‘मोदी विरुद्ध मोदी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2019   
Total Views |




ही निवडणूकमोदी विरुद्ध मोदी’ झाली. यातले कोणते मोदी खरे, याचा निर्णय जनतेने दिलेला आहे आणि २३ मे रोजी तो जाहीर होईल. हा निर्णय होत असताना काय काय घडले, याचा आढावा घेणे, लाभदायक आहे.

 

लेखाचे शीर्षक वाचून तुम्ही बुचकाळ्यात पडले असाल. ‘मोदी विरुद्ध मोदी’ हा शब्दप्रयोग काही माझा नाही. २०१८ सालीच याच शीर्षकाचा एक लेख ‘बिझनेस लाईन’मध्ये श्रिया मोहन या लेखिकेच्या नावाने प्रकाशित झालेला आहे. माझ्या मनात ‘मोदी विरुद्ध मोदी’ हे शीर्षक आले, तेव्हा हा लेख काही मी वाचलेला नव्हता. इंटरनेटवर शोेधताना तो मला सापडला. लेख ‘हिंदू’ दैनिकात प्रकाशित झालेला आहे. ‘हिंदू दैनिक’ मोदी समर्थक नाही आणि नावात ‘हिंदू’ असले तरीही हिंदू समर्थक नाही. त्याचे संपादक कम्युनिझमची भांग पिऊन बसलेले असतात. त्यामुळे अशा लेखात मोदीच मोदींच्या विरुद्ध कसे आहेत, हे डाव्या युक्तिवादाने लेखकाने मांडलेले आहे. परंतु, माझा तसा काही उद्देश नाही.

 

लोकसभा निवडणुकांची पाचवी फेरी पार पडत आहे. शेवटच्या टप्प्यात निवडणूक प्रवेश करीत आहे. या संपूर्ण निवडणूक प्रचाराचा मुख्य विषय कोणता होता - पंतप्रधानपदी मोदी हवेत की मोदी नकोत. ‘मोदी हवे’ असणार्‍यांनी मोदींची प्रतिमा उभी केली आणि ‘मोदी नको’ म्हणणार्‍यांनी मोदींची दुसरी प्रतिमा उभी केली. या अर्थाने ही निवडणूक ‘मोदी विरुद्ध मोदी’ झाली. यातले कोणते मोदी खरे, याचा निर्णय जनतेने दिलेला आहे आणि २३ मे रोजी तो जाहीर होईल. हा निर्णय होत असताना काय काय घडले, याचा आढावा घेणे, लाभदायक आहे.

 

मोदी नको’ म्हणणार्‍यांच्या आघाडीवर होते, राहुल गांधी. त्यांनी एक घोषणा दिली, ‘चौकीदार चोर है.’ गांधी परिवाराचे जे हुजरे आहेत, ते सोडून अन्य कोणालाही ही घोषणा आवडली नाही. देशाचा पंतप्रधान चोर आहे, असा त्याचा अर्थ झाला. ज्यांनी घोषणा दिली, तो ‘साव’ नाही. ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ या प्रसिद्ध कथेतील तो अलिबाबाची औलाद आहे. बोफोर्सच्या चोरीमुळे त्याच्या पिताजीचे पंतप्रधानपद गेले, हा इतिहास जाणणारे लोक अजून जीवंत आहे. त्याच्या आईचा नातेवाईक कात्रोजी पैसा घेऊन पळाला, त्याला वाचविण्यासाठी गांधी घराण्याने खूप प्रयत्न केले. पकडण्यापासून तो वाचला, पण देवाच्या फासापासून तो काही वाचला नाही. तो दोन वर्षांपूर्वी मेला.

 

मोदी कसे नालायक आहेत, राहुल गांधींच्या भाषणाचा हाच मुख्य विषय राहिला. गाजावाजा करून गरिबांना वर्षाला ७२ हजार रुपये देण्याची घोषणा केली. परंतु, निवडणुकीचा प्रचार या घोषणेवर झालाच नाही. सामान्य मतदारांपर्यंत ‘७२ हजार रुपये’ हे शब्ददेखील पोहोचले नाहीत. राफेल संबंधीचा दुसरा मुद्दा राहुल गांधींनी काढला. “खेड्यापाड्यातील माणूस विचारतो की राफेल हे कसले रॉकेल आहे? त्याला राफेलशी काही घेणे-देणे नाही.” अधूनमधून राहुल गांधी पंतप्रधानांना आव्हान देत राहतात की, “माझ्याशी जाहीर वादविवाद करा.” मात्र, नरेंद्र मोदी राहुल गांधींच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाहीत. त्यामुळे राहुल गांधींना वाटतं की, ‘राजा मला भ्याला, माझी टोपी दिली, ढुमढूम ढूमाक’ शाळेतील उंदराची ही गोष्ट आहे.

