संघ संस्कारातून परिवर्तन लक्ष्मी नारायण जोशी विद्यार्थी आश्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2019
Total Views |


 


सद्गुण आणि पावित्र्य यातून चिरकाल टिकणारा आनंद मिळतो, हे खरे आहे. तसेच मुलांवर जसे संस्कार घडवू तसे ते घडतात, याची प्रचिती आली रत्नागिरी जिल्ह्यातील, दापोली तालुक्यापासून २८ किमी अंतरावर वसलेल्या कोळथरेवासीयांना. कारण, येथील 'लक्ष्मी नारायण जोशी विद्यार्थी आश्रम.' या आश्रमामध्ये येणारे बहुतांशी गरजू विद्यार्थी, तर काही कौटुंबिक-सामाजिक परिस्थितीने गांजलेले. त्यात पालकांनी हतबल होऊन, परिस्थितीपुढे हात टेकून आपल्या पाल्यांना या विद्यार्थी आश्रमात पाठवलेले.स्थानिक, पंचक्रोशीतीलच नव्हे, तर कोकणासह मुंबई-पुण्यासारख्या शहरांतूनही शिक्षणासाठी व पर्यायाने चांगले संस्कार मिळावेत म्हणून अनेक पालक आपल्या मुलांना या आश्रमात पाठवतात.


'लक्ष्मी नारायण जोशी विद्यार्थी आश्रमा'मध्ये चांगल्या सवयी आणि चांगली संगत यामुळे विद्यार्थ्यांचे सद्गुण वाढीला लागतात. चुका तर सर्वांकडून होऊ शकतात. मात्र, त्या कळताच कबूल करून प्रायश्चित घेतले, तर 'परिवर्तन' होऊ शकते. तुम्हाला सुधारायचे असेल, तर सवयी व विचार या दोन्ही बाबतीत सुधारणा झाली पाहिजे. हे लक्षात ठेवून विद्यार्थ्यांना आयुष्यात प्रगती करायची असेल, तर फक्त देव व दैवावर अवलंबून न राहता मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करण्याकरिता धडपड करावी लागते. शक्ती इतरांना त्रास देण्यासाठी वापरू नये अशी शिकवण मिळाली, तर 'परिवर्तन' दूर नसते. 'जीवन जगणे' हे शास्त्रही आहे व एक कलाही आहे. अडचणींवर मात करून मार्गक्रमण करण्याची ताकद ज्यांच्यात असते, त्यांच्यापासून यश फार लांब नसते. भरती, ओहोटी व वेळ कोणासाठी थांबत नाही. या सर्व बाबींची ओळख आणि जाणीव या आश्रमात विद्यार्थ्यांना करून देण्यात येते. कोळथरेला तिन्ही बाजूला हिरवागार डोंगर, तर एका बाजूला नजर जाईल तोपर्यंत अथांग समुद्र आहे. इतर गावांप्रमाणेच या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेतून पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण मिळायचे. गावातील मुला-मुलींचे पुढील शालेय शिक्षण थांबायचे. ही अडचण सोडविण्यासाठी मामा महाजन यांनी गावात इ. आठवी ते दहावीपर्यंतचे माध्यमिक विद्यालय १९६० साली सुरू केले. आता त्याचे नाव 'आई आनंदी गोपाळ महाजन विद्यामंदिर' आहे. मात्र, शाळेला किमान हजेरीची अट पूर्ण करण्यासाठी जोड म्हणून 'लक्ष्मी नारायण जोशी' हा विद्यार्थी आश्रमही सुरू केला. अनंत अडचणींवर मात करून आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कर्तृत्वाच्या बळावर अल्पावधीतच कोळथरच्या विद्यामंदिर आणि विद्यार्थी आश्रमाचे नाव सर्वत्र दुमदुमू लागले. खेड्यापाड्यातील रंजल्या गांजलेल्या विद्यार्थ्यांना मामांनी जमवून आणले आणि ही शाळा सुरू केली. पण, तिची ख्याती मुंबई-पुण्यासारख्या शहरातही पोहोचल्यावर तेथून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी कोळथरेला येऊ लागले. परंतु, काही दुर्दैवी घटनांमुळे ही शाळा व हा आश्रम बंद करावा लागला. सन १९८३ साली गावातील बाबूशेठ जाधव आणि सहकारी ग्रामस्थांनी मामांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा नव्याने शाळा आणि आश्रम सुरू केले. मामांनी घालून दिलेल्या आदर्शावर 'कोळथरे पंचक्रोशी विकासमंडळ' ही संस्था गेली ३६ वर्षे शाळा आणि आश्रम चालवत आहे.

 

