अखंड ध्यान...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2019
Total Views |



आपण त्या प्राण्यांवर मनापासून प्रेम केले, तर ते प्राणी आपल्याला वश होतात. यासाठी आपण अंतर्निष्ठ होऊन त्या जाणिवेचे अखंड स्मरण केले की, त्याचे अखंड ध्यान लागते आणि परमात्मा आपल्या हाती येतो. या ठिकाणी समर्थांनी ‘अखंड ध्यान’ असा शब्दप्रयोग केला आहे, तरीदेखीलते एकप्रकारे ‘सहजध्यान’ आहे, असे म्हणता येईल.


सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने ‘भाग्यवान’ कोणाला म्हटले जाते हे पाहिले, तर आपण प्रथम पैशाचा विचार करतो. आपल्या विचारातून‘भाग्यवान पुरुष’ म्हणजे जो खूप पैसा मिळवतो,त्या पैशाच्या जोरावर अनेक भौतिकसुखे भोगतो, ज्याला चांगली प्रसिद्धी मिळते, जो सर्व उपयोग आपल्या मनाप्रमाणे भोगत असतो, अशांना आपण ‘भाग्यवान’ समजतो. त्यामुळे आपल्या ‘भाग्यवंता’च्या व्याख्येत बसणारे कोण कोण आहेत, हे सर्वजण जाणतात. त्या ‘भाग्यवंतां’मध्ये गर्भश्रीमंत व्यक्ती, राजकीय स्थानामुळे मिळणारीसत्ता आणि संपत्ती यांचा उपभोग घेणारे, तसेच चित्रपटसृष्टीशी संबंधित ख्यातकीर्त अभिनेते-अभिनेत्री, क्रिकेटपटू यांचा प्रामुख्याने समावेश असतो. आज सर्वसामान्य माणसाला या नामवंतांचे आकर्षण आहे. कारण, त्यांना उपभोग्य वस्तूंची उपलब्धता सहज शक्य आहे. परंतु, असे असले तरी संतांची आणि समर्थ रामदास स्वामींची ‘भाग्यवान पुरुषा’ची व्याख्या याहून फार वेगळी आहे. समर्थांच्या मते, ज्याच्या अंत:करणात परमेश्वराला खऱ्या अर्थाने स्थान आहे, त्यालाच ‘भाग्यवान’ समजले पाहिले, ही समर्थांची भाग्यपुरुषाची ओळख आहे. स्वामींच्या मते, परमेश्वर हा शुद्ध जाणीवस्वरूप आहे आणि तो जगातील सर्व प्राण्यांच्या अंतर्यामी वावरत असतो. जो त्या अंतर्यामी वावरणाऱ्या परमेश्वराला जाणतो, त्याला आयुष्यात काही कमी पडत नाही. त्या भगवंताला कसे जाणायचे, हा या ‘अखंड ध्यान निरुपण’ या समासाचा विषय आहे. (द. १४ स. ८). या समासाची सुरुवातकरताना स्वामी म्हणतात-

 

बरें ऐसा प्रसंग जाला ।

जाला तो होऊन गेला ।

आता तरी ब्राह्मणी आपणाला ।

शाहाणे करावें ।

 

