काँग्रेसचा नाठाळपणा : सावरकरांची 'वीर' पदवी पाठ्यपुस्तकातून हटवली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2019
Total Views |


 


जयपूर : राजस्थानमध्ये काँग्रेसला सत्ता स्थापन करून अवघे ६ महिनेही झाले नसताना नव्या वादाला आमंत्रण दिले आहे. राजस्थानमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या अशोक गहलोत यांच्या सरकारने बारावीच्या पाठपुस्तकातुन सावरकरांच्या नावापुढील 'वीर' पदवी हटवली आहे. त्यांनी पाठ्यपुस्तकांमध्ये काही आक्षेपार्ह्य बदल केले आहेत. यामध्ये ऐतिहासिक घटना आणि व्यक्तींसंदर्भातील तपशीलाचा समावेश आहे. भाजपची सत्ता असताना पाठ्यपुस्तकात जाणीवपूर्वक काही बदल करण्यात आले होते. या सुधारणा रद्द करण्यासाठी काँग्रेसकडून हा निर्णय घेण्यात आला.

 

पाठ्यपुस्तकांमधील बदलांसंदर्भात एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने १३ फेब्रुवारीपासून दिलेल्या सूचनांच्या आधारे हे बदल करण्यात आले आहेत. आधी असलेल्या पुस्तकांमध्ये काय काय बदल केले गेले पाहिजेत हे या समितीने सुचवले आहे. बारावीच्या या पाठ्यपुस्तकामध्ये स्वातंत्र्यलढ्याची माहिती असलेल्या धड्यामध्ये सावरकरांच्या नावामागील 'वीर' ही उपाधी हटवण्यात आली आहे. राजस्थान मधील काँग्रेस सरकारच्या या निर्णयाचा विरोध करून भाजपा आमदार वासुदेव देवनानी यांनी "क्रांतिवीरांचा अपमान हीच काँग्रेसची ओळख आहे" अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 

जाणून घ्या काय आहेत बदल?

 

- स्वातंत्र्य चळवळीतले नेते या मजकुरात विनायक दामोदर सावरकर असे छापण्यात आले आहे. त्यांच्या नावपुढची वीर ही उपाधी हटवण्यात आली आहे.

 

- या पुस्तकामध्ये सावरकर हे हिंदू नेते असून त्यांनी भारताला हिंदूंचे राष्ट्र म्हणून ओळख द्यायचे काम केले असे म्हंटले आहे. तसेच, इंग्रजांच्या कैदीत असताना त्यांनी तब्बल चार वेळा दयेची याचिका केली होती, १९४२मध्ये भारत छोडो चळवळीला तर स्वातंत्र्य वेळी पाकिस्तानच्या निर्मितीला विरोध केला असे मांडण्यात आले आहे.

 

- १४ नोव्हेंबर १९११ रोजी ब्रिटीश सरकारला पाठवलेल्या विनंती पत्रात सावरकर यांनी स्वत:ला 'सन ऑफ पोर्तुगाल' म्हणवून घेतले होते, असे छापण्यात आले आहे.

 

- महात्मा गांधीजी यांची हत्या करण्यासाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला मदत केली होती. मात्र, या आरोपांमधून त्यांची निर्दोष मुक्तता झाली, असा उल्लेख या धड्यामध्ये आहे.

 

वीर सावरकरांना कशी मिळाली 'वीर' ही पदवी

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'स्वातंत्र्यवीर' किंवा 'वीर' ही पदवी जनतेने दिली होती. ह्याचा पहिला उल्लेख सापडतो तो १९२४ ला. सावरकरांची कारावासातून राजकारणात भाग घेण्यास व रत्नागिरीबाहेर जाण्यास बंदी ह्या अटींवर सशर्त मुक्तता झाली. त्यानंतर नासिकला झालेल्या शिवजंयतीचे वेळी १९२४ ला वीर वामनराव जोशी ह्यांनी सावरकरांचा `स्वातंत्र्यवीर' म्हणून गौरव केला होता. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या भाषणाच्या प्रतिवृत्तांतात सुद्धा निदान तीनचार वेळा तरी सावरकरांचा `स्वातंत्र्यवीर' म्हणून गौरव केलेला आढळतो. कवी वैशंपायन यांनी त्यावेळी रचलेल्या कवितेतही 'स्वातंत्र्यवीर' असाच गौरव केलेला आहे. तसेच `स्वातंत्र्य' च्या दिनांक ४-९-१९२४ च्या अंकात चिटणीस प्रभाकर फलज्योतिष संशोधन कार्यालय यांचा `स्वातंत्र्यवीर सावरकर कुंडली विचार' हा लेख प्रसिद्ध झाला होता. ह्यातही सावरकरांना `स्वातंत्र्यवीर' म्हटले होते.

 

आचार्य अत्रे यांनी १९३५-३६ मध्ये `स्वातंत्र्यवीर' असा गौरव केला होता. १९३७ ला संपूर्ण मुक्तता झाल्यावर सावरकर रत्नागिरी सोडून मुंबईला रहावयास जायच्या आधी रत्नागिरीकरांनी एक सभा घेऊन 'सावरकर सत्कार मंडळ' स्थापन केले. या सत्कार मंडळाचे कार्यवाह सर्वश्री रा. आं. मिशाळ, म. गं. शिंदे आणि वि. भि. पटवर्धन होते. दिनांक १२ जून १९३७ ला रत्नागिरीने वीर सावरकरांना प्रेमाने मानपत्र अर्पण केले. ह्या सभेच्या प्रारंभी रमात्मज (श्री. अ. स. भिडे गुरुजी) लिखित 'राष्ट्रधर्मभाषा धनुतीक्ष्ण-सायका! वंदन स्वातंत्र्यवीर त्या विनायका' हे पद मुलांनी म्हटले. येथेही सावरकरांचा `स्वातंत्र्यवीर' असा गौरव केलेला दिसून येतो. जशी ‘लोकमान्य’ ही पदवी जनतेने टिळकांना दिली होती तशीच ‘वीर’ किंवा `स्वातंत्र्यवीर' ही पदवी जनतेने सावरकरांना दिली होती.

 

(संदर्भ : शां. शि. तथा बाळाराव सावरकर लिखित 'हिंदुसमाज संरक्षक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर- रत्नागिरी पर्व', वीर सावरकर प्रकाशन, १९७२)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@