लिबरलांची गोची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2019
Total Views |
 



उत्तर प्रदेशातल्या जागा कमी होतीलहा प्रवाद मोदीविरोधकांना सुखावणारा असतो. मात्र, त्याचवेळी बंगाल व ओडिशामध्ये वाढणार्‍या जागा यांना अस्वस्थ करून जातात.

 

२०१९ची निवडणूक मोठ्या मजेशीर वळणावर येऊन पोहोचली आहे. २०१४च्या तुलनेत मतदानाचा टक्का फारसा घसरलेला नाही. निवडणुकीचा निकाल काय असेल, याचा अंदाज बहुदा सगळ्यांना आलेलाच आहे. जय-पराजय, प्रस्थापित सरकारविरोधी भावना, त्यातून मिळणारा संभाव्य फायदा, त्यावर विरोधकांपेक्षा अधिक चर्चा करणारे मोदीद्वेष्टे तथाकथित विचारवंत, वाहिन्यांतल्या नोकर्‍या गमावल्याने मुक्त माध्यमांवर गरळ ओकत फिरणारे आजी-माजी संपादक या सगळ्यांचीच मोठी पंचाईत झाली आहे. या देशाचा कौल कोणता आणि तो कसा पडतो, यावर चर्चा खूप झाली आहे. या देशात लोकशाही कशी रुजेल? असा प्रश्न त्यावेळी स्वत:कडे ‘लोकशाहीचे मक्तेदार’ म्हणविणार्‍या लोकांना पडला होता. आज ‘ब्रेक्झिट’ सोडविताना त्यांची स्थिती आणि अमेरिकेची स्थिती पाहिली की, आपल्या देशात लोकशाही रुजविल्याचा त्यांचा समज किती खोटा आणि तकलादू होता, हेच लक्षात येईल.

भारतीय जनमानसाची नाडी ओळखणे तसे अवघडच
! राजकीयदृष्ट्या कधीही एकसंघ नसलेला हा देश उपासनापद्धती निरनिराळ्या असल्या तरीही सांस्कृतिकदृष्ट्या कमालीचा एकसंघ आणि परस्परांविषयी सहिष्णू होता. या सांस्कृतिक वस्त्राचे उभे-आडवे धागे समजलेला सध्याचा राजकारणी म्हणजे नरेंद्र मोदी. मोदींनी गंगाआरती करण्याची पद्धत सुरू केली आणि राजकीयदृष्ट्या कधीही एकसंघ नसलेल्या या देशात सर्वदूर एक संदेश पोहोचला की, हा माणूस ‘आपला’ आहे. गंगेच्या आरतीत सुखावलेले मोदी भारतीय जनमानसाला खूप भावले. या आधी असे वागण्याचे धाडस करणे म्हणजे स्वत:ची राजकीय कारकीर्दच संपविण्यासारखे होते. मोदींनी ही जिकिरीची वाट स्वीकारली आणि यशस्वीही करून दाखविली. धर्माच्या नावाखाली निवडणुकीचे ध्रुवीकरण करण्याचा आरोप नवा नाही. पण, मग मोदींनी तळ्यात मळ्यातही केले नाही. बालीश आरोप करणारे राहुल गांधी, काहीही बोलले तरी खोटेच वाटणारे पवार, सतत कशावर तरी डाफरत कजागपणा करणार्‍या ममता किंवा मायावती; या सगळ्या गोंगाटात मोदी वेगळेच दिसतात ते यामुळेच. या सगळ्या गदारोळातही मोदींनी स्वत:चे एक अनुभवविश्व सिद्ध केलेच. ‘चोर’, ‘खुनी’, ‘नरराक्षस’, ‘मौत का सौदागर’ अशी विशेषणे मोदींना चोवीस तास चालणार्‍या वृत्तवाहिन्यांवर वारंवार लावली गेली. इतक्या वेळी ऐकल्यावर एखाद्याला स्वत:विषयीही सांगितले जात असलेले खोटेही खरे वाटायला लागते. माध्यमांच्या या कोलाहलातही मोदी हरविले नाहीत. त्याचे खरे कारण त्यांनी स्वत:पासून दूर ठेवलेली ‘ल्युटंट दिल्ली.’