समर्थांच्या मते, काळ तर मोठा कठीण आला होता. याच्या मागील समासात ब्राह्मणांच्या दुरवस्थेचे वर्णन स्वामींनी केले होते. ब्राह्मणवर्गाच्या दैन्यावस्थेचे वर्णन केले होते. त्यात स्वामींनी म्हटले आहे की, आताचे ब्राह्मण बुद्धीपासून चळले आहेत.ते आचारभ्रष्ट झाले आहेत. अनेक ब्राह्मण ‘दावलमलक’ या पीराची भक्ती करू लागलेआहेत. काही ब्राह्मण स्वेच्छेने मुसलमान झाले आहेत. अशा रीतीने म्लेंच्छांनी तत्कालीन समाजासमोर अनेक कठीण प्रसंग उभे केले होते. हिंदू संस्कृती धोक्याच्या काठावर उभी होती. तिला कसे वाचवायचे, याची चिंता समर्थांना लागून राहिली होती. म्लेंच्छांचे राजकीय, सांस्कृतिक आक्रमण थोपवण्यासाठी खऱ्या शक्तिशाली योद्ध्यांची जितकी गरज होती, तितकी देवविषयक खऱ्या सांस्कृतिक ज्ञानाची तत्कालीन समाजाला आवश्यकता होती. म्हणून स्वामी समाजाच्या सुरुवातीस म्हणाले की, “आता तरी ब्राह्मणांनी स्वत:ला शहाणे करावे.” मागे झाले ते होऊन गेले. आजच्या काळातील आपले प्रश्न वेगळे असेल तरी समस्या तीच आहे. आज पाश्चात्त्य देशांच्या संस्कृतीची आम्ही नक्कल करतो. त्यांची राहणी, खाणे, बोलणे, भाषा हे आम्ही ‘पुढारलेपणा’चे लक्षण मानतो. त्यामुळे आनंदाच्या कल्पनेसाठी भौतिक आकर्षणाची हाव धरतो. त्यातून निर्माण होणारे द्वेष, मत्सर, स्वार्थीवृत्ती, पैशाला अपरंपार महत्त्व ही विषवल्ली पसरत आहे. अशा अनेक कारणांनी समाजाचे स्वास्थ्य हरवले आहे. अशावेळी संतांच्या विचारांवाचून गत्यंतर नाही. म्हणून समर्थांचे अध्यात्मचिंतन आपल्यासाठी मोलाचे आहे. स्वामी या समासात पुढे सांगतात की,

 

आधी देवास वोळखावे ।

मग अनन्यभावे भजावे।

अखंड ध्यानचि करावे । सर्वोत्तमाचे ।

 

प्रथम आपण आपल्या अंतरंगातील देवालाओळखले पाहिजे. मग अनन्यभावाने त्या देवाची भक्ती करावी. त्या सर्वोत्तमाचे अखंड ध्यान करावे. त्यासाठी ‘आत्म-अनात्म विवेक’ नीट समजून घ्यावा. आत्मा हा जाणीवरूप आहे. तो सर्व प्राण्यांच्या ठिकाणी जाणीव रुपाने असून प्राण्यांच्या ठिकाणी वर्तन घडवून आणतो.

 

प्राणीमात्री जगदान्तरे ।

म्हणोनि राखावी अंतरे ।

दाता भोक्ता परस्परे ।

सकळ काही ॥ (१४.८.७)

 

प्राण्याचे अंत:करण म्हणजे जगाचे अंत:करण आहे. यासाठी सर्वांचे अंत:करण सांभाळावे. कोणाचे अंत:करण दुखवू नये. जो जाणीवरूप देव सगळ्या जगात वावरतो, तोच आपल्याही अंत:करणात असतो. जगातीलप्राण्यांच्या अंतर्यामी असणारी जाणीव आपल्याला अनुकूल झाली, तर प्राणी वश होतात. थोडक्यात, आपण त्या प्राण्यांवर मनापासून प्रेम केले, तर ते प्राणी आपल्याला वश होतात. यासाठी आपण अंतर्निष्ठ होऊन त्या जाणिवेचे अखंड स्मरण केले की, त्याचे अखंड ध्यान लागते आणि परमात्मा आपल्या हाती येतो. या ठिकाणी समर्थांनी ‘अखंड ध्यान’ असा शब्दप्रयोग केला आहे, तरीदेखीलते एकप्रकारे ‘सहजध्यान’ आहे असे म्हणता येईल. कारण, असे ध्यान करण्यासाठी काही विधी नाही किंवा त्यासाठी फार कष्ट करावे लागत नाहीत. एकदा या अंतर्यामी असलेल्या जाणिवेची ओळख झाली की, हे ध्यान चालता, बोलता, लोकोपचार करताना चालू राहणे शक्य आहे. म्हणून त्याला ‘सहजध्यान’ म्हणायला हरकत नाही.

