विविध धर्म प्रणालीतील चिह्नसंकेत : ख्रिश्चन क्रॉस २

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2019   
Total Views |


 


आपल्या लेखमालेच्या 'प्रतीके आणि चिह्न यांचा अभ्यास' या प्राथमिक उद्देशानुसार मागील भागात ख्रिश्चन धर्मातील 'क्रॉस'ची आपण माहिती करुन घेतली. आजही या 'क्रॉस'विषयी अधिक रंजक माहिती जाणून घेऊया.


कुठल्याही धर्मसंकल्पनेतील चिह्नांपैकी सर्वात जास्त चर्चा झालेले, सर्वात जास्त विश्लेषण झालेले, अनेक संकेत देणारे चिह्न म्हणजे ख्रिश्चन धर्मीयांचा परम पवित्र पूजनीय 'क्रॉस' हे चिह्न. प्रतीके आणि चिह्नांच्या भिंगातून पाहायचे म्हटले तर परस्पर विरोधी किंवा विसंगत संकेत देणारे चिह्न असेही म्हणायला हरकत नाही. दोनशे-दीडशे वर्षांपूर्वीच्या विद्वानांनी लिहिलेल्या पुस्तकांतील विस्तृत अभ्यासाने केलेल्या विश्लेषण आणि उल्लेखानुसार, हा पवित्र 'क्रॉस' टोकाच्या समजुती, मनोभावना आणि धारणांचे संकेत देतो. 'क्रॉस'ची उपासना करणाऱ्या श्रद्धाळू दर्शकाची मनःस्थिती आणि मानसिकता अशा संकेतप्राप्तीसाठी महत्त्वाची असते. मात्र, माझे हे विधान फक्त 'क्रॉस'पुरते मर्यादित राहत नाही, तर सर्वच धार्मिक, पंथीय आणि सांप्रदायिक प्रतीके आणि चिह्नांच्या संदर्भात समान असते. अशी किमान १०० पुस्तके सॉफ्ट कॉपी स्वरूपात इंटरनेट अर्काइव्हवर विनामूल्य उपलब्ध आहेत. त्यातली महत्त्वाची काही (1) Christian Iconography - The History of Christian art in Middle ages, by adolphe Napoleon Didron, year1886, (2) Early Christian Symbolism in Great Briton and Ireland, by J. Romilly allen, year 1887, (3) The History, Principles and Practice of Symbolism in Christian art, by F Edward Hulme, year 1892. जीवन-मृत्यू, प्रेम-तिरस्कार, शांतता-हिंसा, क्षमाशीलता-दोषारोप, पुण्य-पाप, अखंड-खंडित, प्राप्ती-सर्वनाश, निर्मिती-विध्वंस असे पराकोटीचा विरोधाभास असलेले संकेत या चिह्नाच्या निव्वळ दर्शनाने निःशब्द संवादासारखे आपल्या मनात निर्माण होतात. हा 'क्रॉस' अनेकांसाठी अनेक संकेत घेऊन येतो. काहींच्या दिवाणखान्यात तो अभिमानाने महत्त्वाच्या जागी ठेवलेला असतो, तर परम श्रद्धेने काहींच्या गळ्यातला दागिना असतो. येशू ख्रिस्ताची शिकवण-उपदेश-प्रेमाचा संदेश असा सकारात्मक संकेत एका बाजूला आणि येशूचा मृत्यू असा नकारात्मक संकेत दुसऱ्या बाजूला, असा हा वरकरणी दिसणारा अर्थसंकेत. 'बायबल'मधील उल्लेखानुसार, छळ करणाऱ्या लोकांवरसुद्धा येशूने प्रेमच केले. विश्वनिर्मितीपासून साक्षात्कारापर्यंत मानवतेला सुळावर टांगून तिचा छळ करणाऱ्या हिंसक आणि पाशवी शक्तींपासून देव आपले रक्षण करत होता. येशू ख्रिस्ताने ते सर्व अत्याचार स्वतः भोगले आणि स्वखुशीने तो मृत्यूला सामोरा गेला. रेने गुनोन यांनी मात्र याच्या पलीकडचा चिह्नाचा व्यापक अर्थ त्याच्या 'The Symbolism of Cross' या १९३१ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात सखोल विश्लेषणाने लिहिला.

 

