शेवटची झटापट!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2019
Total Views |


 


वैफल्याने, नैराश्याने घेरल्याने पवार आता कसलीही विधाने करत आहेत. पण यातून काहीही साध्य होणार नाही, उलट नव्या पिढीसमोर शरद पवारांचेच अधिक हसे होत राहणार. मात्र, आयुष्याच्या संधीकाळी पवारांबाबत असे होणे हे शोकांतिकेसारखेच!


इव्हीएमच्या साहाय्याने लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठीच भाजपने गेल्यावर्षी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तीन राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांत आपला पराभव करून घेतला,” असे अफलातून तर्कट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी लावले. तत्पूर्वी, लोकसभा निवडणूक निकालांबाबतचे एक्झिट पोल जाहीर झाले तेव्हा काँग्रेसनेते रशीद अल्वी यांनीदेखील भाजपवर असाच बेछूट आरोप केला होता. रशीद अल्वी यांच्यासारख्या सामान्य कुवतीच्या नेत्याने आरोप करणे आणि शरद पवारांसारख्या मुरब्बी, अनुभवी राजकारण्याने आरोप करणे, यात मूलभूत फरक असून स्वतःच्याच करतुतीने ते अतिसामान्यपणावर आल्याचे दिसते. वस्तुतः देशपातळीवरील राजकारणात सध्या शरद पवारांचे जे स्थान आहे, तशा तोलामोलाचा नेता अन्य कोणत्याही पक्षात नाही. पण, हाच नेता ज्यावेळी ताळतंत्र सोडून बोलायला लागतो, त्यावेळी पवारांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असेच म्हणावेसे वाटते. कारण, हे जोपर्यंत राजकारणात असतील, तोपर्यंत अशाच शेंडा-बुडखा नसलेल्या विधानांच्या आधारे जनतेच्या मनात भ्रमनिर्मितीचे काम करत राहतील, जे भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या आणि सुदृढ लोकशाहीसाठी उपयुक्त ठरणारे नाही. उलट इव्हीएमवर प्रश्नचिन्ह उठविणाऱ्यांना लोकशाहीचे मारेकरी आणि भारतीय जनतेच्या विवेकबुद्धीवरील शंकासूरच म्हटले पाहिजे.

 

शरद पवारांनी केलेल्या आरोपांवरून काही प्रश्नही निर्माण होतात, ज्यांची उत्तरे पवारांनी वा राष्ट्रवादी काँग्रेसने द्यायला हवी. भाजपने लोकसभा निवडणुका या देशातल्या सर्वच राज्यांत लढवल्या, ज्यात कर्नाटकपासून उत्तरेकडे व पूर्वोत्तरात सर्वत्रच ‘कमळ’ उमलले. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात मात्र भाजपला यश मिळाले नाही, मग इथेही भाजपने पूर्णपणे इव्हीएम हॅक केले होते काय? पश्चिम बंगाल, ओडिशा आणि जम्मू-काश्मीरमध्ये मात्र निम्मेच इव्हीएम हॅक केले गेले, म्हणून तितक्याच जागा भाजपला मिळाल्या? महाराष्ट्रातल्या सातारा, रायगड, मावळ आणि बारामतीतही भाजपने इव्हीएम हॅक करूनच पराभव पत्करला का? तसे जर असेल तर या प्रत्येक ठिकाणी जे जे जिंकले, त्या त्या उमेदवारांच्या राजीनाम्याची मागणी पवार करणार आहेत का? कारण, जनतेने तर भाजपच्या पारड्यात मत टाकले होते आणि भाजपने ते इतरांच्या पारड्यात फिरवले, हाच पवारांचा आरोप आहे ना? मग द्या राजीनामा, अन्य राज्यांत नाही तर निदान बारामतीत कन्या सुप्रिया सुळेंना तरी पवारांनी राजीनामा द्यायला सांगावा. तिथे पवारांच्या तर्कानुसार कांचन कुल यांना मिळालेली मते ही भाजपने इव्हीएम हॅक करूनच सुप्रिया सुळेंना पोहोचवली असतील नावास्तविक, इव्हीएमवर देशातल्या अनेक राजकारण्यांनी शंका घेतल्या, सवाल केले, हे खरेच आहे. पण हेही खरे की, ज्या ज्यावेळी भारतीय निवडणूक आयोगाने इव्हीएम हॅक करून दाखविण्याचे आव्हान अशा लोकांसमोर ठेवले, त्या त्यावेळी या मंडळींनी शेपूटघालेपणा करत बिळात बसून राहण्यातच शहाणपणा मानला. तेव्हा कोणीही ते आव्हान स्वीकारले नाही, बाकी दिल्लीपासून लंडनपर्यंत ‘डमी’ इव्हीएम हॅकिंगचे विदूषकी चाळे मात्र जोरात केले गेले. पुढे देशा-विदेशातल्या कितीतरी तज्ज्ञांनीदेखील इव्हीएम हॅक होऊ शकत नाही, अशी ग्वाही दिली. इव्हीएमची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी व्हीव्हीपॅट मशीनचीही जोडणी करण्यात आली. विशेष म्हणजे, आताच्या लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीत इव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची जुळणी केल्यास त्यातही एकाला दिलेले मत दुसऱ्याला दिल्याचे समोर आले नाही. तरीही हा मूर्खपणा का केला जातो? तर त्याचे उत्तर एकतर भाजपचे विराट यश आणि स्वतःचे अपयश पराभूतांच्या पचनी पडलेले दिसत नाही. लोकांनी मोदींना स्वीकारून आपल्याला नाकारले, आताच्या राजकारणात आपण संदर्भहीन, बिनमहत्त्वाचे, कोणीही किंमत न देणारे झाल्याचे या नेत्यांना कळत नाही. म्हणूनच इव्हीएमच्या नावाने गळा काढण्याचे उद्योग गुडघ्यात मेंदू असलेल्यांना सुचतात. अर्थात ही त्यांची शेवटचीच झटापट आहे, कारण विझणारा दिवा जरा जास्तच फडफडत असतो ना! आता त्यात पवारांसारखे मोठे नावही सामील झाले इतकेच.

