रक्षक वन्यजीवांचा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2019
Total Views |
 


अगदी बालवयापासून वन्यजीव बचावाच्या ध्येयाने झपाटलेल्या ठाणे शहराच्या मानद वन्यजीवरक्षक पवन शर्माची ही कहाणी...


मुंबई (अक्षय मांडवकर) : न्यजीव संवर्धनापेक्षाही वन्यजीव रक्षण आणि बचावाचे कार्य करण्यासाठी हिंमतीची गरज लागते. जीवावर उदार होऊन त्यामध्ये झोकून देण्याची गरज असते. अशाच वन्यजीव बचावाच्या ध्येयाने झपाटलेला ठाणे शहराचा मानद वन्यजीवरक्षक पवन शर्मा.... पवनने वयाच्या तेराव्या वर्षी विषारी असणार्‍या घोणस सापाला वाचविले (रेस्क्यू) होते. वन्यजीवांच्या ओढीने बालवयात त्याच्या हातून घडलेली ती केवळ एक 'चूक' होती. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नव्हती की, आपण पुढे भविष्यात वन्यजीव बचाव क्षेत्रात कार्य करू. आज हा मुलगा मुंबईतील सर्वात सक्षम आणि पारदर्शकपणे काम करणार्‍या वन्यजीव बचाव संस्थेचा प्रमुख आहे. वन विभागाच्या मदतीने तो आज अगदी बिबट्यांपासून तस्करीत सापडलेल्या खवले मांजरांना जीवदान देण्याचे काम करतो. गेल्या नऊ वर्षांमध्ये नियमांच्या चौकटीत राहून त्याने स्वयंसेवक, वन विभाग आणि स्थानिकांच्या सहकार्याने दहा हजारांपेक्षा अधिक वन्यप्राण्यांना वाचविण्याचे काम केले आहे. त्याच्या या प्रामाणिक कामामुळे आज तो ठाणे शहराचा 'मानद वन्यजीव रक्षक' म्हणून कार्यरत आहे.

 

 
 

वन्यप्राणी बचावाप्रति जिव्हाळा आणि भूतदया असणार्‍या सत्यप्रकाश शर्मा यांच्या कुटुंबात १० जुलै, १९९२ रोजी पवनचा जन्म झाला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला खेटून असलेल्या मुलुंडच्या एल. बी. एस मार्गावरील एका गृहनिर्माण संस्थेत त्याचे बालपण गेले. त्यामुळे राष्ट्रीय उद्यानाच्या हरित क्षेत्रातून येणार्‍या वन्यजीवांचा त्याच्या राहत्या सोसायटीच्या आवारात वरचेवर वावर असे. घरातदेखील प्राण्यांप्रति आपुलकीची भावना होती. जखमी झालेले जीव घरी आणणे, त्यांच्यावर उपचार करणे आणि प्रकृतीत सुधारणा झाल्यावर पुन्हा निसर्गात मुक्त करण्याचे काम त्याचे वडील करत होते. त्यामुळे वन्यप्राणी रक्षणाचे, त्यांच्या बचावाचे बीज पवनच्या मनात रुजू लागले. वयाच्या तेराव्या वर्षी घडलेल्या एका घटनेने पवनचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले आणि भविष्यात वन्यजीव रक्षणासाठी कार्य करण्याची ऊर्जा दिली. सोसायटीच्या आवारातील एका मांजरांच्या पिल्लाची घोणस या विषारी सापाने शिकार केली होती. साप दिसल्यावर इमारतीचे सुरक्षारक्षक त्याला मारून टाकत होते. मात्र, यावेळी पवनने सुरक्षारक्षकांना सापाचे महत्त्व समजावून त्या सापाला पकडले आणि त्याला दूर नेऊन सोडले. या घटनेमुळे पवनचा वन्यजीव बचावामधील रस वाढत गेला. मात्र, एवढ्या लहान वयात विषारी सापला वाचविल्यामुळे त्याच्या घरच्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, भविष्यात आपण वन्यजीव बचावामध्येच कार्यरत राहण्याचा निश्चय पवनच्या मनात दृढ झाला.

