समर्थांची थोरवी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2019
Total Views |

 
 
 
समर्थ रामदास स्वामींच्या रूपाने एक भव्य, दिव्य, उत्कट, विवेकी असे हिमालयाएवढे उत्तुंग व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राला लाभले, याचा आम्हाला अभिमान वाटायला हवा. मुसलमानी साम्राज्य काळात असे व्यक्तिमत्त्व हिंदुस्थानातील इतर प्रांतांना लाभले नाही. रामदासांसारखा तत्त्वज्ञ व शिवरायांसारखे धाडसी राजकीय व्यक्तित्त्व यांच्या संयोगाने महाराष्ट्राने वैभवाचे दिवस पाहिले. छत्रपती शिवाजी महाराजांना माणसांची उत्तम पारख होती. महाराजांनी रामदास स्वामींची योग्यता जाणली होती. शिवरायांनी आपले राज्य रामदासांच्या झोळीत टाकल्याची कथा सांगितली जाते. अशावेळी या नि:स्पृह गोसाव्याने ते राज्य शिवरायांना परत केले. या आख्यायिकेतील तथ्य तपासण्याइतपत पुरावे उपलब्ध नसले, तरी या कथेतून एवढे मात्र नक्की अनुमान काढता येते की, शिवाजींचे आणि स्वामींचे संबंध जिव्हाळ्याचे होते. स्वामी आपल्या महंतांद्वारा हिंदुस्थानभर करीत असलेल्या कार्याची माहिती शिवरायांना होती.
 
 
 
हिंदूंनी स्वराज्याची स्थापना आणि जुलमी राजसत्तेचा नायनाट हे जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय होते, तसेच ध्येय समर्थ रामदास स्वामींचेही होते. समान ध्येयाने प्रेरित झालेले हे दोन महान पुरुष एकत्र न येतील तरच नवल. तीर्थाटनाच्या १२ वर्षांच्या काळात स्वामी अशाच राजाच्या शोधात होते. अखेरीस तो त्यांना महाराष्ट्रात शिवाजींच्या रूपाने गवसला. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासाठी स्वामिनिष्ठ माणसे घडवण्याच्या कामाला समर्थ लागले. श्रेष्ठ मूल्यांची जपणूक करून समाजातील माणसांची मने त्यासाठी तयार करण्याचे कार्य स्वामींनी आरंभले होते. हिंदू संस्कृतीतील श्रेष्ठ मूल्यांची जाणीव स्वामींना तत्कालीन समाजात जोपासायची होती. महान विचारवंत योगी अरविंद म्हणतात, “प्राचीन भारतीय संस्कृतीतील श्रेष्ठ मूल्ये पुन्हा भारतीयांच्या जीवनात प्रतिष्ठित केली तरच आपली उन्नती करता येईल.” समर्थ रामदास स्वामींनी आरंभलेले कार्य याहून काही निराळे नव्हते. हिंदू संस्कृतीतील श्रेष्ठ मूल्ये स्वामींना जपायची होती. हिंदुस्थानभर मठस्थापना करून आपल्या महंतांद्वारा या कार्याची सुरुवात स्वामींनी तीर्थाटन काळापासून केली होती.
 
 

स्वामींनी दासबोध ग्रंथात मूर्खांचे व पढतमूर्खांचे अनेक नमुने दाखवून शहाण्या माणसाने त्या मूर्ख लक्षणांचा जाणीवपूर्वक त्याग करावा, असे सांगितले आहे. सद्विधा निरूपण व इतर अनेक समासांतून विवेकाचे महत्त्व सांगून समाजातील शहाण्या माणसाच्या अंगी कोणते गुण असावेत, हे स्पष्ट केले आहे. स्वराज्याला अनुकूल असा आदर्श बलशाली, चारित्र्यसंपन्न माणूस घडवण्याचे कार्य स्वामींनी आरंभले होते. महंतांद्वारा सार्‍या हिंदुस्थानभर लोकोद्धाराचे प्रचंड कार्य करून म्लेंच्छांची सत्ता उलटवून ‘उदंड जाहले पाणी । स्नानसंध्या करावया ॥’ असे सुराज्य जिकडे तिकडे करावे, अशी त्यांनी मनिषा होती. स्वामींच्या ठिकाणी प्रचंड उत्साह होता. ते अत्यंत साक्षेपी होते. आळसाचा त्यांना तिटकारा होता. ते संतप्रवृत्तीचे होते. डोंगरदर्‍यात एकांतात राहणे त्यांना आवडे. पण, तरीही लोकोद्धाराची तळमळ त्यांच्या ठायी होती. लोकसंग्रहाची त्यांना आवड होती. धर्माच्या सात्त्विक पातळीवर त्यांना सज्जनांची संघटना उभारायची होती. समर्थांच्या आयुष्याचा आलेख हा प्रचंड उद्योगाचा आणि चढत्या यशाचा होता. ते दृढसंकल्पवादी, साक्षेपी व विवेकी असल्याने यश त्यांच्यासमोर हात जोडून उभे असे. त्यांनी प्रयत्नवादाचा पुरस्कार केला. नि:स्पृह महंत तयार करून हिंदुस्थानात ठिकठिकाणी आपल्या कार्यासाठी पाठवून दिले. एवढा प्रचंड व्याप सांभाळत असूनही त्यांना आपल्या कार्याचा, आपल्या ज्ञानाचा यत्किंचितही गर्व नव्हता. उच्च आध्यात्मिक विचारांचा तसेच प्रापंचिकांनाही मार्गदर्शन करणारा दासबोधासारखा ग्रंथ लिहून झाल्यावर त्याचे कर्तृत्व ते स्वतःकडे घेत नाहीत. ‘हे सर्व जगदिशाने केले’ असे सांगून ग्रंथाचे संपूर्ण श्रेय ते भगवंताला देतात.

