भाजपच्या पाच कार्यकर्त्यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2019
Total Views |



कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान सुरू झालेला हिंसाचार अजूनही सुरूच आहे. निवडणुकांचा निकाल लागल्यानंतरही पश्चिम बंगालमध्ये सातत्याने राजकीय हिंसाचार सुरूच आहे. शनिवारी रात्री उशिरा पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांदरम्यान झटापट झाली, यात पाच जण ठार झाल्याची माहिती आहे. त्यानंतर भाजपने आरोप केला की, “आमच्या पाच कार्यकर्त्यांची तृणमूल काँग्रेसच्या लोकांनी गोळ्या घालून हत्या केली.” दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने आरोप केला की, “आमच्याही एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे.”

 

भाजप नेते मुकुल रॉय यांनी या घटनेनंतर सांगितले की, “तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी संदेशखली येथे आमच्या चार कार्यकर्त्यांची हत्या केली. शिवाय भाजप कार्यकर्त्यांविरोधातील हिंसेसाठी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी थेट जबाबदार आहेत.” असा आरोपही त्यांनी केला. मिळालेल्या माहितीनुसार मुकुल रॉय यांनी अमित शाह यांची भेट घेऊन त्यांना बंगालमधील घटनेबद्दल सांगितले. घटनेचे गांभीर्य पाहून गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि गृहसचिव राजीव गौबा यांना राज्य सरकारशी चर्चा करण्याचे निर्देशही दिले.

 

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बशीरहाट लोकसभा मतदारसंघातील संदेशखली भागात भाजपचा झेंडा हटविण्यावरून तृणमूल काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये वादाला सुरुवात झाली. पुढे हाच वाद अधिक वाढला आणि दोन्ही गटांत हाणामारीला सुरुवात होऊन संपूर्ण परिसर एखाद्या रणक्षेत्रात बदलला. याचवेळी जोरदार गोळीबारही करण्यात आला. तृणमूल काँग्रेसच्या लोकांनी केलेल्या गोळीबारात सुकांत मंडल, प्रदीप मंडल आणि तपन मंडल व आणखी एका भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, तर अनेक कार्यकर्ते जखमीही झाले. सोबतच शंकर मंडल, देवदास मंडल, संजय मंडल आणि त्यांचे यांचे जावई असे १८ जण घटना घडल्यापासून बेपत्ता आहेत. पोलिसांनी मात्र या घटनेत आतापर्यंत भाजपचे २ आणि तृणमूलच्या तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

 

अमित शाह यांनी मागितला अहवाल

 

भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, “केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्य सरकारकडे झाल्या प्रकाराचा अहवाल मागितला आहे. केंद्र सरकार या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहत असून यामुळे जनतेत प्रचंड नाराजी निर्माण झाल्याचेही विजयवर्गीय यांनी सांगितले. दुसरीकडे आसनसोलचे खासदार आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी ट्विट करत,“आता बंगालच्या जनतेने सर्वांना ओळखले असून लवकरच तृणमूल काँग्रेसचा अंत होईल,” असे म्हटले आहे.

 

भाजप खासदार जाणार संदेशखलीला

 

दरम्यान, मुकुल रॉय यांनी असेही सांगितले की, “भाजपच्या खासदारांचा एक गट सोमवारी संदेशखली येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी करेल. तिथून परतल्यानंतर खासदार एका अहवाल तयार करून केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवणार आहेत. तसेच आम्ही या हत्याकांडाचा लोकशाही मार्गाने विरोध करणार आहोत,” असेही रॉय यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आजदेखील भाजपच्या सात खासदारांसह एका आमदाराने घटनास्थळाचा दौरा केल्याचे समजते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@