योग थेरपी नव्हे, कल्याणकारी जीवनशैली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2019
Total Views |


 


योग म्हणजे दिवसातला केवळ अर्धा तास केली जाणारी आसने आणि प्राणायाम नव्हे; तर उर्वरित साडेतेवीस तास आचरण्याचे यम आणि नियमसुद्धा त्यात अंतर्भूत होतात. योग्य वयात त्यांचा संस्कार झाला, तर आजच्या बऱ्याच वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक समस्या सुटतील, त्या निर्माण होणार नाहीत. २१ जून हा जागतिक योगदिन आहे. त्यानिमित्त वैद्य सुचित्रा सुधाकर कुलकर्णी यांचा हा खास लेख.


"रोज काही व्यायाम होतो का?" उत्तर माहीत असलेले असे काही प्रश्न आम्हाला विचारावेच लागतात. "हो. रोज मी अर्धा तास योग करतो," असं त्या प्रश्नाचं ठराविक 'खोटं' उत्तर ठरलेलं असतं. खोटं यासाठी की, तो 'योग' कधीतरीच 'योगायोगा'नं केला जातो, रोज नाही. तोही २४ तासातील फक्त अर्धा तास. प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की, आपल्या पूर्वजांनी योग व्यवहारात आचरला होता. प्राणायाम, ध्यान, कुंडलिनी जागृती, प्राणाचं उर्ध्वगमन अशा कितीतरी गोष्टी त्यांना अभ्यासानं प्राप्य झाल्या होत्या. युद्धातील मृत्यू सोडले, तर अन्य बऱ्याच जणांनी प्राणांचं नियमन करून योगशास्त्राच्या आधारे स्वतःहून देहत्याग केल्याचे उल्लेख ठायीठायी मिळतात. इतकं त्या काळी हे शास्त्र प्रचलित होतं. आपल्याला योग म्हटलं की, डोळ्यांसमोर येतात ते शाळेतल्या शारीरिक शिक्षणाच्या तासाला करतात तसे काही आसनांचे प्रकार किंवा पद्मासनात बसून केलेले श्वासाच्या भात्याचे प्रयोग! आपली झेप इतकीच. यापलीकडचा आणि अलीकडचा योग माहीत करून घेण्याचा योगच कधी येत नाही. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने आपण हा माहिती-योग साधू या. आयुर्वेदशास्त्रात वेदनांचा विचार करताना सांगितलं आहे की, वेदनांपासून निःशेष (कायमची) मुक्ती केवळ मोक्षानेच मिळते, तर योग हा मोक्षाकडे नेणारा आहे. वेदना किंवा दुःखापासून मुक्ती देण्याच्या कार्यात योग आणि आयुर्वेद ही दोन शास्त्रं अश्विनीकुमारांप्रमाणे प्रभावी आहेत. सामान्यतः आपल्याला माहीत असलेले 'आसन' आणि 'प्राणायाम' ही योगशास्त्राच्या आठ अंगांपैकी केवळ दोन अंगं आहेत. 'आसन' हे तिसरं, तर 'प्राणायाम' हे चौथं अंग. या दोन्हीच्या सरावासाठी रोज अर्धा तास देणं हे मान्य आहे. पण, मुळात योग ही २४ तास करायची साधना आहे. म्हणजे राहिलेल्या साडेतेवीस तासांत काय करायचं, हे जाणून घ्यायला हवं, नाही का? 'आसन' आणि 'प्राणायाम' यांच्या अभ्यासासाठी सर्वात आवश्यक असलेली बाब म्हणजे शरीर आणि मनाचीस्थिरता. 'आसन' आणि 'प्राणायाम' करून ती वाढते हे खरं असलं तरी, सुरुवातीला या स्थैर्याची थोडी का होईना गरज असतेच. शरीर आणि मनाला ते स्थैर्य मिळवून देण्याचं काम करणारी योगशास्त्राची पहिली दोन अंगं म्हणजे 'यम' आणि 'नियम.' यापैकी अहिंसा, सत्य, अस्तेय (अचौर्य), ब्रह्मचर्य (सर्व प्रकारच्या भोगेच्छांवर नियंत्रण) आणि अपरिग्रह (भोग सामुग्रीचा-गरजेपेक्षा जास्त संचय न करणं) हे पाच 'यम' आहेत. यांचा एकत्रित विचार केला तर 'यम' म्हणजे 'संयम' असं म्हणता येईल. मीही माहिती देताच, 'याचा आरोग्याशी काय संबंध?' आणि 'मला याचा काय फायदा?' 'मी अहिंसक असलो तर माझ्या शत्रूचाच फायदा ना?' 'समोरच्याला बरं वाटावं म्हणून मी खरं का बोलायचं?' याला काहीच अर्थ नाही. असं म्हणत माझे, महाविद्यालयीन भाचा आणि भाची तात्त्विक वादावर उतरले.

