स्वतःचे झाकलेले पाहा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2019
Total Views |


 


अहमद पटेल यांनी केलेला भाजपवरील आरोप असो वा राजीव गांधींच्या अवमानाचे म्हणणे असो, दोन्ही गोष्टीशी काँग्रेसचा अधिक संबंध आहे. शिवाय ‘मोदींनीच हे केले, मोदींनीच हे उकरून काढले’ असे म्हणणाऱ्यांनी आधी आपण या माणसाविरोधात काय काय ओकले, तेही पाहावे. स्वतःचे झाकून आणि दुसऱ्याचे वाकून पाहिल्याने काहीही साध्य होणार नाही.


‘चौकीदार चोर है’चा आरोप सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी घातल्यापासून राहुल गांधींना माफी मागण्याशिवाय कोणतेही काम उरले नाही. सर्वोच्च न्यायालयात ‘खेद’, ‘दिलगिरी’ शब्दांवरून चलाखी करणाऱ्या राहुल गांधींना सरन्यायाधीशांनी चांगलेच झापल्याने ते स्वतः आणि काँग्रेसी कार्यकर्तेदेखील आता कुठेही ‘चौकीदार चोर है’ ची घोषणा देईनासे झाले. २०१४ साली सत्तासिंहासनावर बसलेल्यांची घसरगुंडी झाल्यापासून काँग्रेसी नेते-कार्यकर्त्यांच्या तोंडावर कायमच बारा वाजल्याचे चित्र दिसत असे. राहुल गांधींनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ‘चौकीदार चोर है’ची घोषणा दिल्याने पडलेल्या चेहऱ्याचे काँग्रेसी आपल्या मरतुकडेपणात ‘जान’ फुंकल्यासारखा इब्लिसपणा करत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांचे दान आपल्या पारड्यात पडून राहुल गांधी पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचे आणि त्यांच्या अवतीभवती ‘खुशमस्करे’ म्हणून आपलीही वर्णी लागल्याचे गल्लीबोळातल्या काँग्रेसी कार्यकर्त्यांपासून कथित विचारवंत, बुद्धीजीवींनाही वाट होते. परंतु, सत्तारोहणाची ही मजेशीर स्वप्ने पाहत असतानाच सर्वोच्च न्यायालयाचा दमदार बडगा राहुल गांधींवर उगारला गेला आणि काँग्रेसी गुलामांनी आपल्या मनोराज्यात रचलेले इमलेही धडाधडा कोसळत गेले.अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी काँग्रेसवर बॉम्बगोळा टाकला आणि तमाम काँग्रेसीजनांची अवस्था सर्वकाही लुटले गेलेल्या सावकारासारखी झाली. राजीव गांधींनी पंतप्रधानपदी असताना ‘आयएनएस विराट’ या युद्धनौकेचा वापर आपल्या परिवारासकट मित्रमंडळींबरोबर ऐशोआरामासाठी, मौजमस्तीसाठी, सुट्ट्या घालवण्यासाठी केल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.

 

