अमेरिका-इराण संघर्ष आणि भारत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



आपल्याला अमेरिका, अरब देश, इस्रायल या कोणालाच दुखावून चालणार नाही. त्यामुळे अमेरिकेच्या इराणशी व्यापार बंद करण्याच्या सूचनेला ‘हो’ म्हणायचे. व्यापार कमी करायचा आणि इराणलाही आपली स्थिती स्पष्टपणे सांगत राहायचे, हेच आपले नवे परराष्ट्र धोरण असायला हवं.


जगातला सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे, सौदी अरेबिया. मग रशिया, अमेरिका, इराण आणि पार तेराव्या क्रमांकावर आहे आपला भारत. साहजिकच तेलासाठी आपल्याला अरब देश आणि इराण दोघांशीही चांगले संबंध ठेवावेच लागतात. रशिया आणि अमेरिकेशी तर आपले खूप जुने आणि घट्ट संबंध आहेत. पुन्हा ते फक्त व्यापारापुरते नसून राजकीय, सांस्कृतिक, संरक्षणविषयक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातले आहेत. सौदी अरेबिया, इराक, कुवेत, संयुक्त अरब अमिराती इ. अरब देशांमध्ये आजघडीला किमान दोन कोटी भारतीय नागरिक विविध स्तरांवर नोकऱ्या करीत आहेत. दरमहा त्यांच्याकडून काही कोटी डॉलर्सचं परकीय चलन देशात येत असतं. अरब देशांपेक्षाही इराण आपल्याला भौगोलिकदृष्ट्या जवळ आहे. त्यामुळे एकट्या इराणकडून आपली तेल आयात दर दिवसाला २० लाख, ५० हजार बॅरल्स इतकी आहे. एक बॅरल म्हणजे ४२ गॅलन आणि एक गॅलन म्हणजे ३.८५ लिटर्स. आता अरब देश आणि इराण यांचं अजिबात जमत नाही. त्याची कारणं आर्थिक, ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक, धार्मिक सगळीच आहेत. ज्या देशाकडे भरपूर तेल आहे, तो सर्वोच्च स्थानी राहणार, हे अमेरिकेइतकं कोणीच ओळखलं नाही. त्यामुळे अमेरिकेने सौदी अरेबियाला घट्ट मित्र बनवून ठेवलेलं आहे. इतर छोटे-मोठे अरब देश आणि इराणही अगोदर अमेरिकेचे मित्रच होते. पण तेथील स्थिती हळूहळू बदलत गेली. पर्शिया उर्फ इराण हा एक प्राचीन, शक्तिशाली, समृद्ध देश आहे. त्याला इतिहासाचा, परंपरेचा, भाषा आणि साहित्याचा मोठा वारसा आहे. ‘पर्शियन गल्फ’ उर्फ ‘इराणचं आखात’ या एका समुद्रपट्ट्याने त्याला अरेबियन द्वीपकल्पापासून वेगळं ठेवलं आहे. इराणची भूमी अरबी वाळवंटापेक्षा सुपीक आहे.

 

