'बक्सा'ची यात्रा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2019
Total Views |



ईशान्य भारतातील बक्सा व्याघ्र प्रकल्प आणि त्यात बागडणाऱ्या रंगीबेरंगी फुलपाखरांच्या दर्शनाचे हे अनुभवचित्रण...


रात्री साडेदहा वाजता आम्ही गुवाहाटीच्या मुख्य रेल्वेस्थानकात डास आणि घाणेरडा वास यांचा सामना करत उभे होतो. गुवाहाटीवरून आम्हाला न्यू अलीपूरद्वारला घेऊन जाणारी 'कांचनजंगा एक्सप्रेस' फलाटावर यायला अजून अवकाश होता. पण, त्या कुबट वातावरणात भरगच्च सामानासह वेळ काढणे, हे आम्हाला खूपच कठीण जात होते. गुवाहाटी हे आसाम राज्यातील मोठे शहर असूनही त्याचे रेल्वेस्थानक अजिबात स्वच्छ नव्हते. अकरा वाजता 'कांचनजंगा एक्सप्रेस' स्थानकात शिरली आणि त्यात असलेली गर्दी पाहून माझ्या मनात धडकी भरली. आम्ही एकूण पाच जण आणि त्यात मोठ्या बॅगा घेऊन खचाखच भरलेल्या 'कांचनजंगा'मध्ये कसे चढावे, हा मोठाच प्रश्न निर्माण झाला होता. आता हे सगळं दिव्य करायला आम्ही मुंबईतून गुवाहाटीला गेलो तरी का होतो? तर याला कारण फक्त एकच होतं ते म्हणजे, बक्सा व्याघ्र प्रकल्प आणि त्यात बागडणारी ईशान्य भारतातली रंगीबेरंगी फुलपाखरं. पण, सध्या आमच्यासमोर आरक्षित सीट असूनही आपल्याला किमान बसायला तरी जागा मिळेल की नाही, हा मोठाच पेच होता. बॅगांची ढाल करून आम्ही डब्यात घुसलो. डब्यात अक्षरशः अंदाधुंदी माजली होती. सीट नंबर शोधत आम्ही आमच्या जागेवर पोहोचलो. तिथे आधीपासून बसलेल्या माणसांना उठवलं आणि ते लगेच उठलेही. निदान टेकवण्यापुरती जागा मिळाल्याने मी सुटकेचा निःश्वास टाकला. सामान पायाखाली ठेवले आणि आज रात्रभर झोप काही मिळत नाही असा विचार करून 'बक्सा.. बक्सा..' असा जप मनात सुरू केला. नशीबाने 'कांचनजंगा' वेळेत सुटली. बाहेर गारवा असल्याने आतमधल्या गर्दीचा फारसा त्रास जाणवत नव्हता. पण, अनोळखी प्रदेश आणि त्यात सामान बरोबर असल्याने मला डोळे मिटायची भीतीच वाटत होती. फारशी वेगात नसली तरीही 'कांचनजंगा' पळत होती आणि परेश, सर्वेश, प्रतीक्षा आणि गार्गी हे माझे सहप्रवासी बॅगेची उशी करून केव्हाच झोपी गेले होते. मी मात्र 'सिक्युरिटी गार्ड' असल्याप्रमाणे जड झालेले डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न करून सगळ्यांच्या सामानावर लक्ष ठेवून होतो. मध्यरात्र उलटून गेली आणि माझाही थोडावेळ डोळा लागला. पहाटे साडेतीनला जाग आली तेव्हा न्यू अलीपूरद्वार स्थानक अजूनही दोन तासांच्या अंतरावर होते. या सगळ्या भानगडीत मला मोठा धडा हा मिळाला की, सगळ्याच 'टू एस' वर्गाच्या सीट्स 'जनशताब्दी'च्या रथासारख्या नसतात. शेवटी एकदाचे साडेपाच वाजले आणि गाडी न्यू अलीपूरद्वारला येऊन थांबली. ईशान्य भारतात असल्यामुळे साडेपाच वाजूनही सूर्य कधीच उगवला होता. उत्तरेला बक्सा व्याघ्र प्रकल्पाचे डोंगर आणि त्यापलीकडे दिसणारा हिमालय पाहून रात्रीच्या प्रवासाचा