समरस जीवनाची गाथा... कर्मवीर दादा इदाते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2019   
Total Views |



लोकनेते गोपीनाथजी मुंडे प्रतिष्ठान, जालगाव ता. दापोली, जि. रत्नागिरी या संस्थेच्यावतीने कर्मवीर दादासाहेब इदाते यांचा सत्तरी सोहळा आणि ‘कर्मवीर दादासाहेब इदाते सामाजिक समरसता पुरस्कार’ कार्यक्रमाचे आयोजन २ जून रोजी दापोलीला करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त दादा इदातेंच्या शब्दातीत व्यक्तिमत्त्वाचा, कार्याचा घेतलेला हा आढावा...


वदनं प्रसादसनंसदयं हृदयं सुधामुचो वा:।

करणं परोपकरणं येषां केषां न ते वन्धम॥

 

अर्थात, ज्याचे मुख प्रसन्नतेचे आगर, हृदय हे दयेने युक्त, वाणी ही अमृताचा वर्षाव करणारी आणि ज्याचे शरीर परोपकारासाठी असते, ते सज्जन कोणाला वंदनीय नाहीत? या संस्कृत सुभाषिताची आठवण व्हावी असे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे भिकू रामजी इदाते अर्थात सगळ्यांचे ‘दादा इदाते.’ दादा इदातेंच्या नावापुढे ‘कर्मवीर’ उपाधी का लागली असावी? यावर कळले की, नाणीज पीठांकडून दादांच्या कामाच्या सन्मानार्थ ही उपाधी त्यांना नरेंद्रमहाराजांकडून मिळाली आहे. संतांचे अधिष्ठान लाभले आहे. पण, त्याहीपलीकडे जाऊन दादांना ही उपाधी मिळाल्यामुळे दादांचा सन्मान जरी झाला असला तरी, या उपाधीचा मानही दादांमुळे वाढला आहे. कारण, ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने समाजाचे काम करताना दादांनी कधीही वैयक्तिक स्वार्थ, सुख आणि फायदा या गोष्टी पाहिल्या नाहीत. अहोरात्र समाजभान जपताना जग इकडचे तिकडे होवो, दादा आपली जबाबदारी पूर्ण करणारच करणार. दादांच्या आयुष्यातल्या अनेक घटनांपैकी दोन घटना नमूद कराव्याशा वाटतात. एकदा एका कार्यक्रमाला जात असताना दादांच्या गाडीला अपघात झाला. दादा जखमी झाले. परिस्थिती चिंताजनक होती. दादांना इस्पितळात अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले. कार्यक्रम ठरलेला होता आणि तो समाजासाठी महत्त्वाचा होता. त्यामुळे तो कार्यकर्त्यांनी पार पाडला. कार्यक्रम पार पाडून कार्यकर्ते दादांना पाहण्यासाठी इस्पितळात आले. अतिदक्षता विभागामध्ये कुणालाही सोडत नव्हते. दादांची नजर अतिदक्षता विभागाच्या दरवाजाच्या काचेवर खिळलेली. कार्यकर्ते बाहेरून काचेतून दादांना पाहत होते. दादा शुद्धी-बेशुद्धीच्या सीमारेषेवर होते. पण, नजर मात्र कार्यकर्त्यांकडे आणि त्यांनी ओठांची हालचाल केली. कार्यकर्त्यांना वाटले दादांना वेदना होत असाव्यात. पण नाही, दादा त्या गंभीर अस्वस्थेत, अक्षरश: मृत्यूच्या दारातून माघारी फिरून येतानाही कार्यकर्त्यांची वाट पाहत होते. ते दिसल्यावर त्यांनी विचारले, “कार्यक्रम नीट झाला ना? काही अडचण तर नाही ना आली?” कार्यकर्ते स्तब्ध झाले. समाजाविषयी आपल्या जबाबदारीविषयी किती निष्ठा आहे दादांना. त्या निष्ठेला, त्या समाजभानाला ‘कर्मवीर’ उपाधी शोभतेच शोभते. एक असाच अनुभव. भटके-विमुक्त आयोगाचे काम करताना त्यांना देशभर फिरावे लागले. एका डोंगराळ भागात वातावरण खराब होते. वातावरणात अक्षरश: ऑक्सिजन वायूचा स्तर कमी झाला. अशा वातावरणात स्थानिकही घराबाहेर पडत नसत. मात्र, दादा तर समाजाचे काम करायला आलेले, आयोगाचा अहवाल पूर्ण करायला आलेले. येथील काम आटोपल्याशिवाय दुसरीकडे जाणे म्हणजे येथील काम अपूर्णच राहिले असते. मात्र, त्या हवामानामुळे दादांची तब्येतही खराब झाली. त्यामुळे सहकारी, स्थानिक रहिवासी आणि डॉक्टरांनी दादांना सक्तीची विश्रांती घ्यायला लावली. दुसऱ्या दिवशीही तसेच वातावरण. डॉक्टरांचा पुन्हा तोच सल्ला. मात्र, दादांनी विनम्रपणे विश्रांतीला नकार दिला. कारण, तब्येतीपेक्षा त्यांनी हाती घेतलेल्या कामाला न्याय द्यायचा होता. हे काम समाजाचे होते आणि समाजाचे देणे फेडलेच पाहिजे, असे दादांचे म्हणणे.

