भारत विकासाचे 'स्क्रॅमजेट' झेपावले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2019
Total Views |



'स्क्रॅमजेट'च्या यशस्वी परीक्षणाने भारतीय शास्त्रज्ञांचे मनोबलही वाढले असून विज्ञान-तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन तसेच संरक्षण क्षेत्रात भारत पुढेपुढेच झेप घेत असल्याचे यातून स्पष्ट होते.

 

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना' अर्थात 'डीआरडीओ'ने बुधवारी भविष्यात कित्येक मोहिमा साकार करण्याची क्षमता असलेल्या महत्त्वपूर्ण अशा 'हायपरसोनिक टेक्नॉलॉजिकल डिमॉन्स्ट्रेटर मिसाईल व्हेईकल' (एचएसटीडीव्ही) म्हणजेच मानवरहित 'स्क्रॅमजेट' विमानाचे यशस्वी परीक्षण केले. 'डीआरडीओ'च्या या यशामुळे असे तंत्रज्ञान असलेल्या निवडक देशांच्या-अमेरिकेच्या पंगतीत भारताचा समावेश झाला आहे. केवळ २० सेकंदात ३२.५ किलोमीटरची उंची गाठण्याची 'स्क्रॅमजेट'ची क्षमता असून 'मॅक ६' इतका प्रचंड वेग ते पकडू शकते. हायपरसोनिक आणि लांब पल्ल्याच्या क्रूझ मिसाईलसाठी यान म्हणून वापर करण्याव्यतिरिक्त नागरी सेवांसाठी तसेच कमी खर्चात उपग्रहांच्या प्रक्षेपणातही एचएसटीडीव्हीचा-'स्क्रॅमजेट' विमानाचा वापर करता येऊ शकतो. आवाजापेक्षा अधिक वेगाने मारा करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित करण्यासाठी भारताने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून त्यात मानवरहित 'स्क्रॅमजेट' विमान महत्त्वपूर्ण घटक ठरणार आहे. 'अग्नी' क्षेपणास्त्रविषयक कार्यक्रमाचादेखील हा एक भाग आहे. सोबतच स्वदेशी तंत्रज्ञानाने निर्मित 'स्क्रॅमजेट'च्या यशस्वी परीक्षणाने भारतीय शास्त्रज्ञांचे मनोबलही वाढले असून विज्ञान-तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन तसेच संरक्षण क्षेत्रात भारत पुढेपुढेच झेप घेत असल्याचे यातून स्पष्ट होते. शिवाय 'इस्रो'ने नुकतीच 'चांद्रयान-२' मोहिमेची घोषणा करत १५ जुलैला भारतीय अवकाशयान चंद्राकडे झेपावेल, असे म्हटले होते. अशावेळी 'डीआरडीओ'नेही 'स्क्रॅमजेट'चे यशस्वी परीक्षण करत भारतीयांना आनंदवार्ता दिल्याचे दिसते.

 

सध्याच्या घडीला देश विज्ञान-तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनात वेगाने घोडदौड करत असल्याचे चित्र पाहायला मिळत असले तरी, हे सहजासहजी झालेले नाही. विक्रम साराभाई, डॉ. होमी भाभा यांसारख्या शास्त्रज्ञांचे यात मोलाचे योगदान आहे. तसेच अमेरिकेचाही यात एका वेगळ्या अंगाने वाटा असल्याचे म्हणावे लागेल. भारताने अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली अणुचाचणी करत आपण अण्वस्त्रसज्ज झाल्याचे दाखवून दिले होते. परंतु, भारताच्या या निर्णयाने महासत्ता अमेरिकेचे पित्त खवळले. अमेरिकेला कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा कोणतीही खबर लागू न देता भारताने ही चाचणी केली होती. हे अमेरिकेला आव्हान असल्याचे समजून त्या देशाने भारतावर तंत्रज्ञान, आर्थिक, व्यापारविषयक व इतरही अनेक बंधने लादली. भारताची सर्वच बाजूंनी कोंडी करण्यासाठी अमेरिकेने अनेकानेक उचापत्या केल्या, जगाची पोलीसगिरी आपणच करणार, आपल्या शब्दापुढे कोणी जाऊ नये, आपल्यापेक्षा कोणी मोठे होऊ नये आणि आपल्या आर्थिक, सामरिक हितसंबंधांना बाधा येऊ नये, अशी कारणेही त्यामागे होती. परंतु, अमेरिकेने घातलेल्या बंधनांपुढे न झुकता, न डगमगता भारताने आपली प्रगती स्वतःच करण्याचे निश्चित केले. अमेरिका आणि अन्यही कोणता देश भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञान द्यायचे टाळत असताना भारताने देशातच नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचे ठरवले. काळ कठीण असला तरी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर मोठमोठी, आव्हानात्मक कामेही पूर्ण होतात, असे म्हटले जाते, याचाच प्रत्यय त्यानंतरच्या काळात भारतीयांना येत गेला. स्वतःचा विकास दुसर्‍या कोणावर विसंबून नव्हे, तर आपल्याच कर्तृत्वाने होऊ शकतो-होतो, हे भारतीय शास्त्रज्ञांनी यावेळी दाखवून दिले. अर्थातच त्याला देशाच्या राजकीय नेतृत्वाचीही खमकी साथ मिळाली.

