'मराठा' विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राची गरज नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2019
Total Views |



मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुकला या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या वेळी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गामधील जातपडताळणी प्रमाणपत्र लगेच देण्याची गरज नाही, अशी महत्त्वाची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषद व विधानसभेत निवेदनाद्वारे केली. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

राज्यातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना पहिल्याच फेरीसाठी कागदपत्रांच्या जातपडताळणीमध्ये जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची सूचना काल मंगळवारी देण्यात आली होती. परंतु या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश नियमन समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती देशमुख, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, श्रमिक, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री संजय कुटे, संबंधित विभागांचे सचिव यांची बैठक संपन्न झाली.

 

विनोद तावडे यांनी सांगितले की, सन २०१८च्या अधिनियमानुसार मराठा समाजाचा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गामध्ये (एसईबीसी) समावेश करण्यात आला आहे. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या जातप्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरिता पुरेशी यंत्रणा तुर्तास उपलब्ध नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या एसईबीसी प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी संबंधित जातपडताळणी समितीकडे जातपडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे, अशा विद्यार्थ्यास प्रवेशावेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती आता करण्यात येणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे, असेही तावडे यांनी स्पष्ट केला.

 

व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचीत जमाती, वि.जा.भ.ज., इ.मा.व. व विशेष मागास प्रवर्ग या सर्व प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांकडे अर्ज सादर करताना जात वैधता प्रमाणपत्र नसेल, अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाची दुसरी फेरी सुरु होण्यापूर्वी प्रवेश नियामक प्राधिकरण निश्चित करेल अशा दिनांकापर्यंत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याची मुदत वाढवून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असेही मंत्री तावडे यांनी स्पष्ट केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@