 

दादा भटके-विमुक्त समाजाचे काम करतात. कारण, ते त्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात, असा गैरसमजही कित्येकांचा असू शकतो. पण, दादांच्या मते, जातिपाती नाही तर सगळा भारतच एक समाज आहे. त्यामुळे एक ‘हिंदू’ आणि ‘भारतीय’ म्हणून माझे कर्तव्य आहे की, वंचित बांधवांच्या प्रगतीसाठी होता होईतो काम करायला हवे. समरस समाजाची बांधणी करताना कुणी मागे राहून चालणार नाही. त्यामुळेच दादा कळत्या वयापासून सर्व समाजाच्या प्रगतीचा विचार करत होते. फार पुढच्या काळात रा. स्व. संघाच्या एका बैठकीत त्यांनी भटके-विमुक्त समाजाला केंद्रित करून काम करण्यास सुरुवात केली. त्या बैठकीमध्ये असताना एका स्वयंसेवकाने सांगितले की, सोलापूरमध्ये लुटमार केली म्हणून जे दोघे पारधी पोलीस कारवाईमध्ये मारले गेले, ते तर दरोडा पडत असताना त्यांच्या पालामध्ये होते. पण, केवळ गुन्हेगार सापडत नाहीत आणि या समाजातल्या लोकांना अजूनही ‘गुन्हेगार’ म्हणून पाहिले जाते, म्हणून त्यांना राहत्या जागेतून उचलून गोळ्या घातल्या गेल्या. तुम्ही चौकशी करा. काहीतरी करा.” त्यानंतर खऱ्या अर्थाने ‘दादा’ या समाजाचे ‘पालक’ झाले. त्यांनी या समाजासाठी स्वत:ला वाहून घेतले. आणीबाणीच्या काळात येरवडा तुरुंगामध्ये असताना रामभाऊ म्हाळगींनी “तू का नाही भटके-विमुक्त समाजाचा अभ्यास करत,” असा प्रश्न त्यांना विचारला होता; नुसता विचारलाच नाही, तर त्यासंबंधीचे सगळे साहित्य, संदर्भ दादांना दिले होते. त्या साहित्याने, त्या संदर्भांनी दादांच्या कार्याला संजीवनी प्राप्त करून दिली. पुढच्या कालावधीत रमेश पतंगे, नाना नवले, रमेश महाजन वगैरेंसोबत दादांची समरसतेची बैठक पक्की होत गेली. दुसरीकडे रा. स्व. संघाचे महाराष्ट्रस्तरावरचे काम करताना प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे वगैरेंशीही संपर्क वाढत गेला. मात्र, या संपर्काचे दादांनी कधीही राजकारण केले नाही. उलट राजकीय सत्ताधाऱ्यांनीही समरस समाज निर्माण करण्यासाठी काय करायला हवे, यासाठी दादा म्हणजे एक मार्गदर्शकच झाले. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सध्या खा. अमर साबळे आणि आ. भाई गिरकर यांनी दत्तक घेतलेली गावे. खा. साबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मगाव आंबवडे दत्तक घेतले, तर आ. गिरकरांनी माता रमाबाईंचे वणंद गाव दत्तक घेतले. दादांनी समाजाच्या प्रगतीसोबतच त्या समाजाचे माणूसपण मिळवून द्यायचा नेहमीच प्रयत्न केला. त्यामुळेच की काय, १९९९ साली महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती अभ्यास व संशोधन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. पुढे राज्य मागासवर्गीय आयोगाचे दोन वेळ सदस्य व सहा महिने ते हंगामी अध्यक्ष राहिले. २०१५ साली भारत सरकार नियुक्त राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. पुन्हा २०१९ साली दादा भारत सरकार नियुक्त केंद्रीय विमुक्त भटक्या व अर्धभटक्या जमाती कल्याण आणि विकास मंडळाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले.

