लोकसभा निवडणुकीतील नेत्यांची मुक्ताफळे...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2019
Total Views |

लोकसभा निवडणुकीचे पाच टप्प्यांतील मतदान आटोपले असून, आता फक्त शेवटच्या दोन टप्प्यांतील मतदान बाकी आहे. साध्या शब्दांत सांगायचे, तर लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा हत्ती गेला आणि शेपूट बाकी आहे. यावेळची निवडणूक अतिशय चुरशीची आणि अटीतटीची होत आहे. लोकसभेची ही पहिली नाही तर सतरावी निवडणूक आहे. प्रत्येकच निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र, यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने अतिशय खालची पातळी गाठली आहे. यासाठी नेमके कुणाला जबाबदार धरायचे, ते सांगता येणार नाही. एकाने अरे म्हटले की दुसर्याने कारे म्हणायचे असते, पण यावेळी एकाने अरे न म्हणताही दुसर्याने कारे म्हणणे सुरू केले आहे. युद्धात आणि प्रेमात सर्व क्षम्य असते, असे म्हणतात, त्यात आता निवडणुकीचाही समावेश करावा लागेल. तसे पाहिले तर यावेळची निवडणूक ही एकप्रकारचे युद्धच आहे.
यावेळच्या निवडणुकीत साधुुसंत आणि साध्वीही उतरल्या आहेत. रामायण आणि महाभारताचा उल्लेखही प्रचारात केला जात आहे. आतापर्यंत निवडणुकीत सुदैवाने कुणाचा बळी गेला नसला, हत्या झाली नसली तरी हत्येची तयारी दाखवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने आणि नेतृत्वात भाजपा यावेळची निवडणूक लढवत आहे. त्यामुळे संपूर्ण विरोधी पक्षानेही मोदी यांनाच ठरवून लक्ष्य केले आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे स्वयंघोषित दावेदार राहुल गांधी यांनी तर राफेल प्रकरणापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर ठरवून टाकले आहे. ‘चौकीदार चोर हैं’ असे राहुल गांधी सतत म्हणत आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधान मोदी यांनी बोफोर्स प्रकरणाचा उल्लेख करत, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर एक म्हटले, तर त्यामुळे कॉंग्रेसचा तिळपापड झाला.
मुळात याची सुरुवात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. राफेल प्रकरणावरून त्यांनी, आपल्याजवळ कोणतेही पुरावे नसताना पंतप्रधान मोदी यांना चोर ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. राफेल प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाल्याचे पुरावे असतील, तर राहुल गांधी यांनी ते संसदेत वा सर्वोच्च न्यायालयात सादर करावे, मोदी यांना दोषी सिद्ध करावे. पण, कोणतेच पुरावे नसताना सातत्याने कुणाला चोर ठरवणे योग्य नाही. पंतप्रधान झाल्यावर ‘मिस्टर क्लीन’ अशी प्रतिमा असलेले राजीव गांधी यांच्यावर बोफोर्स प्रकरणात दलाली घेतल्याचे आरोप झाले. त्यामुळे पंतप्रधानपदावरून पायउतार होताना त्यांची प्रतिमा ‘मिस्टर डाऊटफुल’ अशी झाली होती. मोदी यांनी हाच तर उल्लेख केला. मग यात कॉंग्रेसने भडकण्यासारखे काय आहे?
राहुल गांधी यांची प्रतिमा विचार करून बोलणारे अशी नाही, तर बोलून गेल्यानंतर आपण काय बोललो याचा विचार करणारी आहे. त्यामुळे ‘चौकीदार चोर हैं’ प्रकरणात त्यांना सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागावी लागली आहे. संपूर्ण देश मला पप्पू म्हणतो, अशी कबुली त्यांनी भर लोकसभेत दिली, पण देश आपल्याला पप्पू का म्हणतो, याचा विचार त्यांनी कधी केला नाही.
उलट, आपल्या वागण्या-बोलण्याने ते वारंवार आपले पप्पूपण सिद्ध करत असतात. जोपर्यंत राहुल गांधी यांनी पप्पूपणाचा अंगरखा पांघरला आहे, तोपर्यंत ते कॉंग्रेसचे अध्यक्ष तर राहतील, पण देशातील विश्वसनीय आणि प्रगल्भ असे नेते होऊ शकणार नाहीत. पंतप्रधानपद तर त्यांच्यापासून खूप लांब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाराणसी मतदारसंघात निवडणूक लढवण्याच्या वल्गना करणार्या, पण ऐनवेळी मैदानातून पळ काढणार्या कॉंग्रेसच्या महासचिव श्रीमती प्रियांका गांधी-वढेरा यांनी, पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख दुर्योधन असा केला आहे. दुर्योधनाला जसा अहंकार झाला, तसा अहंकार पंतप्रधान मोदी यांना झाला असल्याचे श्रीमती प्रियांका गांधी-वढेरा यांनी म्हटले आहे. महाभारताच्या वेळी जेव्हा भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाला समजवायला गेले, तेव्हा दुर्योधनाने त्यांनाच बंधक बनवण्याचा प्रयत्न केला, असे श्रीमती गांधी यांनी म्हटले.
 