प्रथम शाळेच्या सर्वांगीण प्रगतीची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. दहावीच्या निकालाचा विचार करता, सन २००२ पासून सातत्याने ९० टक्क्यांच्या वर लागत आहे. चार वेळा १०० टक्केही निकाल लागला. क्रीडास्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा, स्पर्धा परीक्षा, आय.सी.टी. केंद्र, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा आणि साहाय्य, ज्यादा तासिका, रात्र अभ्यासिका, घरोघरी अभ्यासिका, शारदोत्सव व सामाजिक उपक्रमांची जोड या संस्थेने दिली आहे. आता आश्रमाबद्दल माहिती करून घेऊया. सामाजिक, कौटुंबिक आर्थिक, शैक्षणिक, वैयक्तिक अशा अनेक प्रकारच्या समस्यांमुळे, शैक्षणिक प्रगती खुंटलेली मुले आश्रमात येतात. सामूहिक जीवन, सहअध्यायींचा सहवास, शिस्त, संस्कार, शिक्षण, राष्ट्रीय भावना या सर्व प्रशिक्षणातून फार थोड्या वेळात मुलांमध्ये आमूलाग्र बदल घडून येतात. मुलांची वर्तणूक, विचार, आचार यात फरक पडतोच, त्याचबरोबर उत्तम गुण मिळवत सर्वच मुले दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन जीवनाच्या पुढील वाटचालीस सिद्ध होतात. संघसंस्काराप्रमाणे पहाटे ५.३० ते रात्री ९.३० पर्यंत आखलेला आश्रमातील दिनक्रम. सकाळी ३० मिनिटे व्यायाम, प्रार्थना, नाश्ता, दोन वेळा ताजे भोजन, भोजन मंत्र, साफसफाईची कामे, सायंप्रार्थना, संध्याकाळी एक तास मैदानावर खेळ, रोज अडीच तास अभ्यास या दिनचर्येचे काटेकोर पालन केल्यामुळे मुले शिस्तप्रिय होतात व त्यांच्यात आमूलाग्र परिवर्तनही घडून येते. दीपक महाजन यांना साथ देणाऱ्या धर्मपत्नी ज्योती या गावच्या सरपंच असूनही त्या निवडक विद्यार्थ्यांची घरी शिकवणी घेतात. त्यांनी आव्हान स्वीकारून दहावीच्या अंतिम परीक्षेत या मुलांना ९१ टक्क्यांपर्यंत मजल मारत पुढे आणले. आणखी एक प्रसंग. पश्चिम रेल्वेवरील उपनगरातील संघ कार्यकर्त्याकडे घरकाम करणाऱ्या महिलेच्या मुलाला संगत चांगली न मिळाल्याने जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. प्रभादेवी, मुंबई येथील यशवंत भवनमधून कोळथरे येथील आश्रमामध्ये फोन आल्यावर त्याला लगेच कोळथरेच्या आश्रमात बोलावण्यात आले. आश्रमातील चांगल्या मुलांच्या संगतीत राहिल्याने त्या मुलाच्या जीवाला असणारा धोकाही टळला. मात्र, सुरुवातीला या मुलाचे वागणेही गंभीरच होते. आल्या-आल्या त्याने दरवाजावर एवढ्या जोरात धडक दिली की, त्याचे डोकेच चिरले गेले. गावात टाके घालण्याचीही सोय नाही. मात्र, दीपक उर्फ भाऊ महाजन यांनी प्रथमोपचार औषध निमिर्तीचा अनुभव पणास लावून रक्तस्राव तत्काळ थांबवला व दुसऱ्या दिवशी त्याला तालुक्याच्या ठिकाणी नेऊन टाके घालून जीवावरचे संकट टळले. त्यानंतर मात्र, त्या मुलानेही आपला विचित्र स्वभाव बदलला. तो स्थिर आणि शांत स्वभावाचा झाला.

 

असाच एक अनुभव. एक मुलगा दहावीपर्यंत कसाबसा पोहोचला, पण दहावीच्या अंतिम परीक्षेत नापास झाला. पदाधिकाऱ्यांना एकच विद्यार्थी अपयशी झाल्याची खंत वाटत असतानाच, त्या विद्यार्थ्याचे पालक आनंदी मुद्रेने आले. ते म्हणाले, "अहो, मुलगा कधी बोर्डाच्या परीक्षेला बसेल यावरच आमचा विश्वास नव्हता. तो पहिल्या प्रयत्नात एकाच विषयात अनुत्तीर्ण झाला आहे. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका." तो मुलगा आज यशस्वीरीत्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान सांभाळतो. अशा आश्रमाशी निगडित असंख्य विद्यार्थ्यांच्या यशस्वी गाथा आहेत. रक्षाबंधन, दहीहंडी, स्नेहसंमेलन, क्रीडास्पर्धा अशा विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा आश्रमात विकास होतो. सुसंस्कृत, सुशिक्षित, राष्ट्रभक्त, शिस्तप्रिय समाज घडविणे हेच आश्रमाचे उद्दिष्ट आहे.आश्रमातील माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करून हे उद्दिष्ट साध्यही केले आहे. रा. स्व. संघाचे भिकूजी उर्फ दादा इदाते याच आश्रमशाळेचे विद्यार्थी. या आश्रमात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हीच प्रेरणा आहे. अंबरनाथचा सचिन चव्हाण हा एक माजी विद्यार्थी सहकुटुंब आता आश्रमात राहतो. आश्रमप्रमुख म्हणून तो सर्व दैनंदिनं कामे पाहतो व अध्यक्ष दीपक (भाऊ) यांना किमान एक दिवसआड भेटून आश्रमातील विद्यार्थ्यांचे कुशल कथन करतो.

 

आश्रमशाळेतील प्रवेश व अधिक माहितीसाठी संपर्क -

कोळथरे पंचक्रोशी विकास मंडळ

मु.पो. कोळथरे-४१५७१२

ता. दापोली, जि.रत्नागिरी

संपर्क फो. (०२३५८) २८५२२२/२३

 

संस्थेला सध्या काही सुधारणा करण्यासाठी आर्थिक साहाय्याची गरज आहे. आपण स्वत: परिचित संस्थांतर्फे वा मंडळांकडून या संस्थेला साहाय्य करून उपकृत करावे, ही विनंती. सध्याची आश्रमाची इमारत व्हीजेटीआयचे पहिले प्राचार्य जोशी यांनी बांधून दिलेली आहे, हे विशेष.

 

- अनिल पालये

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@