 

 
 

शासनाचा आणि लोकांचा दादांवर इतका विश्वास का? कारण, दादांनी कधीही घड्याळ्याच्या काट्यावर पाट्या टाकण्याचे काम केले नाही. दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण झालीच पाहिजे आणि तीही १०० टक्के सत्य निकषांवर असे दादांचे काम. आयोगावर नियुक्ती झाली आहे, अधिकार आहे, मग काय दिलेले काम उरकून टाकायचे आणि व्हायचे मोकळे, असे दादांनी कधीही केले नाही. उदाहरणार्थ, भटके-विमुक्त समाजाचे काम म्हणजे या यादीमध्ये या समाजासाठी अमूक अमूक काम करायचे बसं. असे त्यांनी केले नाही, तर या यादीबाहेरचे समाज कोणते आहेत? त्यांना मान्यता मिळवून द्यायचे किचकट आणि सर्वार्थाने जिकिरीचे कामही दादांनी केले. ‘मरीआईवाले’ जातीचा कोणत्याही जातीत समावेश नव्हता. परंतु, दादांच्या सतत प्रयत्नांमुळे या समाजाचा प्रथमच भटके-विमुक्तांमध्ये समावेश झाला. देवीच्या नावाने अंगावर कोरडे ओढणाऱ्या आणि वंचितांपेक्षाही वंचित भटके जिणे जगणाऱ्या ‘मरीआईवाल्या’ला दादांनी लोकशाही भारताचे नागरिक बनण्यासाठी मोठे काम केले. हे सगळे करताना दादांनी कुटुंब, गाव समाज यांच्याकडेही अजिबात दुर्लक्ष केले नाही. कौटुंबिकस्तरावर कुटुंबाला जगण्यासाठी पुरेसे अर्थाजन करून दादा २०-२५ दिवस समाजकार्य, देशकार्य करण्यासाठी घराबाहेरच राहायचे. यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांना मोलाची साथ दिली हे मात्र खरे. मात्र, वैयक्तिक पातळीवर समाजासाठी खऱ्या अर्थाने भटके जीवन जगताना दादांना मधुमेहाने जखडले. गेली २० वर्षे दादा दररोज हाय इन्सुलिनच्या गोळ्या घेतात. मात्र, ३६५ दिवस काम करतात. देशभरातील समाजाच्या प्रगतीचा आलेख निर्माण करताना दादा आपल्या गावाला विसरले नाहीत. रत्नागिरी-दापोली परिसरातल्या समस्यांचा पाठपुरावा करताना दादा कुठेही कमी पडले नाहीत. या परिसरातील शिक्षण आणि स्वावलंबनाचा प्रश्न सोडवताना दादा अनेक आयामातून कार्य करत आहेत. जबाबदारी स्वीकारून प्रकल्प उभारत आहेत. या परिसरातील कित्येक सेवाभावी मंडळे, स्वयंसेवी संस्था, वंचितासाठींच्या आश्रमशाळा, वसतिगृहे वगैरे वगैरेंची निर्मिती दादांच्या प्रेरणेने झाली आहे. नुकतेच आ. भाई गिरकरांनी दत्तक घेतलेल्या वणंद गावी जाण्याचा योग आला. निमित्त होते वणंद गावी भाईंनी केलेल्या विकासकामांच्या उद्घाटनाचे. तसे पाहिले तर दादा ज्येष्ठ! वयाने, कार्याने, अनुभवाने आणि पदानेही. पण, भाईंनी वणंदचा विकास वास्तवतेवर आधारित आणि उल्लेखनीय करावा म्हणून दादांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या गावाची पाहणी केली. भाईंना माहिती दिली. हे सारे का, तर माता रमाबाईंच्या गावाचा विकास समाजाचे प्रतिनिधित्व करणारा नेता करणार आहे. ते काम उत्कृष्ट व्हावे, समाजासमोर एक चांगला संदेश जावा म्हणून. अर्थात, यासाठी दादांना कुणी सांगितले नव्हते, पण समाजकार्याचा वसा घेताना समाजाप्रति जे पालकत्व येते, ते पालकत्व दादांच्या स्वभावाचा एक पैलूच बनून गेले आहे.