 

हे नियम दुसऱ्याच्या भल्यासाठी आहेत, हा तुमचा मोठा गैरसमज आहे. तो मी दूर करते. त्याआधी तुम्ही मला सांगा, तुम्हाला 'lie detector' माहीत आहे का?

"पोलीस वापरतात तो ना? हो, माहीत आहे की. पण त्याचं काय आत्ता मधेच?" भाच्यानं लगेच उत्तर दिलं.

"त्याचं तत्त्व माहीत आहे का तुम्हाला? एखादी व्यक्ती खोटं बोलत असेल, तर तिच्या शरीरक्रियांमध्ये होणारे बदल आपल्याला या यंत्राच्या साहाय्यानं कळू शकतात. याचाच अर्थ- आपण खोटं बोललो तर आपल्या शरीरात बदल होतात, हे तरी मान्य?"

"हं, मग?"

"हे बदल तणावजन्य असतात आणि शरीराला घातक असतात."

"मग?" भाच्याचा प्रश्न.

"मग काय विचारतोस? म्हणजे आपण खोटं बोलतो तेव्हा आपल्याच शरीराचा घात करतो ना? याचाच अर्थ, खरं बोललो तर आपलाच फायदा नाही का? तुला कायम सगळा इस्कोट करून का सांगावं लागतं रे?" भाचीनं भावाचं माप काढलं.

"अरे, माझं लक्ष नव्हतं ना!" भाच्याचं ठरलेलं कारण. पण," 'अहिंसे'चं काय? कायम मार खायचा?" तो सहज हार मानणार नव्हताच.

"कुठल्याही जीवाला आपल्या शरीर, वाणी किंवा मन यांनी पीडा होणार नाही अशी वर्तणूक म्हणजे 'अहिंसा.' अनोळखी जीवांशी आपली पहिली वर्तणूक अशीच असावी. कुणी आपल्याला पीडा देत असेल, तर त्याचा प्रतिकार करण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे. मुळात आपण अहिंसक असू तर आपल्या भोवतालचे जीवही अहिंसक बनतात, असं योगशास्त्र सांगतं," मी म्हटलं.

"काहीतरीच हं." भाच्याला पटेना.

"का? प्रकाश आमटे यांच्याबरोबर वाघ-सिंहासारखे हिंस्र पशूसुद्धा प्रेमानं राहतातच की. बघताय ना? आपले पूर्वज हेच तर सांगतात," मी म्हटलं.

"प्राण्यांचं ठीक, पण माणसांचा काय भरवसा? अहिंसेनं आपल्या देशाची काय वाट लावली बघितलं ना?" भाचीनं तिच्या जिव्हाळ्याचा विषय छेडला.