इसवी सनाच्या सातव्या शतकात अरबस्तानात इस्लाम या एका नव्याच उपासना संप्रदायाचा उदय झाला. पुढच्या दोन-तीन शतकांत अरब मुसलमानांनी आणि त्यांचे नोकर म्हणजे गुलाम असलेल्या तुर्क मुसलमानांनी आशिया, आफ्रिका आणि युरोप खंडांमधील अनेक देश जिंकले आणि मुसलमान बनवले. त्याच झपाट्यात पर्शिया उर्फ इराणचाही क्रम लागला. पण काही काळातच इराणने डोकं वर काढलं. कारण, विजेत्या अरब आणि तुर्कांपेक्षा त्याची भाषा, संस्कृती श्रेष्ठ होती. त्यामुळे एकंदर इस्लामी संस्कृतीचा चेहरामोहराच बदलून अरबी-तुर्कींऐवजी फारसी झाला. इसवी सनाच्या तेराव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत टिकून राहिलेल्या तुर्कांच्या विशाल साम्राज्यात खुद्द अरबस्तान होता, पण इराण नव्हता. अरब आणि तुर्क हे ‘सुन्नी’ आहेत, तर इराण हा ‘शिया’ आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अरेबियन द्वीपकल्पात अमाप तेल सापडलं. तसंच ते इराणमध्येही सापडलं. आता धार्मिक संघर्षाला एक नवा आर्थिक आयाम मिळाला. प्रेषित मोहम्मदांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या सौदी अरेबियाने स्वतःला जगभरच्या सर्व मुसलमानांचा नेता समजायला सुरुवात केली. तेव्हा इराणने स्पष्ट केलं की, “सर्व म्हणजे, सर्व ‘सुन्नी’पंथीयांचा असेल कदाचित, पण जगातल्या सर्व ‘शिया’पंथीयांचा नेता फक्त इराणच आहे.” तिकडे पॅलेस्टाईनमध्ये एक नवीच शक्ती उदयाला आली ती- इस्रायल. दादागिरी करण्याच्या आपल्या जन्मजात सवयीमुळे अरबांनी उगीचच या चिमुकल्या देशाशी पंगा घेतला. पण, एकतर इस्रायलचे नेते भलतेच कडवे लढवय्ये होते आणि दुसरं म्हणजे, अमेरिका इस्रायलच्या पाठी ठामपणे उभी होती. कारण, अमेरिका सगळं अर्थकरण ‘ज्यू लॉबी’च्या हातात होतं. इजिप्त, सीरिया, लेबेनॉन हे अरब देश इस्रायलकडून मार खात असताना सर्वात मोठा अरब देश सौदी हा युद्धापासून अलिप्त होता. कारण तो अमेरिकेचा मित्र होता. इराणही अमेरिकेचा मित्र होता, म्हणजे शहा रेझा पहलवी या राजाची राजवट इराणमध्ये टिकवून ठेवण्यात अमेरिका यशस्वी ठरली होती. पण, १९७९ साली अयातुल्ला सय्यद रूहूल्ला मुसावी खोमेनी या धर्मगुरूने क्रांती करून शहाची राजवट संपवली.

 

तिथपासून सगळंच बदललं. खोमेनीच्या इराणने अमेरिकेसह संपूर्ण पश्चिम जगाशी पंगा घेतला, इस्रायलशी पंगा घेतला, यात आश्चर्य नव्हतं. पण, त्याने अरबांशी पंगा घेतला. इराणचा शेजारी इराक हा अरब देश. इराकचा सद्दाम हुसैन हा त्यावेळी तरी अमेरिकेचा उघड शत्रू नव्हता. पण, ‘बाथ’ हा त्याचा पक्ष समाजवादी म्हणजे डाव्या विचारांचा असल्यामुळे अमेरिकेला फार अनुकूल होता, असं नाही. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, शत्रू आणि मित्र ही नाती राजकीय गरजेप्रमाणे बदलायची असतात, एका वेळी एकाच आघाडीवर लढायचं असतं, ही राजनीतीमधील चिरंतन तत्त्व आहेत. खोमेनीच्या नव्या कडव्या इस्लामी इराणने ही सगळी तत्त्वं गुंडाळून एकाच वेळी अमेरिका, पश्चिम जग, इस्रायल, अरब देश या सगळ्यांशी संघर्ष सुरू केला. शेजारच्या इराकशी तर त्याने सरळ लढाईच सुरू केली. १९८० मध्ये सुरू झालेली ही लढाई आजही चालूच आहे. कारण, अधिकृत युद्धबंदी झालेली नाही. तेव्हापासून म्हणजे गेली ४० वर्षं अमेरिका आणि इराण यांचे संबंध सतत ताणलेलेच आहेत. ११ सप्टेंबर, २००१च्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ विद्ध्वंसाचं निमित्त करून अमेरिकेने प्रथम अफगाणिस्तान आणि मग इराकवर प्रत्यक्ष हल्ला चढवला. सद्दाम हुसैनला पकडून फासावर लटकवलं. पाकिस्तानात दडून बसलेल्या ओसामा बिन लादेनचा सफाया केला. त्यानंतर आता अमेरिका इराणवर हल्ला करणार, असे बरेच प्रसंग घडले. पण अजून तरी तसं प्रत्यक्षात घडलेलं नाही. अमेरिका, इस्रायल, पश्चिमी जग, आपलेच सुन्नी बांधव या सगळ्यांशी जोरात भांडण करत असतानाच एकीकडे इराणने अण्वस्त्र विकसित करण्याइतपत वैज्ञानिक प्रगतीही साध्य केली आहे. इराण अण्वस्त्र बनवतोय म्हटल्यावर अमेरिका आणखीनच संतापली. विविध प्रकारची आर्थिक बंधनं-इकॉनॉमिक सँक्शन्स आणून तिने इराणची व्यापारीकोंडी करण्याचे प्रयत्न केले, पण इराण सगळ्याला पुरून उरलेला आहे. मे २०१९ पासून अमेरिका-इराण तणाव पुन्हा एकदा युद्धाकडे सरकतो आहे. अमेरिकेने दोन मोठ्या युद्धनौका ‘पेट्रियट’ आणि ‘सॅम’ या क्षेपणास्त्र प्रणालींसह अरबी समुद्रात इराणच्या दक्षिणेकडे आणून उभ्या केल्या आहेत. १३ मे, २०१९ रोजी अमेरिकन संरक्षणमंत्री पॅट्रिक शहनान म्हणाले की, किमान सव्वा लाख अमेरिकन सैनिक मध्य-पूर्वेत उतरण्याच्या बेतात आहेत.” पण, राजकारणात अशी मोघम विधानेच करायची असतात. पण, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एक ‘घनचक्कर’ गृहस्थ आहेत. आपल्याच संरक्षणमंत्र्यांचे विधान खोडून काढीत ते म्हणाले, “छे! सव्वा लाख सैनिकांनी काय होतंय? गरज पडल्यास आम्ही कितीही सैनिक पाठवू.”