शीण कधीच पळून गेला. आमचा टूर गाईड, कुणाल चक्रवर्तीला यायला अजून वेळ असल्याने वेटिंग रूमच्या भानगडीत न पडता, आम्ही सरळ चहाची टपरी गाठली आणि आम्लेट पावसोबत चहाची लज्जतदार न्याहारी उरकून घेतली. बक्सा व्याघ्र प्रकल्प हा पश्चिम बंगाल राज्याच्या उत्तर दिशेला हिमालयाच्या कुशीत ७६० चौरस किमी पसरलेला व्याघ्र प्रकल्प आहे. अलीपूरद्वार जिल्ह्यात असलेल्या या जंगलाची सीमा उत्तरेला थेट भूतानला जोडलेली आहे. पूर्वेला मानस राष्ट्रीय उद्यान, पश्चिमेला जलदापारा वन्यजीव अभयारण्य, उत्तरेला सिंचुला पर्वतरांग आणि भूतानमधील फिबसू वन्यजीव अभयारण्य आणि दक्षिणेला गंगेचे विस्तीर्ण खोरे अशा संपन्न भागांनी बक्साचे जंगल वेढलेले आहे. आशियाई हत्तींच्या आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये हे जंगल अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. १९८३ साली स्थापन केलेल्या या राखीव जंगलात ३०० हून अधिक पक्षी, भारतीय वाघ, हत्ती, सांबर असे सस्तन प्राणी, अगणित वृक्षराजी आणि ३५० हून अधिक वेगवेगळ्या जातीची फुलपाखरे आढळतात. याच फुलपाखरांसाठी आम्ही निसर्गवेडे लोक एवढ्या लांब आलो होतो. सकाळी सहा वाजता चक्क ऊन पडले होते आणि 'पेल ग्रास ब्ल्यू' फुलपाखरे आजूबाजूला बागडायला लागली होती. आयतीच संधी म्हणून आम्ही थोडेसे 'बर्डिंग'ही उरकून घेतले. सातच्या सुमारास कुणालबाबू त्याच्या ड्रायव्हरसकट सुमो घेऊन आले आणि आम्ही बक्साच्या जंगलात जायला मार्गस्थ झालो.

 

अलीपूरद्वार शहरापासून बक्सामध्ये प्रवेश करण्याचे ठिकाण जवळजवळ २२ किमी दूर आहे. अलीपूरद्वार शहर मागे टाकल्यावर बक्सामधील पर्वतरांगा अजूनच जवळ दिसत होत्या. वातावरण स्वच्छ असल्याने त्यांच्यामागे हिमाच्छादित शिखरेही दिसत होती. बर्फाळलेल्या पर्वतांचे हे मला झालेले पहिले दर्शन. थोड्याच वेळात आम्ही बक्साच्या चेकपोस्टवर पोहोचलो. कुणालने आम्हा सर्वांचा परवाना आणि प्रवेशशुल्क अशी औपचारिकता पूर्ण केली आणि त्यानंतर आम्ही आमच्या यादीमधील पहिल्या जागी म्हणजे 'राजाभातखावा' या ठिकाणी जायला निघालो. 'राजाभातखावा' हे नाव कूच बिहारच्या राजाच्या नावावरून पडले. तो राजा या निसर्गरम्य परिसरात भोजन करायला यायचा म्हणून या जागेला सगळेजण 'राजाभातखावा' म्हणू लागले! न्यू जलपायीगुडी ते समुक्तला रोड या मार्गावरचे हे एक महत्त्वाचे रेल्वेस्थानक. निसर्गाचे खरे सौंदर्य अनुभवायचे असेल तर पावसाळ्यात या रेल्वेमार्गावरून प्रवास करायलाच हवा. नशीब जोरावर असेल तर एखादा हत्तींचा कळपही आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर 'राजाभातखावा' आल्यावर कुणालने आम्हाला सुमोमधून खाली उतरवले आणि जवळच्याच एक ओढ्यावर नेले. एप्रिलचे दिवस असूनही ओढ्याला खूप पाणी होते. ओढ्याच्या आजूबाजूला सर्वत्र हिरवीगार झाडी होती आणि त्यात वेगवेगळी फुलपाखरे, चतुर उडत होते. मागे निळे निरभ्र आकाश, सर्वत्र हिरवेगार गवत, मध्येच असलेली निलगिरीची उंचच उंच झाडे, त्यात चरणाऱ्या गाई आणि झाडांवर लटकलेली ऑर्किडची रंगीत फुले हे सगळे पाहताना युरोपमध्येच गेल्याचा भास होत होता. 