रेने गुनोन लिहितात की, “फार प्राचीन काळापासून 'क्रॉस'सदृश चिह्नं जगातील अनेक संस्कृतींमध्ये प्रचलित होती. त्यामुळे 'क्रॉस' हे फक्त ख्रिश्चन धर्म संकल्पनेतील चिह्न आहे, अशी कोणाची धारणा झालीच असेल, तर प्रथम ती त्यांनी दूर करायला हवी.” उल्लेख केल्यानुसार, खिश्चन धर्म निर्माण होण्याच्या आधीपासून या प्रतीकाचे अथवा चिह्नाचे अनेक अर्थसंकेत प्रचलित होते आणि आहेत. येशू ख्रिस्ताचे बलिदान हा असाच एक अर्थसंकेत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. किंबहुना, या चिह्नाच्या संदर्भातील प्राचीन काळातील काही निश्चित संकल्पना हे चिह्न येशू ख्रिस्ताच्या जीवनातील अंतिम क्षणाशी जोडले जाण्याचे मूळ कारण आहे. रेने गुनोन यांचे साहित्य तीन सूत्रानुसार वाचणे आवश्यक आहे. पहिले सूत्र म्हणजे त्यातील चिंतन-विचार. उत्क्रांती काळापासून झालेल्या समाजनिर्मितीचे आणि त्यातील व्यक्तिगत आणि सामूहिक मानसिकतेतील गुणदोषांची नोंद करणारा हा इतिहास आहे. याबरोबरच अनेक संस्कृतीतील तत्त्वज्ञान, अध्यात्म यावरील तुलनात्मक विश्लेषण हे दुसरे सूत्र आहे. प्रतीकविद्या या ज्ञानशाखेचा विस्ताराने परिचय करून देतानाच प्रतीकशास्त्र म्हणजेच 'सिम्बॉलोजी'चा मूलभूत परिचय आणि विश्लेषण हे त्या साहित्यातील तिसरे सूत्र आहे. रेने गुनोन याने प्रतीकशास्त्र आणि चिह्नार्थ यावरील केलेले चिंतन आणि भाष्य हे या विषयातील मूलभूत लिखाण म्हणून मान्यताप्राप्त झाले. यासाठी ते 'लॉ ऑफ करस्पॉन्डन्स' या संकल्पनेचा संदर्भ देतात. असा प्राचीन अर्थसंकेत मान्य केला तर या चिह्नाचा 'क्रॉस' या संबोधनाचा शब्दशः अर्थ आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या अनेक संकेतांच्या मागील पारंपरिक भूमिका स्पष्ट होतात.

 

 
 

'लॉ ऑफ करस्पॉन्डन्स' या संकल्पनेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रतीक आणि चिह्नाला असलेले अर्थबाहुल्य किंवा अर्थवैविध्य, एकापेक्षा जास्त संदर्भ देण्याची त्याची क्षमता याचे विश्लेषण करणारी प्रणाली. काही सहस्र वर्षांच्या काळात, प्रचलित समाजातील अनेकविध सांस्कृतिक आणि धर्मसंकल्पनांच्या प्रभावामुळे, त्या समाजाने स्वीकारलेल्या जीवनविषयक तत्त्वज्ञानानुसार या चिह्नांना विशेष संदर्भ आणि अर्थसंकेत प्राप्त झालेले असतात. नागरिकांच्या एका गटासाठी एक अर्थ, दुसऱ्या गटासाठी काही वेगळा अर्थ, अशी कुठल्याही प्रतीक आणि चिह्नाची मांडणी केली जात नाही. अशी प्रतीके आणि चिह्ने कालातीत असतात. असे अर्थवैविध्य असलेल्या प्रतीकांचे वैशिष्ट्य असे की वेगवेगळ्या समाजरचनेत, वेगवेगळ्या काळांत, वेगवेगळ्या घटनांमध्येसुद्धा या सर्व अर्थांची सुसंगत व्यक्तता, त्या अर्थांचे योग्य समर्थन आणि काही सहस्र वर्षांच्या कालावधीनेसुद्धा जाणवलेले त्याचे संकलित अर्थसंकेत. कुठल्याही समाजातील स्वीकृत भाषा आणि त्याची लिपी यापेक्षाही अमर्याद संवाद क्षमता आणि नेमके व समर्पक अर्थ व्यक्त करण्याची क्षमता या प्रतीक-चिह्नात असते. ज्याकाळात बोली भाषा प्रगत झाली होती; मात्र त्यासाठी लिपीची व्यवस्था आणि कुठलेली लिखित साहित्य निर्माण झाले नव्हते, अशा काळात काही अनुभव, काही जाणिवा आणि पारंपरिक ज्ञानसंचय व्यक्त करण्याचे आणि चिरंतन संवादाचे अत्यावश्यक आणि अपरिहार्य साधन म्हणजे अशी प्रतीके आणि चिह्नेच होती. आनंद के. कुमारस्वामी त्यांच्या प्रतीकविद्येच्या विश्लेषणात लिहितात -

 

औद्यागिक प्रगती आणि यंत्रांचा शोध लागण्याच्या आधीच्या म्हणजे सतराव्या शतकाच्या अखेरपर्यंत प्रत्येकाला या प्रतीक-चिह्नांच्या भाषेचा योग्य परिचय होता. त्यानंतरच्या काळात अपल्याला या भाषेचे पूर्ण विस्मरण झाले.”