 

देशात एकटे राहुल गांधीच नरेंद्र मोदींच्या विरोधात आहेत, असे नाही. प्रादेशिक नेत्यांचीही काही कमी नाही. ममता बॅनर्जी सांगतात की, “२३ मे नंतर नरेंद्र मोदी यांना ‘रसगुल्ला’ मिळेल. मी त्यांची राजकीय कारकीर्द समाप्त करून टाकणार आहे.” शरदराव पवार म्हणतात की, “मोदी हे धोकादायक राजकारणी आहेत. ते पुन्हा पंतप्रधान झाल्यास राज्यघटना धोक्यात येईल.” मायावतींचा एकच अजेंडा असतो की, “मोदी दलितविरोधी आहेत.” हाच राग त्या सतत आळवीत बसतात. यांचे सर्व डावे भाट वेगवेगळे पिल्लू सोडून देत असतात- मोदींनी संवैधानिक संस्था धोक्यात आणल्या आहेत, मोदी हुकूमशहा आहेत, देशात आणीबाणीसदृश्य परिस्थिती त्यांनी निर्माण केली आहे, ते लोकशाहीला धोका आहेत, ते धर्मांध राजकारण करतात, देशात असहिष्णुता खूप वाढली आहे, विकास काही झाला नाही, हीच लांबण आणखी वाढविता येईल... पण, तुम्ही कंटाळाल म्हणून थांबतो.

 

महाराष्ट्रात ज्यांना कोणी फारसे विचारत नाही, ते पृथ्वीराज चव्हाण म्हणतात,“मोदी पंतप्रधान होणार नाहीत. अन्य भाजपचा कोणताही पंतप्रधान बनू शकत नाही.” डॉ. मनमोहन सिंग यांची कीर्ती ‘कळसुत्री पंतप्रधान’ अशी जशी आहे, तशी ते ‘श्रेष्ठ अर्थतज्ज्ञ’ आहेत अशीदेखील आहे. ते म्हणतात,“मोदींची पाच वर्षे त्रासदायक, विनाशकारी असल्यामुळे त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला पाहिजे.” कळसुत्री पंतप्रधानाने अर्थशास्त्राचा इतका अनर्थकारी अर्थ करू नये, त्यांच्या कीर्तीला तो शोभा देत नाही. सारे जग म्हणतं की, भारत झपाट्याने आर्थिक प्रगती करीत चाललेला आहे. विकासाचा दर आठ टक्क्यांपर्यंत पोहोचलेला आहे. शेअर बाजार अत्यंत तेजीत आहे. ‘मोदी विरुद्ध मोदी’ सामना अशा प्रकारचा आहे. एक आहे भावात्मक मोदी, ज्यांनी जन-धन योजना सुरू केली, गावागावांत शौचालये उभी केली. ‘मेकिंग इंडिया’ आणि ‘मेड इन इंडिया’ची विषयसूची राबविली. आरोग्य सेवा सुरू केली.


गरीब घरांना गॅस मिळवून दिला. सामान्य लोकांना परवडणार्‍या किंमतीत घरे उपलब्ध करून दिली. प्रचंड प्रमाणात रस्तेबांधणी केली. विकासाचे लाभ सामान्य माणसांपर्यंत पोहोचविले. मनमोहन सिंग काय म्हणतात याला काहीही किंमत राहत नाही. खेड्यापाड्यातील सामान्य शेतकरी काय म्हणतो, त्याला मात्र मनमोहक किंमत आहे. चंद्रपुरात मतदान होते, तेथील जो उमेदवार आहे, तो अनेकांना आवडलेला नाही. असे प्रत्येक उमेदवारांबाबत असते, त्यात नवीन काही नाही. एक सामान्य खेडूत गावच्या भाषेत म्हणतो (ते इथे देता येणार नाही) त्याचा अर्थ असा की, “हा उमेदवार मत देण्याच्या लायकीचा नाही, पण मी मोदींना मत देणार आहे.” दक्षिण मुंबई हा मुंबईतील श्रीमंतांचा भाग समजला जातो. तेथील एक मतदार घरी आपल्या पत्नीला म्हणतो, “शिवसेनेच्या उमेदवाराला मत देणार नाही, त्याऐवजी काँग्रेसला मत देईन.” त्याची पत्नी रागावून म्हणते,“तुम्हाला काही समजतं की नाही, काँग्रेसला मत म्हणजे राहुल गांधीला मत, तुम्ही राहुल गांधीला मत देणार?” तो मतदार म्हणतो,“मी मतदान केंद्रात गेलो आणि धनुष्यबाणावर शिक्का मारून आलो.”