'राजाभातखावा'च्या ओढ्यात आम्हाला फक्त ईशान्य भारतात आढळणारे अनेक चतुर आणि टाचण्या मिळाल्या. 'हिमालयन बाथ व्हाईट' हे फुलपाखरू मी पहिल्यांदा इथेच पाहिले. इतरही अनेक फुलपाखरांचे मनसोक्त फोटो काढताना वेळ कसा निघून जात होता, ते कळतच नव्हते. शेवटी कुणालने आग्रह करून सर्वांना नाश्त्यासाठी बाजूच्या टपरीवर बोलावले. आदल्या दिवशी कुणालने फोन करून 'आप सब लोगोंको पोहा और दही चलेगा ना?' असे विचारले होते. पश्चिम बंगालमध्ये जाऊन पोहे खायला मिळणार या विचाराने मी खुश झालो होतो. पण, कुणालच्या पोह्यांमध्ये 'कांदेपोहे' हा शब्द नसल्याचे माझ्या लक्षातच आले नव्हते. नाश्ता करायला बसल्यावर आमच्यासमोर आले ते भिजवलेले पोहे आणि मोठी वाटी भरून गोडे दही! असा काही प्रकार पुढ्यात येईल याची अजिबात कल्पना नसल्याने आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसलो होतो आणि कुणालने तिकडे पुढ्यातले पोहे दह्याबरोबर ओरपायला सुरुवातही केली होती. शेवटी ज्या भागात जाणार त्या भागातले 'ऑथेंटिक लोकल फूड' खायचे, या नियमानुसार आम्हीही ते 'दहीपोहे' ओरपायला सुरुवात केली. गोडे दही असल्याने चव मात्र मला आवडली. त्यानंतर अनिवार्य असलेला चहा आला. बंगाली लोकही खूप चहावेडे असतात. बक्साच्या जंगलात राहायला गेल्यावर फक्त चहा प्यायला म्हणून कुणाल आम्हाला बक्सामधून 'राजाभातखावा' असे अकरा किमी घेऊन यायचा! चहाच्या दोन फेऱ्या झाल्यावर आम्ही जयंती नदीपाशी असलेल्या आमच्या 'होम स्टे'कडे जायला निघालो. आम्ही यायच्या आधीच कुणालने सर्वांसाठी 'होम स्टे' बुक करून ठेवला होता. राजाभातखावाहून जयंती गाव सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर आहे. दोन गावांच्या मध्ये कोणतेही गाव नाही. रस्ता दुतर्फा गर्द झाडीने वेढलेला. रस्त्यावरची वाहतूक अगदी तुरळक, सामान घेऊन जाणारा एखादा छोटा टेम्पो किंवा आमच्यासारख्या पर्यटकांची एखादी जीप एवढीच काय ती वर्दळ. ईशान्य भारतात अजूनही टिकून असलेल्या जंगलांपैकी या जंगलातून जात असताना एक वेगळीच मजा येत होती. इथली वनसंपदा एवढी समृद्ध आहे की, या रस्त्यावर बऱ्याचदा हत्तींचे येणेजाणे असते आणि कित्येकांना हे गणराज पटकन समोर येऊन सरप्राईज देतात. मात्र, आम्हाला असे काही सरप्राईज मिळाले नाही. फक्त वाटेत एका ठिकाणी पाणी सांडलेले होते आणि त्यावर फुलपाखरांचा थवा चिखलपानाला बसला होता, तेव्हा आम्ही गाडीतून खाली उतरून फोटो काढत होतो. रात्री या रस्त्यावरून जायला परवानगी नाही. कारण, रात्री आठ वाजले की बक्साचे दरवाजे बंद होतात आणि कुणालाही आत प्रवेश मिळत नाही. शिवाय वनखात्याची माणसे अंतर्गत रस्त्यांवरून नेहमी गस्त घालत असतात.

