अव्वल स्थान टिकविण्याचे आव्हान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2019   
Total Views |



कोणत्याही क्षेत्रात अव्वल येणे, हे तसे सोपे असते. मात्र, कायमस्वरूपी त्याच अव्वल स्थानावर टिकून राहाणे हेच खरे आव्हान असते. नुकताच ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी तंबाखूविषयी जनजागृती करण्यात नाशिकने अव्वल स्थान पटकावले. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि तंबाखू सेवन याला प्रतिबंध करण्यासाठी असणाऱ्या (सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा) ‘कोटपा’ कायद्याची अंमलबजावणी नाशिक शहर पोलिसांच्या वतीने काटेकोरपणे करण्यात आली. या कायद्यानुसार, सुमारे दोन हजार नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ‘कोटपा’ कायद्याची अंमलबजावणी करण्यात राज्य पोलिसांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला असता, नाशिक शहर पोलिसांची कामगिरी अव्वल ठरली आहे. या कामगिरीत प्राप्त केलेले अव्वल स्थान कायम ठेवण्याचे आव्हान यापुढील काळात नाशिक पोलिसांसमोर असणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात मागील दीड वर्षांच्या कालखंडात जवळपास १६ हजार, २४५ नागरिकांवर ‘कोटपा’चा बडगा उगारण्यात आला आहे. नाशिकपाठोपाठ सोलापूर शहर पोलिसांचा क्रमांक लागतो. त्याखालोखाल सातारा, पालघर, अमरावती, बीड, वाशीम, औरंगाबाद, रायगड, नवी मुंबई आणि मुंबई पोलीस असा क्रम लागतो. दरवर्षी ३१ मे हा ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. नाशिक शहरवासीय व्यसनाधीन असू नयेत, तसेच येथील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांच्या नेतृत्वात नाशिक पोलिसांनी अथक प्रयत्न केले. जनजागृती फेरी, मॅरेथॉन स्पर्धा, निबंध स्पर्धा, शिबिरे अशा माध्यमातून नाशिक शहर पोलिसांनी याबाबत कायमच जनजागृती केली. तसेच, नाशिक शहर पोलिसांनी ‘कोटपा’ कायद्याची अंमलबजावणी करताना स्वतःदेखील तंबाखू मुक्ततेची शपथ घेतली. नाशिक शहर पोलीसच या उपक्रमाचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर होते. त्यामुळे स्वतःपासून सुरुवात करत सुधारणेचा एक नवीन वस्तुपाठ शहर पोलिसांनी घालून दिला आहे. मात्र, यापुढील काळात आपणच विस्तारित आणि सक्षम केलेल्या मार्गाची तीच ओळख कायम ठेवण्याचे आव्हान नाशिक शहर पोलिसांना पेलावे लागणार आहे, हे निश्चित.

 

असा आदर्श कौतुकास्पद

 

कुटुंबातील व्यक्तीचे देहावसान झाल्यावर आवश्यक ते क्रियाविधी सर्वच धर्मात केले जातात. मात्र, नाशिक येथील कोठावदे बंधूंनी याबाबत एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. नाशिकरोड येथे वास्तव्यास असणाऱ्या जितेंद्र मधुकर कोठावदे यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे वडिलांच्या देहावसानपश्चात त्यांच्या तेराव्याच्या विधीप्रसंगी रक्तदान करत आदर्श निर्माण केला आहे. हिंदू परंपरेत तेराव्याच्या विधीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी सुतकाचे अधिकारी असणारे सर्वच आप्तस्वकीय एकत्र येत असतात. एकाच वेळी, एकाच ठिकाणी एकत्र आलेल्या या सर्वांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केल्याने त्याचा निश्चितच गरजू रुग्णांना फायदा होणार आहे. आजघडीला विवाह, दशक्रिया, वाढदिवस अशा प्रसंगांना काही वस्तू दान देण्याची पद्धत रुढ आहे. मात्र, विकत घेऊन वस्तू दान करण्यापेक्षा रक्तदान केल्याचे हे एक अनोखे उदाहरण आहे. रक्ताच्या नात्यांची वीण घट्टच असते आणि रक्ताचा माणूस म्हणजे आपले पिता निवर्तल्यानंतर त्यांच्या संस्कारांची वीण अधिक घट्ट करणारा हा उपक्रम आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तेराव्या दिवशी दान करण्यात येणाऱ्या वस्तूंच्या खर्चास फाटा देत कोठावदे कुटुंबीयांनी केलेले हे दान निश्चितच स्पृहणीय असल्याची चर्चा सध्या नाशिकमध्ये आहे. यापूर्वीदेखील कोठावदे बंधूंनी त्यांच्या मातोश्री शकुंतला कोठावदे यांच्या निधनपश्चात असेच रक्तदान करत एक आदर्श निर्माण केला होता. तसे पाहिले तर एका हाताने केलेले दान दुसऱ्या हातालादेखील समजू नये, ही भारतीय संस्कृती आहे. मात्र, मूळ संस्कृतीशी फारकत घेत एका भलत्याच संस्कृतीची जोपासना करणारे काही तुरळक नागरिकदेखील आहेत. अशा नागरिकांसाठी कोठावदे परिवाराच्या या उपक्रमाचा आदर्श हा मार्गदर्शक ठरावा, असे वाटते. मुळात आपल्यापाशी जे आहे, त्याचे दान करणे अभिप्रेत असते आणि याच बाबीचा साकल्याने विचार करून कोठावदे परिवाराने हा आदर्श घालून दिला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@