ज्येष्ठांची काळजी गरजेचीच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2019   
Total Views |



भारताचा विचार करता ज्येष्ठांची वाढती संख्या आणि त्यांची सातत्याने होणारी उपेक्षा अधिकच काळजीचा विषय आहे. आजी-आजोबांच्या या पिढीला एकेकाळी भारताच्या पारंपरिक आणि सामाजिक वातावरणात आदराची, सन्मानाची वागणूक मिळत होती. ज्येष्ठांच्या छत्रछायेखाली संपूर्ण कौटुंबिक वातावरण अधिकच भरलेले आणि भारलेले दिसत असे. केवळ कुटुंबच नव्हे तर समाजातही या पिढीला मान होता, त्यांची काही एक शान होती. पण ही शान आज लुप्त होताना का दिसते? ज्येष्ठांच्या या पिढीला आज उपेक्षेचे जिणे का जगावे लागत आहे? ज्येष्ठांना निरर्थक आणि निरुपयोगी का समजले जात आहे? हे प्रश्न उपस्थित होतात. तसेच ज्येष्ठांच्या उपेक्षेने कुटुंब दुबळे होत असतानाच नव्या पिढीवरही विपरित प्रभाव पडत आहे.


संयुक्त राष्ट्रसंघाने नुकताच जागतिक लोकसंख्याविषयक अहवाल प्रसिद्ध केला. जागतिक लोकसंख्येसंबंधीच्या या अहवालानुसार २०२७ सालापर्यंत भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होईल. लोकसंख्येच्या बाबतीत जगात अव्वल क्रमांकावर जाणाऱ्या भारताबद्दल या अहवालात अन्यही काही बाबी नमुद केल्या असून त्यानुसार २०५० पर्यंत देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या तिपटीने वाढेल. म्हणजेच लोकसंख्येच्या तिरक्या पद्धतीने वाढणाऱ्या या (अ)संतुलनामुळे भारत ज्येष्ठांचा-वृद्धांचा समाज म्हणून पुढे येईल. कोणत्याही देशात तरुणांच्या संख्येपेक्षा ज्येष्ठांची संख्या वाढली की, नव्या परिस्थितीत काही आव्हाने उभी ठाकतात. ज्येष्ठ नागरिकांची देखभाल करण्यापासून ते त्यांच्या ऊर्जेच्या रचनात्मक उपयोगाचे मुद्दे अशावेळी समोर येतात. सोबतच संपूर्ण समाजाला आपल्या जीवनविषयक मूल्यांचाही पुनर्विचार करावा लागतो. ज्येष्ठांच्या उन्नत, स्वस्थ आणि आनंदी जीवनासाठी समाजाला आपल्या विचारांत परिवर्तन आणावे लागते. कारण, सध्याच्या घडीला देशातील बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक कौटुंबिक, सामाजिक उपेक्षेला बळी पडत असल्याचेच दिसते. ज्येष्ठांना योग्य तो सन्मान न दिल्यास आणि त्यांच्या उन्नत जीवनासाठी प्रयत्न न केल्यास समाज दुभंगण्याचा, छिन्न-भिन्न होण्याचाही धोका संभवतो. लोकसंख्येतील वृद्धी व घटीच्या अंदाजामुळे नागरिकांच्या जीवनशैलीशी निगडित सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांमध्ये परिवर्तन करण्याची आवश्यकता अधोरेखित होते. तसेच सरकारलाही या दिशेने व्यापक योजना लागू करण्याची आणि सहयोग-समन्वयाची गरज असल्याचे दिसते. भारतात केवळ ज्येष्ठांची संख्या वाढत नसून सर्वसामान्य लोकसंख्याही वाढत आहे, तर जगातील जवळपास ५५ देशांना मात्र घटत्या लोकसंख्येची समस्या सतावत आहे. २०५० पर्यंत या देशांच्या लोकसंख्येत एक किंवा त्याहून अधिक टक्क्यांची घट होऊ शकते. उल्लेखनीय म्हणजे ही घट केवळ जन्मदर कमी होण्यामुळे नव्हे तर नागरिकांच्या देश सोडून पलायन वा स्थलांतर करण्यानेही होत आहे. काही देशांत तर कायदा-व्यवस्थेची समस्या नाही, पण रोजगाराच्या उत्तम संधी नसल्याने त्या त्या देशांतले नागरिक इतर देशांची वाट चालत असल्याचे दिसते.