 

या देशातली बहुविधता चकीत करायला लावते, तसेच वर्गवादावर चर्चा करून स्वत:चा वेगळा वर्ग करून शाळा करणार्‍यांचेही कौतुक करावे, तेवढे थोडेच. ‘ल्युटंट दिल्ली’ अशाच एका वेगळ्या वर्गाची मक्तेदारी. तुम्हाला छान इंग्रजी बोलता येत नसले, रंगीत पेल्यांचे चषक परस्परांना भिडवत हास्यविनोद करता येत नसले आणि येत असले तरी या कंपूत जर तुम्हाला स्थान नसेल, तर मग तुम्हाला ही मंडळी ‘त्यांचा’ मानतच नाहीत. ‘त्यांचे’ मानले नाही तर काय असा फरक पडतो, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. पण, तुम्ही राज्य करण्यासाठीदेखील कसे नालायक आहात, हेदेखील देशाला पटवून दिले जाऊ शकते. मोदींनी या सगळ्यांना फाट्यावर मारले आणि आपला प्रवास आखून घेतला. मुळात कुणाच्याही नसलेल्या दिल्लीवर राज्य होते ते याच मंडळींचे. आज या सगळ्यांसमोर मोठा प्रश्न आहे तो म्हणजे ‘पुढे काय?’

दिल्लीच्या वर्तुळात एक चर्चा चांगलीच रंगली आहे आणि ती म्हणजे, या ‘ल्युटंट दिल्लीतल्या तथाकथित विचारवंत आणि त्यांच्या वाहनचालक आणि नोकरांमधील संवादाची. सर्व्हे, इंग्रजी वर्तमानपत्रात छापून येणारे लफ्फेदार लेख, त्यातली तज्ज्ञांची मते हे सगळे वाचूनही मोदींचा वारू कसा रोखला जात नाही, याचे उत्तर मिळत नाही. ‘उत्तरेत जागा कमी होतील’ हा सध्या चाललेला चर्चेचा विषय ताजा असला आणि त्यामुळे हे लिबरल बिरबल सुखावले असले तरी बंगाल, पूर्वोत्तर राज्ये, ओडिशा यांसारख्या ठिकाणी लोकांचा मतदानाचा उत्साह आणि ‘मोदी मोदी’चा जप पाहिला की, मंडळींना पुन्हा चक्रावल्यासारखे होते. घरी बॅग घेऊन येणार्‍या त्यांच्या डॉक्टरांनाही या आजारावर औषध सापडेनासे झाले आहे. माणूस जितका जास्त शिकतो, तितकाच तो गोंधळांनाही आमंत्रण देत असतो. आपला कॉमन सेन्स कायम राहावा म्हणून आपल्या वाहनचालकांना किंवा नोकरांना ही मंडळी आता सल्ले विचारू लागली आहेत. या अचानक आलेल्या संकटाला तोंड द्यायचे आणि आपले मत इतके महत्त्वाचे आहे, हे त्या वाहनचालकांनाही आताच कळू लागले आहे. रिक्षावाल्यांच्या मताची जशी एक लाट या देशात निवडणुकीत येत असते, तशीच ही लाट मानावी लागेल. २०१४ ने या देशातल्या अनेक गोष्टींचे बुरखे फाडले. २०१९ उरल्यासुरल्या सफाईचे कामही करणार आहे. ‘पुरस्कारवापसी’ करण्यापासून बाकी सगळे उद्योग करूनही या देशातल्या जनमानसात कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला दिसत नाही, हे या मंडळींना कळून चुकले आहे. जे सामान्य जनाला कळते, ते स्वत:ला ‘विचारवंत’ म्हणवून घेण्यात धन्यता मानणार्‍यांना कळत नाही, हीच या विचारवंतांची शोकांतिका आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@