अरुणा जेव्हा गायब होते...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2019   
Total Views |



सह्याद्रीच्या कुशीत वसलेला नाशिक जिल्हा हा विविध जलस्त्रोतांनी समृद्ध आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावणाऱ्या गोदावरी नदीच्या अनेक उपनद्या नाशिक जिल्ह्यात आहे. त्यापैकीच एक महत्त्वाची उपनदी म्हणजे अरुणा नदी. मात्र, या अरुणा नदीचे दुर्दैव म्हणजे अनेक नाशिककरांना अरुणा नावाची नदी नाशिकमध्ये आहे, हेच माहीत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या नदीवर करण्यात आलेल्या बांधकामांमुळे ही नदीच गायब झाली आहे.


नाशिक शहराजवळील रामशेज किल्ला येथे अरुणा नदीचा उगम होतो. सुमारे साडेनऊ ते १० किमीचे अंतर पार करत या नदीचा संगम रामकुंडात जलाशयाच्या खाली असलेल्या नैसर्गिक गोमुखात गोदावरी नदीशी होतो. रामशेज किल्ल्यावरून प्रवाहित होणारी ही नदी पंचवटी येथील इंद्रकुंडात सामावते. म्हणजेच इंद्रकुंडात असणारे पाणी हे अरुणा नदीचे आहे, अशी माहिती नदी या विषयाचे अभ्यासक आणि गोदाप्रेमी देवांग जानी यांनी दिली. इंद्रकुंडमार्गे अरुणा नदी रामकुंडातील गोमुखात विसावते. यालाच गोदा-अरुणा संगम म्हणतात व येथेच सिंहस्थ कुंभमेळ्याचे शाहीस्नान पार पडते. भारतात सिंहस्थ कुंभमेळा भरणाऱ्या प्रत्येक ठिकाणी संगम आढळतो. त्यामुळे अरुणा आणि गोदा या संगमासदेखील आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. ही झाली नदीच्या उगमापासून ते प्रवाहापर्यंतची स्थिती. आता जर आपण आजचे वास्तव पाहिले तर दिसणारे चित्र नेमके उलटे आहे. इंद्रकुंडमार्गे रामकुंडापासून जर आपण उलट दिशेने रामशेज किल्ल्याकडे प्रवास सुरू केला तर, या नदीवर उभारण्यात आलेल्या बांधकामांची मालिकाच आपल्याला दिसते. अरुणा नदीवर असणाऱ्या पायऱ्या १९९० सालापर्यंत दिसत असल्याचेदेखील देवांग जानी आवर्जून नमूद करतात. त्यावेळी त्या पायऱ्यांच्या खालून नदी प्रवाही होती. त्यातच १९९१ मध्ये नाशिक महानगरपालिकेने इंद्रकुंडात नदीवर पितळी पाईपलाईन टाकली व या पाईपलाईनचे दुसरे टोक रामकुंडात गोमुखात सोडले असल्याचे जानी यांनी सांगितले. त्यानंतर २०१५ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे करताना इंद्रकुंडासमोर असलेल्या पंचवटी सार्वजनिक वाचनालयासमोरील पायऱ्या तोडून तेथे उताराचा रस्ता बनविण्यात आला आणि नेमकी याच रस्त्याखाली अरुणा नदी दबली गेली असून नदी अस्तित्वात असूनही तिचा कोणताही प्रवाह दृष्टीपथात नसल्याचे वास्तव समोर येत आहे. नदीप्रवाहावर झालेली बांधकामे आणि अयोग्य नियोजन यामुळे अरुणा नदी गायब झाली असून तिचे अस्तित्वच दृष्टीपथात येत नसल्याने महत्त्वपूर्ण असलेल्या अरुणा नदीचे महत्त्वच संपुष्टात आल्याचे जानी यांनी सांगितले. ब्रिटिशकालीन दस्तऐवजात इंद्रकुंडाचा काठ हा अरुणा नदीचा काठ असल्याच्या नोंदी आढळतात. मात्र, अरुणा नदी ही केवळ इंद्रकुंडातच दिसून येते.

