'क्रियायोगी' ते 'आध्यात्मिक गुरू'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2019   
Total Views |



क्रियायोगाचे ज्ञान प्राप्त केल्यानंतर संपूर्ण विश्व आपले कुटुंब मानत समाजकार्य करणाऱ्या योगगुरू मंगेशदा यांच्या कार्याचा आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हा अल्प परिचय...


'शून्यातून विश्व निर्माण करणे' हा मराठीतील एक वाक्प्रचार. सामान्य परिस्थितीतून सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचत समाजाप्रति दायित्व मानत अखंड सेवा देणाऱ्या सद्गुरू मंगेशदा यांचा प्रवासही असाच. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या व नऊ भावंडांत सर्वात लहान मंगेश नावाच्या मुलाने लहानपणीच एक स्वप्न उराशी बाळगले. काहीतरी भव्य दिव्य कार्य करून प्रचंड मेहनत करण्याची तयारीही केली होती. त्या काळातील संस्कारांचेही पुढील आयुष्याची दिशा ठरविण्यासाठी मोठे योगदान असते. सर्व भावंडांमध्ये आधीपासूनच बंडखोर वृत्तीच्या मंगेशने आई-वडिलांच्या धाकात न राहता मन मानेल तसेच जगणे पसंत केले. बालपणात मंगेशचे परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी अनेकदा खटके उडत. मात्र, शरीराला त्याचा प्रतिकार जमत नसे. अशा मनोवृत्तींशी दोन हात करण्यासाठी शरीर मजबूत करणे, व्यायाम करणे यासाठी विविध खेळांमध्ये प्रावीण्य संपादन करण्याचा ध्यास त्याने घेतला. यातच योगाभ्यासाची आवड निर्माण झाली, याच क्षेत्रात काहीतरी करावे, अशी मनिषा बाळगून त्याने घरच्यांचा निरोप घेतला. त्या काळात त्याचा ओढा अध्यात्माकडे वळला. नव्या वाटा शोधत असताना योगी पुरुष आणि क्रियायोगाचे प्रणेते श्री श्री महावतार बाबाजी यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांच्यासोबत राहण्याचा योग आला आणि नव्या जगात प्रवेश मिळाला. हिमालयाच्या परिसरात वास्तव्य, अविरत साधना, आध्यात्मिक प्रवासाची वाटचाल आणि त्याची अनुभूती इतरांस करून देत गुरूआज्ञेने सोडलेला संकल्प हे सारे विलक्षण अनुभव मंगेश यांना आले.

 

सद्ग़ुरू डॉ. मंगेशदांनी क्रियायोगाचे ज्ञानभंडार सर्व संसारी जनांसाठी खुले केले. क्रियायोग त्याच्या मूळ स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचविणे हेच ध्येय मानून आजवर हजारो लोकांचे जीवन उज्ज्वल ज्ञानज्योतींनी त्यांनी समृद्ध केले आहे. अंधश्रद्धांना असलेल्या कडव्या विरोधामुळे ते अनेक तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. 'आधी कर्म करा आणि त्यानंतर त्याचा अभिमान बाळगत इतरांना सांगा,' या कार्यशैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत. 'योग' या शब्दाचा अर्थ जोडणे. शरीर, आत्मा आणि मन असो किंवा प्रत्येक जात, धर्म आणि संप्रदाय, विविध संस्कृती, देश आणि प्रकृती यांना एकत्रपणे जोडून ठेवल्याने 'योग' हा आज आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यासला गेला आहे. डॉ. मंगेशदा यांच्या मते, जप-जाप्य आणि कर्मकांड यामध्ये मस्त राहून निष्क्रिय राहण्यापेक्षा कर्मयोग हा धर्म मानून मानवतेची सेवा करण्यास योग हा सर्वात सुंदर मार्ग आहे. समाजाचे आपण देणे लागतो व त्यामुळे संपूर्ण समाज हेच आपले कुटुंब मानून ते कार्यरत असतात. आपल्या रोजच्या वास्तव्यातील परिसर, धार्मिक स्थळे या ठिकाणची अस्वच्छता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे कित्येक वर्षांपूर्वी आपल्या अनुयायांसह स्वच्छता मोहीम त्यांनी उभी केली. स्वाईन फ्लू, डेंग्यू या रोगांची त्यांनी जनजागृती केली. तुळशीच्या रोपांचे वाटप व वृक्षसंवर्धन ही संकल्पना घेऊन त्यांनी आजवर अनेकांना या मोहिमेत सक्रिय सहभागी करून घेतले. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सत्कारावेळी केवळ तुळशीचे रोपटे द्यावे, असा सदगुरू मंगेशदा यांचा अट्टहास असतो.

 

महिला सक्षमीकरणासाठी महिला स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक वर्ग चालविण्याचा उपक्रमही त्यांनी यशस्वीपणे पार पाडला आहे. लहानपणापासूनच खेळाची आवड असल्याने कराटेमध्ये त्यांनी ब्लॅकबेल्ट मिळवला आहे. इतकेच नाही तर आशियायी कराटे स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक मिळवले आहे. नेमके हेच तंत्र त्यांनी महिला सबलीकरणासाठी वापरले. आपल्या समाजकार्याद्वारे अनेकांच्या आयुष्यात प्रकाश टाकण्याचे दिव्यकार्यही त्यांनी केले आहे. अंधत्व आलेल्या अनेकांच्या आयुष्यात दृष्टीदानाचा प्रकाश पसरविणारा नेत्रदान संकल्प त्यांनी सुरू केला आणि यशस्वीपणे राबवलाही. ५० वर्षांहून अधिक काळ ते योगशास्त्राचा प्रसार करत आहेत. त्यांच्या क्रियायोगातील संशोधनासाठी 'जीव थिओलॉजिकल युनिव्हर्सिटी'द्वारे त्यांना 'डॉक्टरेट' पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत विविध संघटना, विद्यापीठे आणि देशी तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविले आहे. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुरस्कार, लंडन येथे देण्यात आलेला महात्मा गांधी सन्मान पुरस्कार, योग रत्न पुरस्कार, इंडो-व्हिएतनाम मेडिकल बोर्डाचा पुरस्कार आदी सन्मान त्यांना देण्यात आले आहेत. त्यासह 'सद्ग़ुरू मंगेशदा क्रियायोग फाऊंडेशन' या संस्थेची ९३ केंद्रे असून त्याद्वारे योगसाधनेव्यतिरिक्त अनेक उपक्रम नियमितपणे राबविले जात आहेत. दै. 'मुंबई तरुण भारत'तर्फे त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@