आपल्या प्रतिपादनाच्या समर्थनार्थ त्यांनी महाकवी रामधारीिंसह दिनकर यांच्या कवितेतील ओळी वाचून दाखवल्या- ‘जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है, हरि ने भीषण हुंकार किया, अपना स्वरूप विस्तार किया, डगमग डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले, जंजीर बढाकर साध मुझे, हां हां दुर्योधन, बांध मुझे.’ अशा कठीण ओळी वाचून दाखवताना श्रीमती प्रियांका गांधी-वढेरा यांना दम लागला असावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुर्योधन संबोधताना श्रीमती प्रियांका गांधी-वढेरा यांनी संपूर्ण भाजपालाच कौरव सेना ठरवले आहे. भाजपा कौरव झाल्यामुळे आपोआपच कॉंग्रेस पांडव ठरली आहे. यावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी चोख प्रत्युतर दिले आहे. श्रीमती प्रियांका गांधी-वढेरा यांनी मोदी यांची तुलना दुर्योधनाशी केली आहे, मात्र दुर्योधन कोण आणि अर्जुन कोण हे 23 मे रोजी मतमोजणीनंतर समजून येणार आहे, असे शाह म्हणाले.
श्रीमती प्रियांका गांधी-वढेरा यांनी कॉंग्रेसला पांडव ठरवण्याचा प्रयत्न केला असला, तरी यच्चयावत कॉंग्रेस नेत्यांमधील एकही गुण पांडवांची आठवण करून देणारा नाही. स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंतच्या सर्व कॉंग्रेस नेत्यांची कृती कौरवांची आठवण करून देणारी आहे. देशातील लोकशाहीचे वस्त्रहरण कॉंग्रेसनेच केले आहे. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी श्रीमती प्रियांका गांधी-वढेरा यांची अप्रत्यक्षपणे पाठराखण केली आहे. मोदी यांच्यासाठी दुर्योधन असा चुकीचा शब्द वापरला, मोदी त्यापेक्षाही भयंकर आहेत, असे राबडीदेवींना म्हणायचे होते. मिसा भारती यांचा उल्लेख कुणी शूर्पणखा असा केल्यामुळे भडकलेल्या राबडीदेवी यांनी भाजपा आणि जदयु नेत्यांसाठी ‘गंदी नाली के किडे’ असा शब्द वापरला आहे.
 
 
देशात असे महाभारत सुरू असताना, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामायण घडवले आहे. बंगालमध्ये रामाचे नाव घेताच ममता बॅनर्जी यांना संताप अनावर होतो. रामाचे नाव घेणार्या लोकांना पकडण्यासाठी ममता बॅनजीं त्यांच्या मागे धावत असल्याचा व्हिडीओ आला आहे. हा व्हिडीओ खरा की खोेटा ते समजू शकले नसले, तरी ममता बॅनर्जी यांची वाटचाल पाहता तो खरा असल्याचे जाणवते. ममता बॅनर्जी यांना रामाच्या नावाची एवढी चीड का? यामुळेच ममता बॅनर्जी रावणाच्या वंशातील तर नाही ना, असा संशय येतो.
 
 
 
ममता बॅनर्जी यांची गेल्या काही महिन्यांतील वागणूक पाहता, त्यांचे नाव बदलले पाहिजे, असे वाटते. कारण त्यांच्या वागण्याबोलण्यात कुठेच ममता दिसत नाही, तर संताप आणि सूडच दिसतो. आपण काय करतो, काय बोलतो, याचे ममता बॅनर्जी यांचे भान सुटत चालले आहे. ममता बॅनर्जी आधी अशा नव्हत्या, मात्र आपल्या हातातील सत्ता चालल्याचे पाहून त्या बेभान झाल्यासारख्या दिसत आहेत. मोदी खोटे बोलतात, ते दंगेखोर आहेत, त्यांना लोकशाहीची थप्पड मारायची माझी इच्छा आहे, अशी मुक्ताफळे ममता बॅनर्जी यांनी उधळली आहेत. कॉंग्रेसचे दुसरे नेते संजय निरुपम, मोदी यांना औरंजेब ठरवत आहेत. कॉंग्रेस आणि अन्य पक्षांच्या नेत्यांच्या अशा बरळण्याला भाजपाच्या नेत्यांनाही त्याच भाषेत उत्तर द्यावे लागत आहे, ही आणखीनच व्यथित करणारी बाब आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही, असा आम्ही आपल्या देशाचा मोठ्या अभिमानाने आणि गौरवाने उल्लेख करतो; पण या देशातील नेत्यांची भाषा ऐकली की असे लोक आपले नेते आहेत, या लोकांना आपल्याला निवडून द्यावे लागते, याची लाज वाटू लागते. निवडणुकीत कुणी िंजकेल, कुणी हारेल, मात्र नेत्यांच्या अशा विधानाने आमची लोकशाही वारंवार पराभूत होत आहे, याची जाणीव सगळ्यांनी ठेवण्याची गरज आहे.
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@