 

 
 

सुमारे वीस मिनिटांनी आम्ही जयंती गावात येऊन पोहोचलो. 'जयंती' नदीच्या नावावरून या गावालाही 'जयंती' हे नाव पडले आहे. गावाला लागूनच जयंतीचे विस्तीर्ण पात्र आहे. उन्हाळा असल्याने नदीला फारसे पाणी नव्हते. पांढऱ्या दगडगोट्यांनी भरलेल्या रूंद नदीपात्राच्या मधोमध छोटासा प्रवाह होता. नदीपात्राच्या पलीकडे उत्तरेस लगोलग सिंचुला पर्वतरांग सुरू होत होती आणि त्यापलीकडे भूतानची निसर्गरम्य भूमी होती. जिकडे पाहावे तिकडे फक्त हिरवा रंग. फक्त काही ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे कोसळलेल्या डोंगरांची माती दिसत होती. जयंतीला 'क्वीन ऑफ दुआर्स' असेही म्हटले जाते. मध्यपूर्व हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या भागाला 'दुआर' म्हणतात. असे काही दुआर पश्चिम बंगाल आणि आसपासच्या प्रदेशात आहेत. बक्सा दुआर हा त्यापैकीच एक प्रदेश. जयंती हे बक्सामधील एक प्राचीन गाव. पुरातन काळात या जंगलातून भूतानला रेशीममार्ग जात असे. या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी जवळच्याच एका टेकडीवर एक किल्ला बांधण्यात आला होता. ब्रिटिशांनी त्या किल्ल्याचे रूपांतर कारागृहात केले. अंदमानच्या सेल्युलर जेलनंतर बक्साचा किल्ला हा अतिदुर्गम कारागृह म्हणून ओळखला जाई. इंडो-भूतान सीमेवर उगम पावणारी गदाधर नदी पर्वतांतून खाली आली की, 'जयंती' म्हणून ओळखली जाते. जयंतीचे महाकाय पात्र किमान पाचशे मीटरपेक्षा नक्कीच मोठे असावे. दर पावसाळ्यात जयंतीला पूर येतो आणि आपल्याबरोबर डोंगरातील माती आणून आजूबाजूचा परिसर सुपीक बनवतो. सारखे पूर येऊन जयंती नदीवर असलेला पूल आता मातीखाली गेला आहे. त्या पुलाचा फक्त वरचा भाग दिसत असल्याने येथे कधीकाळी पूल होता, हे आपण म्हणू शकतो. जयंती गावाची लोकसंख्या फारशी नाही. जंगलपर्यटनामुळे जवळपास प्रत्येक घरात 'होम स्टे' आहेत. जयंतीच्या काठावर दोन-तीन रिसॉर्टही झाली आहेत. गावाचे पुरापासून रक्षण व्हावे म्हणून जयंतीच्या काठावर बांध घातलेला आहे. या बांधावरून हल्ली पाणी गेलेले नाही, असे गावातले लोक सांगतात. गावात जवळपास साऱ्या जुजबी सुविधा आहेत. रोज सकाळी अलीपूरद्वारहून गावात बस येते. एअरटेल आणि व्होडाफोन कंपनीला जयंती गावात रेंज आहे. बक्सा टूर गाईड्सच्या जीप, पर्यटक, वनखात्याचे कर्मचारी आणि स्थानिक गावकरी यांनी गावातील मुख्य चौक दिवसा गजबजलेला असतो. जयंती गावात 'प्रजापती' नावाच्या 'होम स्टे'मध्ये आमचे वास्तव्य होते. फुलपाखरांना स्थानिक भाषेत 'प्रजापती' म्हणतात. प्रजापतीच्या खोल्यांमध्ये सामान ठेवून आम्ही बक्सामधील आमच्या पहिल्या फुलपाखरू भ्रमंतीसाठी सज्ज झालो. ज्या ठिकाणी आम्ही जाणार होतो, त्या ठिकाणाचे नाव होते 'संत्राबारी'! 