परस्पर विश्वासाचे प्रतीक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2019
Total Views |


भारत-श्रीलंका संबंध हे काही आजचे नाहीत, तर त्याला हजारो वर्षांपासूनचा, रामायण काळाचा, बौद्धकाळाचाही इतिहास, वारसा आहे. तसाच तो संबंध माजी पंतप्रधान राजीव गांधी, ‘लिट्टे’ आणि तामिळ बंडखोर असाही आहे. मोदींच्या श्रीलंका दौर्‍याकडे या कोनातूनही पाहायला हवे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसर्यांदा सत्तेवर विराजमान होताच आपल्या पहिल्या परदेश दौर्‍यांतर्गत प्रथम मालदीवला आणि नंतर श्रीलंकेला भेट दिली. नरेंद्र मोदींची श्रीलंका भेट तिथे एप्रिल महिन्यात इस्टरच्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची होती. दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेत पोहोचलेले पहिले विदेशी नेते म्हणून भारतासारख्या देशाच्या पंतप्रधानाचा दौरा श्रीलंकन सरकार, सुरक्षाविषयक संस्था, नागरिक आणि तिथे राहणार्‍या भारतीयांत एकतेची, आत्मविश्वासाची भावना जागवणारा ठरला. कारण, जिहादी धर्मांधांनी लागोपाठ घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांमुळे तो देश हादरला होता आणि तिथे भितीची छाया होती. हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या भितीच्या वातावरणाचा श्रीलंकेतील पर्यटनावर होत असलेला विपरित परिणामही दिसून येत होता.

 

पर्यटन हा श्रीलंकन अर्थव्यवस्थेचा कणा असून तोच जर दुबळा झाला तर त्याचा फटका तिथल्या सर्वांनाच बसणार, हे साहजिकच. मात्र, मोदींनी दिलेल्या भेटीमुळे तो देश सुरक्षित असून तिथे अन्य देशांतील लोकही ये-जा करू शकतात आणि भारतही श्रीलंकेच्या साहाय्यासाठी तत्पर आहे, हा संदेश दिला गेला. शिवाय श्रीलंकेतील पर्यटन व्यवसाय यामुळे पुन्हा एकदा भरभराटीला येऊन त्याचा तिथल्या अर्थव्यवस्थेलाही लाभ होणार, हे निश्चितच. परंतु, इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांबद्दलचा इशारा भारताने आधीच दिलेला होता. मात्र, तिथल्या अंतर्गत राजकारणामुळे भारताने पाठविलेल्या संदेशावर योग्य ती कार्यवाही झाली नाही. तसेच असेही म्हटले जाते की, श्रीलंका आणि चीनमधील संबंधांमुळे भारताने तिथे गोंधळ निर्माण करण्यासाठी असा इशारा दिल्याचा गैरसमज श्रीलंकेला झाला व त्या देशाने भारतीय सूचनेकडे दुर्लक्ष केले. पण, नंतर मात्र तसा हल्ला झाला. त्यानंतर मोदींनी मृतांप्रति संवेदना व्यक्त करत हल्ल्याचा निषेध केला आणि पुढे थेट श्रीलंकेत पाऊलही ठेवले. मोदींच्या या दौर्‍याने श्रीलंकेच्या मनात भारताप्रति विश्वासाची भावना दृढ करण्याचे काम केले. तसेच आगामी काळात भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावून येईल, याची ग्वाही देणाराही ठरला. दुसरीकडे भारत-श्रीलंका संबंध हे काही आजचे नाहीत, तर त्याला हजारो वर्षांपासूनचा, रामायण काळाचा, बौद्धकाळाचाही इतिहास, वारसा आहे. तसाच तो संबंध माजी पंतप्रधान राजीव गांधी, ‘लिट्टे’ आणि तामिळ बंडखोर असाही आहे. मोदींच्या श्रीलंका दौर्‍याकडे या कोनातूनही पाहायला हवे.

 

श्रीलंकेत तामिळ राष्ट्रवादाच्या, स्वायत्ततेच्या नावाखाली ‘लिट्टे’ या दहशतवादी संघटनेने सरकारविरोधात युद्ध छेडले. प्रभाकरनच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेत मोठ्या संघर्षाला सुरुवात झाली व देशाच्या एकता-अखंडतेसमोर आव्हान उभे ठाकले. तामिळ नेत्यांच्या दबावामुळे तत्कालीन भारतीय नेतृत्वाने म्हणजेच राजीव गांधींनी ‘लिट्टे’ला मदत करण्याचे धोरण स्वीकारले. ‘लिट्टे’च्या दहशतवाद्यांना भारतात प्रशिक्षणही दिले गेले. वस्तुतः ही श्रीलंकेतील अंतर्गत समस्या होती आणि भारताने त्यात हस्तक्षेप करणे गरजेचे नव्हते. मात्र, राजीव गांधींनी ते केले. कदाचित श्रीलंकेसारख्या छोट्या देशाला आपण आपल्या मनाप्रमाणे नियंत्रणात ठेऊ शकतो, आपला प्रभाव पाडू शकतो, अशी भावना राजीव गांधींच्या मनात असावी. परंतु, देश छोटा असो वा मोठा तो स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून असतो आणि ते टिकविण्यासाठी तो काहीही करू शकतो. त्याला आव्हान देणे योग्य नसते. राजीव गांधींनी हीच गोष्ट विसरत ज्या संघटनेने श्रीलंकन सरकारविरोधात लढा पुकारला, तिलाच हाताशी धरण्याचे काम केले, ही श्रीलंकेतल्या अंतर्गत प्रश्नातली ढवळाढवळ होती. पुढे 1987 साली राजीव गांधींनी श्रीलंकेचा दौरा केला. परंतु, याचवेळी कोलंबोत ‘गार्ड ऑफ ऑनर’ देतेवेळी श्रीलंकन नौदलातील एका सैनिकाने राजीव गांधींच्या डोक्यावर बंदुकीच्या दस्त्याने वार केला.