  

सकळ करणे जगदिशाचें ।

आणि कवित्वचि काय मानुष्याचें ।

ऐशा अप्रमाण बोलण्याचें ।

काय घ्यावें ॥ (दा. २०.१०.३५)

 

सतराव्या शतकात सर्व क्षेत्रात जी क्रांती घडून आली, त्यात समर्थांचा सहभाग लक्षणीय होता, हे कुणी नाकारू शकत नाही. कुठल्याही क्रांतीसाठी समाज संघटित करावा लागतो. एका ध्येयाने प्रेरित होणारे समाजघटना एकत्र बांधण्याचे कार्य आपण समजतो, तेवढे सोपे नाही. शिवाय त्या संघटनेची उभारणी चारित्र्यमूल्यांसह व नीतिमूल्यांवर करून संघटन अबाधित राखणे व त्याचा उपयोग लोकांच्या उद्धारासाठी करणे, असे भव्य ध्येय साकार करण्यासाठी समर्थ झटत होते. हिंदुस्थानभर शेकडो मठांची स्थापना करून स्वामींनी आपल्या कार्याची पूर्वतयारी करून ठेवली होती. समर्थांच्या या खर्‍या सामाजिक कार्याची जाणीव थोड्याच समर्थशिष्यांना आहे. पूर्वीच्या आचार्यांनी अनेक वर्षे निवृत्तीमार्गाचा उपदेश करून संसारविमुखता समाजाच्या हाडीमासी मुरवली होती. परमार्थ मार्गातले ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे तत्त्वज्ञान परमार्थात उन्नती करण्याच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे असेलही; परंतु ते तत्त्वज्ञान प्रपंचात ऐहिकात शिरल्यामुळे राजकीय आकांक्षा बोथट होत गेल्या. आपला मित्र कोण, आपला शत्रू कोण ही ओळखच नाहीशी व्हायची वेळ आली. पाणी जसे सज्जन, दुर्जन, कपटी, हिंस्र अशा सर्व प्राण्यांची तहान भागवते, वृक्ष जसा त्याच्या फांद्या छाटणार्‍यालाही मधुर फळे खाऊ घालतो, दमलेल्या सर्व श्रान्तांना सावली देतो. त्यात आपपर भाव असत नाही. असे आपण वागावे. संसार करणे हे पाप आहे, अशी ही समाजात रुजलेली विचारसरणी नष्ट करून ऐहिक आकांक्षा, स्वराज्य साम्राज्य, राष्ट्राची उभारणी, राष्ट्रहिताची जाणीव, लोकोद्धाराची तळमळ, त्यासाठी अपार कष्ट करण्याची तयारी, हे प्रपंच विज्ञान लोकांना सांगायचे होते. समर्थांनी प्रपंचाची महती सांगितली. प्रपंच बुडाला तर परमार्थही बुडेल असे पटवून दिले. लोकांना दुबळे करेल, असे तत्त्वज्ञान बाजूला सारून त्यांना धनुर्धारी राम आणि इकडचा पर्वत तिकडे नेण्याचे सामर्थ्य असणार्या स्वामिनिष्ठ हनुमानाची उपासना सांगितली. दैववादाने दुबळ्या झालेल्या समाजाला त्यांनी ‘यत्न तो देव जाणावा’ ही नवी विचारसरणी दिली.

 
 
 
राष्ट्रप्रेमाची जाणीव समाजात निर्माण करून ‘महाराष्ट्रधर्म’ ही नवी संकल्पना समाजात पोहोचवण्याचे कार्य समर्थ करीत होते. त्यासाठी त्यांच्या दृष्टीसमोर फक्त महाराष्ट्र नव्हता, तर अख्खा हिंदुस्थान होता, हे त्यांनी नेमलेल्या महंतांवरून व ठिकठिकाणी उभारलेल्या मठांवरून स्पष्ट दिसते. समर्थांनी ‘महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे’ हे स्वप्न साकार करून दाखवले. समर्थांचे हे राष्ट्रपूरक तत्त्वज्ञान त्याकाळी नवे होते. तथापि, समर्थांच्या ‘दासबोध’ ग्रंथात या नवीन विचारसरणीचे, तत्त्वज्ञानाचे सविस्तर विवेचन फारसे आढळत नाही. दासबोध ग्रंथात शिष्यांच्या परमार्थविषयक शंकांचे निरसन व त्यावर उपदेश करण्यात सारा ग्रंथ खर्ची पडतो. समर्थांची नवी विचारसरणी, प्रपंचाचे विज्ञान शोधून काढावे लागते. त्याकाळी या नव्या तत्त्वज्ञानावर त्यांनी प्रवचने, कीर्तने केली असतील. आपल्या अमोघ वाणीने त्यांनी जनमताचा ओघ राष्ट्रीय जाणिवेकडे संस्कृतीरक्षणाकडे, क्षात्रतेजाकडे वळवला, हे सर्वविदीत आहे. थोर विचारवंत, प्रसिद्ध लेखक डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे लिहितात, “संघटना, प्रयत्नवाद, तर्कनिष्ठा, विवेक ही तत्त्वे अशी आहेत की, समाजाला त्यांचे पूर्ण आकलन व्हावयास हवे असेल, तर त्या प्रत्येक विषयावर एकेक दासबोध लिहिणे आवश्यक आहे.” डॉक्टरसाहेबांचे हे म्हणणे योग्य आहे. त्याला मी पुस्ती जोडीन की, ‘आणि त्यासाठी समर्थांसारखा सिद्धहस्त, साक्षेपी ग्रंथकर्ताच हवा!’

(क्रमश:)

 -सुरेश जाखडी
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@