आंतरजातीय विवाह प्रोत्साहन रकमेत वाढ करणार - आठवले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2019
Total Views |



नवी दिल्ली : रामदास आठवले यांनी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचा आज पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी आंतरजातीय विवाह प्रोत्साहन रक्कम व विद्यार्थी शिष्यवृत्तीत वाढ करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पदभार स्वीकारल्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही घोषणा केली. यावेळी त्यांनी मंत्रालयाच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.

 

मंत्रालयाच्या वतीने आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी अडीच लाख रूपये प्रोत्साहन रक्कम देण्यात येते. आगामी काळात ही रक्कम वाढविण्यात येणार असल्याचे आठवले म्हणाले. याशिवाय अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सध्या माध्यमिक पूर्व व माध्यमिकोत्तर शिष्यवृत्ती २९० ते १२०० रूपयांपर्यंत देण्यात येते, या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील १० वर्षांपासून शिष्यवृत्तीची ही रक्कम कायम असून त्यात वाढ करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या कोट्यात वाढ करण्यात येईल, तसेच मंत्रालयाअंतर्गत कार्यरत डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने अनुसूचित जातीतील जनतेला शस्त्रक्रियेसाठी देण्यात येणाऱ्या साडेतीन लाखांच्या रकमेत वाढ करण्यात येणार असल्याचेही आठवले यांनी यावेळी सांगितले. अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या निधीमध्ये ५५ हजार कोटींहून वाढ होऊन ७६ हजार कोटी रूपये झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@