 

इथे शरद पवारांच्या गेल्या काही दिवसांतल्या विधानांचीही चर्चा केली पाहिजे. साप अंगावरून गेल्याने आपण मुख्यमंत्री झाल्याचे म्हणणाऱ्या पवारांनी मोदी सत्तेवर येताच, हे सरकार १३ दिवसांत कोसळेल, असा शाप दिला, तर निकालाच्या आधी सत्ताधारी हिमालयात जाऊन बसले, असे म्हणत मोदींच्या केदारनाथ दौऱ्यालाही विरोध केला. सोबतच परिवर्तनासाठी अल्लाहची दुवाही मागून बघितली. शरद पवारांच्या या प्रत्येक विधानातून, कृतीतून सत्तेपासून वंचित राहिल्याने होत असलेली तडफडच दिसते. आपल्या अर्धशतकी राजकीय कारकिर्दीत पवारांनी नेहमीच सत्तेचे पान स्वतःच्या पुढ्यात कसे राहिल, हे पाहिले. मग त्यासाठी कोणत्याही थराला जाणे, कोलांटउड्या मारणे, इकडची तिकडची माणसे पळवून आणण्याची कामेही त्यांनी केली. मात्र गेल्या पाच वर्षांपासून राज्यात आणि केंद्रातही सत्ता नसल्याने पडलेल्या उपवासामुळे पवारांचे चित्त थाऱ्यावर नाही, असे दिसते. वैफल्याने, नैराश्याने घेरल्याने पवार आता कसलीही विधाने करत आहेत. पण यातून काहीही साध्य होणार नाही, उलट नव्या पिढीसमोर शरद पवारांचेच अधिक हसे होत राहणार. मात्र, आयुष्याच्या संधीकाळी पवारांबाबत असे होणे हे शोकांतिकेसारखेचदुसरीकडे मोदींच्या शपथविधीसाठी पवारांच्या आसनावरुन धुरळा उडविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने करून पाहिला. शरद पवारांना पाचव्या रांगेतला पास दिल्याने महाराष्ट्राचा अपमान झाल्याचे म्हटले गेले. काही काही लाळघोट्यांनी तर याचा संबंध थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या औरंगजेबाच्या आग्राभेटीशीही जोडला. हा खरे तर कहरच होता, पण कितीही आरडाओरडा केला तरी पवारांना पाचव्या रांगेत बसविण्यावरून महाराष्ट्र काही पेटला नाहीच. कारण, तो मूळ महाराष्ट्राचा अपमानच नव्हता, नव्हे तो पवारांचाही अपमान नव्हता. तर मोदींना पवारांकडून केला गेलेला विरोध द्वेषाच्या, असूयेच्या पातळीवर उतरल्याचा हा दाखला होता. ज्याला जनतेने अजिबात पाठिंबा दिला नाही. तसेच प्रफुल्ल पटेल यांच्या हवाई वाहतूक घोटाळाप्रकरणी ईडीने नुकतेच त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही आम्ही पटेलांच्या पाठीशी उभे राहू, असे सांगितले, ते साहजिकच. कदाचित वाटा सर्वांनाच मिळाला असेल. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, प्रफुल्ल पटेल गोंदियातून निवडून येत व त्यांनी घोटाळा केला असेल तर तो महाराष्ट्रीय जनतेने त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाचा अपमान ठरू शकतो, पण त्यांची होऊ घातलेली चौकशी हा अपमान ठरणार नाही. आता या चौकशीत प्रफुल्ल पटेल ईडीला सहकार्य करो आणि पवारांचे नाव न येवो व त्यातून पवारांचा अपमान न होवो, इतकेच.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@