 

लोकसंख्याविषयक अहवाल-२०१९ नुसार २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या आताच्या ७७० कोटींवरून सुमारे ९७० कोटींवर पोहोचेल. तथापि, लोकसंख्येच्या वाढीत प्रत्येक ठिकाणी घट नोंदवली जात आहे, पण भारतात मात्र लोकसंख्या वाढेल, असाच अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार जगात सध्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांपेक्षा अधिक असून २०५० पर्यंत जगाच्या एकूण लोकसंख्येत ज्येष्ठांचा वाटा दुप्पट तर भारतात तिप्पट होईल. भारतात आताच १०.४ कोटी ज्येष्ठ नागरिक असून २०५० पर्यंतज्येष्ठांची संख्या तिपटीने वाढून ३४ कोटींपर्यंत जाईल. अशा परिस्थितीत वेगाने वाढणाऱ्या ज्येष्ठांच्या लोकसंख्येमुळे काही कौटुंबिक, सामाजिक प्रश्नही निर्माण होतात. कारण, ‘वृद्धत्व’ केवळ चेहऱ्यावर सुरकुत्या आणत नाही, तर दरदिवशी नवी नवी आव्हानेही घेऊन येते. एकटेपणाची समस्या ज्येष्ठांना सर्वाधिक जाचते, कोणाशीतरी बोलण्यासाठी ते सतत झुरत राहतात, तरसत राहतात. आपल्या मुलांच्या घरी येण्याच्या वाटेवर कित्येक ज्येष्ठ नागरिक डोळे लावून बसल्याचेही पाहायला मिळते. तसेच निराशेने घेरलेल्या बहुतांश ज्येष्ठांचा ७७ टक्के वेळ घराबाहेरच जातो. कारण, कोणाशीतरी दोन शब्द बोलावे, असे त्यांना वाटत असते. एखाद्याने आपले म्हणणे ऐकावे, बोलावे, असेही ज्येष्ठांना वाटत राहते. एका अभ्यासात ही गोष्ट स्पष्ट झाली असून मुले आपल्या आई-वडलांच्या नेमक्या गरजाच समजून घेत नाहीत, ही चिंताजनक बाबही यातून समोर आली. अशावेळी मुले आपल्या आई-वडिलांच्या समस्यांवर, अडचणींवर उपाय कसे शोधू शकतील? ‘आयव्हीएच सिनियर केअरनामक संस्थेने यासंबंधी अहवाल सादर केला असून ज्येष्ठांच्या देखभालीसाठी निश्चित असा कार्यक्रम विकसित करण्याची गरज अधोरेखित करणारी निरीक्षणेही नोंदवली आहेत.

 

