गाजराची पुंगी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2019   
Total Views |



मागल्या पाचसहा दशकांत अशा आघाड्या गठबंधने उभारण्याचे थोडे प्रयोग झालेले नाहीत. त्यात एकदाही यश आले नाही. अपवाद फक्त डाव्यांच्या बंगाली आघाडीचा आहे. त्याचप्रमाणे केरळातील डाव्या पक्षांची आघाडी व काँग्रेसची आघाडी दीर्घकाळ टिकलेली आहे; अन्यथा बाकी जितक्या आघाड्या वेळोवेळी झाल्या, त्या ‘गाजराची पुंगी’ म्हणावी तशाच होत्या. वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली.


गेले वर्षभर चालू असलेला महगठबंधनाचा डंका २३ मे नंतर अकस्मात कुठेही ऐकू येईनासा झाला आहे. मागल्या वर्षी फुलपूर व गोरखपूर येथील पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचे उमेदवार जिंकले आणि हा डंका पिटणे सुरू झाले होते. तसे बघायला गेल्यास मायावतींचा पक्ष कधी पोटनिवडणूक लढवित नाही. त्यामुळेच तेव्हासुद्धा त्यांचे उमेदवार या दोन्ही जागी नव्हते आणि एकट्या समाजवादी पक्षाला सहज हरविण्याच्या भ्रमात भाजपने पूर्ण तयारी केलेली नव्हती. मात्र, ऐनवेळी मायावतींनी दोन दिवस आधी आपल्या पक्ष समर्थकांना समाजवादी उमेदवाराला मत देण्याचे एकतर्फी आवाहन केले आणि निकालावर फरक पडला. मग अखिलेशने मायावतींच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानले आणि तिथून मतविभागणी टाळून भाजपला २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्याचे मनसुबे रचले जाऊ लागले. त्यामध्ये राजकारणात नसलेल्या अनेक बुद्धीमंत, अभ्यासक व विश्लेषकांनीही पुढाकार घेतला. त्यातून या ‘महागठबंधन’ कल्पनेचा अक्राळविक्राळ मायावी राक्षस तयार झाला आणि तो भाजपपेक्षाही पुरोगामी लोकांना भुरळ घालू लागला. हा सगळा गदारोळ इथपर्यंत जाऊन पोहोचला की, एका टीव्ही चर्चेत मी मजेने म्हटले होते, “मतदान नंतर होईल. आपण राहुल गांधींचा पंतप्रधान म्हणून शपथविधी उरकून घेऊया का?” कारण, असे गठबंधन शक्य नाही आणि झाले तरी त्याला मतदार दाद देणार नाही, याची मला पूर्णपणे खात्री होती. अखेरीस झालेही तसेच आणि आता जिथून सुरुवात झाली, त्या उत्तर प्रदेशातच मायावतींनी गठबंधनाचे धागेदोरे तोडून टाकले आहेत. त्यांनीच बंधन तोडले म्हटल्यावर अखिलेशलाही बिचाऱ्याला त्यात अडकून राहणे शक्य नव्हते. दोघाही नेत्यांनी यापुढे स्वबळावर लढायचा निर्धार व्यक्त केला आहे. अर्थात त्यात नवे काहीच काही. स्वबळ कशाला म्हणतात, ते ठाऊक नसलेल्यांच्या असल्या वल्गना लोकांना कधीच माहिती झालेल्या आहेत.

