भगव्या-हिरव्यापलीकडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2019   
Total Views |



चालू विश्वचषक क्रिकेट सामन्यात भारतीय क्रिकेटपटू भगवी जर्सी घालून मैदानात उतरणार आहेत. यावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींचे मत आहे की, म्हणे, "जर्सीचा रंग बदलला. कारण, मोदींना सगळ्या देशाचे भगवेकरण करायचे आहे." तसे पाहायला गेले तर अबू आझमी काय म्हणाले, याला तशी किंमत शून्यच! पण, तरीसुद्धा त्यांच्या मताचा समाचार घ्यावाच लागेल. कारण, अबू आणि अबूसारख्या कित्येक धर्मांधांनी धर्माला प्रतीक आणि संकल्पनांच्या जाळ्यात गुंडाळून टाकले आहे. लोक जगतात का मरतात, याचे अबू आझमींसारख्यांना काहीही सोयरसुतक नसते. त्यांना देणेघेणे असते, ते फक्त कर्मकांडाशी आणि त्याच्याशी निगडित असलेल्या तर्कहीन, बुरसटलेल्या प्रथांशी. अर्थात, आझमीसारख्यांबाबत हेही विधान खोटेच पडेल. कारण, आझमीसारख्या माणसांना हिरव्या रंगाचे इतके कौतुक असते, तर हिरवा रंग ज्या समृद्धीचे प्रतिनिधित्व करतो, ती समृद्धी अबू आझमी ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, तिथे दिसते का? खरेतर भारताने जर्सीचा रंग का बदलला, याला अनेक तांत्रिक बाजू आहेत. पण, त्या बाजू आझमीसारख्या लोकांना समजतील, अशी आशा करूच शकत नाही. लोकांचे अज्ञान हीच आपली समृद्धी मानणाऱ्यांना लोकांमध्ये गैरसमज, अज्ञान माजवूनच सत्ता मिळते, हे याचे सत्य उदाहरण. मुंबईतील गोवंडी, देवनार डम्पिंग ग्राऊंड हा अबू आझमींचा मतदारसंघ. या कचऱ्याच्या डोंगरावर प्रामुख्याने बिहार, प. बंगालमधून आलेले मुस्लीम बांधव राहतात. ही वस्ती अनधिकृत. पाण्याची मारामार. इतकी की कचऱ्याच्या डोंगरातून घाणीला सुटलेले पाणीही लोक तत्सम कामासाठी वापरतात. इथल्या लोकांना सांगितले गेले आहे की, "तुमच्या इथे आमदारसाहेब (अबू आझमी) पाण्याची लाईन टाकतात. पण, मोदी लगेच ती तोडून टाकतो." कचऱ्याच्या डोंगरातून कधीच बाहेर न येणाऱ्या लोकांना हे खरे वाटते. आश्चर्य म्हणजे, इथल्या काही लोकांना वाटते की, पंतप्रधान मोदी हातात फावडा कुऱ्हाड घेऊन बसलेले असतात. रात्र झाली की, मोदी ती पाईपलाईन स्वतः फोडतात, कारण ही वस्ती मुस्लिमांची आहे. काय बोलावे? या लोकांचे नरकापेक्षा भयंकर जगणे आणि त्याहीपेक्षा समाजवादी पक्षालाच मते मिळावीत म्हणून इथल्या लोकांमध्ये पसरवलेले अज्ञान, द्वेष. अबू आझमींनी या गरीब समाजबांधवांबद्दल बोलावे, मग भगवा का हिरवा ही त्यापलीकडची गोष्ट...

 

ये भगवा रंग....

 

नसलेला वाद उकरून काढणे, तो वाद असा पेटवणे की, लोकांना वाटले पाहिजे, अरे हाच काय तो आपला जीवन-मरणाचा प्रश्न. आपल्या देशात असे घडताना आपण नेहमीच पाहतो. विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय क्रिकेट संघ भगव्या रंगाची जर्सी घालून सामना खेळणार आहे, हा विषयही सध्या असाच रंगला आहे. क्रिकेटपटूंनी भगव्या रंगाची जर्सी घातली म्हणून त्यांचे सर्वांचे खेळ कौशल्य वाढेल किंवा कमी होईल, असा तार्किक आणि वास्तविकदृष्ट्याही काहीएक मुद्दा नाही. मात्र, तरीही जर्सीचा रंग चर्चेचा विषय झाला आहे. का? कारण, देशात धर्मांधता तीही हिंदू समुदायाची धर्मांधता वाढली आहे, हे सिद्ध करण्यासाठी काही लोक अक्षरशः डोळ्यात तेल घालून बसलेले असतात. काहीही घडले की, त्या गोष्टीचा संबंध असहिष्णुता, धर्मांधता आणि त्यादृष्टीने देशात नावापुरता अल्पसंख्याक असलेल्या समुदायावर अन्याय होत आहे, अशी मिथ्या भावना पसरवणे, हे या लोकांचे जन्मसिद्ध कर्तव्यच आहे. नव्हे, तो त्यांचा हक्कच आहे अशा, थाटात आणि आविभार्वात हे लोक वावरत असतात. अशाच लोकांनी भगव्या जर्सीचा संबंध हिंदुत्वाशी लावला आहे. यांना कोण सांगणार की भारतीय संघाची जर्सी निळी आहे, पण विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या संघाची जर्सीही निळीच आहे. एकाच सामन्यात दोन सहभागी देशांची जर्सी सारख्याच रंगाची असू नये, असे संकेत आहेत. त्यामुळे भारतीय संघाला आपल्या जर्सीचा रंग बदलावा लागला. आता काहींचे म्हणणे आहे की, मग भारतानेच का बदलावा जर्सीचा रंग? इंग्लंडने का नाही बदलला? तर यजमान देशाने आपल्या जर्सीचा रंग बदलू नये, असाही संकेत आहे. त्यामुळे यजमान असलेल्या इंग्लंडऐवजी भारतालाच जर्सीचा रंग बदलावा लागला. आता हे क्रिकेटच्या विश्वातले संकेत आहेत. खेळ राजकारणापलीकडेच असतात. पण काही लोक खेळाचेच राजकारण करतात. अशाच लोकांनी भगव्या रंगाच्या जर्सीचे राजकारण सुरू केले आहे. बरं, या लोकांना त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असलेल्या भगव्या रंगाचा इतका तिरस्कार का? भारतीय संस्कृतीमध्ये भगव्या रंगाला अनन्यसाधारण वारसा आहे. समजा, हा वारसाच नको आहे तरीसुद्धा रंगाला रंग म्हणून समजायची सहिष्णुता भगव्या रंगाला विरोध करणाऱ्यांमध्ये कधी येईल?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@