राष्ट्रवादीची 'भाकरी आणि पीठ'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2019
Total Views |


 


 'भाकरी' तर बदलावीच लागेल, किंबहुना 'पीठ'ही बदलावे लागेल, असे बिनधास्त मत पवारांच्या धाकल्या पातीने फेसबुकच्या माध्यमातून मांडले आणि तेव्हापासून पक्षात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. पक्षातील या कुजबुजीमुळे राष्ट्रवादीतील 'जाणती' मंडळी सध्या कमालीची अस्वस्थ झाल्याचे समजते. शरद पवार, तारिक अन्वर आणि दिवंगत पूर्णो संगमा या तीन काँग्रेसी नेत्यांनी दोन दशकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस या 'काँग्रेसी' म्हटले जाऊ शकेल अशा पक्षाची स्थापना केली. अन्वर, संगमा हे नेते संस्थापक असल्याचे दाखवले जात असले तरी ही खर्‍या अर्थाने 'पवार काँग्रेस'च होती. आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दहा वर्षांपूर्वी 'वायएसआर काँग्रेस' या नावाचा पक्ष स्थापन केला. पण, त्या पक्षाचे नाव थेट आपल्या वडिलांच्या नावावरून (वायएसआर) ठेवले. पण, 'ताकाला जाऊन भांडे लपवणे' ही म्हण पवारांच्या स्वभावावरूनच पडली की काय, असे वाटावे अशी परिस्थिती असल्याने पवार-तारिक- संगमा (अमर-अकबर-अँथोनी) यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्याचे दाखविण्यात आले. या त्रिकुटाच्या नावांमुळे पवारांचा आवडता 'सर्वधर्मसमभाव'ही जपला गेला. अशा या 'राष्ट्रवादी'चा जन्म झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच या पक्षाला राज्याची सत्ता भागीदारीत का होईना मिळाली. त्यानंतर सलग पंधरा वर्षे या तथाकथित राष्ट्रवादी नेत्यांनी राज्याची सत्ता अक्षरशः उपभोगली. २०१४ साली भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता आल्यानंतर हा पक्ष पाहिल्यांदाच सलग पाच वर्षे सत्तेच्या बाहेर राहिला. सुरुवातीला तर या राष्ट्रवाद्यांनी भाजप सरकारला न मागता पाठिंबा देऊन नेहमीप्रमाणे संधीसाधू राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर भाजप- शिवसेना एकत्र आल्याने राष्ट्रवादीला हात चोळत बसावे लागले. 'मोठे साहेब' सत्तेच्या बाहेर राहूच शकत नाहीत, ते नक्कीच काहीतरी करतील आणि आपल्याला सत्तेच्या जवळ जाता येईल, हा दृढ विश्वास राष्ट्रवादीच्या नेते, कार्यकर्त्यांना होता. पण, काळाच्या ओघात तो विश्वास नष्ट होऊन सगळेच जमिनीवर आले.

 

नवे-जुने...

 

१९९९ साली राष्ट्रवादीची आघाडीच्या रूपाने सत्ता आल्यानंतर अजित पवार, जयंत पाटील, आर. आर. पाटील, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ यांच्यासारख्या त्यावेळी तरुण असलेल्या मंडळींनी कॅबिनेट मंत्री म्हणून रुजू होत राज्याचा कारभार हातात घेतला. त्यामुळे आपसूकच राष्ट्रवादीची प्रतिमा 'युवकांचा पक्ष' अशी झाली. (त्यानंतर यथावकाश सुप्रियाताईंच्या पुढाकाराने 'युवती राष्ट्रवादी काँग्रेस'ची विंगही स्थापली गेली, तो भाग वेगळा.) राष्ट्रवादीला सलगपणे सत्ता मिळाल्यावर त्या पक्षात एकप्रकारचे साचलेपण आले, जे 'युवा' म्हणून पक्षाच्या पुढच्या फळीत गेले ते नेहमी पुढेच राहिले. कालांतराने ते 'युवा' न राहता 'ज्येष्ठ' झाले. मात्र, तरीही त्यांनी आपली पदे आणि संस्थाने पक्षातील नवीन लोकांच्या हाती जाऊ दिली नाहीत. यामुळे या पक्षात काही कालावधीनंतर अपवादानेच युवा नेतृत्वाला संधी मिळाली. नाही म्हणायला अगाथा संगमा (पी. ए. संगमा यांची लेक) सारख्या युवतीला केंद्रीय राज्यमंत्रिपद देण्यात येऊन पवारांनी युवाईला योग्य संदेश देण्याचा प्रयत्न केला. पण, व्हायचा तो परिणाम झालाच आणि या पक्षाचा 'तरुणांचा पक्ष' अशी असलेली प्रतिमा पुसली गेली. आता पार्थ आणि रोहित यांच्या रूपाने पवारांची तिसरी पिढी राजकारणात प्रवेश करत असताना पक्षाच्या आधीच्या युवा प्रतिमेची आठवण पक्षाला झाली. त्यानंतर पक्षाला पुन्हा युवा चेहरा देऊन राष्ट्रवादीची 'पॉवर' वाढविण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले आहेत. आधीच पाच वर्षांच्या विजनवासामुळेच पक्ष फुटत असताना व नेत्यांचा संयम सुटत असताना पक्षात काहीतरी केले जातेय, हेही दाखविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षातर्फे जास्तीत जास्त युवक-युवतींना संधी देण्याचे नियोजन केले जात आहे. पण, हे करताना ज्येष्ठांना हळुवारपणे बाजूला सरकवावे लागेल. हे नाजूक काम असून येथे काही गडबड झाल्यास या बाजूला होणार्‍या ज्येष्ठांची नाराजी पक्षाला अजूनच त्रासदायक ठरू शकते, याची पूर्ण जाणीव मोठ्या पवारांना आहे. त्यामुळेच त्यांनी हे काम रोहित पवारांना दिले असावे. त्याचीच परिणती म्हणून आता 'भाकरी' आणि 'पीठ' बदलायची भाषा जाणीवपूर्वक चर्चेत आणली गेली आहे.

 - शाम देऊलकर
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@