"ती वाट अहिंसेनं नाही लावली, अहिंसा अयोग्य ठिकाणी आचरणात आणल्यानं लागली. अहिंसा इ. पाच 'यम' हे वैयक्तिक पातळीवरील आचरणासाठी आहेत. राष्ट्रीय पातळीवर हे लागू होत नाहीत. त्या वेळी त्यांना 'सद्गुण विकृती' म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा धर्मरक्षणासाठी युद्ध केलंच की. करायलाच हवं. मात्र, वैयक्तिक व्यवहारात आपण कुणाला दुखवू नये. रोजच्या जीवनाचा बहुतांश भाग वैयक्तिक व्यवहारांनीच व्यापलेला असतो. अशा वेळी सतत हिंसक भाष्य, हिंसक विचार किंवा हिंसक कृती हे पुन्हा 'असत्य' भाषणाप्रमाणे आपल्याच शरीराला घातक ठरतं," दोघांचा अंदाज घेत मी बोलत होते. "कळलं? तेव्हा आता जाता-येता मला टपल्या मारणं, माझ्या खोड्या काढणं, चिडवणं या हिंसक कारवाया बंद करा. खुद की भलाई के लिये, " विजयी मुद्रेनं भावाकडे बघत भाची म्हणाली. "आणि ते 'ब्रह्मचर्या'चं काय?" भाच्यानं विचारलंच.

"तुला वाटतंय तसं फक्त लैंगिक ब्रह्मचर्य इथे अपेक्षित नाही. सगळ्याच इंद्रियांच्या भोगांवर नियंत्रण हवं. तहान-भूक या गरजा वेगळ्या. खरंतर ऋषिमुनी त्यावरही नियंत्रण मिळवायला सांगतात. पण, तो भाग पुढच्या टप्प्यातला. सुरुवातीला किमान गरज पूर्ण झाल्यावर तरी अभिलाषा नसावी. तुमच्या लहानपणी आपल्याकडे कामाला यायची ती मुमताज, आठवते का?" मी विचारलं.

"हो. ती वारली ना?"

"वारली नाही. तिचा तेव्हा खून झाला होता."

"काय? कुणी केला?" भाचीनं हबकून विचारलं.

"तिच्या नवऱ्यानंच. त्याला जुगाराचा नाद होता. आता जुगार ही काही जीवनावश्यक गोष्ट नाही. मुमताज जुगाराला पैसे देत नसे. एकदा तिचे तीन-चार कामांचे पगाराचे पैसे घरात आले होते. नवऱ्याला त्या पैशाची इच्छा झाली. मुमताज देणार नाही म्हटल्यावर त्यानं ते चोरले आणि घराबाहेर जाऊ लागला. कडीच्या आवाजानं मुमताजला जाग आली. त्यानं घाईघाईत पैसे शर्टच्या खिशात कोंबले. काही नोटा खिशातून डोकं वर काढत असलेल्या मुमताजला दिसल्या. तिनं पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला. दोघांचं भांडण झालं, त्यात नवऱ्यानं रागारागात हिच्या डोक्यात सोटा घातला. ती गेली, नवऱ्याला शिक्षा झाली. एका इच्छेपायी किती मोठा अनर्थ? इच्छा पूर्ण झाली नाही की राग येतो, मग त्यात अडथळा वाटणाऱ्या व्यक्तीशी असं चुकीचं वर्तन घडू शकतं. म्हणून इंद्रियांवर संयम हवा. गीतेत नाही का सांगितलं आहे- ध्यायतो विषयांपुंस:..." मी सुरुवात केली.

"हं. पुढे क्रोधात् भवति संमोह:... तेच ना?" भाच्याला आठवल्याचा आनंद झाला.

" 'अपरिग्रह'चा काय संबंधपण? म्हणजे कुणी श्रीमंत व्हायचंच नाही की काय? हा अन्याय आहे," भाची म्हणाली.