 

भारत व श्रीलंकेतील वादग्रस्त शांतता कराराविरोधातील ही प्रतिक्रिया होती, तसेच राजीव गांधींच्या ‘लिट्टे’बद्दल घेतलेल्या भूमिकविषयीची ही भावना होती. नंतर श्रीलंकेतील हस्तक्षेपाचे किंवा ‘लिट्टे’ने राजीव गांधींकडून जी अपेक्षा केली होती, त्याची पूर्तता न होण्याचे पर्यवसान राजीव गांधींच्या दुर्दैवी हत्येत झाले. उठसूट एखाद्या देशात केवळ त्याच्या छोट्या आणि तुमच्या मोठ्या आकारावरून नाक खुपसणे किती धोकायदायक ठरू शकते, हे सांगणारी ही विदारक घटना होती. नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरण व श्रीलंका दौर्‍याकडे या परिप्रेक्ष्यातून पाहता काही गोष्टी ठळकपणे दिसतात. त्या म्हणजे शेजार्‍यांना प्रथम प्राधान्य देणे, शेजारी देशांच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप न करणे, सर्वांना बरोबर घेऊन चालणे, संकटसमयी मदतीसाठी तत्पर असणे आणि भारताप्रति विश्वासाची भावना जागवणे.

 

चिमुकल्या देशांना आपल्या शेजारच्या प्रचंड आकाराच्या, लोकसंख्येच्या, सामर्थ्याच्या देशाची भीती वा संशय वाटणे साहजिकच. बर्‍याचदा दोन मोठे देश एकमेकांच्या स्पर्धेत छोट्या देशांचा प्याद्यासारखा वापर करून घेतात. पण, नरेंद्र मोदींनी आपल्या सत्ताकाळात असे केल्याचे कुठेही दिसले नाही. भूतान असो वा नेपाळ किंवा बांगलादेश-श्रीलंका अथवा मालदीव, या प्रत्येकाशी मोदींनी सौहार्दाचे, सलोख्याचे संबंध राहतील, असेच पाहिले. ‘आम्ही तुमच्यापेक्षा मोठे असलो तरी तुमच्या सहकार्यानेच एकमेकांचा विकास होणार आहे,’ हा संदेश देण्याचे काम मोदींनी केले. नेपाळमधील मधेशी आंदोलनाला भारताने पाठिंबा दिला नाही किंवा मालदीवमधील आणीबाणीवेळीही भारताने हस्तक्षेप करणे टाळले. श्रीलंकेबाबतही वेगळी परिस्थिती नाही. चीनने ज्याप्रमाणे या देशांत पायाभूत प्रकल्प विकासाच्या वा कर्जाच्या माध्यमातून प्रवेश केला, त्यांना आपल्या वर्चस्वाखाली ठेवण्याचे उद्योग केले, तसे भारताने केले नाही.

 

भारताच्या याच धोरणाने त्या देशांना भारतावर विश्वास ठेवण्याला बाध्य केले. नरेंद्र मोदींनी श्रीलंकेचा दौरा केला, त्यावेळी राष्ट्रपती मैत्रिपाल सिरीसेना यांनी त्यांचे स्वागत केले. अचानक आलेल्या पावसावेळी खुद्द सिरीसेना यांनी मोदींच्या डोक्यावर छत्री धरली. इथे इतिहासातील व वर्तमानातील दोन घटना आहेत, त्यापैकी एक म्हणजे राजीव गांधींच्या श्रीलंका दौर्‍यावेळी डोक्यावर बंदुकीच्या दस्त्याने बसलेला फटका आणि दुसरी म्हणजे नरेंद्र मोदींच्या डोक्यावर थेट राष्ट्रपतींनी धरलेली छत्री. राजीव गांधींच्या दौर्‍यावेळी तिथल्या सैनिकाची भारताच्या पंतप्रधानाबद्दलची भावना तीव्र विरोधाची होती, तर मोदींबद्दलची भावना मात्र हृद्य स्वागताची होती. म्हणूनच नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे फलित काय, असे कोणी विचारल्यास त्याचे उत्तर या प्रसंगातून मिळते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परस्परांतील विश्वास नेमका कोणत्या स्तरावर पोहोचला आहे, हे दाखविणारा हा प्रतिकात्मक प्रसंग होता. तसेच दोन्ही देशांतील संबंध पुढे कोणत्या उंचीवर जातील, हे सांगणारी ही घटना होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@