जय श्री राम म्हणाल तर दीदी तुरुंगात पाठवतील : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-May-2019
Total Views |



कोलकाता : "ममता दीदींना रामाचे नाव घेणाऱ्यांचेही वावडे आहे. जे कोणी 'जय श्रीराम' म्हणत आहेत त्यांनाही ममता बॅनर्जी कैदेत टाकत आहेत," अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केली आहे.



 

नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगाल येथील तामलूक सोमवारी प्रचारसभेला संबोधित केले. फनी वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर सोमवारी पश्चिम बंगालमधील तामलूक येथे मोदींनी प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी ममता बॅनर्जी यांच्यावर त्यांनी कडाडून टीका केली.

 

फनी वादळासंदर्भातील चर्चेला ममतांची पाठ

फनी वादळानंतरच्या परिस्थितीची पाहणीसाठी मोदींनी एक बैठक बोलावली होती. बैठकीला ममता बॅनर्जींनी पाठ फिरवली. 'फनी वादळाबद्दल चर्चा करण्यासाठी मी दोनदा ममता बॅनर्जींना फोन केला. पण त्यांनी एकाही फोनचे उत्तर दिले नाही. त्यांचा फोन येईल अशी आशा होती पण त्यांनी परत फोनही केला नाही." असे मोदी म्हणाले.

 

पश्चिम बंगालमध्ये दडपशाहीचे राज्य सुरू

पश्चिम बंगालमध्ये टोळयांचे आणि दडपशाहीचे राज्य सुरू आहे, असे म्हणत मोदींनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. ते म्हणाले, "बंगालमध्ये आधी 'नामपंथी' सरकार होते. त्यानंतर डाव्यांचे वामपंथी सरकार आले. आता मात्र, बंगालमध्ये दडपशाही आणि गुंडशाहीचे सरकार आहे'. पंतप्रधान कार्यालयाच्या कोणत्याही पत्रांचे उत्तर ममता बॅनर्जी देत नसल्याचा खुलासाही मोदींनी केला.


"जय श्री राम म्हणणाऱ्यांची रवानगी तुरुंगात"

जय श्री राम म्हणत ममता बॅनर्जींसमोर जाणाऱ्यांना ममता दीदी तुरुंगात टाकत आहेत, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला आहे. लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान सोमवारपासून आहे. आणखी दोन टप्पे बाकी आहेत. यंदा सातही टप्प्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये मतदान होत असून भाजप राज्यभर जोरदार प्रचार करत आहे. त्यामुळे भाजप ममता दीदींच्या साम्राज्याला सुरुंग लावतात का याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. ममता बॅनर्जी यांनीही भाजपच्या विरोधात दोन हात केले आहेत.



 

 

प्रकरण नेमके काय ? 
 पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या 'जय श्रीराम'च्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांवर भडकल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ममतांचा ताफा जात असताना 'जय श्रीराम' च्या घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर ममता भडकल्या असल्याचा हा व्हिडिओ पश्चिम बंगाल भाजपच्या ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. मात्र, या व्हिडिओची चर्चा रंगल्यानंतर तृणमूल काँग्रेसने हा व्हिडिओ बनावट असून भाजप त्याच्या नेहमीच्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. मात्र, या व्हिडिओला भाजप कार्यकर्त्यांनी व्हिडिओद्वारेच उत्तर दिले आहे. 



 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@