१९८७ साली लक्षद्वीपच्या बंगाराम बेटांवर देशसुरक्षेला वाऱ्यावर सोडून आराम फर्मावण्यासाठी गेलेल्या नामदार राजीव गांधींनीआयएनएस विराट’मधून आपल्या परिवारातील सदस्यांसह, इटलीतील नातलग, बच्चन परिवार आणि अन्य मित्रमंडळींनाही नेले. सोबतच ही खबर कोणालाही लागू नये याचीदेखील पुरेपूर काळजी घेतली गेली; पत्रकार-माध्यमांनाही यापासून दूर ठेवण्यात आले. पण म्हणतात ना, कितीही डोळे मिटून दूध प्यायले तरी मलाईवर डल्ला मारणाऱ्या बोक्यांवर-मांजरांवर इतरांची नजर असतेच की! तसेच इथेही झाले आणि काही धडपड्यांनी देशाचे पंतप्रधान एवढा लवाजमा घेऊन नेमके चाललेत तरी कुठे आणि कशाला हे शोधून काढलेच. अर्थात, देशाला आपली स्वतःची जहागिरी समजणाऱ्या काँग्रेसी पंतप्रधानांनी युद्धनौकेचा वापर खासगी सुखोपभोगासाठी केला, तरी त्यांना विरोध करण्याची तेव्हा कोणाची बिशाद होती म्हणा? परिणामी, गेल्या जवळपास ३२ वर्षांपासून कसल्याही चौकशीची मागणी न होता ही घटना पद्धतशीरपणे दाबली गेली. परंतु, नरेंद्र मोदी म्हणजे काही कोणा गांधी-नेहरू घराण्याचे इमानदार चाकर नव्हे, तर ते पडले देशकार्यात आणि देशसेवेत कधीही खंड पडू न देणारे प्रामाणिक पंतप्रधान! म्हणूनच आपल्यावर पातळी सोडून केल्या जाणाऱ्या टीकेला उत्तर देण्यासाठी नरेंद्र मोदींनी गांधी घराण्याचा हा कारनामा ठळकपणे जगासमोर आणला आणि ‘मिस्टर क्लिन’च्या मुखवट्यामागे लपवलेल्या खऱ्या चेहऱ्यावर उजेड पाडला. पण, मोदींनी आपल्या पूजनीय नेत्याचे दडवलेले कृत्य बाहेर काढल्याने काँग्रेसी नेते-कार्यकर्ते मात्र चांगलेच चवताळले आणि त्यांनी ‘उलटा चोर कोतवाल को डाँटे’च्या थाटात मोदींवरच टीकेला सुरुवात केली.

 

दीर्घकाळापासून सोनिया गांधींचे वफादार-अहमद पटेलांनी राजीव गांधींच्या हत्येला भारतीय जनता पक्षच जबाबदार असल्याचे तारे तोडले. “भाजपने समर्थन दिलेल्या पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी राजीव गांधींच्या सुरक्षाव्यवस्थेत कसर सोडल्यानेच बॉम्बस्फोटात ते मारले गेले,” असे अहमद पटेल म्हणाले. परंतु, संसदीय राजकारणात इतकी वर्षे खपवलेल्या माणसाची बुद्धी नेमकी कुठे पेंड खाते, तेही यानिमित्ताने समोर आले. कारण, अहमद पटेल म्हणतात तसे भाजपच्या पाठिंब्याने व्ही. पी. सिंग यांचे सरकार सत्तेवर आले होतेच, पण ते केवळ २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९० या काळातच पंतप्रधानपदी होते. राजीव गांधी या दरम्यान हयातच होते. १० नोव्हेंबर १९९० नंतर काँग्रेसच्या पाठिंब्याने चंद्रशेखर पंतप्रधानपदी आले आणि सहा महिन्यांतच २१ मे १९९१ रोजी राजीव गांधींची हत्या झाली. म्हणजेच राजीव गांधींना पुरेशी सुरक्षाव्यवस्था दिली नव्हती, हा अहमद पटेलांचा आरोप व्ही. पी. सिंग वा भाजपशी नव्हे, तर चंद्रशेखर आणि काँग्रेसशीच जुळत असल्याचे स्पष्ट होते. म्हणूनच अहमदभाईंनी आता भाजपवर खोटे-नाटे आरोप करण्याऐवजी आपल्याच पक्षाच्या पाठिंब्याने पंतप्रधान झालेल्या चंद्रशेखर यांनी राजीव गांधींना पर्याप्त सुरक्षा का दिली नाही, असा प्रश्न विचारायला हवा. दुसरीकडे राजीव गांधी प्रकरणावरून आज भाजपवर खार खाणारे काँग्रेसी, त्यांचे अध्यक्ष आणि अध्यक्षाची बहीण तरी आपल्या पित्याशी किती प्रामाणिक आहेत? राजीव गांधींच्या हत्येची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या जैन आयोगाने तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम-द्रमुक पक्षावर संशय व्यक्त केला होता. त्यानंंतर काँग्रेसने द्रमुकच्या पाठिंब्याने सत्तेवर आलेल्या इंद्रकुमार गुजराल यांचे सरकार पाडले. परंतु, पुढे मात्र काँग्रेसची द्रमुक आणि करुणानिधींबरोबर चांगलीच गट्टी जमली. २००४ ते २०१३ पर्यंतच्या काँग्रेस आघाडी सरकारातही द्रमुक पक्ष सहभागी होता आणि आताही दोन्ही पक्षांनी हातात हात घालून तामिळनाडूतील लोकसभा निवडणूक लढवली. सोबतच राजीव गांधींच्या खुन्यांनाही माफ केल्याचे राहुल-प्रियांका या भावा-बहिणीने सांगितले. म्हणजेच, आपल्या पिताश्रींच्या, नेत्याच्या, पंतप्रधानाच्या दुर्दैवी मृत्यूचे महत्त्व याच लोकांनी कमी केले. पण, खडे कोणाच्या नावाने फोडतात तर भाजपच्या आणि नरेंद्र मोदींच्या!

