ममतांची 'कटकट' वाढणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2019   
Total Views |



लोकसभा निवडणुकीचे निकाल येऊन महिना लोटला तरी पश्चिम बंगाल राज्य अजूनही राजकीय हिंसेने धुमसतंय. बंगालमध्ये भाजपच्या ४० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांच्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हत्या केल्याचा आरोप आहे. पण, ममतादीदींनी आपली हेकेखोरी सोडलेली नाही. आता सध्या त्या चर्चेत आहेत, त्या 'कट मनी'च्या परतफेडीच्या मुद्द्यावरून. 'कट मनी' म्हणजे सोप्या भाषेत स्थानिक तृणमूलच्या नेत्यांनी सरकारी कामांतून 'कट' करून खाल्लेला पैसा. नुकतेच आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना हा 'कट मनी' कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी ज्यांच्याकडून वसूल केला, त्यांना परत करण्याचे आदेश ममतदीदींनी दिले. म्हणजे, एकप्रकारे आपल्या सरकारमध्ये चालणाऱ्या या पक्षीय भ्रष्टाचाराचीच जाहीर कबुली देऊन ममतादीदी मोकळ्या झाल्या. याचप्रकारे आता ममतादीदींनी शारदा, नारदासारख्या चिटफंडमधील घोटाळ्यांचीही कबुली एकदाची देऊन टाकावी आणि बंगालवासीयांना त्यांचा हक्काचा पैसा परत द्यायची तजवीज करावी. पण, दीदी ते करणार नाहीत. दीदी कार्यकर्त्यांना त्यांनी गैरमार्गाने कमावलेली कमाई जनतेच्या झोळीत टाकायला सांगतील, पण खुद्द दीदींकडूनच अशी अपेक्षा करणे म्हणजे सिंहाला गवत खायला लावण्याचा प्रकार. आधीचे तृणमूलवासी आणि विद्यमान भाजप खासदार सौमित्र खान यांनीही 'कट मनी'चा मुद्दा लोकसभेत गुरुवारी उपस्थित केला. एवढेच नाही, तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात यापैकी किती पैसा जमा झाला, असा सवालही त्यांनी विचारला. पश्चिम बंगालचा गड भाजपच्या तोफेने दणाणल्यानंतर ममतादीदी सैरभैर झाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या भयेने ग्रासल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांना जनतेचा लुटलेला पैसा परत देण्याची सुबुद्धी त्यांना सुचली. पण, मुळात जनतेकडून अशाप्रकारे त्या वसुली करूच कशी शकतात? इतकी वर्षं त्यांनी आपला पक्ष याच 'कट मनी'वर पोसला का? निवडणुकाही याच वसुलीच्या पैशाने लढवल्या का? यांसारख्या प्रश्नांचीही दीदींनी उत्तरं द्यावी. दीदी, तुम्हीच तुमच्या तोंडून भ्रष्टाचाराची कबुली दिली ते एकदम भालो! आता चौकशीचा ससेमिरा मागे लागला की, मोदी-शाहंच्या नावाने गळे काढू नका. कारण, जो 'कट मनी' तुम्हाला रसगुल्ल्यासारखा गोड लागत होता, आता त्याच्याच वसुलीसाठी संतप्त बंगालवासीय तुमच्या कार्यकर्त्यांच्या तोंडात मिरची कोंबताना दिसले, तर तीही गोड मानून घ्या.

 

'कमल'नाथा, पुरे आता!

 

एकीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे राजीनामानाट्य संपायची चिन्हे नसताना, काँग्रेस कमिटीच्या मानवी हक्क आणि माहिती अधिकार भागाचे प्रमुख विवेक तन्खा यांनीही आपले 'हात' झटकले. जिथे पक्षाध्यक्षांचेच 'रुसू बाई रुसू, बिळात बसू' सुरू असेल, तिथे कार्यकर्त्यांची काय तऱ्हा??? मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही "मी राजीनामा देणार होतो, पण श्रेष्ठींनी अडवले," असे सांगत स्वत:चीच पाठ थोपटून घेतली आणि हो, राजीनामा मुख्यमंत्रिपदाचा नाही बरं का, तर मध्य प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदाचा.... खरं तर तो दिला काय, नाही दिला काय, याने फरक तो काय पडणार म्हणा? पण, उगाच पक्षाच्या पराभवाच्या नैतिक जबाबदारीचे नाट्य वगैरे कमलनाथांनीही व्यवस्थित रंगवले. कमलनाथांनी यावेळी एक मजेशीर विधान केले. ते म्हणतात, "राहुल गांधींचे योग्यच आहे. मध्य प्रदेशमधील पराभवासाठी मी जबाबदार आहे. पण, माझ्याव्यतिरिक्त आणखी कोण जबाबदार आहे, ते मी सांगू शकत नाही." म्हणजे, एकीकडे पराभवाची जबाबदारी स्वीकारायचीही आणि ती इतरांवरही अशा पद्धतीने ढकलायची, ही अजब प्रथा. कदाचित, मध्य प्रदेशातील एकूण २९ लोकसभांच्या जागांपैकी कमलनाथांचा मुलगा नकुलनाथ छिंदवाड्यातून निवडून आल्यामुळे कमलनाथांचा आत्मविश्वास अगदीच द्विगुणित झालेला दिसतो. बाकी २८ जागा हरलो तर काय, माझ्या मुलाची जागा, मुख्यमंत्र्याच्या मुलाची जागा निवडून आली ना, तेच मोठे यश... खरं तर राहुल गांधींनीही गहलोत, कमलनाथ आणि चिदंबरमच्या पुत्रप्रेमामुळेच काँग्रेसचे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पानिपत झाल्याचे म्हटले होते. यावरूनच काँग्रेससारखा शंभर वर्षांची परंपरा असलेला राष्ट्रीय पक्ष केवळ तीन नेत्यांच्या दुर्लक्षामुळे पराभूत होऊ शकतो, यापेक्षा हास्यास्पद काही नसावे. काँग्रेसच्या पडझडीला पुत्रप्रेमात आंधळे झालेले हे तीन नेते जितके जबाबदार आहेत, त्याहीपेक्षा शंभर पटीने जास्त काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचाच हा दारुण पराभव म्हणावा लागेल. त्यांच्या द्वेषाच्या, आरोपांच्या राजकारणाला भारतीय मतदारांनी साफ नाकारले. पण, कमलनाथांना त्याचे काय.... ते आपली राज्यसत्ता उपभोगण्यात मस्त आहेत, पण जनता विजेच्या लपंडावाने त्रस्त आहे. एकूणच काय तर जोपर्यंत ही घराणेशाहीची काँग्रेस अंतर्गत संस्थानेही उद्ध्वस्त होत नाहीत, तोपर्यंत हा पक्ष असाच अ'नाथ'च राहणार!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@