 

रेने गुनोन हा मुद्दा स्पष्ट करताना पुढे म्हणतात की, “मानवाच्या प्रगतीला पूरक आणि प्रेरक असलेल्या ज्या प्राचीन सिद्धांतापासून प्रेरणा घेऊन ही प्रतीके आणि चिह्ने निर्माण झाली. त्या सर्व सिद्धांतांची सूक्ष्म तत्त्वमीमांसा करणारे, हे चिरकाल टिकणारे, शब्दाविना केलेले निरंतर संवाद आहेत. मात्र, प्रतीकातील आणि चिह्नातील सूक्ष्मार्थ समजून घेण्याची क्षमता आणि त्याची जाणीव एखाद्या कालावधीतील घटना आणि त्याच्या क्रमवारीवर अवलंबून असते.” रेने गुनोन पुढे लिहितात की, “स्वतंत्र विचार करू शकणारा, स्थानिक संस्कृती आणि पारंपरिक तत्त्वज्ञान जाणणारा समाज आणि त्यातील नागरिक अशी प्रतीके आणि चिन्हे त्यांच्या सूक्ष्मार्थ स्वीकारतात. मात्र, दीर्घकाळात संपन्न झालेली समाजाची अभिव्यक्ती आणि त्याचे वैविध्य याची जाणीव नसलेल्या पढत मूर्खांना या प्रतीकातील निःशब्द संवाद ऐकता किंवा वाचता येतातच, असे गृहीत धरू नये.” याचे उदाहरण द्यायचे झाले तर एखादी धर्मसंकल्पना प्रचारकी पद्धतीने अशिक्षित आणि धर्मसंकल्पनेविषयी निरागस असलेल्या लोकांच्या गळी उतरवळी जाते. 'आजपासून तुम्ही आमचा धर्म स्वीकारलात. हे पुस्तक जवळ ठेवा. हे तुमची सर्व दु:ख दूर करेल,' अशा भूलथापांनी कुठल्याही प्रतीकांचा सूक्ष्मार्थ समजत नसतो आणि पोहोचत नसतो. प्रतीकविद्येच्या आणि चिह्नसंस्कृतीच्या माझ्या अभ्यासात माझे गुरू आनंद के. कुमारस्वामी यांच्याबरोबरच रेने गुनोन यांचे साहित्य कायमच मार्गदर्शक ठरले आहे.

 

रेने गुनोन यांच्या साहित्याचा अभ्यासकांनी आणि समीक्षकांनी 'चिरस्थायी आणि चिरकालीन तत्त्वांचा पुरस्कर्ता' (perennialist) आणि 'परंपरावादी तत्त्वज्ञ' (traditionalist) अशा संबोधनाने गौरवले आहे. याचे कारण म्हणजे, रेने गुनोन वाचकाला प्राचीन भारतीय वेदांच्या अभ्यास आणि विश्लेषणातून आपल्या मानवी जीवनाचा, मानवतेचा, मानसिकतेचा आणि मानवी मन आणि बुद्धीच्या अफाट क्षमतेचा परिचय करून देतात. उत्सुक वाचकाला मानवी उत्क्रांतीच्या प्राथमिक पातळीवर घेऊन जाताना त्यातील ठोस तत्त्वमीमांसा पाश्चिमात्य जगातील सुजाण वाचकांपर्यंत प्रथम पोहोचवणारा गुनोन यांचा सर्वात महान आणि प्रसिद्ध ग्रंथ 'magnum opus' म्हणजे ' Man and His Becoming according to the Vedanta.' प्रतीकविद्या-प्रतीकशास्त्र-चिह्नसंस्कृती या विषयातील मूलभूत विश्लेषक लिखाण करण्याचा मान निःसंशयपणे रेने गुनोन यांचाच आहे. फ्रेंच-जर्मन-इंग्लिश भाषिक वाचकांना प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा त्यातील सिम्बॉलॉजीचा परिचय करून देणारे त्यांचे दोन ग्रंथ, पाश्चात्य जगात याचा प्राथमिक पाया रचणारे ठरले आहेत. प्राचीन भारतीय संस्कृतीच्या, तत्त्वज्ञान-बुद्धिमत्ता-विज्ञान अशा तीन खांबांवर रचलेल्या वैदिक संहितेचा परिचय करून देणारा रेने गुनोन यांचा पहिला ग्रंथ 'Introduction to the Study of Hindu Doctrines.' प्रतीकविद्या-प्रतीकशास्त्र-चिह्नसंस्कृती याचे विश्लेषण करणारा 'The Universal Language of Sacred Science.' हा दुसरा ग्रंथ. रेने गुनोन यांचे सर्वच साहित्य भारतीय संस्कृतीला त्यांनी दिलेले सन्मानचिह्न आहे, याचा विस्तारित अभ्यास प्रत्येक अभिमानी भारतीयाने करायलाच हवा. 'स्वस्तिक' आणि 'ख्रिश्चन क्रॉस' यांचे जवळचे नाते आहे, असे माझे विधान वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. ख्रिश्चन धर्म संकल्पनेच्या स्थापनेनंतर पहिली ३०० वर्षे 'स्वस्तिक' हेच या धर्मबांधवांचे मुख्य प्रतीक होते. रोमन साम्राज्यात ख्रिश्चन धर्माचा अधिकृतपणे स्वीकार सहाव्या शतकात केला गेला. त्यानंतर आत्ताचे क्रॉसचे चिह्न 'स्वस्तिक' चिह्नाच्या जागी स्वीकारले गेले आणि त्याचा अधिकृत वापर सुरू झाला. 'स्वस्तिक' आणि 'क्रॉस'च्या या नात्याचे विश्लेषण पुढील लेखांत नक्की वाचा.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@