दिल्लीमध्ये महिलांना मेट्रोसह बस प्रवास मोफत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना दिल्ली सरकारने मोठी घोषणा केली आहे. दिल्लीतील महिलांना डीटीसी बस आणि मेट्रोतून मोफत प्रवासाची सुविधा देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शनिवारी रात्री दिल्लीतील लोधी कॉलनीत भेट दिली असता केजरीवालांनी ही घोषणा केली. लोकसभेत आम आदमी पार्टीला मिळाले अपयश लक्षात घेऊन त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे विरोधकांकडून सांगण्यात येत आहे.

 

"महिलांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे. महिलांनी सार्वजनीक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी जनजागृती करण्याचा उद्देश समोर ठेवून महिलांना डीटीसी बस आणि मेट्रोतून मोफत प्रवासाची सुविधा देणार आहोत. पुढील दोन ते तीन महिन्यात महिलांसाठी बस आणि मेट्रोचा प्रवास मोफत करण्यात येईल. यासाठी जवळजवळ ७०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा सर्व खर्च दिल्ली राज्य सरकार उचलणार आहे." असे त्यांनी सांगितले.

 

येत्या काही महिन्यांमध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. केजरीवालांच्या या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी दरवर्षी १२०० कोटींचा बोजा सरकारवर पडणार आहे. "हा माझा पैसा नसून दिल्लीतील जनतेचाच पैसा आहे. यासाठी आम्ही कोणताही अतिरिक्त कर लादलेला नसून केवळ भ्रष्टाचार रोखून आम्ही हा पैसा वाचवला आहे. तोच पैसा आम्ही आता जनतेसाठी वापरत असून जनतेने आम्हाला आशिर्वाद द्यावेत." असे आवाहन त्यांनी केले आहे. केजरीवालांची ही मोफत प्रवासाची खेळी कितपत यशस्वी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@