"लगेच अन्याय कसा होईल? हा काही कायदा नाही. 'अपरिग्रह' ही स्वेच्छेनं करायची गोष्ट आहे. गरजेपेक्षा जास्त संचय नसावा. आता गरज कशी ठरवायची? तर सर्वसामान्य माणसांसाठी पुढील सहा महिन्यांना पुरेल इतका संचय योग्य आहे. अगदी योग्य मार्गानं जरी त्यापेक्षा जास्त प्राप्ती झाली तरी तिचं गरजूंना दान करावं. कारण, तुमच्याकडे जे जास्त आहे ते कुणाच्या तरी हक्काचं चुकून तुमच्याकडे आलं आहे. शास्त्रात गरजेपेक्षा जास्त साठवणाऱ्या व्यक्तीलाही 'चोर'च म्हटलं आहे. आत्ताचे अब्जाधीश असलेले लोक आपल्याला चोर वाटतातच ना? जितका संग्रह जास्त तितकी भीती जास्त. आधी इंद्रियसंयम करून गरजा कमी करायच्या आणि मग गरजेपेक्षा जास्त साठवणूक करायची नाही. झाली तर दानाचा मार्ग अवलंबावा."

"खरं आहे यार. आम्हाला तर एक मोबाईल, एक दुचाकी, चार कपडे, एक डीओ.... काहीच मर्यादित चालत नाही. म्हणजे आम्ही चोर? अरे बापरे!" भाचा प्रकाशला.

"कसले उच्च विचार आहेत ना हे?" भाची भारावून म्हणाली.

"हो. पण तुम्ही अजून एव्हरेस्ट कुठे बघितलं आहे? भगवान पतंजली पुढे म्हणतात की, आपली जात, देश, काळ असा कसलाही विचार न करता प्रत्येक व्यक्तीनं स्वतंत्ररीत्या 'यमां'चं पालन करायचं, असं एकाच वेळी सगळ्या समाजानं ठरवलं, तर त्याला 'महाव्रत' असं म्हणतात." मी दोघांच्या डोळ्यांत बघत माहिती दिली. अपेक्षेप्रमाणे त्या दोघांचे डोळे लकाकले.

"काय सांगतेस? असं होऊ शकतं?" भाच्यानं आश्चर्यानं विचारलं.

"आई शपथ! म्हणजे आपल्या पंतप्रधानांनी सगळ्यांना महाव्रताच्या कामाला लावलंय तर!" भाची म्हणाली.

"आणि या ऐतिहासिक घटनेचे आपण साक्षीदार असणार आहोत!" भाचा म्हणाला. "एका दिवसात नाही होणार मान्य. पण, 'अहिंसा' हे जर महाव्रत झालं, तर दहशतवाद नष्ट होऊ शकतो ना? आणि 'अपरिग्रहा'नं दारिद्र्य नष्ट होऊ शकतं. भारी उपाय आहे यार!"

"वैयक्तिक स्वास्थ्यावर सामाजिक स्वास्थ्य मुफ्त, मुफ्त, मुफ्त..." भाची जाहिराती बघते आवडीनं, त्याचा प्रभाव.

"हे सगळे एक प्रकारचे नियमच झाले की. तरी यांना 'यम' म्हणायचं आणि नियम अजून वेगळे?" भाच्यानं विचारलं.

"तसे दोन्ही नियमच. 'यम' म्हणजे समाजात वागण्याचे नियम, तर 'नियम' म्हणजे वैयक्तिक वागणुकीचे नियम." त्यांना उत्सुकता वाटतेय म्हटल्यावर मी संधी कशाला सोडू?

"शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान..." भाची पोपटासारखी बोलली.

"माहीत आहे तुला कॉलेजमध्ये योग शिकवतात ते, एवढा काही भाव नकोय खायला हं..." हे ना, कुठल्यातरी जन्मीचे 'टॉम' आणि 'जेरी' असावेत.

"पण, तू सांग मावशी. तू सोप्पं करून सांगतेस. त्याचा नुसता अर्थ आणि उपयोग कळतो असं नाही, तर अनिवार्यताही कळते," भाची म्हणाली.

