हे तर तुमच्याच कर्माचे फळ!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2019
Total Views |


 


आज पंतप्रधान मोदींनी राजीव गांधींबद्दलचे सत्य आणि तथ्य समोर आणले तर राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि चमच्यांनी बिथरण्याचे काहीही कारण नाही. कारण, घराण्याचे चिराग जो चिखल उडवण्याचा खेळ इतके दिवस करत आले, त्याला मोदींनी दिलेले हे प्रत्युत्तर आहे. राहुल गांधींनी आपण करून ठेवलेल्या कर्मांचे कांड पाहावे आणि कर्मसिद्धांत आपल्यालाच लागू होत असल्याची खात्री करून घ्यावी.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल केलेल्या थेट विधानानंतर तमाम काँग्रेसीजनांची भर उन्हाळ्यातडबल हिट’ मुळे जबरदस्त लाही लाही होत असल्याचे दिसते. तुमच्या पिताश्रींचा शेवट क्रमांक एकचा भ्रष्टाचारी म्हणून झाल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारच्या जाहीर प्रचारसभेत राहुल गांधींना उद्देशून केला. तद्नंतर आपल्या पिताश्रींच्या बचावासाठी आलेल्या दोन्ही खळीवाल्या पोरांसह घराण्याच्या निष्ठावंत गड्यांनी आणि आपला पक्षच भाड्याने दिलेल्या अध्यक्षानेही तत्काळ नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. गळ्यात जानवे वगैरे घालून ‘सिझनल हिंदू’ झालेल्या राहुल गांधींना तर कर्मसिद्धांत आठवला आणि “मोदी तुम्ही तुमच्या कृत्यांची फळे भोगायला तयार राहा,” असे ते म्हणाले, तर एका नेक आणि पवित्र व्यक्तीच्या हौतात्म्याचा नरेंद्र मोदींनी निरादर केल्याचे प्रियांका गांधींनी म्हटले. दादरच्या पोपटानेही “मोदींना देश कधीही माफ करणार नाही,” असे खरडले. वस्तुतः भारताच्या राजकीय इतिहासाचे ज्ञान आणि भान नसलेल्या काँग्रेस अध्यक्ष आणि त्यांच्या भगिनींनी राजीव गांधी केवळ आपले पिताश्री असल्यानेच त्यांना वाचविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न केल्याचे म्हणावे लागेल. सोबतच दुसऱ्याच्या घरचे पाणी भरणाऱ्या राज ठाकरेंनाही आज केवळ मोदीद्वेषापायी राजीव गांधी आणि काँग्रेसबद्दल उमाळा फुटल्याचे दिसते. आगामी विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने आघाडीत सामील करून घेऊन चार-दोन जागांची खैरात करावी, अशीही राज ठाकरेंची यामागे इच्छा असेल. दुसरीकडे मोदींनी वापरलेल्या ‘क्रमांक एकचा भ्रष्टाचारी’ या शब्दांचा अर्थ केवळ आर्थिक घोटाळेबाज, संरक्षण साहित्य खरेदीतील लाचखोर एवढ्यापुरताच मर्यादित नसून तो त्याच्याही पुढचा आहे.

 

भ्रष्टाचार म्हणजेच ‘भ्रष्ट आचार’ किंवा नियम, कायदा, संविधानसंमत आचरणाच्या विरुद्ध वागणे आणि हा ‘भ्रष्ट आचार’ काँग्रेसच्या सर्वच पंतप्रधानांनी वेळोवेळी केल्याचे देशाचा इतिहास तपासून पाहिल्यास समजू शकते. आताचा मुद्दा राजीव गांधींचा आहे, म्हणून तेवढ्यापुरताच विचार केल्यास पंतप्रधानपदी असताना त्यांनी भ्रष्ट आचारणाचे एकापेक्षा एक विक्रमच रचल्याचे पाहायला मिळते. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतरमहाकाय वृक्ष उन्मळून पडले की भूकंप होणारच,” असे शीख समुदायाविरोधात दंगल उसळलेली असताना बोलणारी व्यक्ती भ्रष्ट आचरण करणारी नव्हती तर काय होती? अशाप्रकारे आईच्या हत्येचा बदला घेण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना उकसवणारे राजीव गांधीच होते आणि नंतर दंगलीतील आरोपी असलेल्या काँग्रेसी कार्यकर्त्यांना, नेत्यांना पाठीशी घालून अधिकारपदे देणारेही तेच होते. विशेष म्हणजे, आपल्या पिताश्रींचा हाच वारसा कमलनाथ यांना मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी बसवून राहुल गांधीही पद्धतशीरपणे पुढे नेत असल्यानेबाप से बेटा सवाई’ म्हणीचा अनुभव घेताना देश सध्या दिसतो. १० ते १५ हजार भारतीयांचा बळी घेणाऱ्या भोपाळ वायुगळती कांडातील अ‍ॅन्डरसन नामक आरोपीला पळून जाण्यात मदत करणारेही राजीव गांधीच होते. भोपाळमधल्या प्रेतांचे रक्त राजीव गांधींच्या शरीरावर जरी उडाले नसले तरी ते या कृत्यामुळे त्यांच्या हाताला नक्कीच लागले होते. शहाबानो प्रकरणात एका मुस्लीम महिलेवर अन्याय होत असताना न्यायाची बाजू न घेता केवळ मतांच्या राजकारणापायी सर्वोच्च न्यायालयाचाही निर्णय फिरवणारे भ्रष्ट आचरण राजीव गांधींचेच होते. राजीव गांधींच्या या कारनाम्यांमुळे मोदींनी त्यांना भ्रष्ट आचरण करणारा पंतप्रधान म्हटले तर ते नक्कीच वावगे ठरत नाही.