 

इथूनच ‘सगळ्या काही गोष्टी मोदीच करतात’ची काँग्रेसी आणि विरोधकी रडारड सुरू झाल्याचे स्पष्ट होते. राहुल गांधींपासून शरद पवार, मायावती, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आदी सगळेच भेदरलेले नेते देशातल्या प्रत्येक घटनेला मोदीच जबाबदार असल्याचे म्हणताना दिसतात. खरे म्हणजे आपल्या पक्षांतून एवढे लोक निघून गेले, तेही शरद पवारांसारख्या ‘जाणत्यांना’ कधी कळले नाही. स्वतःचा पक्ष तुटताना झोपून राहायचे आणि कोणी विश्वासू फुटलाच, तर मोदींच्या नावाने खडे फोडायचे, असा हा सगळा खेळ. ‘मतदानावेळी इव्हीएमवरील कोणतेही बटण दाबा, मत मात्र कमळालाच जाते, नरेंद्र मोदींनीच इव्हीएम यंत्रे हॅक केली,’ हादेखील या लोकांचा आवडता आरोप असतो. उद्या या लोकांच्याघरातल्या कुंड्यांतील रोपांना फुले आली नाहीत तरी ती मोदींमुळेच’, यापासून ‘ते ‘फनी’ चक्रीवादळ आले तेही मोदींमुळेच’, ‘दुष्काळ पडला तो मोदींमुळेच’ असले निरर्थक संबंध लावतानाही हे लोक दिसतील. पण, केवळ आरोप लावून काहीही होत नसते, त्यासाठीचे पुरावेही हाताशी असावे लागतात आणि कसोटीच्या प्रसंगी ते समोरही ठेवायचे असतात. हीच गोष्ट काँग्रेसींना वा विरोधकांना कधी जमत नाही. अहमद पटेल यांनी केलेला भाजपवरील आरोप असो वा राजीव गांधींच्या अवमानाचे म्हणणे असो, दोन्ही गोष्टीशी काँग्रेसचा अधिक संबंध आहे. शिवाय ‘मोदींनीच हे केले, मोदींनीच हे उकरून काढले’ असे म्हणणाऱ्यांनी आधी आपण या माणसाविरोधात काय काय ओकले, तेही पाहावे. स्वतःचे झाकून आणि दुसऱ्याचे वाकून पाहिल्याने काहीही साध्य होणार नाही. म्हणतात ना, अंतर्मनात डोकावून पाहा, तसे आता आधी काँग्रेसनेच करावे. स्वतःच्या बऱ्यावाईट कारवाया त्यांना नक्कीच आढळतील.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@