 

अरुणा नदीबाबत माहिती प्राप्त करण्यासाठी देवांग जानी यांनी नाशिक महानगरपालिकेच्या गोदावरी संवर्धन कक्षाला ३१ ऑक्टोबर, २०१८ रोजी माहिती अधिकार अंतर्गत माहिती प्राप्त करण्याकरिता अर्ज केला होता. त्यात जानी यांनी रामकुंडात असणाऱ्या अरुणा गोमुखात प्रतिदिन येणाऱ्या पाण्याची मात्रा किती आहे, अरुणा नदी उगमस्थानापासून ते रामकुंडातील गोमुखापर्यंत अरुणा नदीची लांबी, रुंदी आणि खोलीची तपशीलवार माहिती द्यावी, रामकुंड ते उगमस्थानापर्यंत अरुणा नदीच्या काठावर असणाऱ्या बांधकामांची तपशीलवार माहिती द्यावी आणि नाशिककरांना अरुणा नदीचे पात्र पाहावयाचे झाल्यास त्यांना ते कोठे पाहता येईल, याबाबत माहिती द्यावी, अशी विनंती केली होती. त्यावर माहिती गोदावरी संवर्धन कक्षाच्या अभिलेखावर आढळून येत नाही, असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे अस्तित्वात असणाऱ्या नदीची माहितीच महापलिकेकडे नसणे हे शहरातून अरुणा नदी गायब झाल्याचेच द्योतक आहे का?, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या या उत्तराच्या अनुषंगाने देवांग जानी यांनी दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार तत्कालीन महापालिका आयुक्त यांच्यासमोर गोदावरीतील १७ प्राचीन कुंडांसह अरुणा नदीच्या अस्तित्वासंबंधी पुराव्यासह सादरीकरण केले. यावेळी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी,“आम्ही अरुणा नदीवर रस्ता बांधला आहे, मात्र अरुणा नदीच्या संरचनेत कोणताही बदल केला नाही,” असे लेखी उत्तर दिले. त्यामुळे सादरीकरणपश्चात नदीचे अस्तित्व महापालिका मान्य करते असे दिसते. तसेच, नाशिक महानगरपालिकेच्या २०१७ च्या शहर विकास आराखड्यातदेखील अरुणा नदी दाखविण्यात आली आहे. मात्र, माहिती अधिकारात अभिलेखावर नोंद नाही, असे उत्तर दिले जाते. त्यामुळे अरुणेच्या अस्तित्वाची नेमकी स्थिती काय आहे, हाच एक मोठा प्रश्न आहे. माहिती अधिकारावर अपील दाखल केले असता व नाशिक महानगरपालिकेच्या वतीने याबाबत स्मार्ट सिटीमध्ये अरुणा नदी विषयाचा समावेश करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, आजमितीस सहा महिने उलटूनदेखील त्यावर साधी चर्चादेखील झाली नसल्याचे जानी यांनी सांगितले.

 

स्मार्ट सिटी डीपीआरमध्ये केपीएमएल या कंपनीने इंद्रकुंडपासून ते रामकुंडपर्यंत पाईपलाईनद्वारे ही नदी आणण्यात येईल, असा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, यामुळे अरुणा नदी पुनर्जीवित होणार नसल्याने व व हे नैसर्गिक नदीशी अनैसर्गिक कृत्य असल्याने यावर जानी यांनी हरकत घेतली. प्राप्त माहितीनुसार गोदावरी व अरुणा संगमाचे धार्मिक महत्त्व असे आहे की, जेव्हा महादेवाला गोहत्येचे पातक लागले होते, तेव्हा नंदीच्या सांगण्यावरून महादेवांनी या संगमात आंघोळ केली व ते कपालेश्वर मंदिरात विराजमान झाले. त्यामुळे या नदीला पौराणिकदृष्ट्या महत्त्व असल्याने ही नदी इंद्रकुंड ते रामकुंड या मार्गात पुनर्जीवित करणे आवश्यक आहे. तसेच इंद्रकुंड ते रामशेज किल्ला येथे अतिक्रमण झाले असून त्याचीदेखील चौकशी व्हावी, अशी मागणी पुढे येत आहे. अरुणा नदीत साधारणत: २५० ते ३०० क्युसेस जलसाठा आहे. हे पाणी गोदावरीत आल्यास गोदावरी प्रदूषणाला आळा बसेल तसेच, जिल्ह्याचा पाणीप्रश्नदेखील सुटण्यास मदत होईल. तसेच, अरुणेच्या प्रवाहामुळे स्वच्छ पाणीसाठादेखील उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. मानवी जीवनाची सुरुवात ज्या नदीकिनाऱ्यांवर झाली, त्याच जीवनदायिनी असणाऱ्या नद्या अशा पद्धतीने गायब होत असतील तर हा मोठा चिंतेचा विषय आहे. अरुणा नदी हे त्याचे केवळ प्रातिनिधिक उदाहरण आहे. गोदाकाठ केवळ गोदेबाबत विविधांगी भूमिका घेऊन समृद्ध होणार नाही, तर गोदेच्या उपनद्यांचेदेखील पुनर्जीवन करणे त्यासाठी नक्कीच आवश्यक आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@