 

ताबडतोब दुसऱ्या दिवशी दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ नेत्यांनी युद्धाच्या शक्यतेचा साफ इन्कार केला. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनी म्हणाले, “युद्ध होणार नाही.” अमेरिकन परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ रशियाच्या दौऱ्यावर होते. ते म्हणाले, “आम्हाला इराणशी युद्ध नको आहे.” १ जून, २०१९ ला अयातुल्ला खोमेनींचे लष्करी सल्लागार याह्या रहीम सफावी म्हणाले, “अमेरिकेने आपली लष्करी जहाजं अरबी समुद्रातून इराणी आखातात आणली तरी हरकत नाही. ती आमच्या क्षेपणास्त्रांच्या बरोबर पल्ल्यात आहेत.त्याचप्रमाणे अमेरिकेने हे लक्षात ठेवावं की, युद्ध होणं याचा अर्थ तेलाची किंमत १०० डॉलर्स प्रतिबॅरलवर जाणं.” ही भाषा फारच प्रभावी आहे. कारण, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचा भाव ६२ डॉलर्स प्रतिबॅरल आहे. तो १०० डॉलर्सवर जाणं याचा अर्थ महागाईचा भडका. आता या सगळ्यात भारत कुठे आहे? भारताचेअमेरिका, अरब देश यांच्याशी मैत्रीचे संबंध आहेत.भारताचे इस्रायलशी संरक्षण, डावपेच, अतिरेकी विरोधी प्रशिक्षण इ. क्षेत्रात फारच घट्ट संबंध आहेत. या उलट इराणकडून आपण दर दिवशी २ लाख, ५० हजार बॅरल्स तेल घेत असलो तरी, एकंदर संबंध बेताचेच आहेत. इराणने काश्मिरी अतिरेक्यांना आणि त्यांच्या फुटीर मागण्यांना पाठिंबा दिलेला आहे. पण, २०१७ पासून संबंध पुन्हा थोडे बदलत आहेत. इराणने ‘इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोर’ (आय.एन.एस.टी.) नावाचीएक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. अरबी समुद्रातल्या चाबहार बंदरातून थेट मॉस्को आणि अॅस्ट्राखान या शहरांपर्यंत ७२०० किमीचा व्यापारी मार्ग बांधायचा, अशी ही योजना म्हणजे चीन-पाकच्या ग्वादर योजनेला उत्तर आहे. म्हणूनच भारताने तिच्यात भाग घेऊन या कॉरिडोरचे दक्षिण टोक चाबहारऐवजी मुंबई बंदर करायचे, असे ठरवले. पण, आपल्याला अमेरिका, अरब देश, इस्रायल या कोणालाच दुखावून चालणार नाही. त्यामुळे अमेरिकेच्या इराणशी व्यापार बंद करण्याच्या सूचनेला ‘हो’ म्हणायचे. व्यापार कमी करायचा आणि इराणलाही आपली स्थिती स्पष्टपणे सांगत राहायचे, हेच आपले नवे परराष्ट्रमंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांचं धोरण असायला हवं.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@