प्रफुल्ल पटेलांवर टांगती 'तलवार'; ईडीने दुसऱ्यांदा बजावले समन्स

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2019
Total Views |




नवी दिल्ली : राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते आणि माजी नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ६ जून रोजी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी)ने पटेल यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. दीपक तलवार-विमान घोटाळा प्रकरणात पटेलांचे नाव आल्याने ईडीने चौकशीसाठी त्यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र आपला पूर्व नियोजित कार्यक्रम असल्याचे कारण देत त्यांनी चौकशीला हजर राहण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे आता ईडीने त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले आहेत. १० किंवा ११ जून रोजी हजर रहाण्यासंबंधी त्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

 

दीपक तलवार-विमान घोटाळा प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करतेवेळी प्रफुल्ल पटेल यांचे नाव समोर आले होते. दीपक तलवार यांना प्रफुल्ल पटेल यांच्या निकटचे मानले जाते. प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय मंत्रिपदी असताना दीपक तलवार यांना विशेष सवलत दिल्याचा आरोप आहे.

 

नेमके प्रकरण काय?

 

अंमलबजावणी संचालनालयाने ऑगस्ट २०१७ मध्ये या एकूणच प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. सीबीआयनेदेखील याप्रकरणात नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे अधिकारी, एनसीआयएल, एअर इंडिया आणि अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता. चौकशीतून वाचण्यासाठी दीपक तलवार देशाबाहेर फरारही झाला होता. पुढे त्याचे दुबईतून प्रत्यार्पण करण्यात आले व ईडीने त्याला अटकही केली.

 

एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण, आर्थिक स्थिती नसताना ७० हजार कोटी रुपये किंमतीच्या १११ विमानांची खरेदी, परकीय गुंतवणुकीतून प्रशिक्षण संस्था सुरू करणे तसेच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग खासगी कंपन्यांना देणे अशा चार प्रकरणांचा सध्या ईडीकडून तपास सुरू आहे. हा घोटाळा झाला तेव्हा नागरी उड्डाण खाते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होते. त्यामुळेच पटेल यांची चौकशी करण्यात येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@