लय भारी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2019   
Total Views |


 


भारताच्या मिशन वर्ल्ड कपची सुरवात दणक्यात झालीय. दक्षिण आफ्रिकेचा ६ विकेट राखून भारतानं सफाईदार पराभव केलाय. या दोन ओळीत भारताच्या विजयाचा पराक्रम व्यक्त करणं म्हणजे विराटच्या टीमवर अन्याय करण्यासारके आहे. स्कोरबोर्डवर नजर टाकली तर भारतानं आफ्रिकेला स्वस्तात गुंडाळं होतं पण खेळपट्टीवर नजर टाकली तर तसं म्हणणं धाडसाचं ठरलं असतं... अर्थात बुमरा आणि चहलचं श्रेय हिरावून घ्यायचं नव्हतं पण भारतीय टीम खेळायला आल्यावर रोहित शर्माचा बॉलशी सुरु असलेल्या लपंडाव काळजाचा ठोका चुकवणारा होता. पहिल्या २० बॉलमध्ये रोहितला फक्त ५ धावा करता आल्या होत्या. आणि त्यात एक जीवदानही.

 

मॅच संपल्यावर कॅप्टन विराट कोहलीनं त्याची कबूली दिली. आमचा विजय सहज नव्हता तर प्रोफेशनल होता ही प्रतिक्रीयाच खुप काही सांगून जाते. पण अशा आव्हानात्मक परिस्थितीतच रोहीतमधील गुणवान खेळाडूची ओळख पटते. ज्या पध्दतीनं रोहीतनं शतक ठोकत भारताच्या विजयाचा पाया रचला ते काबीले तारिफ होते... वन डेतील त्याचं हे २३ वे शतक आहे. दुसरीकडे चहलनं एकहाती विकेट मिळवल्या असं म्हणावं लागेल. त्याच्या चारपैकी ३ विकेटवर त्याची एकट्याची मालकी होती. फॅफ डू फ्लेसिस आणि डुसेनचे त्याने काढलेले दांडके म्हणजे भानामतीच होती. त्या दोघांना अजूनही बॉल नेमका कुठून घुसला हे कळले नसेल आणि मिलरला तर जणू हिप्नाटीजम केल्याप्रमाणे आपल्याच बॉलिंगवर कॅच द्यायला चहलनं भाग पाडलं. फेहलुकवायोला तर त्यानं क्रिकेटच्या भाषेत मामा बनवलं आणि धोनीनं त्याला स्टम्पिंग केले.

 

मॅचचा शेवट काय असणार याची ही सुरुवात होती. भारताची बॅटींग लाईनअप बाबत तर अवघ्या जगानं धास्ती घेतलीय. टीममधील आठव्या क्रमांकापर्यंत कोणताही खेळाडू मॅच विनींग खेळी खेळण्याची क्षमता राखून आहे. बुमरा, भुवनेश्वर,चहल आणि अगदी पंड्यापर्यंत तुफानी बॉलिंग लाईनअप असणाऱ्या संघाकडून विजयी सुरुवात अपेक्षितच होती. भारताचा हा विजय लय भारी आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये रॉबिन राऊंडपध्दतीनं मॅच होणार असल्यामुळे प्रत्येक टीम दुसऱ्या टीमसोबत खेळणार आहे. त्यामूळे सुरुवातीच्या या मॅचमध्ये तसं दडपण कमी असणार आहे. अशावेळीच महत्वपुर्ण गुणांची कमाई करून सेमी फायनलचा दावा मजबूत करण्याच्या दिशेनं भारतानं पहिलं पाऊल टाकलंय. प्रवास कितीही मैलाचा असला तरी त्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल महत्वाचं असतं. भारताचं हे पहिलं विजयी पाऊल आश्वासक होतं एवढं नक्की.


 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@