'संत्राबारी' हे नक्की काय प्रकरण आहे, हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न कुणालने लगेच दूर केला. संत्राबारीचे खरे नाव 'संथालबारी'. या ठिकाणी खरोखरच संत्र्याची झाडे आहेत. 'संथाल'चा अपभ्रंश होऊन 'संत्राबारी' हे सुटसुटीत नाव असलेली जागा दुर्मीळ फुलपाखरांसाठी अगदी योग्य आहे. काही मिनिटांतच आम्ही सुमोने संत्राबारीला पोहोचलो. तेथे गेल्यावर पहिल्यांदा महत्त्वाचे काम म्हणजे आम्हाला आमच्याबरोबर बक्सा व्याघ्र प्रकल्पाचा गाईड घ्यायचा होता. या जंगलाच्या नियमानुसार, तुम्ही एकटे या जंगल परिसरात कुठेही फिरू शकत नाहीत. तुम्हाला वनखात्याचा गाईड तुमच्यासोबत घेणे आवश्यक आहे. तसे नसल्यास तुम्हाला कडक शिक्षा होते. म्हणूनच संत्राबारीच्या ओढ्यात जाण्यापूर्वी आम्हाला गाईड घेणे आवश्यक होते. कुणालबाबूने त्याचीही सोय आधीच करून ठेवली होती. साधारण साठीचा एक माणूस आम्हाला गाईड म्हणून मिळाला आणि आम्ही संत्राबारीच्या ओढ्यात फुलपाखरे शोधायला उतरलो. उतरल्या उतरल्या आम्हाला 'पॉपिंजे' नावाच्या सुंदर फुलपाखराचे दर्शन झाले. 'पर्पल सफायर, ऑरेंज ओकलीफ, खासी रेडब्रेस्ट, ऑर्किड टिट, फॉरेस्ट पियरो अशा अनेक ईशान्य भारतीय फुलपाखरांच्या मेजवानीवर कळस चढवला तो 'ग्रेट डार्की अर्थात हिमालयन क्रेन्युलेट मॉटल' या दुर्मीळ फुलपाखराने. भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार, या फुलपाखराला वाघासारख्या संरक्षणाचा दर्जा मिळालेला आहे. परत येताना अजून एका दुर्मीळ गोष्टीने आम्हाला दर्शन दिले. इंडो-चायनीज 'ब्ल्यू रीडटे'ल नावाच्या अतिसुंदर टाचणीने आमचा पहिला दिवस अजूनच रंगतदार बनवला. चारच्या सुमारास सूर्य पश्चिमेकडे झुकू लागला आणि आम्ही जयंती गावात परत आलो. आल्या आल्या पहिला मोर्चा जेवणाकडे वळवला. बंगालच्या या भागात जेवणात भात आणि बटाटेच असतात. भाजी बटाट्याची, उसळ बटाट्याची, काचऱ्याही बटाट्याच्या. तोंडी लावायला तिथली स्थानिक चटणी. मांसाहारी खाण्यात गोड्या पाण्यातले मासे आणि अंड्याची आमटी. मात्र, दिवसभर उन्हात फिरून पोटात भुकेचा आगडोंब उसळलाच होता. त्यामुळे जेवायला बसल्यावर जे पुढ्यात आले ते आम्ही खायला सुरुवात केली. पोटभर खाऊन झाल्यावर आम्ही 'होम स्टे'वर आलो आणि जे झोपी गेलो ते थेट रात्री साडेनऊ वाजता कुणालचा फोन आल्यावरच उठलो!

