बंगाली जादू चालेना!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2019
Total Views |


 


बंगालला स्वत:ची अशी एक अस्मिता नक्कीच आहे. मुसलमानांचे लांगूलचालन करणाऱ्या कुठल्याही पक्षाच्या महिला नेतृत्वाने आजतागायत बुरखा घालून हिंडण्याचे उद्योग केलेले नाहीत. या बाईंनी मतांच्या आशेने तेही केले. आता त्याची फळे मिळण्याची वेळ आली आहे.


“आम्ही बंगालसाठी खूप काम केले. २०११ पासून टीएसीने जालगडसाठी काम केले. आता भाजपचा या भागात दिसायला लागणारा प्रभाव हा धक्कादायक आहे.” एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्याने व्यक्त केलेली ही चिंता आहे. ही चिंता व्यक्त करायला लागण्याचे मुख्य कारण आहे, बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा वाढणारा प्रभाव. जालगडव्यतिरिक्त असे कित्येक भाग आहेत, जिथे भाजपचा प्रभाव विस्मयकारकरित्या वाढतच आहे. वस्तुत: भाषा, स्थानिक नेतृत्वाचा अभाव, संघटनेचे अपुरे बळ असे अडसर असतानाही भाजप का वाढते, हा एकमेव प्रश्न आता बंगालमध्ये निर्माण झालेला दिसतो. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर असलेला हा प्रश्न कधी नव्हे तो, त्यांच्या नेतृत्वासमोरही वाकुल्या दाखवित उभा आहे. ‘वाकुल्या’ हा शब्द कदाचित प्रौढ वाटणार नाही. परंतु, ज्या प्रकारच्या नेतृत्वाकडे आज बंगाल आहे, तिथे तर्ककुतर्क काहीच न चालता ममता बॅनर्जींचा विक्षिप्तपणा चालतो. ही स्थिती जालगडचीच नसून उर्वरित बंगालमध्येही अशीच स्थिती आहे. तृणमूल काँग्रेसचे काही बालेकिल्ले वगळले, तर बाकी सर्वत्र ‘मोदी मोदी’चा गजर ऐकू येऊ लागला आहे.

 

लालगडसारख्या सीपीआय- सीपीएमप्रेरित ठिकाणीसुद्धा आता तृणमूलला डाव्यांसोबत नव्हे, तर भाजपबरोबर सामना करावा लागत आहे. हे असे भाग आहेत, ज्या ठिकाणी ज्योती बसूंच्या नेतृत्वाखाली निरनिराळी आंदोलने झाली आणि काँग्रेसची सत्ता डाव्यांनी उलथवली. आता याच इतिहासाची पुनरावृत्ती होते का, हे पाहाणे बंगालमध्ये लक्षणीय ठरेल. बंगालमध्ये फारसे प्रभावी स्थानिक नेतृत्व नसताना भाजप का वाढते, या प्रश्नाचे उत्तर एकदम सोपे आहे. ते दडले आहे नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्त्वात. संपूर्ण देशाला कवेत घेणारे हे एकमेव नेतृत्व, ज्याने भाजपच्या परंपरागत मतदाराला खुश केलेच आहे, पण त्याचबरोबर नव्या मतदारालाही तितक्या दमदारपणे भाजपकडे आकर्षित केले आहे. मग प्रश्न उरतो तो ममता बॅनर्जींचा. डाव्यांची चाळीस वर्षांहून अधिक असलेली सत्ता उलथवून टाकणाऱ्या या बाईंवरचा बंगाली जनतेचा विश्वास हळूहळू उडू लागला आहे. याचे मूळ कारण काय, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. खरंतर विकासाला फारशी अनुकूल नसली तरीही डाव्यांची राजवट बंगालने मनापासून स्वीकारली होती. देशभरात डाव्यांचे किल्ले एकामागोमाग एक कोसळले, तरीही पश्चिम बंगालचा बालेकिल्ला शेवटपर्यंत कायम होता. तो अभेद्य किल्ला कोसळवून टाकण्याचे काम केले ते ममता बॅनर्जींनी! असे असताना दहा वर्षांत असे काय घडले की, बंगाली जनतेला त्या नकोशा झाल्या आहेत?

