गठबंधनाची भानगड? नको रे बाबा!!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2019
Total Views |


 


‘महागठबंधन’ यंदा भाजपच्या चौखूर उधळलेल्या अश्वाला लगाम घालणार, अशी हवा तयार करण्यात आली. या हवेनं ‘महागठबंधना’चा फुगा जोरदार फुगवला खरा, परंतु २३ मे रोजी निवडणूक निकालांची टाचणी लागताच फाटकन हा महाकाय फुगा फुटला आणि अक्षरशः नाहीसाच झाला. त्यानंतर आता ‘महागठबंधना’तील घटकपक्षांनी स्वबळाचे नारे देत या नष्ट झालेल्या फुग्याचं ‘तेरावं’ घालण्याचं कामदेखील सुरू केलं आहे.


देशाच्या राजकारणाचं व्याकरण बदलून टाकणाऱ्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून १३ दिवस उलटले आहेत. या १३ दिवसांतच अनेक निवडणूकपूर्व ‘गठबंधनां’चं, थोडक्यात राजकीय सोयरिकीचंही तेरावं घातलं जात आहे. यामध्ये सर्वांत अग्रक्रमाने नाव घ्यावं लागेल, ते उत्तर प्रदेशातील गाजलेला प्रयोग, अर्थातच ‘महागठबंधन’चं. उत्तर प्रदेशच्या राजकारणातील पारंपरिक शत्रू म्हणजे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष. साधारण तीनेक दशकं हे दोन्ही पक्ष या राज्यात एकमेकांशी अक्षरशः जीव खाऊन भांडले. एकीकडे ‘नेताजी’ मुलायमसिंह यादव आणि दुसरीकडे ‘बहन’ मायावती. परंतु, २०१४ मधील ‘नरेंद्र मोदी’ नामक लाटेत या दोन्ही पक्षांचा अक्षरशः धुव्वा उडाला आणि मग यंदाच्या निवडणुकीत या दोन पक्षांनी चक्क आघाडी केली. ही आघाडी, म्हणजेच ‘महागठबंधन’ यंदा भाजपच्या चौखूर उधळलेल्या अश्वाला लगाम घालणार, अशी हवा तयार करण्यात आली. या हवेनं ‘महागठबंधना’चा फुगा जोरदार फुगवला खरा, परंतु २३ मे रोजी निवडणूक निकालांची टाचणी लागताच फाटकन हा महाकाय फुगा फुटला आणि अक्षरशः नाहीसाच झाला. त्यानंतर आता ‘महागठबंधना’तील घटकपक्षांनी स्वबळाचे नारे देत या नष्ट झालेल्या फुग्याचं ‘तेरावं’ घालण्याचं कामदेखील सुरू केलं आहे.

 

लोकसभेचा विजयी मार्ग ज्या राज्यातून जातो, ते राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. कारण, या राज्यात लोकसभेच्या देशातील सर्वाधिक म्हणजे तब्बल ८० जागा आहेत. यंदा या जागा सपा-बसपाने एकत्रितपणे लढवल्या. तथापि, यापैकी केवळ १५ जागा जिंकण्यात ‘महागठबंधन’ला यश मिळालं. मायावतींच्या बसपाने नाही म्हणायला शून्यावरून १० वर झेप घेतली आणि सपाने आपल्या आधीच्या ५ जागा टिकवल्या. परंतु, हे ‘महागठबंधन’ जणू काही भाजपला सत्ताच्युत करणारच, असाच समाज देशातील असंख्य पत्रकार, राजकीय विश्लेषकांनी करून घेतला होता. त्याच आधारावर गेले तीन-चार महिने विविध प्रसारमाध्यमांवरून चर्चांचा कीस पाडला जात होता, वृत्तपत्रांतून लेखांचे रतीब घातले जात होते. ८० पैकी ७०च्या वर असलेला भाजप या आघाडीमुळे थेट ३०-३५ पर्यंत येणार, म्हणजे साधारण चाळीसेक जागा घटणार, पुन्हा गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये भाजपला मोठा फटका बसणार, म्हणजे आणखी चाळीसेक जागा घटणार आणि भाजप २००+ जाण्यात अपयशी ठरणार, हा काय तो या मंडळींचा निष्कर्ष. या निष्कर्षासाठी कारणीभूत घटक म्हणजे उत्तर प्रदेशातील ‘जात’. काळाच्या मागे राहल्याचे दुष्परिणाम काय असतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे या प्रकारचं विश्लेषण आणि त्यातून सपशेल फसलेल्या अंदाजांकडे पाहता येईल.