 

परिणामी, स्वदेशातच भारतीय शास्त्रज्ञांकडून क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, युद्धनौका, उपग्रह आणि उपग्रह प्रक्षेपकांची निर्मिती करण्यात आली. आता तर आंतरखंडीय 'अग्नी' आकाश क्षेपणास्त्रे, 'तेजस' लढाऊ विमानांची निर्यात करण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच तत्कालीन संरणक्षमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंबंधीचे सुतोवाच केले होते. इतकेच नव्हे, तर 'इस्रो'नेदेखील प्रचंड मेहनतीच्या जोरावर कमी खर्चात अत्यंत उत्कृष्ट असे उपग्रह प्रक्षेपणाचे तंत्र शोधून काढले. 'इस्रो'च्या या कामगिरीमुळे उपग्रह प्रक्षेपणाच्या बाजारातही भारताचे नाव घेतले जाऊ लागले. आजपर्यंत भारताने इंग्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान आदी अनेक देशांव्यतिरिक्त अमेरिकेच्याच उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याचाही कारनामा करून दाखवला. म्हणजेच ज्या देशाने कधीकाळी भारताला नवे तंत्रज्ञान मिळू नये, यासाठी पावले उचलली, त्याच देशावर भारताचे तंत्रज्ञान वापरण्याची वेळ आली, ही मोठी घटना होती. आताही स्वदेशात विकसित केलेले 'स्क्रॅमजेट' विमान भारतासाठी महत्त्वाचे आहे. कारण, यातून केवळ क्षेपणास्त्रेच प्रक्षेपित करता येणार नाही, तर त्याचा उपयोग नागरी सेवांसाठी आणि उपग्रह प्रक्षेपणासाठीही होणार आहे. अर्थातच, हे सर्वच सध्या येत असलेल्या खर्चापेक्षाही कमी खर्चात होईल. यातून देशाचा पैसा तर वाचेलच, पण जागतिक बाजारपेठेलाही आकृष्ट करता येईल. कारण, प्रत्येक देशाला नवीन तंत्रज्ञान हवे असते, पण ते प्रत्येकालाच परवडेल असे नाही. बड्या राष्ट्रांनी विकसित केलेले तंत्रज्ञान हे बहुतेकदा प्रचंड महागडे असते, जे छोट्या देशांना विकत घेणे अशक्यच. पण, भारताने उपग्रह प्रक्षेपणाच्या बाजारात जसे स्थान मिळवले तसेच 'स्क्रॅमजेट'च्या साहाय्यानेही मिळवता येऊ शकते. ज्याचा भारताला आणि जगालाही नक्कीच फायदा होईल.

 

इथे आणखी एक मुद्दा विचारात घ्यायला हवा, तो म्हणजे नरेंद्र मोदी! २०१४च्या आधी, पुढे मोदी सत्तेवर आल्यानंतर आणि आताही भाजप व रा. स्व. संघाच्या विचारसरणीमुळे देश मागे जाईल, अशा वावड्या स्वयंघोषित बुद्धीजीवी, विचारवंतांकडून उडवल्या गेल्या. पंतप्रधानांचे वा एखाद्या मंत्र्याचे, खासदाराचे, आमदाराचे, नेत्याचे एखादे विधान घ्यायचे आणि पुढचा-मागचा संदर्भ न पाहता त्याविरोधात कालवा करायचा, असे धोरण या लोकांनी अवलंबले. पण, मोदींच्या सत्ताकाळात देश मागे वगैरे गेल्याचे वा काळाची चक्रे उलटी वगैरे फिरल्याचेही कधी निदर्शनास आले नाही, तर भारताने विज्ञान-तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन आणि संरक्षण क्षेत्रातही अधिकाधिक प्रगती केल्याचेच दिसते. म्हणजेच ज्यांना मोदीद्वेषाने ग्रासलेले होते, ज्यांच्या मनात राष्ट्रवादी-हिंदुत्ववादी विचारसरणीबद्दल द्वेष दाटलेला होता, त्या लोकांनी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीच हा गदारोळ माजवल्याचे स्पष्ट होते. मार्च महिन्यात भारताने केलेली उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी विद्यमान सरकार विज्ञान-तंत्रज्ञानाबद्दल किती संवेदनशील आहे, हे दाखवणारी होती.

 

हीच चाचणी कथित पुरोगामी-प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारे असे ज्यांना समजले जाते, त्या काँग्रेस सरकारने रोखून धरली होती. पण, तेव्हा कोण्या बुद्धीमान शहाण्याने त्याचा विरोध केला नाही वा हा देशाला मागे नेण्याचा निर्णय असल्याचे म्हटले नव्हते. मोदींनी हा प्रगतिशील निर्णय घेतल्यावर मात्र हा निवडणूक जिंकण्यासाठीचा डाव आहे, असे म्हणण्यापर्यंतही काहींनी मजल मारली होती. दुसरीकडे आजच इस्रोप्रमुख के. सिवन यांनी भविष्यात अवकाशात स्वतःचे अंतराळ स्थानक निर्मितीचे नियोजन असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे 'चांद्रयान-२' संबंधी माहिती देत असताना त्यांनी ही घोषणा केली. तत्पूर्वी इस्रोचे माजी प्रमुख जी. माधवन नायर यांनी 'चांद्रयान-२' याआधीच अवकाशात झेपावले असते, मात्र काँग्रेसने तसे होऊ दिले नाही, निवडणुकांतील लाभासाठी काँग्रेस सरकारने आधी मंगळयान मोहीम राबवली, असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. या एकूणच घटना पाहता देशातील नरेंद्र मोदींचे सरकारच विज्ञान व तंत्रज्ञानात देशाला पुढे घेऊन कटिबद्ध असल्याची खात्री पटते आणि आगामी काळात या क्षेत्रात भारत प्रगतीची नवनवी शिखरे पादाक्रांत करण्यासाठी झेपावेल, असा विश्वासही वाटतो.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@