भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2019
Total Views |




नवी दिल्ली : चालू वर्षात भारत जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. सध्या भारत सहाव्या स्थानावर असून ब्रिटन जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. परंतु भारत ब्रिटनला मागे टाकून पाचव्या स्थानावर झेप घेईल. तसेच २०२५ सालापर्यंत आशिया-पॅसिफिक क्षेत्रात जपानलाही मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानावर जाईल, असे भाकित आयएचएस मार्किटने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

 

आयएचएस मार्किटने सोमवारी आपला अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार चालू वर्षात भारताची अर्थव्यवस्था ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच २०२५ सालापर्यंत आशिया पॅसिफिक क्षेत्रातही भारत जपानला मागे टाकून दुसऱ्या स्थानावर जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.

 

लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला मिळालेल्या विजयानंतर जारी करण्यात आलेल्या अहवालात मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी आर्थिक दृष्टीकोन सकारात्मक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच २०१९ ते २०२३ या कालावधीत जीडीपीचा सरासरी दर सात टक्क्यांच्या जवळपास राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

 

२०१९ मध्ये भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि देशाचा जीडीपी ३ लाख कोटी डॉलर्सपेक्षा अधिक होणार असल्याचे आयएचएसच्या मार्किटच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांच्या रॅकिंकमध्ये भारत पुढे जाणार असून जागतिक जीडीपीच्या वृद्धीतही भारताचे योगदान वाढेल. तसेच भारत आशिया पॅसिफिक क्षेत्रातील एक प्रमुख इंजिन बनेल. आशियाई क्षेत्रातील व्यापार आणि गुंतवणुकीच्या प्रवाहातही भारताचे अमूल्य योगदान असेल, असेही अहलवालात सांगण्यात आले आहे.

 

सध्या जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा १८ टक्के असून २५ टक्क्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान, विद्यमान सरकारसमोर उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील रोजगार वाढवण्याचे आव्हान असेल असेही यात नमूद करण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@