 

बंगालला स्वत:ची अशी एक अस्मिता आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र यांसारख्या मोठ्या राज्यांना जशी एक तिखट अस्मिता आहे, तशी ती बंगाललासुद्धा आहे. नावडणाऱ्या गोष्टीचा निषेध ही तर खास बंगाली तर्‍हाच! ममता बॅनर्जी या बंडखोर स्वभावाच्या भावनिक गरजेला एकदम भावल्या आणि त्या बंगाली जनतेच्या भावविश्वाच्या प्रतीक झाल्या. वाजपेयींच्या काळात केंद्रात मंत्रिपद भूषविलेल्या या बाईंनी तसे स्वत:चे बरे नाव कमावले होते. बंडखोरी आणि आततायीपणा या दरम्यान एक सूक्ष्म रेषा असते. ती ओलांडली की, आततायी आणि आक्रस्ताळेपणाचे दर्शन घडायला सुरुवात होते. ममता बॅनर्जींकडे ज्या आस्थेने लोकांनी राज्य सोपवले, त्या आस्थेलाही गेल्या काही काळात तडे गेले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, ममतांनी आळविलेले मुस्लीम लांगूलचालनाचे राग. केवळ मुस्लीम नाही, तर ‘धर्मांध मुसलमानांच्या हितसंबंधांचे रक्षण करणारी राजकारणीअशी ममतांची गेल्या काही दिवसांतली प्रतिमा आहे. मालदाची दंगल असो किंवा दुर्गापूजेच्या विसर्जन मिरवणुकीवर घातलेली मनाई, हे सगळे बंगाली जनतेला न आवडलेले विषय. बंगालला एक स्वत:चा म्हणून चेहरा आहे. यात रवींद्रनाथ टागोर आहेत, विवेकानंद आहेत, सुभाषचंद्र बोसही आहेत. या जनतेला बुरखा घालून इफ्तार पार्ट्यांना जाणारी मुख्यमंत्री भावत नाही. मुस्लीम लांगूलचालन ही खरतर काँग्रेसची मक्तेदारी. फरटोप्या किंवा गोलटोप्या घालून एकमेकांना घास भरवितानाची छायाचित्रे हेच आजपर्यंतचे सेक्युलॅरिजमचे प्रमाणपत्र होते. अगदी इंदिरा, सोनिया, मायावती किंवा अगदी परवा परवा राजकारणात पद घेऊन सक्रिय झालेल्या प्रियांका गांधींनीसुद्धा हे कधीच केले नाही. या बाईंनी मात्र सगळ्याच सीमा ओलांडल्या. सत्ता आणि हट्टीपणा यात आंधळ्या झालेल्या ममता बॅनर्जींना कोण सांगणार?

 

स्वत: फारसा धार्मिकतेकडे ओढा नसलेला बंगाली मतदार ममता बॅनर्जींच्या विरोधात गेला, तो त्यांच्या या बुरखा प्रकरणामुळेच. ममताच असे वागायला लागल्यानंतर धर्मांध मुल्ला-मौलवींनाही चेव आल्याचे गेल्या दोन-तीन वर्षांत बंगालमध्ये पाहायला मिळाले. यातल्या कितीतरी मुल्ला-मौलवींची भाषणे आपल्याला समाजमाध्यमांवर पाहायला मिळतात. बांगलादेशी घुसखोर असो किंवा रोहिंग्ये, ममता बॅनर्जी आपल्या एकगठ्ठा मुस्लीम मतांवर लक्ष ठेऊन काहीही बरळत राहिल्याचे आम बंगाली जनतेने पाहिले. हे सगळेच आता ममता बॅनर्जींच्या अंगाशी आले आहे. ममता आपल्या धार्मिक अनुनयाला कसलाही मुलामा देतील; पण नंतर त्यांनी आपल्यातले हिंदू प्रेम दाखवायला ज्या सभा केल्या किंवा ज्या घोषणा दिल्या, त्या अत्यंत नाटकी आणि हिडीस होत्या. यामुळे त्यांच्यातल्या दांभिकतेवरही चांगलाच प्रकाश पडला. जातीधर्माच्या राजकारणापलीकडे संपूर्ण देशात जे विकासाचे पर्व सुरू झाले, ते ममतांच्या आक्रस्ताळी नेतृत्वामुळे बंगालपर्यंत पोहोचू शकले नाही. आता बंगाली जनतेलाही ते कळून चुकलेले आहे. हे सगळे अस्मिता किंवा भावनिक मुद्दे बाजूला ठेवले असले तरीही बंगालची फारशी प्रगतीही झालेली नाही. ज्या ठिकाणी एकेकाळी डाव्यांचे कार्डहोल्डर युनियन बनवून दादागिरी करायचे, ती जागा तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे उद्योगधंदे बंगालपासून दूरच राहिले. नॅनोची सिंगूर कथा जाहीरच आहे. ममतांच्या काळात त्यात फारसा काही बदल घडू शकला नाही. पर्यायाने बंगाली युवावर्गाच्या हातात निराशेशिवाय फारसे काही उरलेले नाही. लोकसभेच्या या निवडणुकीत नरेंद्र मोदींची जादू चालेल. मात्र, ज्या ममता बॅनर्जींकडे बंगाली जनतेने मोठ्या आशेने आपले राज्य सोपविले होते, त्याच ममतांना नाकारण्याची, सपशेल नाकारण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@