 

राजीव गांधींच्या भ्रष्ट आचरणविषयक पुढचा मुद्दा येतो तो बोफोर्स तोफ घोटाळ्यासंदर्भात. इथे ‘मिस्टर क्लीन’ म्हणून कितीही गवगवा केला आणि बोफोर्स प्रकरणात पुरावे मिळाले नसल्याचे दिसत असले तरी इटालियन दलालाशी राजीव गांधींचे काय संबंध होते, हे कोणीही सांगू शकेल. सोबतच हे पुरावे का मिळाले नाहीत की मिळूच दिले नाहीत आणि कोणी हाही संशोधनाचा विषय आहे. शिवाय बोफोर्स व्यवहारातील दलाल असलेल्या क्वात्रोचीला देशाबाहेर पळून जायला मदत करणारे कोण होते, हेही सर्वांसमोर आहे. १९९१ साली श्रीलंकेत गेल्यानंतर दुर्दैवीपणे मृत्यू आलेल्या राजीव गांधींनी आपल्या निधनाआधी केलेली ही कृष्णकृत्ये कशी विसरता येतील? केवळ मृत्यू झाला म्हणूनच जर संबंधित व्यक्तीने केलेली गैरकृत्ये विसरायची असतील तर मग काँग्रेसींना हिटलर, स्टॅलिन, माओ, चर्चिलपासून लादेन, कसाब शेकडो, हजारो, लाखो लोकांचा बळी घेऊनही निर्दोषच वाटतील. हो, कोणीही राजीव गांधींच्या मृत्यूची खिल्ली उडवू नये, हे मान्यच, पण म्हणून त्यांनी इतिहासात केलेल्या चुकांचीही आठवण करता कामा नये, हे शक्यच नाही.

 

आता मोदींनी तेच केले, तर गांधी घराण्याच्या कित्येक गुलामांना त्यात विकृतीही दिसली. पण, मग नरेंद्र मोदींच्या आई, बाप, बायकोपासून खानदानाचा उद्धार केला गेला, तेव्हा आता मोदींच्या नावाने शिमगा करणारे कुठल्या बिळात लपले होते? गांधी घराण्याच्या पायजम्याचा नाडा आज मोदींनी खेचला, तर विकृती आठवणाऱ्या बुद्धिजीवी, विचारवंत लेखकांनाच राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाहीर सभेतून ‘माफीवीर’ म्हणून उल्लेख केल्यावर आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. गांधी घराण्याच्या झेल्यांनी हीच उकळ्यांची गुळणी तोंडात धरून ठिकठिकाणी सावरकरविरोधी पिंका टाकल्या, तेव्हा या लोकांना मोठा पराक्रम गाजवल्याचा आभास होत होता. अटल बिहारी वाजपेयींच्या मृत्युनंतरही काँग्रेस आणि समर्थक पक्ष, नेते, कार्यकर्त्यांनी वाजपेयींच्या मृत्यूने त्यांच्या मागील कर्मांचा हिशोब पूर्ण होत नाही, असली भाषा केली होती. हे शब्द ऐकून टाळ्या वाजवणारे कोण होते, काँग्रेसीच ना? इतकेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘फेकू’, ‘नीच’, ‘चोर’, ‘खून का दलाल’ आणि ‘मौत का सौदागर’सारखी हलकी विशेषणे लावताना सोनिया गांधींसकट सगळ्याच काँग्रेसींनी मानवी संस्कृतीचे परमोच्च टोक गाठले होते का? हाही प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच आज पंतप्रधान मोदींनी राजीव गांधींबद्दलचे सत्य आणि तथ्य समोर आणले तर राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि चमच्यांनी बिथरण्याचे काहीही कारण नाही. कारण, घराण्याचे चिराग जो चिखल उडवण्याचा खेळ इतके दिवस करत आले, त्याला मोदींनी दिलेले हे प्रत्युत्तर आहे. राहुल गांधींनी आपण करून ठेवलेल्या कर्मांचे कांड पाहावे आणि कर्मसिद्धांत आपल्यालाच लागू होत असल्याची खात्री करून घ्यावी.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@