थेरो का असे बोलले?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2019   
Total Views |
 



एप्रिल महिन्यात ख्रिश्चन समुदायाचा इस्टर संडे साजरा होत असतानाच श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. सुमारे २५० पेक्षा अधिक निष्पापांचा बळी घेणार्‍या या जिहादी-दहशतवादी-फिदायीन हल्ल्यानंतर श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावर संशयितांची धरपकड करण्यात आली. तसेच सरकारने आणीबाणीही लावली. नुकतीच श्रीलंकन सरकारने या आणीबाणीची मुदतही वाढवली. परंतु, प्रशासकीय पातळीवर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे काम चालू असतानाच समाजात मात्र धर्मांध मुस्लीम समुदायाविरोधात तीव्र असंतोष खदखदत होता.

 

परिणामी, बॉम्बस्फोट मालिकेनंतर देशात बहुतांश ठिकाणी मुस्लिमांविरोधात हिंसाचाराच्या घटना घडल्या. कारण, बॉम्बस्फोट करणारे मुस्लीम समुदायातलेच होते. मुस्लीमविरोधी दंगली व झटापटी सातत्याने सुरू असतानाच त्यात ख्रिश्चन समुदायाव्यतिरिक्त श्रीलंकेतील बौद्ध समुदायाने मात्र मोठा सहभाग घेतला. आताही श्रीलंकेतील बौद्ध भिक्षू वराकगौडा श्री ज्ञानरत्न थेरो यांच्या विधानांवरून काहूर माजवले जात असून मुस्लीम समुदाय भितीच्या वातावरणात राहत असल्याचे म्हटले जात आहे. पण, श्रीलंकेत किंवा जगातल्या बहुतांश देशात अशी परिस्थिती का निर्माण झाली, त्यावर उपाय काय हेही शोधले पाहिजे.

 

बॉम्बस्फोटाच्या आगीत होरपळलेल्या श्रीलंकेत काहीच दिवसांपूर्वी एका मुस्लीम डॉक्टरने चार हजार बौद्ध स्त्रियांची न सांगता संततीनियमनाची शस्त्रक्रिया केल्याने मोठेच वादंग निर्माण झाले. श्री ज्ञानरत्न थेरो यांनी मुस्लीम डॉक्टरने केलेल्या याच कृत्याबद्दल बौद्ध भिक्षुणींना नेमके काय वाटते, हे सांगितले व देशात गदारोळ उडाला. बौद्ध भिक्षुणींच्या मते, अशाप्रकारे न सांगता स्त्रियांवर संततीनियमनाची शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरला दगडाने ठेचून मारले पाहिजे आणि याच विधानाचा उच्चार थेरो यांनी एका भाषणादरम्यान केला. श्री ज्ञानरत्न थेरो हे श्रीलंकेतील असगरिया संप्रदायाचे प्रमुख असून त्यांनी मुस्लीम समुदायाच्या हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि अन्य व्यवसायांवर, दुकानांवर बहिष्कार घालण्याचेही आवाहन केले. थेरो यांच्या मते, मुस्लीम हॉटेल व्यावसायिक ताटात वाढल्या जाणार्‍या अन्नातून मूल जन्माला घालता येणार नाही, अशी औषधे मिसळून खाऊ घालतात, त्यामुळे मुस्लीम समाजाच्या उपाहारगृहांत कोणीही जाऊ नये. परिणामी, देशातील मुस्लीम समुदायाच्या संघटनांनी, मानवाधिकार कार्यकर्त्यांनी थेरोंच्या विधानामुळे समाजात हिंसाचार उसळेल, माथी भडकतील, असा दावा करायला सुरुवात केली. परंतु, या लोकांना आताच का जाग आली? किंवा असे काही झाले तरच यांचे तोंड का चालू होते? इतरवेळी हे लोक मूग गिळून गप्प का बसतात?

 

वस्तुतः जगभरातल्या कितीतरी देशांत आणि जनतेत दहशतवादाने म्हणा किंवा अन्य काही कारणांमुळे मुस्लीमविरोधी वा स्थलांतरित मुस्लीमविरोधी भावना निर्माण झाल्याचे गेल्या काही वर्षांत पाहायला मिळाले. कारण, मुस्लीम समुदाय कधीही ज्या देशात राहतो तिथल्या संस्कृतीशी एकरूप होताना दिसत नाही. सतत आपले वेगळेपण जपण्याच्या वेडात त्या त्या देशांचे कायदे-नियम तोडण्यालाही त्यांच्याकडून प्राधान्य दिले जाते. शिवाय मूठभर धर्मांध मुस्लीम ज्यावेळी आपल्या धर्मश्रेष्ठत्वासाठी कायदा हातात घेतात, हिंसाचार-रक्तपात घडवून आणतात, बॉम्बस्फोट-जिहादी हल्ले करतात, इसिससारख्या दहशतवादी संघटनेत सामील होतात, तेव्हा उर्वरित मुस्लीम समाज आणि त्या समाजातील ज्येष्ठ-वरिष्ठ नागरिक कोणतीही भूमिका घेत नाहीत. परिणामी, मुस्लिमांव्यतिरिक्तच्या समाजात मूठभर धर्मांधांच्या मागे हा संपूर्ण समाज असल्याची प्रतिमा तयार होते आणि ती तोडण्याचे काम मुस्लीम समुदायानेच करणे गरजेचे असते, जे होत नाही.

 

आता श्रीलंकेतल्या मुस्लीम संघटना आणि मानवाधिकार कार्यकर्ते थेरो यांच्या विधानावरून आदळआपट करत असतानाच या लोकांनी कधी इसिसविरोधी, अल-कायदाविरोधी आंदोलन केले का? आपल्या पोरासोरांना कट्टरतावाद्यांपासून वाचवण्यासाठी काही उपाययोजना केल्या का? मदरशांत मुख्य प्रवाहातील शिक्षण दिले जावे, यासाठी पुढाकार घेतला का? तर तसे झाल्याचे दिसतच नाही. म्हणूनच मुस्लीम समुदायानेदेखील याविषयी ठोस पावित्रा घेणे गरजेचे आहे. थेरो यांच्या दगडाने ठेचून मारण्याच्या विधानाचे समर्थन करता येणार नाहीच, पण मुस्लीम समुदायानेही इतरांवर आपल्याविरोधात अशाप्रकारचे शब्द उच्चारण्याची वेळच येऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत; अन्यथा एका समाजाला दुसर्‍या समाजापुढे उभे करण्याचा खेळ सुरूच राहिल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@