दुसरीकडे भारतात २०५० पर्यंत प्रत्येक पाचवा नागरिक ६० वर्षांवरील असेल. तरुणांच्या अधिक संख्येमुळे भारताला सध्या युवकांचा देश म्हटले जात असले तरी, हळूहळू ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढणार आहेच. युवावस्थेतून वृद्धावस्थेकडे जाणाऱ्या भारतात सध्या ज्येष्ठ नागरिक मात्र घोर उपेक्षेचा आणि अवमानाचाही सामना करत आहेत. उपेक्षा, भावनिक रितेपणा आणि औदासिन्य घेऊन ते जगत आहे. अर्थात, ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, दुबळे डोळे, थकलेले शरीर आणि उदास मन जी बिकट परिस्थिती उलगडून दाखवते त्याला समाजाची आधुनिक विचार व स्वार्थी जीवनशैली जबाबदार आहे. भारताचा विचार करता ज्येष्ठांची वाढती संख्या आणि त्यांची सातत्याने होणारी उपेक्षा अधिकच काळजीचा विषय आहे. आजी-आजोबांच्या या पिढीला एकेकाळी भारताच्या पारंपरिक आणि सामाजिक वातावरणात आदराची, सन्मानाची वागणूक मिळत होती. ज्येष्ठांच्या छत्रछायेखाली संपूर्ण कौटुंबिक वातावरण अधिकच भरलेले आणि भारलेले दिसत असे. केवळ कुटुंबच नव्हे तर समाजातही या पिढीला मान होता, त्यांची काही एक शान होती. पण ही शान आज लुप्त होताना का दिसते? ज्येष्ठांच्या या पिढीला आज उपेक्षेचे जिणे का जगावे लागत आहे? ज्येष्ठांना निरर्थक आणि निरुपयोगी का समजले जात आहे? हे प्रश्न उपस्थित होतात. तसेच ज्येष्ठांच्या उपेक्षेने कुटुंब दुबळे होत असतानाच नव्या पिढीवरही विपरित प्रभाव पडत आहे. सोबतच आपण ज्येष्ठांना कुटुंबाच्या मुख्य प्रवाहात आणू शकत नाही का? अशी कोणती कारणे आणि परिस्थिती आहे की, ज्यामुळे ज्येष्ठांची इतकी उपेक्षा होत आहे, हेही प्रश्न निर्माण होतात. उल्लेखनीय म्हणजे, ही मोठी समस्या असून एका फटक्यात त्यातून मार्ग निघू शकत नाही, हेही लक्षात ठेवले पाहिजे. या समस्येवर तोडगा शोधण्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये जागरुकता आणली पाहिजे.

 

आपल्यापुढील दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नवी पिढी आणि ज्येष्ठांच्या पिढीतील वाढते ‘अंतर’ दूर कसे करणार? दोन्ही पिढ्यांमधील संवाद आणि संवेदनशीलता लुप्त होत गेली तर समाज आणि कुटुंब आपल्या नैतिक जबाबदारीपासून विन्मुख होईल, असेही वाटते. दोन पिढ्यांत निर्माण होणारे हे भावनिक आणि व्यावहारिक ‘अंतर’ कोणत्याही प्रकारे हितावह नाही, हेही इथे लक्षात घ्यायला हवे. ज्येष्ठांना त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या टप्प्यावर मानसिकदृष्ट्या ताकद, साथ द्यायला हवी. नवी पिढी आणि ज्येष्ठांच्या पिढीच्या संयुक्त जीवनशैलीचे अनेक फायदेही आहे, ज्यामुळे केवळ समाज आणि राष्ट्रच बळकट होणार नाही तर कुटुंबही समृद्ध होईल. कारण, एका विशिष्ट अवस्थेनंतर निश्चितच कोणत्याही व्यक्तीमध्ये परिपक्वता, जाणतेपण येते. म्हणूनच ज्येष्ठांच्या अनुभवाचा लाभ घेऊन युवा पिढीदेखील संस्काराने समृद्ध होऊ शकते. ज्येष्ठांकडे असलेले अनुभवांचे वैभव आणि ज्ञानाची अपूर्व संपत्ती कुटुंबाला जगाच्या वेगाशी आपला वेग जुळण्यात साहाय्यक होऊ शकते. तसेच ज्येष्ठांना सावरणे, सांभाळणे, त्यांना कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणणे हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. सोबतच सामूहिक भावनेत विश्वास ठेवणाऱ्या ज्येष्ठांचा हात हातात घेऊन चालण्याने जीवनात उत्साहाचा संचारही होईल. कारण, एकट्याने चालणे म्हणजे काही चालणे नव्हे, तर चालता-चालता कोण्या दुसऱ्या व्यक्तीलाही चालण्यासाठी प्रोत्साहन देणेही गरजेचे असते, जे काम ज्येष्ठ नागरिक करू शकतात, तसेच सरकारनेदेखील ज्येष्ठांच्या अनुभवांचा, त्यांच्यातील शारीरिक, बौद्धिक क्षमतेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि शारीरिक स्थितीला अनुरुप अशी कार्य-क्षेत्रे शोधायला हवीत. अशा एकत्रित प्रयत्नांतून ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढली तरी त्याचा देशाला फायदाच होईल व त्यांची कोणीही उपेक्षा करण्यास धजणार नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@