 

अतिशय शांत, संयमित स्वरात दादा प्रत्येकाशी बोलतात. बरं एखाद्याला अमूक एक गोष्ट करायला सांगायची असेल तरी, दादा जबरदस्तीने कोणतेही काम करायला लावत नाहीत, हा प्रत्येकाचा अनुभव. याचेच एक उदारहरण. दादांच्या घरासमोर परिचित युवक राहायला आला. युवकही समाजशील. या युवकाने संघाशी जोडले जावे, असे दादांनी काय कोणत्याही स्वयंसेवकाने प्रयत्न केलेच असते. दादा दररोज त्याला भेटायचे. क्षेम-कुशल विचारायचे. शेवटी इतकेच म्हणायचे, “गावात शाखा लागते.” कित्येक महिने हेच चालले. त्या युवकाच्या मनात आले- दादा दररोज सांगतात, गावात शाखा लागते. जाऊन पाहावे एकदा. तो युवक एकदा गेला आणि त्यानंतर नियमित शाखेत जाऊ लागला. दादांनी देशभरातल्या भटके-विमुक्तांच्या प्रश्नांना गवसणी घातली. पण, त्याचवेळी स्वत:च्या सरोदे समाजाच्या प्रश्नांनाही मार्ग शोधून दिला. आज सरोदे समाजात १०० टक्के साक्षरता आहे, समाजातील बहुसंख्य लोक उच्चपदावर कार्यरत आहेत. यासाठी दादांचे योगदान मोठे आहे. समाजात पूर्वी चांगल्या-वाईट प्रसंगांमध्ये दारू पिण्याची प्रथा होती. पण, दादांच्या शब्दाला मान देऊन परिसरात दारूबंदीला अग्रक्रम देण्यात आला. मागे वळून पाहताना आजही भागवत मास्तर आणि कृष्णामामा महाजन यांचे नाव घेताना दादांचा आवाज गहिरवतो. डोळ्यांच्या कडा पाणावतात. ते सांगतात, “घरची गरिबी, वडील पायाने अधू, पण कष्टकरी. आई दुर्वा विकायची. प्रसंगी भीक मागणेही क्रमप्राप्त. आईची मुले जगत नसत. त्यामुळे ‘मुले जगू दे’ म्हणून आईने देवीकडे भीक मागितली आणि म्हणून मी ‘भिकू’ जन्मलो. पहिली-दुसरीत शिकत असतानाही मी छोटी-मोठी कामे करायचो. दुपारी शाळेतून आलो की मासे पकडायला जायचो. एके दिवशी माशाचा गळ पायात रूतला. आईने लोखंड पायाला लागून एक मुलगा मरताना पाहिला होताना. तिचा तर जीव थाऱ्यावर राहिला नाही. गळ पायातून निघत नव्हता. वेदनेने माझा जीव अर्धा झाला. भागवत मास्तरांना हे कळल्यावर हातातले काम टाकून ते घरी आले. मला त्यांनी उचलले आणि दापोलीला नेले. डॉक्टरांच्या मदतीने गळ काढला. मास्तरांचे प्रेम, स्नेह माझ्या मनात समाजभानाची, माणुसकी जाणीव रूजवून गेली. तेथून पुढे मी भागवत मास्तरांमुळे संघशाखेत गेलो, ते आजतागायत जात आहे. कृष्णमामांनीही मला शिक्षणाविषयी नव्या जाणिवा दिल्या. संघस्वयंसेवक असलेल्या या दोघांनीही माझ्या जीवनात आमूलाग्र बदल केला आहे. मी आज जो आहे तो रा. स्व. संघामुळे आणि मी रा. स्व. संघामध्ये आलो, ते भागवत मास्तरांमुळे. त्यामुळे भागवत मास्तर माझ्यासाठी अखंड प्रेरणास्रोत आहेत.”

 

दादांना मिळालेले पुरस्कार

 

- १९९१ साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते ‘मधुकर देवल सामाजिक पुरस्कार’

 

- २००५ साली राज्यपाल विष्णुकांत शास्त्री यांच्या हस्ते ‘स्वामी विवेकानंद सेवा सन्मान सामाजिक पुरस्कार’

 

- २००५ साली प. पू. जगद्गुरू नरेंद्राचार्य यांच्या नाणीज धर्मपीठाकडून ‘कर्मवीर’ ही उपाधी

 

- २००६ साली मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते ‘कोकण मराठी साहित्य परिषद उत्कृष्ट ग्रंथ संग्राहक व वाचक पुरस्कार’

 

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन पुरस्कार, औरंगाबाद, श्री स्वामीसमर्थ गौरव पुरस्कार दापोली, ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ नवी दिल्ली

 

- भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दलु कलाम राष्ट्रीय गौरव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे ‘बाबा आमटे पुरस्कार’

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@