"अनिवार्यता? जी. ए. वाचायला लागल्यापासून बब्बी मोठे मोठे शब्द वापरायला लागली की!" भाच्यानं डोळे मोठे केले.

" 'शौच' म्हणजे स्वच्छता, पावित्र्य. यात अंतर्बाह्य पावित्र्य अपेक्षित आहे. काही मुनी तर शरीर, मन, अन्न, धन, वाणी यांचाही यात समावेश करतात."

" 'स्वच्छ भारत अभियान' म्हणजे हाही योगसाधनेचाच भाग?" भाच्याचा प्रश्न.

"हो. सुरुवात म्हणूया."

" 'अन्न शौच' म्हणजे जंक फूडविरहितअन्न. पाकिटातलं अन्न आणि बाटल्या/कॅन/ टेट्रा पॅक यातली पेयं वर्ज्य!"

"अब तेरा क्या होगा कालिया?" भाचीनं भाच्याला चिमटा काढला.

"मी नाही हं असलं काही खात. माझे सगळे मित्र खातात, पण मी नाही. मी तर कुणाचं उष्टंपण नाही खात. एकाच बाटलीला तोंड लावून पाणी पिणं, सगळ्यांनी एकाच ताटलीत किंवा एकच चमचा वापरणं- ये सब हमारे उसलोंके खिलाफ हैं. तोंडानं विज्ञानाच्या गप्पा मारायच्या आणि वागायचं हे असं अवैज्ञानिक- हा ढोंगीपणा मला मान्य नाही."

"अर्थात! असंच पाहिजे. जीवाणूजन्य आजारांना घाबरून जाहिरातीत दाखवतात ती जीवाणूनाशक ढीगभर साबणं, हॅण्डवॉश, टूथपेस्ट असल्या केमिकल्सच्या आहारी जाऊन आणखीन गाळात जाण्यापेक्षा हे बरं नाही का?" मी त्याला पाठिंबा दिल्यानं त्याचा चेहरा लगेच उजळला.

" 'संतोष' म्हणजे जे मिळतंय त्यात समाधान मानण्याची वृत्ती ना मावशी?" भाचीचा पुढचा प्रश्न.

"पण, आपण अल्पसंतुष्ट राहिलो तर प्रगती कशी होणार आपली? 'श्रेु रळा ळी लीळाश' ना?" भाचा उवाच.

"हा विषय फारच गोंधळाचा आहे. त्यासाठी आपली प्रगतीची व्याख्या आपण स्वतः ठरवायला हवी, दुसऱ्यानं नाही. ती प्रगती साधण्यासाठी योग्य प्रयत्न केल्यावर जे मिळेल त्यात समाधान हवं. शिवाय विकासासाठी किंवा प्रगतीसाठी प्रयत्न करताना 'अहिंसा' इ. 'यम' विसरायचे नाहीत.

"म्हणजे मी एखादा उद्योग करायचं ठरवलं, तर कुणाचीही हिंसा न करता, कुणालाही न दुखावता, खरं बोलून, चोरी न करता, हाव न धरता आणि गरजेपेक्षा जास्त नफेखोरी न करता असा उद्योग करायचा? किती अवघड? भांडवलशाही विचारसरणीचा प्रभाव हा असा आहे. आपलीच संस्कृती आपल्याला अवघड वाटायला लागते."

"अवघड काय त्यात? आपले पूर्वज लाखो वर्षे असेच जगत आलेत," मी म्हटलं.

"म्हणजे सध्याच्या शीतपेयं, जंक फूड, सौंदर्यप्रसाधनं इ. कंपन्या त्यांच्या जाहिरातीत जे रेटून खोटं बोलतात ते चुकीचं ठरेल," भाच्याला आणखी एक शोध लागला.

