'असीम फाऊंडेशन'च्या माध्यमातून लडाखमध्ये साकारणार सायन्स पार्क-२०

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2019
Total Views |



गेली १७ वर्षे भारताच्या सीमावर्ती भागात कार्य करणार्‍या 'असीम फाऊंडेशन'च्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील लडाख येथील सायन्स पार्क उभे राहत आहे. गेले दोन महिने अविरतपणे चालू असलेले हे काम दि. २० जून रोजी प्रत्यक्ष मूर्त रूपात सर्वांसाठी खुले होणार आहे. भारतीय सैन्याच्या १४ कोअरचे प्रमुख या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी असणार आहेत. लडाखचा भाग हा उंचीवरील वाळवंट म्हणून ओळखला जातो. 'असीम फाऊंडेशन'ने २०१२ मध्ये प्रथम लडाखमध्ये कामाला सुरुवात केली. यामध्ये स्थानिक ठिकाणे, व्यक्ती आणि अधिकार्‍यांना भेट देऊन परिस्थिती समजून घेऊन शैक्षणिक संधी उभ्या करण्यासाठी काम सुरु झाले.

 

शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रतिमहिना एक असे व्यवसाय संधींची ओळख करून देणारी व्याख्याने 'अभिलाषा प्रकल्पां'तर्गत सुरु झाली आणि यातूनच लडाखच्या भागामधील शाळांशी संपर्क वाढला. या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी संपर्क आणि मैत्री दौर्‍यांचे आयोजनही करण्यात आले. याचाच पुढील भाग म्हणून सध्या 'असीम'च्या माध्यमातून पुणे येथे लडाखमधील आठ विद्यार्थी उच्चशिक्षण घेत आहेत. विज्ञानाधारित दृष्टिकोन, तार्किक मीमांसा आणि जिज्ञासा या तीन महत्त्वाच्या मूल्यांना एका सूत्रात बांधण्यासाठी आणि त्यातून शिक्षण पूरक अनुभवांसाठी म्हणून लडाख येथे 'सायन्स पार्क' उभे राहते आहे. लडाखला एक नवी ओळख मिळावी यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला. या प्रकल्पासाठी स्थानिक सामान्य नागरिक आणि शाळांकडून कायमच उत्साहवर्धक प्रतिसाद आला आहे. त्याचबरोबर उर्वरित भारतातूनही अनेक तरुणांनी या कार्याला मूर्त रूप यावे यासाठी प्रत्यक्ष या ठिकाणी जाऊन दिवस रात्र काम केले आहे. लेह पासून जवळच असणार्‍या शे गावामध्ये हे 'सायन्स पार्क' उभारले जात आहे.

 

सायन्स पार्क

या प्रकल्पातून शिक्षणाबरोबरच सातत्याने संपर्क तयार करण्यासाठी आणि या भागाला तेथील नागरिकांसह उर्वरित भारताशी जोडून घेण्यासाठी याचा नक्की उपयोग होईल असे 'असीम फाऊंडेशन'चे संस्थापक सारंग गोसावी यांनी सांगितले. या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून काम करणार्‍या निरुता किल्लेदार, मंदार गाडगीळ आणि नेहा घुगरी यांनी हा प्रकल्प पूर्ण होण्यामागे या भागामध्ये राहणार्‍या स्थानिक नागरिकांचा मोठा मदतीचा हात असून ते सार्वजणही या उद्घाटनाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे सांगितले. येत्या २० जूनला सकाळी १० वाजता शेमधील सिंधु घाटाजवळ हे 'सायन्स पार्क' सर्वांसाठी खुले होणार आहे. अधिक माहितीसाठी http://aseemfoundation.org अथवा http://infoaseemfoundation.org वर संपर्क साधावा.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@