 

अखंड ध्यानाचे लक्षण ।

अखंड देवाचे स्मरण।

याचे कळता विवरण ।

सहजचि घडे॥ (१४.८.२४)

 

‘देवाचे अखंड ध्यान’ म्हणजे ‘देवाचे अखंड स्मरण’ आपल्या अंत:करणात जाणिवेच्या रुपाने देव असतो, तसा दुर्जन माणसाच्या ठिकाणीही देव असतो.पण, दुर्जनाचा स्वभाव लाथा मारण्याचा असल्यामुळे त्याच्यापासून आपल्याला त्रास होणार, हे ओळखून असावे. अशांच्या सहवासात आपले अंत:करण दुश्चित होते. यासाठी समर्थ उपाय सुचवतात. समर्थ सांगतात, आपण त्या दुर्जनाची बरोबरी करू नये, म्हणजे आपण त्यांच्या पातळीवर उतरू नये. त्यांच्याशी भांडत बसू नये. अशा दुर्जनांशी संबंध आलाच, तर ते स्थान सोडून निघून जावे. नंतर विवेकाने आपले मन शांत करावे. ते आपल्यासाठी हितकारक असते. आत्मा एक आहे हे खरे, पण अनेकवेळा प्राणिमात्रात तो वेगळेपणाने प्रत्ययाला येतो.

 

आत्मत्वी दिसतो भेद ।

हा अवघाचि देहसमंध ।

येका जीवने नाना स्वाद । औषधी भेंदे ।

 

त्या वेगळेपणाचे कारण म्हणजे पाणी एकच असले तरी, वेगळ्या चवीच्या वनस्पतींना ते वाढवते. ऊस, मिरचीचे रोपटे, कारल्याची वेल, द्राक्षवेल यांना एकच पाणी दिले तरी, त्यांच्या चवीत भिन्नता येेते, त्याचप्रमाणे हे आहे. सज्जन व दुर्जन दोघांच्याही ठिकाणी देव असला तरी, त्यांच्या वर्तनात फरक असणारच. लोक नेहमी अनात्म्याचे ध्यान करतात. त्यासाठी खूप कष्ट करतात, पण काहीही करून ते अनात्म्याचे ध्यान टिकत नाही. लोक देवाला स्थूल समजून त्याचे ध्यान करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे डोळे मिटून ध्यानाला बसल्यावर काहीच्या काही दिसू लागते.

 

परी तें धरितांहि धरेना।

ध्यानी येती वेक्ति नाना।

उगेचि कष्टती मना ।

कासाविस करूनी॥

 

प्रयत्न करूनही हे ध्यान टिकत नाही. ध्यानाला बसल्यावर देवाचा चेहरा एखाद्या परिचित व्यक्तीच्या चेहऱ्यासारखा दिसून काहीच्या काही दिसू लागते. आजच्या चित्रपट, टीव्हीच्या जमान्यात त्यातील गोंडस चेहरे, मनापुढे दिसू लागून मन वाहवत जाते. ध्यान बाजूलाच राहते. नको नको ते भास होऊ लागतात. यातून मार्ग काढायचा तर प्रथम आपल्याला हे ठरवायचे आहे की, ध्यान देवाचे करायचे आहे की देवालयाचे करायचे आहे! ‘आत्मा’ हा खरा देव असून ‘देह’ हे त्याचे देवालय आहे. तेव्हा आपण ध्यान कुठे लावायचे, हे प्रथम ठरवावे. देवाला स्थूल शरीरधारी समजून जर त्याचे ध्यान करण्याचा प्रयत्न केला, तर तो निष्फाळ ठरतो. खऱ्या देवाला ओळखून तिथे चित्त एकाग्र करावे.

 

देह देऊळ आत्मा देव ।

कोठें धरूं पाहाता भाव।

देव वोळखोन जीव तेथेंचि लावावा॥

(१४.८.२९)

 
 

- सुरेश जाखडी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@