उद्धव ठाकरेंनी दिली होती बाळासाहेबांना घर सोडून जाण्याची धमकी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2019
Total Views |



खासदार नारायण राणेंच्या आत्मचरित्रात करण्यात आला दावा


मुंबई : नारायण राणेंना पक्षात ठेवलंत, तर मी घर सोडून जाईन, अशी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना धमकी दिल्याचा दावा नारायण राणेंच्या आत्मचरित्रातून करण्यात आला आहे. खासदार नारायण राणे यांचे आत्मचरित्र सध्या प्रकाशनाच्या वाटेवर असून सध्या याची काही पाने व्हायरल झाली आहेत. एका वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाच्या दाव्यानुसार राणे यांच्या आत्मचरित्राची काही पाने आमच्या हाती लागल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

राणेंच्या आत्मचरित्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना टार्गेट करण्यात आले आहे. आपल्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडावे लागल्यामुळे मनोहर जोशींचा माझ्यावर राग होता. त्यामुळेच जोशी उद्धव ठाकरेंच्या जवळचे झाले असाही आरोप या आत्मचरित्रातून करण्यात आल्याचा दावा या वृत्तवाहिनीने केला आहे. यासोबतच त्यांनी आपल्या आत्मचरित्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दलही खुलासा केला आहे. २००५ साली राज माझ्यासोबतच शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करणार होते, असा उल्लेख त्यांनी केला आहे.

 

खासदार नारायण राणे यांनी राज ठाकरे यांच्याबद्दलच्या किस्सा आत्मचरित्रात सांगितला आहे. "उद्धव ठाकरे यांच्यामुळे पक्षात माझी घुसमट होत आहे. नवे नेतृत्व पक्ष सांभाळण्यास अकार्यक्षम आहे. तुम्ही नवा पक्ष स्थापन करावा." हा संदर्भ देताना राणे म्हणतात राज यांच्या कार्यशैलीविषयी मी ओळखून आहे. त्यांच्यासोबत भविष्यात काम करण्याचा विचार मी करेन. नारायण राणे यांच्या कॉंग्रेस प्रवेशानंतर राज ठाकरे यांनीही आपला पक्ष स्थापन केला. राणे यांना त्यावेळी ३८ आमदारांचा पाठींबा होता. बाळा नांदगावकर यांनाही त्यावेळी राणेंसह जाण्याचा विचार केला होता. मात्र, १३ आमदारांनीच केवळ राणेंबरोबर कॉंग्रेस प्रवेश केला.

 

दरम्यान, शिवसेना का सोडली याचे कारण आपल्या आत्मचरित्रात सांगणार असल्याचे राणेंनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे राणेंच्या या आत्मचरित्रातून अनेक गोष्टीचा उलगडा होणार असून काही दिवसातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या आतमचरित्राचे प्रकाशन करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@