 

वर्षभर ‘महागठबंधन’ सत्तेत आणून बसविणाऱ्यांना आता त्यात कुठे चूक राहिली, त्याचा शोध घ्यावा लागतो आहे. मुळात जे राजकारणात नाहीत, त्यांनी विविध राजकीय पक्षांना एकत्र एका दावणीला बांधण्याच्या उचापती कशाला कराव्यात? मागल्या पाचसहा दशकांत अशा आघाड्या गठबंधने उभारण्याचे थोडे प्रयोग झालेले नाहीत. त्यात एकदाही यश आले नाही. अपवाद फक्त डाव्यांच्या बंगाली आघाडीचा आहे. त्याचप्रमाणे केरळातील डाव्या पक्षांची आघाडी व काँग्रेसची आघाडी दीर्घकाळ टिकलेली आहे; अन्यथा बाकी जितक्या आघाड्या वेळोवेळी झाल्या, त्या ‘गाजराची पुंगी’ म्हणावी तशाच होत्या. वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. गेल्या वर्षभरात विविध राज्यांत व विविध पक्षांत अशा संधीसाधू आघाड्या कमी झालेल्या नाहीत. कर्नाटकात काँग्रेसने बहुमत गमावले तरी भाजपला सत्ता थोडक्यात हुकली तर सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी विनाविलंब राहुल गांधींनी जनता दलाला मुख्यमंत्रीपद देऊन आघाडी सरकार स्थापन केले. त्यातला मुख्यमंत्री रोजच्या रोज रडतो आहे आणि आता लोकसभेतील पराभवानंतर ती आघाडी कडेलोटावर उभी आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशात दोन वर्षांत दोन आघाड्या बनवून अखिलेशने आपला वडिलोपार्जित समाजवादी पक्ष डबघाईला आणून ठेवला आहे. त्यातल्या राष्ट्रीय लोकदलानेही आता स्वबळावर लढायच्या गर्जना केल्या आहेत. ज्यांना एकजुटीने यश मिळवता येत नाही, त्यांनी स्वबळावर जिंकण्याचे मनसुबे करावेत; यासारखा कुठला विनोद असू शकतो? अर्थात त्यात इतरांचा भ्रमनिरास झालेला असला, तरी मायावतींचा उद्देश पूर्णपणे सफल झाला आहे. त्यांना पंतप्रधानपदावर दावा करायचा होता. त्यात अपयश आलेले असले, तरी लोकसभेत व विधानसभेत भुईसपाट झालेल्या बहुजन समाज पक्षाला दहा खासदार मिळालेले आहेत. आपला पक्षही उमेदवार निवडून आणू शकतो, ही मायावतींची पत बाजारात पुन्हा प्रस्थापित झाली आहे.

 

मध्यंतरी लोकसभा गमावली आणि विधानसभेत दिवाळे वाजल्यानंतर मायावतींच्या पक्षाची राजकीय पत संपलेली होती. मायावती वगळता त्यांच्या पक्षात कोणीही नेता नसतो. त्या आपल्या इच्छेनुसार कोणालाही उमेदवारी देतात आणि त्याची चांगली किंमत वसूल करतात, हे उघड गुपित आहे. आताही आयुष्य देवेगौडांच्या पक्षात आणि कर्नाटकात घालवलेले दानिश अली नावाचे नेते ऐनवेळी बसपामध्ये दाखल झाले आणि सपा-बसपा गठबंधनाचे उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांचा बसपाशी नेमका संबंध काय? अनेक बसपा उमेदवार असेच असतात आणि मायावतींच्या अनेक सहकाऱ्यांनी पक्ष सोडल्यावर तिकिटे विकण्याचे आरोप केलेले आहेत. त्यातूनच मायावतींनी प्रचंड संपत्ती गोळा केलेली आहे. पण, जेव्हा तुमच्या पक्षाकडून निवडून येण्याची काही शाश्वती नाही, तेव्हा कोणी तिकीट विकत घ्यायला येणार नाही. मग तीच पत पुन्हा मिळवण्याची मायावतींना गरज होती आणि ताज्या निवडणुकीने ती पत पुन्हा प्रस्थापित केली आहे. तेवढ्यापुरती मायावतींना अखिलेशची गरज होती. हेच मायावतींनी आजवर अनेक आघाड्या व राजकीय मैत्रीतून साध्य केलेले आहे. त्यात मुलायम, भाजप असे अनेकांचे बळी गेलेले आहेत. अखिलेशला तो धडा शिकायला मिळाला इतकेच. आता मायावतींना प्रत्येक निवडणूक लढवायची आहे आणि उमेदवार हवेत. म्हणूनच आजवरचा पायंडा मोडून त्यांनी पोटनिवडणुकाही लढवायचा निर्णय घेतला आहे. लवकरच उत्तर प्रदेशच्या ११ विधानसभा रिक्त जागा भरण्यासाठी पोटनिवडणुका होणार आहेत आणि मायावतींनी त्या सर्व लढवण्यासाठीच समाजवादी पक्षाशी असलेली आघाडी मोडली आहे. कारण जागा वाटून घ्यायच्या तर सर्व जागी तिकिटे विकता येणार नाहीत ना? बाकी वैचारिक लढाई बुद्धीमंतांनी लढायची असते. मायावतींना वैचारिक भूमिका ही व्यवहाराच्या पुढे महत्त्वाची नसते. यात नवे काहीच नाही. पण, शहाण्यांना तो खुळेपणा आवडतो ना? बहनजी त्यांना छानपैकी खेळवतात.

