होमियोपॅथीक तपासणी केस टेकिंग भाग-२१

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2019
Total Views |



रुग्णांमध्ये दिसून आलेल्या स्वप्नांची मानसिक स्थिती व औषध सिद्धतेच्या वेळी औषधांमध्ये दिसून आलेली मानसिक स्थिती यांचा मेळ करून मग होमियोपॅथीचे ‘सम’ असे औषध शोधून काढले जाते व रुग्णाला दिले जाते.


होमियोपॅथीक तपासणी करताना रुग्णाच्या विशिष्ट प्रकारच्या वागणुकीचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबरीने रुग्णाच्या अंतर्मनाचासुद्धा अभ्यास केला जातो. या अंतर्मनाच्या आत शिरण्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे रुग्णाला पडणारी स्वप्ने. स्वप्ने ही बऱ्याचदा माणसाची खरी मानसिक स्थिती दाखवत असतात. वरकरणी रुग्ण कितीही मुखवटे लावत असला तरी, बहुतेक वेळा स्वप्नामध्ये त्याला काही गोष्टी दिसतात की, ज्यामुळे त्याचा खरा चेहरा समोर येतो. मनात दाबून ठेवलेल्या अनेक गोष्टी ज्या काही कारणांमुळे दर्शवता येत नाहीत किंवा मनामध्ये कायमच्या घर करून बसलेल्या असतात, त्या बरेचदा स्वप्नांच्या वाटे बाहेर पडतात वा त्याचप्रकारची स्वप्ने मग माणसाला पडत असतात. स्वप्ने ही कुठल्याही तडजोडीविना येणाऱ्या भावना दर्शवतात. कारण, स्वप्नामध्ये त्या माणसाची इच्छाशक्ती व तरतमभाव कार्यरत नसतो. अंतर्मनावर त्यावेळी कुठलाही ताबा नसतो. अंतर्मन कुठल्याही दबावाखाली नसते व बाह्यमनातून अंतर्मनाकडे येणाऱ्या व तेथे रुजलेल्या भावना किंवा समज किंवा काही घटना व त्यांचा बाह्यमनावर झालेला परिणाम किंवा काही अनुभव किंवा कुठल्याही प्रकारच्या सुप्त इच्छा या अंतर्मनाकडे कुठल्याही अडथळ्याविना येत असतात व या सर्व गोष्टींना स्वप्नांच्या मार्गातून वाट मिळते व वारंवार माणसाला तशा प्रकारची स्वप्ने पडू लागतात.

 

स्वप्ने ही बरेचदा जशीच्या तशी न पडता प्रतीकात्मक पडत असतात. (symbolic dreams) उदाहरणार्थ- एखाद्या माणसाला कार्यालयामध्ये काही कामाची चिंता असेल व त्याला त्याचे उत्तर सुचत नसेल, तर त्याला स्वप्नात असे दिसू शकते की, तो परीक्षेला बसला आहे व त्याला प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. अशावेळी त्याची जी मानसिक स्थिती आहे, तशीच ती कार्यालयामध्ये असते. अशा प्रकारची प्रतीकात्मक स्वप्ने पडू शकतात. परंतु, त्यातील मानसिक स्थिती ही फार महत्त्वाची असते. होमियोपॅथीक औषध सिद्धता करताना सिद्धकर्त्यांमध्येसुद्धा औषधांच्या परिणामामुळे मानसिक स्थिती बदलते व त्यांना स्वप्ने पडतात. ही स्वप्ने मग मुद्देसूद व सविस्तरपणे लिहून ठेवली जातात. रुग्णांमध्ये दिसून आलेल्या स्वप्नांची मानसिक स्थिती व औषध सिद्धतेच्या वेळी औषधांमध्ये दिसून आलेली मानसिक स्थिती यांचा मेळ करून मग होमियोपॅथीचे ‘सम’ असे औषध शोधून काढले जाते व रुग्णाला दिले जाते. याव्यतिरिक्त, लहान मुलाची माहिती (केस) घेताना त्याच्या आईचीसुद्धा माहिती घेतली जाते हे आपण पाहिलेच आहे. (mother's history during pregnancy) आईच्या गरोदरपणातील शारीरिक व मानसिक स्थितीचा अभ्यास केला जातो. कारण, जनुकीय शास्त्रांनुसार गरोदरपणातील स्थिती ही काही वेळा जशीच्या तशी किंवा काही प्रमाणात लहान बाळामध्ये आलेली दिसून येते. लहान बाळ जेव्हा काहीही बोलू शकत नाही, अशावेळी त्याच्या आईची गरोदरपणातील स्थिती फार महत्त्वाची असते व जनुकीय शास्त्रानुसार त्या स्थितीचा (chromosomal and genetic study) अभ्यास केल्यावर त्या बाळाला औषध देणे सोपे जाते. पुढील भागात आपण या केस टेकिंगबद्दल अजूनही महत्त्वाची माहिती बघूया.

 

- डॉ. मंदार पाटकर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@