 

दुसरा दिवस आमच्या सहलीचा महत्त्वाचा टप्पा होता. कारण, या दिवशी आम्ही बक्सा जंगलातल्या प्रसिद्ध महाकाल शिव मंदिराच्या पलीकडे असणाऱ्या एका जागी जाणार होतो, जिथे फुलपाखरे शेकडोंच्या संख्येने चिखलपानाला एकत्र जमतात. सकाळी उठलो, त्यावेळी आकाश निरभ्र होते आणि स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता. असेच वातावरण पुढचे दोन दिवस राहू दे, अशी देवाकडे प्रार्थना करून आम्ही खोलीच्या बाहेर पडलो. याच वेळी पश्चिम बंगालमध्ये निवडणुका असल्याने कुणाल अलीपूरद्वारला मतदान करायला गेला होता. मात्र, जायच्या अगोदर बक्सा प्रकल्पातला एक गाईड मोहन छेत्रीकडे आम्हाला त्याने सोपवले होते. मोहनदा सकाळी आठ वाजता आम्हाला न्यायला येणार होता. तोपर्यंत आम्ही चहा नाश्ता उरकून घ्यायचे ठरवले. जयंती गावाच्या मुख्य चौकात असलेल्या एका टपरीवजा हॉटेलमध्ये आम्ही चहापुरी खाऊन घेतली. बरोबर खाण्याच्या जुजबी वस्तूही विकत घेतल्या. कारण, आता थेट संध्याकाळी साडेचारला परत आल्यावर आम्हाला जेवण मिळणार होते. आठ वाजता मोहनदा जिप्सी घेऊन आला. उघड्या जिप्सीमधून फिरायची मजाच काही वेगळी असते. तेवढ्यात हॉटेलच्या समोर एका कोपऱ्यात मिल्कवीडच्या झाडांवर मला टायगर फुलपाखरांचे थवे दिसले. प्लेन, स्ट्राईप्ड, ब्ल्यू, चेस्टनट अशा वेगवेगळ्या टायगर फुलपाखरांचे फोटो काढण्यात अर्धा तास गेला! शेवटी नऊ वाजता आम्ही महाकाल शिव मंदिराकडे जायला निघालो. नऊ वाजले असूनही ऊन मात्र अकरा वाजल्यासारखे होते. मोहनने जिप्सी जयंतीच्या पात्रात नेली. आमचा रस्ता त्या नदीपात्रातूनच जात होता. पांढऱ्या रंगाच्या दगड-गोट्यांवर परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे डोळे दिपत होते. मात्र, तरीही मी आजूबाजूला लक्ष ठेवून होतो. जयंतीचे पहिले वळण ओलांडल्यावर प्रवाहाच्या बाजूलाच एका ओलसर ठिकाणी आम्हाला फुलपाखरांचा थवा चिखलपान करताना दिसला. 'यलो ऑरेंज टिप' पासून देखण्या 'पॅरिस पीकॉक'पर्यंत जवळपास शंभरहून अधिक फुलपाखरे तिथे आरामात चिखलपान करत होती. आमची चाहूल लागताच ती भर्रकन उडाली आणि आमच्या अवतीभवती घिरट्या घालू लागली. मात्र, पाच मिनिटांतच ती पुन्हा आधीच्या जाग्यावर बसून चिखल पिऊ लागली. बाजूला पाण्यात पडलेल्या फांद्यांवर 'ब्ल्यू मार्श हॉक' आणि क्रिमझन टेल्ड मार्श हॉक' हे चतुर टेहाळणी करत बसले होते. या सर्व मंडळीचे फोटो काढून आम्ही पुढे निघालो. जयंती नदी ज्या ठिकाणी पर्वतामधून खाली येते, तिथे जवळच छोटा महाकाल हे देवस्थान आहे. आपल्याला या जागेपर्यंत गाडीने जाता येते. मात्र, पुढे जाण्यासाठी पायीच प्रवास करावा लागतो. या ठिकाणी दोन नद्या एकत्र येतात. एक भूतानच्या सीमेवरून येणारी गदाधर नदी आणि दुसरा म्हणजे हाथी नाला. हत्ती पूर्वेकडे आसाम आणि भूतानमध्ये जायला या नाल्याचा उपयोग करतात म्हणून या नाल्याला 