 

 

 

वयाच्या अठराव्या वर्षाची पायरी ओलांडल्यावर त्याने 'रेस्किंक असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेलफेअर' (रॉ) या प्राणिप्रेमी संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे उद्दिष्ट होते, संकटांत सापडलेल्या प्राण्यांना वाचविणे. संस्थेच्या सुरुवातीच्या काळात एका बचावकार्यादरम्यान मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडल्याची आठवण पवन सांगतो. पवईतील विहार तलावाच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाण्याच्या टाकीत पडलेल्या नागाला वाचविण्यासाठी पवनला पाचारण करण्यात आले होते. टाकीत उतरून नागाला पकडल्यावर अनावधाने त्याचा पाय निसटला आणि तो खोल टाकीत जाऊन पडला. दैव बलवत्तर म्हणून तेवढ्यात जलशुद्धीकरण यंत्रणा सुरू झाली आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पाण्याच्या मोठ्या बुडबुड्यांमुळे तो वरच्या दिशेने फेकला गेला. मात्र, या घटनेमुळे आपण बरचे काही शिकल्याचे पवन सांगतो. अशा घटनेमुळे सुरुवातीला जागेची पाहणी करूनच नंतर बचावकार्याला सुरुवात करण्याची समज मिळल्याचे त्याने सांगितले.
 
 

 
 
 
 चुकांमधून धडे घेत पवन वन्यजीव बचावाचे काम शिकला. सुरुवातीला सापांचा बचाव केल्यानंतर लोकं पवन आणि त्याच्या स्वयंसेवकांकडे संशयाच्या नजरेने पाहत होते. ही मुले सापांचे विष विकत असणार, त्यांची तस्करी करत असल्याचा संशय लोकांमध्ये निर्माण झाला होता. मात्र, पवनच्या प्रामाणिक कामामुळे हा संशय हळूहळू दूर झाला आणि लोकांचा 'रॉ'वर विश्वास बसला. गेल्या नऊ वर्षांमध्ये पवन आणि त्याच्या सहकार्यांनी मिळून दहा हजारांपेक्षा अधिक वन्यजीवांना वाचवून त्यांना जीवदान दिले आहे. यामध्ये खासकरुन बिबट्या, मगर, अजगर आणि खवले मांजर या प्राण्यांचा समावेश आहे. मुंबईमध्ये घडणार्‍या मानव-बिबट्या संघर्षाच्या घटनांमध्ये वन विभागाच्या मदतीकरिता पवन आणि त्याचे सहकारी हिरीरीने सहभागी होतात.
 

नियोजनबद्ध आणि महत्त्वाचे म्हणजे, नियमांच्या चौकटीत राहून वन्यजीव बचावाचे काम करण्यासाठी त्याची संस्था ओळखली जाते. वन विभागाशी प्रामाणिक राहून त्यांच्यासोबत काम करण्याचे कौशल्य पवनने आपल्या अंगी बाणवले आहे. त्याच्या सकारात्मक आणि प्रामाणिक कामामुळे वन विभागाने त्याला ठाणे शहाराच्या 'मानद वन्यजीव रक्षक'पदी बसविले आहे. सुरुवातीला केवळ आठजणांच्या बळावर उभ्या राहिलेल्या पवनच्या 'रॉ' संस्थेचा कार्यविस्तार वाढला आहे. आता या संस्थेत १०० स्वयंसेवक कार्यरत आहेत. गेल्या वर्षी केरळमध्ये आलेल्या महाभयंकर पुरावेळी संकटात सापडलेल्या प्राण्यांच्या मदतीकरिता खाद्य आणि औषधांचा पुरवठा 'रॉ' संस्थेने केला होता. सध्या या संस्थेचा कार्यविस्तार वाढतो आहे. पवनच्या या कार्याला दै.'मुंबई तरुण भारत' कडून शुभेच्छा... !


वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@