही महिन्यांच्या बाळापासून ते १५ वर्षांपर्यंतच्या बालकांचाही समावेश होतो. शिवाय अशा गुन्ह्यात कित्येकदा तो करणारे गुन्हेगार संबंधित पीडिताच्या अवतीभवती वावरणारे, आसपासचेच कोणीतरी असतात. बालके तर अशा विकृत मानसिकतेच्या लोकांचे लवकरच सावज होतात. कारण, प्रतिकाराची किमान क्षमता, भीती-धाकदपटशा दाखवून प्रकरण दाबता येईल, याची खात्री आदी कारणांनी लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार सातत्याने वाढत असल्याचेच दिसते. ‘युनिसेफ’ने २०१४ साली जारी केलेल्या एका आकडेवारीनुसार २ ते १७ वर्षे वयोगटातील तब्बल एक अब्ज बालके दरवर्षी कसल्या ना कसल्या लैंगिक शोषणाला-अत्याचाराला सामोरे जातात; मग ते शारिरीक, भावनिक किंवा अन्य कुठल्याही प्रकारचे असो. जगातल्या पाचपैकी एक महिला आणि तेरापैकी एक पुरुष आपल्या बालपणी अशा प्रकारच्या शोषणाला बळी पडल्याचेदेखील ही आकडेवारी सांगते.
बालकांविरोधातील लैंगिक गुन्हे थोपविण्यासाठी विविध देशांनी वेगवेगळे कायदे आणि शिक्षेच्या तरतुदीही केलेल्या आहेतच. पण कायदा असा हवा की, त्याची जरब बसली पाहिजे, जेणेकरून शिक्षेच्या भीतीनेच कोणी गुन्हा करू धजावणार नाही. सध्या अशाच एका कायद्याची चर्चा होताना दिसते-ते म्हणजेच युक्रेन या पूर्व युरोपीय देशांतील नवे विधेयक. युक्रेनच्या संसदेत नुकतेच बालकांविरोधातील कोणत्याही अत्याचाराच्या-बलात्काराच्या गुन्ह्यांतील दोषींना नपुंसक करण्याच्या शिक्षेची तरतूद असलेले विधेयक मांडण्यात आले. या विधेयकानुसार कोणी व्यक्ती बाललैंगिक शोषणात दोषी आढळला तर संबंधित आरोपीला नपुंसक करणारे इंजेक्शन टोचले जाईल.
वैद्यकीय भाषेत या प्रक्रियेला ‘केमिकल कॅस्ट्रॅक्शन’ असे म्हणतात. आता युक्रेनच्या संसदेने हे विधेयक मंजूर केले तर अशा आरोपींना दरवर्षी हे इंजेक्शन दिले जाईल. तसेच हे इंजेक्शन १६ ते ६५ वर्षांदरम्यानच्या आरोपींना लावण्याचेही या विधेयकात प्रस्तावित आहे. दरम्यान, अशाच प्रकारचा कायदा अमेरिकेतील अलाबामासारख्या काही राज्यांत पूर्वीपासूनच लागू आहे. युक्रेनमधील अधिकृत आकडेवारीनुसार केवळ २०१७ या एका वर्षात देशभरात बालकांवरील बलात्काराची ३२० प्रकरणे समोर आली, परंतु बालकांविरोधात एकूण अत्याचारांची संख्या हजारोंच्या पटीत आहे. चालू आठवड्यातच तिथल्या पोलिसांतर्फे असेही सांगितले गेले की, एकाच दिवसांत बालकांवरील बलात्काराची सुमारे पाच प्रकरणे समोर आली.
तथापि, या प्रकरणांत गुन्हेगाराने दाखवलेल्या सर्व प्रकारच्या भीतीला झुगारून पालकांनीदेखील याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती, हे महत्त्वाचे. कारण बर्याचदा पालकही अशावेळी दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्यास कचरतात, जे टाळले पाहिजे. सोबतच नव्या विधेयकानुसार बालकांविरोधात लैंगिक अत्याचार करणार्या गुन्हेगारांचे एक नोंदणीपुस्तकही तयार केले जाईल. या पुस्तकात सर्वच दोषींची माहिती नोंदविण्यात येईल. इतकेच नव्हे तर युक्रेनियन पोलीस या प्रकरणांत शिक्षा भोगलेल्या गुन्हेगारांवर आयुष्यभर नजरही ठेवणार आहेत. शिवाय नव्या कायद्यानुसार बालकांवरील बलात्कारात दोषी असलेल्यांना १२ वर्षांऐवजी १५ वर्षांपर्यंत गडाआड राहावे लागेल. याच काळात त्यांना दरवर्षी नपुंसकतेचे इंजेक्शन देण्यात येईल. या इंजेक्शनमुळे पुरुषांतील टेस्टेस्टिरॉनची निर्मिती बंद होते व संबंधित व्यक्तीची लैंगिक क्षमता घटत जाते. अर्थात, याचा प्रभाव ही इंजेक्शन ज्या काळापर्यंत दिली जातात तोपर्यंतच असतो. दरम्यान, अशा प्रकारच्या शिक्षेच्या भीतीने तरी बालकांविरोधातील लैंगिक अत्याचार व बलात्काराला आळा बसेल, अशी आशा करूयात.