 

मोदी विरुद्ध मोदी’ या सामन्यात ‘राहुल गांधींचे मोदी’ पराभूत होताना दिसत आहेत, लोकांनी ते स्वीकारलेले नाहीत. ते कसे स्वीकारलेले नाही, याचा आणखी एक किस्सा सांगतो. सानपाड्याहून ‘उबेर’ने घरी गेलो. ड्रायव्हरला त्याचे बील दिले. ड्रायव्हर मला म्हणतो,“पंतप्रधान कौन बनेगा?” मी त्याला म्हटले,“आपके युपीवालोने गठबंधन कर मोदी को पराभूत करने का बीडा उठाया है।” तो रागावून मला म्हणाला,“भाईसाहब, दस कुत्ते कभी शेर का शिकार कर सकते है क्या? ऐसा कभी हुआ है क्या?” ‘चौकीदार चोर है’ याला एका सामान्य टॅक्सी ड्रायव्हरने दिलेले हे उत्तर आहे.

 

सगळ्या विरोधी पक्षांची, काँग्रेस पक्षाची, राहुल आणि प्रियांका गांधी यांची सगळ्यात मोठी अडचण ही झालेली आहे की, त्यांना मोदी विरुद्ध आणखी कोणी दुसरा उभा करता आला नाही. प्रियांका गांधींनी गर्जना केली की, मी वाराणसीतून निवडणूक लढविणार, पण नंतर त्यांनी माघार घेतली. न लढताच रणांगण सोडले. राहुल गांधी अमेठीबरोबर वायनाडमध्ये उभे आहेत. अमेठीतून जिंकण्याचा त्यांना विश्वास नाही. शरद पवार म्हणाले की, “चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी, मायावती यापैकी कोणीतरी पंतप्रधान होईल.” राहुल गांधींना त्यांनी काही किंमतच दिली नाही. त्यामुळे ‘मोदींविरुद्ध कोण?’ याचे उत्तर काँग्रेसला शोधता आले नाही.

 

ही निवडणूक यासाठी मोदीकेंद्रित झाली. नकारात्मक प्रचार, खोटा प्रचार, दिशाभूल करणारा प्रचार स्वीकारायला तरुण तयार नाहीत. मुंबईतील मतदान केंद्राचा अनुभव असा आहे की, तरुण फार मोठ्या प्रमाणात मतदान करण्यास बाहेर पडला. तो राहुल गांधींची सोशल मीडियावरून कशी खिल्ली उडवत असतो, हे आपण पाहिलेले असेलच. कौशल्याने मोदींनी ही निवडणूक राष्ट्रवादावर नेली. राष्ट्रवादाचे प्रतीक म्हणून बालाकोटवरील हल्ला, त्याच्या अगोदरचे सर्जिकल स्ट्राईक हे विषय पुढे आणले. प्रज्ञासिंहला तिकीट देऊन ‘हिंदू दहशतवादा’ची भाषा करणार्‍यांचे थोबाड फोडले. या दोन्ही विषयांवर राहुल गांधी यांना सकारात्मक भूमिका घेता आलेली नाही. बालाकोट सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, म्हणजे देशभक्तीवर प्रश्न उभे करण्यासारखे झाले आणि ‘हिंदू दहशतवादा’वर बोलणे म्हणजे हिंदूकडून चपलांचा मार खाण्यासारखे आहे. राहुल गांधी यांच्या भाग्यात काय आहे, हे २३ मेनंतरच आपल्याला स्पष्ट होईल. ती त्सुनामी असेल की फनी वादळ असेल, याची आपण प्रतीक्षा करूया.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@