जव्हार, मोखाड्यातील शाळांमधील मुलांना सुट्यांमध्ये शालेय पोषण आहार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2019
Total Views |



पालघर : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या धर्तीवर दुर्गम भागातील जव्हार व मोखाडा तालुक्याच्या शाळांमधील मुलांना सुटीतही शालेय पोषण आहार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपचे आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रामनाथ मोते यांच्या प्रयत्नानंतर शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

 

पालघर जिल्ह्यात यंदा प्रथमच दुष्काळ पडला. त्यानुसार तलासरी, विक्रमगड आणि पालघर तालुक्यात गंभीर दुष्काळाची घोषणा करण्यात आली. मात्र, त्यातून जव्हार व मोखाडा तालुक्याला वगळण्यात आले होते. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आदिवासी मुलांची शालेय पोषण आहारावर मोठी मदार आहे. दुष्काळग्रस्त भागातील शाळांमध्ये सुटीच्या काळातही शालेय पोषण आहार वाटप केले जाते. मात्र, जव्हार व मोखाडा तालुक्यातील मुले वंचित राहत होती. विशेषत या दोन्ही तालुक्यातील सर्वाधिक गावांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. या पार्श्वभूमीवर दोन्ही तालुक्यांनाही शालेय पोषण आहार द्यावा, अशी मागणी आमदार डावखरे व रामनाथ मोते यांनी केली होती.

 

या विषयांबरोबरच विविध प्रश्नांसंदर्भात आमदार डावखरे यांनी पालघरमध्ये गुरुवारी बैठक घेतली. या बैठकीत शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांचे शालेय पोषण आहाराच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर आमदार डावखरे यांनी जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत जव्हार व मोखाडा तालुक्याचा समावेश झाला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर या तालुक्यातील मुलांना सुटीच्या काळातही शालेय पोषण आहाराबरोबरच अन्य सवलती देणार असल्याचे सांगितले. जव्हार, मोखाड्याबरोबरच वसई तालुक्यातील ३५ गावांमधील मुलांनाही शालेय पोषण आहाराचा पुरवठा होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@