'हाथी नाला' हे नाव पडले आहे. एकट्या दुकट्याने या हाथी नाल्यात घुसणे हा निव्वळ वेडेपणा असतो. कधी मोठमोठ्या हत्तींचा कळप तुमच्यासमोर येईल आणि तुम्हाला बघून त्यांची काय प्रतिक्रिया असेल, याबद्दल काहीच सांगता येत नाही. त्यामुळे स्थानिक लोक शक्यतो या नाल्यात काम असल्याशिवाय जात नाहीत. गदाधर नदीमधून अजून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला काही पायऱ्या दिसतात. या पायऱ्या चढून खूप वर गेल्यावर बडा महाकाल हे शंकराचे प्रसिद्ध देवस्थान लागते. दर महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी जत्रा भरते. ज्या ठिकाणी पायऱ्या सुरू होतात, तेथे एक कमान आहे आणि बाजूला भूतानचे राजे जिग्मे खेसर वांगचुक यांचा फोटो लावलेला आहे. पावसाळ्यात दर वेळी या नदीला पूर येतो आणि बडा महाकाल मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते चार महिन्यांसाठी बंद होतात. पाऊस संपला की, स्थानिक लोक नदीवर बांबूपासून तयार केलेले छोटे छोटे पूल बांधतात. ज्या ठिकाणी अवघड चढण आहे, तेथे बांबूच्या शिड्या बनवून त्या पक्क्या बसवल्या जातात. पुढच्या पावसाळ्यात हे पूल पुन्हा वाहून जातात आणि पाऊस संपला की, नव्या पुलांची उभारणी होते. हे चक्र कित्येक वर्षांपासून असेच सुरू आहे. देवस्थान असल्याने या ठिकाणी लोकांची ये-जा सुरू असते. बडा महाकालवर जाण्याआधी लोक गदाधर नदीच्या पाण्यात आंघोळ करतात आणि मग वर जातात. लोकांच्या वावरामुळे या सुंदर जागी प्लास्टिकचे साम्राज्य वाढू लागले आहे. आमचा फुलपाखरांचा स्पॉट हा बडा महाकालच्या विरुद्ध दिशेला असल्याने आम्हाला अजून पुढे जायचे होते. बांबूचे चार पूल आणि चार शिड्या चढून आम्ही एका दरीमध्ये आलो. दोन्ही बाजूंना सरळसोट कडे होते आणि मधून थंडगार पाण्याचा प्रवाह वाहत होता. कड्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे गवत आणि नेचे उगवले होते. त्या गवतातूनही सारखे पाणी ठिबकत होते. कड्याच्या वरती बक्साचे घनदाट जंगल होते. पाण्याच्या प्रवाहातून अजून पुढे आल्यावर थोडी सपाट मैदानासारखी जागा लागली. तिथे पुन्हा दोन नद्यांचे प्रवाह एकत्र येत होते. उजवीकडून येणारी नदी ही भूतानमधून येत होती आणि डावीकडून येणारी नदी भारतातून येत होती. थोडक्यात, आम्ही भारत आणि भूतानच्या सीमेवर उभे होते. उत्तरेला आणखी उंच पर्वतरांगा दिसत होत्या आणि सर्वत्र घनदाट जंगल होते. काही ठिकाणी दरड कोसळून अख्खे डोंगरच खाली आले होते. ज्या ठिकाणी आम्ही उभे होतो, त्याच्या आजूबाजूला सुमारे शंभर मीटर रूंदीचे सपाट मैदान होते आणि त्याच्यामधून नदी वाहत होती. पाणी असल्यामुळे काठावरचा भाग ओलसर होता आणि याच ओलसर भागात शेकडो फुलपाखरे मनसोक्त बागडत होती.

 

- डॉ. दत्तप्रसाद सावंत

(लेखक वन्यजीव संशोधक आहेत.)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@