 

समाजवादी पक्ष म्हणजे यादव आणि मुस्लिमांचं एकगठ्ठा मतदान. त्यात बसपा म्हणजे दलितांचं एकगठ्ठा मतदान. मुस्लिमांची १८-१९ टक्के, यादवांची ८-९ टक्के आणि दलितांची २० टक्के मतं एकत्र केली की झालं, ८० पैकी किमान ५० मतदारसंघ आपलेच, असं हे गणित. अर्थात, एकूणच उत्तर प्रदेशच्या आजवरच्या राजकीय इतिहासाला साजेसं. या जातीय गणितांना भाजपने रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी जबर दणके दिले होते परंतु, तरीही ही मंडळी काही शहाणी झाली नाहीत. काही विशिष्ट जातीसमूहांना चुचकारायचं, त्यांची एकगठ्ठा मतं मिळवायची आणि निर्धास्तपणे राज्य करायचं, ही रणनीती अगदी काँग्रेससह असंख्य छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांनी वापरली. सपा-बसपा हे तर यातले अर्क. मग दोन किंवा त्याहून अधिक जातीसमूहांना एकत्र करून त्यांचे वेगवेगळे ‘पॅटर्न्स’ तयार झाले. यंदा ‘महागठबंधन’ आणि त्यांच्या भाटांकडून सतत ‘मुयाद’ समीकरणाचा जप केला जात होता. वर उल्लेखल्याप्रमाणे विशिष्ट जातींची मतं ही आपल्याच पक्षाची जहागीर, असा अतिआत्मविश्वास या गणितांमागे होता. दुसरीकडे, भाजपला केवळ तथाकथित उच्चवर्णीय म्हणजे ब्राह्मण, ठाकूर, वैश्यांचीच मतं मिळतात, हीदेखील या समीकरणांची एक आंधळी बाजू होती. या समीकरणांच्या आधारावर यंदा मोदी सरकार आपटणारच, अशी खात्री मनाशी बाळगून, त्यासाठी अक्षरशः जीव टांगणीला लावून देशातील असंख्य ‘तज्ज्ञ’ मंडळी बसली होती.

 

मे महिन्याची २३ तारीख उजाडली आणि हा भ्रमाचा भोपळा फुटला. सपा आणि बसपाला एकत्र येऊनही केवळ ३७ टक्के मतंच मिळू शकली, तर भाजपला एकट्याने लढून ५० टक्के मतं मिळाली. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यापासून पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकजण, शिवाय काही मोजके राजकीय विश्लेषक हे सातत्याने सांगत राहिले, की, ‘महागठबंधना’ने काहीच फरक पडणार नाही, उत्तर प्रदेशासह देशभरात भाजप बहुमत मिळवेल. परंतु, या तथाकथित बुद्धिवादी वर्तुळाने त्यांना गांभीर्याने घेतलं नाही. अखेर विकास आणि राष्ट्रवादाचं राजकारण या जातीय समीकरणांपुढे वरचढ ठरलं आणि त्यातून निकाल काय लागले, ते आपल्यासमोर आहेतच. या निकालांमुळे, उत्तर प्रदेशात सध्या दिल्लीतील एका कथित धडाडीच्या पत्रकाराच्या शब्दांत सांगायचं झालं तर, ‘डर का माहौल है’.. भाजपचा विजयरथ जंग जंग पछाडूनही आवरता न आल्यामुळे उत्तरेतील अनेक रथी-महारथींची मती गुंग झाली आहे. काय करणार, पिढीजात शत्रूशी घरोबा करूनही अखेर सरशी मात्र भाजपचीच झाली आहे, त्यामुळेच बहुधा सपा आणि बसपाने हा नादच सोडल्याचं दिसतं. सपा, बसपा कमी की काय म्हणून इवल्याशा राष्ट्रीय लोकशाही दलानेही ‘महागठबंधन’ नामक भानगडीचा नाद सोडण्याचं ठरवलं आहे. मायावतींनी तर सपासोबतच्या आघाडीचा काहीच फायदा झाला नसल्याचं सांगत ‘महागठबंधना’ला झटकूनच टाकलं आहे. आता येत्या काळात हे दोन पक्ष सर्वशक्तिमान भाजपला पराभूत करण्यासाठी काय नवी रणनीती आखतात, हे कळेलच. परंतु, तूर्तास सपा, बसपासारख्या या संधिसाधू, गलिच्छ जातीय राजकारणाने बरबटलेल्या पक्षांचं खरं रूप भारतीय मतदारांना पुन्हा एकदा कळून चुकलं असेल, अशी आशा करायला हरकत नसावी.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@