"आहेच ते चुकीचं. ही सगळी उत्पादनं आरोग्याला घातक आहेत हे माहीत असून, केवळ पैसा आणि प्रतिष्ठा यांच्या मोहापायी, या उत्पादनांच्या मोहजालात तरुणांना ओढण्यासाठी आपली बुद्धी पणाला लावणारे या कंपन्यांचे सीईओ, जाहिरात तयार करणारे लोक, संशोधनाचे खोटे रिपोर्टस देणारे संशोधक, जाहिरात प्रसारित करणारी माध्यमं सगळ्यांचीच शुचिता लयाला गेली आहे. खोट्या बातम्या देणारे पत्रकार, टीआरपीसाठी खोटारडेपणा करणारी माध्यमं, गरज नसताना औषधे, तपासण्या, शस्त्रकर्म यांचा ससेमिरा मागे लावून देणारे डॉक्टर्स, वर्षानुवर्षे कोर्टात केस लटकत ठेवणारे वकील आणि न्यायाधीश, लोकांना कायद्याची खोटी भीती दाखवून पैसे उकळणारे पोलीस आणि त्याला निमूटपणे साथ देणारे आपण सर्व... सगळे जण या एकाच माळेतले मणी.लहानपणापासून योगशास्त्र शिकवलं असतं, तर कदाचित आपण प्रत्येक पाऊल टाकताना, प्रत्येक पैसा कमावताना काही सद्विचार केला असता आणि समाज खूप मोठ्या संकटातून वाचला असता," मी म्हटलं.

"असं होऊ शकतं?" भाच्याला पटत नव्हतं.

"का नाही? याला 'अर्थशुचिता' असं म्हणतात. अरे, आपल्या देशातला खेड्यापाड्यातला अगदी गरीब माणूससुद्धा हे शौच पाळतो."

"इतक्या लांब कशाला जायचं? आपल्या वैष्णवी मावशी आहेत ना," भाची म्हणाली. "आपल्याकडे किती वेळा उधार पैसे मागावे लागतात त्यांना. दर महिन्याच्या पगारातून थोडे थोडे फेडत बसतात. पण, त्यांच्या मुलाला गेल्या महिन्यात दारू पोहोचवायचं काम मिळालं होतं. दिवसाचे बक्कळ ६०० रुपये मिळणार होते. पण, मावशीनी नाही तर नाही करू दिलं ते काम पोराला. म्हणे- ज्याच्या घरी देणार, त्याच्या कुटुंबाची वाताहत होणार. असलं वंगाळ काम करून श्रीमंत होण्यापेक्षा गरिबाची भाकरी बरी." बाईसाहेबांचं घरात बरंच लक्ष असतं म्हणायचं. तिच्या गुणग्राहकतेचं मला कौतुक वाटलं.

"अरे! म्हणजे या अशिक्षित लोकांना जे समजतं ते सुशिक्षितांना समजत नाही? मग शिक्षणाचा काय उपयोग?" भाच्याचा स्वाभाविक प्रश्न.

तसं नाही काही. सामान्य ज्ञान वाढणं, शिस्त लागणं, बाहेरच्या जगाशी ओळख होणं, हे शिक्षणाचे फायदे आहेतच की! पण, शिक्षणाला योगाभ्यासाची जोड दिली तर मनुष्य म्हणून आपल्याला आपल्या विकासाचा मार्ग सापडू शकतो. योग्य प्रयत्न केले तर तोच मार्ग आपल्याला देवत्वाच्या पथावर नेऊ शकतो, हे महत्त्वाचं." मी समजुतीचा सूर लावला.

"मग 'तप' करायचं का? ध्रुवबाळ, वाल्या यांच्यासारखं? अंगावर वारूळ चढेपर्यंत?"

" 'तप' म्हणजे 'तितिक्षा.' एखादं काम करण्यासाठी आपली सहनशक्ती वाढवणं म्हणजे 'तप."'

