जे. पी. नड्डा भाजपचे कार्यकारी अध्यक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2019
Total Views |



नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी आज जगतप्रकाश उर्फ जेपी नड्डा यांची निवड करण्यात आली. भाजपच्या संसदीय बोर्डाने हा निर्णय घेतला. केंद्रीय संरक्षण मंत्री व वरिष्ठ भाजपनेते राजनाथ सिंह यांनी ही माहिती दिली असून विद्यमान भाजप अध्यक्ष अमित शाह हेच पक्षाध्यक्षपदी राहणार आहेत. दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवणुकीआधी जेपी नड्डा यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी करण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील सप-बसपच्या आघाडीमुळे राजकीय विश्लेषकांनी राज्यात भाजपचे अस्तित्व धोक्यात आल्याचे म्हटले होते. परंतु, राज्याच्या प्रभारीपदी असलेल्या नड्डांनी भाजपला इथे ८० पैकी ६२ जागा जिंकून दिल्या.

 

जेपी नड्डा पहिल्यांदा १९९३ साली बिलासपूर येथून आमदार म्हणून निवडून आले. नंतर १९९८ पासून २००३ आणि २००७ ते २०१२ पर्यंत बिलासपूर इथूनच ते विजयी झाले. १९९८ ते २००३ या काळात ते हिमाचल प्रदेशच्या आरोग्यमंत्रिपदीही होते. २००८ ते २०१० पर्यंत हिमाचल प्रदेशातील धूमल सरकारमध्ये जेपी नड्डा यांच्याकडे वने आणि पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचा पदभार देण्यात आला. २०१२ साली ते हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर निवडून गेले, तर २०१४ मध्ये मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेवर आल्यानंतर ते केंद्रीय आरोग्यमंत्रिपदीही होते.

 

अभाविप ते भाजप अध्यक्ष

 

जेपी नड्डा यांनी ७० च्या दशकातील जेपी नारायण यांच्या आंदोलनातून प्रेरणा घेत विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाले. पटना येथे राहताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत प्रवेश केला. नंतर १९७७ ते १९७९ पर्यंत पटना विद्यापीठात अभाविपचे ते सचिवही होते. इथूनच जेपींच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. पटना येथे अभाविपचे काम केल्यानंतर नड्डा हिमाचल प्रदेशात गेले व तिथे त्यांनी अभाविपचे सचिव व सहसचिव म्हणून काम केले. सन १९८३ मध्ये नड्डा यांनी हिमाचल प्रदेश विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. अभाविपच्या निरनिराळ्या पदांवर काम करणाऱ्या जेपींची कुशल रणनीती व सक्रियतेमुळे पुढे निरनिराळ्या पदांवर नियुक्ती होत गेली. सन १९८६ मध्ये नड्डा अभाविपचे राष्ट्रीय सचिव आणि संघटनमंत्री झाले, तर १९८९ मध्ये भ्रष्टाचाराविरोधात नड्डा यांनी आंदोलन छेडले, केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडली. याचवेळी त्यांना अटक करण्यात आली व ते ४५ दिवसांपर्यंत कारागृहातही राहिले.

 

राष्ट्रीय राजकारणात प्रवेश

 

१९८९ आणि १९९० च्या लोकसभा निवडणुकीत जेपी नड्डा यांना भाजयुमोच्या निवडणुक प्रभारीपदाची जबाबदारी दिली गेली. इथूनच नड्डा यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला. सन १९९० ते १९९१ पर्यंत नड्डा हिमाचल प्रदेश भाजपचे सचिवही होते. दरम्यान, जेपी नड्डा वयाच्या ३१ व्या वर्षीच १९९१ ते १९९४ पर्यंत भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीही विराजमान झाले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@