 

सांगायचा मुद्दा इतकाच की, हळूहळू गठबंधन वा आघाडीचा मुखवटा फाटलेला आहे. तो एकाच राज्यात फाटलेला नाही, किंबहुना नुसता विविध पक्षांतील बेबनावानेच तो मुखवटा फाटलेला नाही. ज्या उत्तर प्रदेशामुळे मोदींना सत्ता मिळाली व तिथेच भाजपच्या जागा कमी केल्यास मोदींना सत्तेबाहेर बसवता येईल; असे मनोरथ चालले होते, तिथेच मतदानाने गठबंधनाला जमीनदोस्त केलेले आहे. आपल्या ८० पैकी ७३ जागा भाजपला टिकवता आल्या नाहीत, हे सत्यच आहे. पण, त्यातल्या ६४ जागा टिकवताना भाजपने मतांचा मिळवलेला हिस्सा डोळ्यात अंजन घालणारा आहे. सपा-बसपा आणि अजित सिंग यांची बेरीज भाजपला पाणी पाजण्यास पुरे असेल, असे गणित मांडणाऱ्यांना मतदाराने सणसणीत चपराक हाणलेली आहे. कारण, एकट्या उत्तर प्रदेशात भाजपने ५० टक्के मतांचा पल्ला गाठला आहे, तर गठबंधनाची बेरीज मागच्याइतकीही मते मिळवू शकलेली नाही. त्यातला संधीसाधूपणा बुद्धीमंतांना दिसत नसला तरी सामान्य मतदाराला ओळखता येतो आणि त्यानेच गठबंधनाला उद्ध्वस्त करून टाकलेले आहे. त्यानंतर मायावतींनी वेगळी चूल मांडण्याला पर्याय नव्हता किंवा अखिलेशच्या ‘यादव’ मतदारांवर खापर फोडण्याखेरीज उपाय नव्हता. देशातला सामान्य मतदार जातीपाती व संकुचित अस्मितेला सोडून देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतो आहे. त्याचीच साक्ष या मतदानाने जगाला दिलेली आहे. मग त्यात अशा मतलबी पुरोगामी ढोंगबाजीला स्थान कुठून असणार ना? एक गोष्ट आतापासून लक्षात ठेवण्यासारखी आहे. मायावतींनी भले दहा जागा मिळवून आपले अस्तित्व टिकवलेले असेल. पण, यापुढे नजीकच्या भविष्यात त्यांच्या पक्षाला वा तत्सम राजकारणाला स्थान उरलेले नाही. मतदाराला जातीपातीच्या नाव अस्मितेसाठी ओलीस ठेवून आपल्या तुंबड्या भरणाऱ्या राजकारणाला यावेळी मतदाराने तिलांजली दिल्याचा संकेत हे निकाल देत आहेत. समजून घेणाऱ्यासाठी ते पुरेसे आहेत. पण झोपेचे सोंग आणणाऱ्यासाठी त्यातून काहीही शिकता येणार नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@