"आमच्या पिढीला आजी 'मेषपात्र' म्हणते. म्हणते तुम्हाला काहीच सहन होत नाही, लवंग गरम पडते आणि वेलची उष्ण पडते," भाचीला आठवलं.

"खरं आहे. ऊन-थंडी-पाऊस हे सगळं सहन करता आलं पाहिजे. जरा ऊन पडलं की वातानुकूलित लागतं, हे काय कामाचं? केवळ शारीरिकच नाही तर मानसिक सहनशक्तीसुद्धा वाढायला हवी. आईवडील थोडे रागावले तरी मुलं नाराज होतात, व्यसनाच्या आहारी जातात. हे चुकीचं आहे. जरा कुठे दहावीत एकदा अनुत्तीर्ण झालं, तर निराश होऊन आत्महत्येपर्यंत पोहोचणं, हे मनाच्या कमकुवतपणाचं लक्षण आहे. प्रेमाला नकार दिला तर राग, अपमान, निराशा या भावनांच्या अतिरेकातून- प्रेमाच्याच व्यक्तीला इजा करणारी कृत्यं करणाऱ्या व्यक्तीला प्रियकर कसं म्हणायचं? हे सगळं समंजसपणे सहन करणं आणि तरी कुणालाही त्रास न देता आयुष्यात पुढे जाणं हेच 'तप.' आपल्यासारख्या सामान्य माणसांना त्यासाठी जंगलात जायची गरज नाही. किंबहुना आपल्याला ते झेपणारच नाही. आलेल्या संकटांना धैर्यानं तोंड देत, यश/अपयश, मान/अपमान सहन करत आपलं काम नेटानं करत राहणं हे आपल्यासाठी 'तप!"'

"मावशी, तुला माहीत आहे का? वाघालासुद्धा जंगलात कधीकधी चार-पाच दिवस उपाशी राहावं लागतं म्हणे. प्रत्येक वेळी शिकार मिळतेच असं नाही. तो प्राणी जीव वाचवण्याच्या प्रयत्नात यशस्वीही ठरू शकतो ना? मग काय वाघानं लगेच डिप्रेशनमध्ये जायचं की काय? तो कसा त्याच उमेदीनं दुसऱ्या दिवशी शिकारीला बाहेर पडतो," भाच्यानं माहिती पुरवली.

"म्हणून तर उपवास किंवा लंघन हा तपाचा एक भाग ठरतो. आपल्याला उपवास तरी सहन होतो का बघा? बरं, होत नाही ते नाही, वर आपण त्याचं कौतुक करतो. उपवासाच्या पद्धतीलाच नावं ठेवतो," मी म्हटलं.

"असं काही नाही हं. मी करू शकते," भाचीचा अहं दुखावला असावा.

"ठीक आहे. आता श्रावण महिना येतोच आहे. शनिवारी हनुमंताचं व्रत करा. बघू दिवसभराचा उपवास झेपतो का? पण, उपवास म्हणजे पूर्ण उपाशी हं. अगदीच राहवलं नाही तर केवळ दूध किंवा फलाहार. साबुदाणा, बटाटा, श्रीखंड असले लाड नाहीत," मीपण आव्हान दिलं.

"येस. डन! मीपण करून बघतो. त्याशिवाय सहनशक्ती कशी वाढणार? आमच्या वयाच्या किती मुलांना असं उपाशी राहावं लागत असेल ना? आपले जवानदेखील राहतात की उपाशी. ते निभवू शकतात तर आम्हालाही जमलंच पाहिजे," भाच्यानं कधी नव्हे ते बहिणीला साथ दिली.

"पुढचा 'नियम' आहे 'स्वाध्याय.' याचा अर्थ, पृथ्वीवरील जीवांना कल्याणकारक असणाऱ्या शास्त्रांचा अभ्यास," मी म्हटलं.

"अशीपण अट आहे? बापरे, यात आत्ताची किती शास्त्रं बाद होतील? तुला माहीत आहे का मावशी? नोबेल पारितोषिक मिळालेल्या काही शास्त्रज्ञांनी दुसऱ्या महायुद्धात, लाखो लोकांना मारू शकतील अशा जैविक अस्त्रांचा शोध लावला आहे. त्याबद्दल त्यांना गौरवलं गेलं आहे हे किती वाईट," भाच्याला प्रश्न पडला.

"असे नियम लावायचे म्हटलं तर आयुर्वेदच शिकावा लागेल सगळ्यांना." भाची म्हणाली.

" 'आयुर्वेद' आणि 'योग.' ही दोन शास्त्रं कल्याणकारी आहेत हे खरंच. याशिवाय 'अध्यात्मविद्या विद्यानाम्' म्हणजे विद्यांमध्ये मी अध्यात्मविद्या आहे, असं भगवंतांनी गीतेत सांगून ठेवलं आहे. दुर्दैवानं ही विद्या युवावस्थेत प्राप्त न करता वार्धक्यात आपण तिच्या अभ्यासाला लागतो. तेव्हा सगळ्या क्षमता कमी झाल्यानं परिस्थिती बिकट असते," मी मनोमन खूश होऊन म्हणाले. अर्थात, इतर शास्त्रांचाही उपयोग जो केवळ मानवाच्या कल्याणासाठी करतो तोच खरा माणूस.

" 'ईश्वरप्रणिधान' म्हणजे ईश्वराची उपासना, नामस्मरण- हो ना?" भाची आपली माहिती तपासून घेत होती. "पण, त्याचा इथे काय संबंध?" भाच्यानं विचारलं.

"ईश्वराच्या स्मरणाशिवाय या सगळ्याची पूर्ती कशी होईल? समर्थ तर सांगतात, 'रघूनायकावीण वाया सिणावे' म्हणजे ईश्वराव्यतिरिक्त आपण जे जे काही करतो ते व्यर्थ शिणणं आहे, ते श्रम वायाच जातात. 'यम-नियमां'चे पालन करताना कितीतरी वेळा मोह-निराशा यामुळे आपण डळमळीत होऊ शकतो. अशा वेळी ईश्वरोपासना आपल्याला बळ देते. 'अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना: पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्' म्हणजे अनन्यभावानं माझी भक्ती करणाऱ्या व्यक्तीचं 'योग' (अप्राप्ताची प्राप्ती) आणि 'क्षेम' (प्राप्ताचं रक्षण) मी करतो, हे खुद्द भगवान श्रीकृष्ण सांगतात. त्यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ! दिवसातले झोपेव्यतिरिक्तचे १८ तास 'यम-नियमां'च्या खडतर मार्गावरून चालायचं असेल, तर भगवंतांचा असा आश्वासक सहवास सतत हवाच, नाही का?" मी दोघांचा अंदाज घेत बोलत होते.

"ग्रेट यार!" भाचा चित्कारला. "हे सगळं इन्स्पायरिंग आहे, व्यक्तिमत्त्वाचा विकास करणारं आहे. शिवाय यातच तणावनियोजन आहे आणि मूल्यशिक्षणसुद्धा आहे," तो नादात बोलत होता.

"अरे वा! इतक्या कमी वेळात छान सारांश काढलास की!"

"जमतो थोडा थोडा," भाचा लाजत म्हणाला. पण, "आता कल्याणकारी योगशास्त्राच्या स्वाध्यायाला सुरुवात आजपासूनच." त्याचा उत्साह आणि निर्धार पाहून माझ्या आशा पल्लवित झाल्या. आत्ता पेरलं तरच उगवणार ना?

 

- वैद्य सुचित्रा कुलकर्णी

(लेखिका एम. डी. आयुर्वेद असून

बी. ए. योगशास्त्रात सुवर्णपदक मिळाले आहे.) 'आयुर्वेदीय आरोग्यमंत्र' या पुस्तकातून साभार.

[email protected]

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@